Login

बहरलेली मैत्री

ईरा : लेखणीचा राचमार्ग

  विषय : गोष्ट छोटी डोंगराएवढी

    लघूकथा : बहरलेली मैत्री

    "  विनू चल ना रे खेळायला जाऊ ? " थोडा वेळ थांब हं ,..! गणेश बोलला.

     " अरेपण ,  सगळी मुलं वाट पहात आहेत आपली " विनू म्हणाला.

     " आईवडिलांना सांगून जावं लागतं बाबा मला ..! " गणेशने आपले स्पष्टच सांगून टाकले.

       बरं ,आज  क्रिकेटच्या खेळात धमाल करायची हं..! " तु आणि मी  एकाच टीममध्ये पाहिजे बाबा..!" असं गणेश आणि विनूचे संवाद दररोजचे चालू असायचे.दोघेही एककमेंकापासून क्षणभरही राहत नसत.शाळेत , खेळात , फिरायला , कुठे जाईल तिथं हि जोडगळी एकत्रच दिसायची.शाळेत दोघेजण अभ्यासात हुशार होते.दोघेही गुरुजींचे लाडके होते.कोणतेही काम सांगितले असता कधीही दोघांनी नकार दिला नाही.अज्ञाधारक आणि आदराने भारलेली ही विनू आणि गणेशची जोडी मित्रांच्यात फार रमायची.सगळ्यांना सामाऊन घेऊन खेळात रंगत आणायची व तासनतास खेळत राहायचे शेवटी या दोघांनाच मुलांना खेळात गुंंतवल्याबद्दल मुलांच्या आईवडिलांकडून बोलणी खावी लागत होती.पण याची कधीच विनू व गणेशने फिकीर केली नाही उलट त्यांना सगळ्यांना प्रोत्साहीत केले.यांचे शाळेचे दिवस आणि मारलेली मजा म्हणजे दोस्तीचा खरा आनंद होता.

      दोघांचे प्राथमिक शिक्षण दिमाखात  पार पडले.आपली शैक्षणिक चुणूक त्यांनी प्राथमिक स्तरावर दाखवली होती.खेळात आणि इतर कलाही त्यांनी जोपासल्या होत्या.गुरुजीँनाही विनू आणि गणेशकडून जीवनात नविन अपेक्षा होत्या तशी त्यांची वाटचाल सुरु होती.प्राथमिक शिक्षणात एकत्र असणारे विनू गणेश माध्यमिक शिक्षणासाठी जवळच्या शाळेत जाऊ लागले.तिथंही दोघं एकत्रच राहू लागले.अभ्यास ,खेळ, मौजमजा नव्या मित्रांची ओळख यात या जोडीने सा-यांचे लक्ष वेधले.यांच्या जीवलग मैत्रीची चर्चा सगळी होत होती.निरपेक्ष भावनेने मैत्री कशी करायची याचे उदाहरण येथील शिक्षक मुलांना देत असत.अभ्यासात आणि खेळात चमक दाखवल्यामुळे त्यांची सर्वत्र वाहवा होत होती.माध्यमिक शाळेत गणेशला धवल यश मिळाले.विनूला पण यश मिळाले पण गणेशपेक्षा कमी गुण मिळाले.पण विनूने गणेशला खूप शुभेच्छा दिल्या.गणेशनेही विनूला शुभेच्छा देऊन " पुन्हा तु नव्या जोमाने उभारी घेशील " अशी ग्वाही दिली.दोघांचे सर्वत्र कौतुक झाले.दोस्तीची चर्चा झाली.चांगल्या संगतीने यश मिळवता येते हे विनू आणि गणेशच्या मैत्रीवरुन सर्वांना समजले होते.

       माध्यमिक शिक्षणानंतर  वाटा बदलतात.ज्याच्या त्याच्या ईच्छा वेगळ्या असतात त्यामुळे निराळ्या क्षेत्रात करियर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असतात.विनूने  घरच्यांना शेती व इतर कामात मदत होण्यासाठी जवळच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.गणेशचा कल इंजिनियमध्ये होता त्यामुळे त्यांने कोल्हापूरमध्ये महाविद्यालयात प्रवेश घेतला.आता दोघांचे शिक्षण वेगवेगळे होते.अनेकवर्ष एकत्र घालवलेले क्षण , गप्पा , खेळ , दंगामस्ती  हे सारे आठवले की विनू आणि गणेश भारावून जात होते.पण आपण एकमेकांना भेटत राहू व आपली मैत्री अशीच चिरंतन टिकवू हा ध्यास दोघांनिही घेतला होता.त्यादृष्टीने ते सुट्टीत भेटत असत.गप्पा मारत , गावात फिरायला जात , जुन्या मित्रांना भेटत.आपुलकीने त्यांनी आपली माणूसकी जिवंत ठेवली होती.दोघेही असेच भेटत व आपल्या मैत्रीला उजाळा देत होते.मन आणि भावना यांची सुरेख गुंफण म्हणजे यांची मैत्री होती.

        विनूचे कॉलेज पूर्ण झाले होते.शेती आणि दुग्धव्यवसाय यामध्येही त्यांने ब-यापैकी जम बसवला होता आणि तो यातच समाधान मानत होता.गणेशने इंजिनियरची पदवी मिळवली होती.हुशार असलेमुळे त्याची चांगल्या कंपनीत निवड झाली.गणेश पुण्याला मोठ्या कंपनीत नोकरीला लागला.उत्तम नियोजन कष्ट , जिद्द आणि अनुभव यामुळे त्याची आॕफीसर म्हणून नेमणूक झाली.चांगले पगाराचे पॕकेज मिळाले आणि गणेश जीवनात स्थिरस्थावर झाला.परंतू तो विनूला विसरला नव्हता.वेळोवेळी तो विनूला फोन करुन चौकशी करत होता.अडचणीच्या वेळी गणेश विनूला आर्थिक मदत करत असत.विनूही गणेशला आपल्या शेतातील धान्य , फळे देत असत.पुण्याहून घरी आल्यावर योग्य पाहुणचार करुन  आपले मैत्रीचे नाते त्यांने अबाधित ठेवले होते.

     दोघेही  जीवनात आनंद लुटत होते.दोघांच्यात बरीच परिपक्वता आली होती.संसारात रमण्यासाठी त्यांची लग्नाची तयारी सुरु होती.विनूला आपल्याच नातलगातील मुलगी वधू म्हणून घरच्यांनी आणली होती.नातेसंबध टिकावे व आणखी मजबूत होण्यासाठी घरातील मंडळीनी हे पाऊल उचलले होते.विनूने ते आनंदाने कबूल करुन सुखाने संसार सुरु केला होता.अगदी सर्वांच्यात मिळूनमिसळून वागून कुटुंबात विनूने आपला ठसा उमटवला होता.ज्यावेळी घरातील मंडळींचा मैत्रीचा विषय निघत तेंव्हा " तुमच्या मैत्रीने आम्हालाही जीवन जगायचे शिकवले "  हे उदगार ऐकून विनूला आपल्या संस्कारक्षम मैत्रीचा अभिमान वाटे.गणेशने आपले चार हात केले.सुशिक्षित मुलीला घरी आणून संसाराचे योग्य धडे दिले.सर्वांना आदराची वागणूक द्यायच्या सूचना आपल्या पत्नीला दिल्या.अल्पावधीतच गणेशची पत्नी कुटुंबात रमली.अवघे कुटुंब आनंदाने नांदू लागले.गणेशचे कुटुंब विनूच्या घरी येई.आनंदाने गप्पा होत.जेवणावर येथेच्छ ताव मारुन गणेश प्रसन्न होऊन घरी येई.घरी विनूच्या कुटुंबाची  स्तुती होत.हे पाहून कधी गणेशही विनूला आपल्या पुण्याच्या घरी नेत असत.अलिशान गाडीतून अनेक ठिकाणी पर्यटन करुन विनूला सारे जग दाखवत असत.अत्यंत समाधानाने विनू गावी परतत असत. मैत्रीचे भावबंध विनू व गणेशने अत्यंत तन्मयतेने गोंजारले होते.त्याची गोड फळे ते स्वतःही चाखत होते पण इतरांनाही त्याचा वेगळा आदर्श देत होते.आईवडिलांचे संस्कार , गुरुजनांचा आदर्श , व्यावहारिक ज्ञान , शैक्षणिक ओढ , सकारात्मक विचार , सामाजिक भान ,  कुटुबवत्सल मन , दूरदृष्टीकोन , समरसता , मिळूनमिसळून वागण्याची तयारी , प्रत्येकाला मदतीचा हात देण्याची भावना या सगळ्या गुणांचा परिपाक म्हणजे " विनू आणि गणेशची मैत्री होती." दोघेही मैत्रीच्या या रंगात खूप रंगले होते.नेहमीच्या ,  येणंजाणं,  देणंघेणं चालूच होतं.सुखाने बहरलेली ही मैत्री दोघांना मनस्वी आनंद देत होती.

      दैनंदिन जीवन जगत असताना अशा कांही घटना घडतात आणि जीवनाला वेगळी कलाटणी मिळते अशा घटना त्या नात्याचे महत्व आधोरेखित करतात.गणेशचे जीवन आनंदात चालले होते.मुले , पत्नी , कुटुंब , मित्रमंडळी यामध्ये गणेश छान रमाला होता.अचानक एकदिवस आपली फोरव्हिलर घेऊन तो पुण्याच्या बाहेर फिरायला निघाला होता.मुलं आणि सोबत पत्नी होती.कामावरुन त्याला थकवा आला होता तरीही त्यांने फिरायला जायचे ठरवले होते.अत्यंत कौशल्याने गणेश गाडी चालवत होता संध्याकाळची वेळ होती अचानक अनोळखी वाहनाने गणेशच्या गाडीला  वेगाने धडक दिली.धडक बसाताच गणेशची गाडी दूर फेकली गेली गाडीला जोरदार अपघात झाला होता.गणेशची पत्नी आणि मुले ओरडत होती.गणेश बेशुद्ध पडला होता.गणेशच्या पत्नीला व मुलांना जास्त मार लागला नव्हता.गणेशची पत्नी घाबरलेली होती.पण तीने धाडसाने तेथील लोकांना विनंती करुन गणेशला पुण्यात दवाखान्यात अॕडमिट केले.डॉक्टरांनी सर्व चिकित्सा करुन मेंदूला मार लागला असलेमुळे आॕपरेशन करणे गरजेचे आहे असे सांगितले.गणेशची पत्नी भयंकर काळजीत होती तीने ताबडतोब गणेशचा मित्र विनूला फोन लावला.विनूला अपघाताची सविस्तर माहिती दिली आणि लगेच विनू गणेशकडे आला.गणेशला बेशुद्ध अवस्थेत पाहून विनूचे मन राहवेना.लगेच त्यांने डॉक्टरांची भेट घेतली आणि " कांही करा पण माझ्या मित्राला वाचवा " असा विनू डॉक्टरांना विनवनी करत होता.डॉक्टरांबरोबर चर्चा करुन गणेशचे तातडीने आॕपरेशन केले.सारी पैशाची जमवाजमव व लागेल ती तयारी विनूने केली होती.आॕपरेशन झाल्यानंतर विनू गणेशजवळ थांबला होता.त्याची सगळी सेवा तोच  करत होता.गोळ्या , औषधे खाणंपिणं तोच बघत होता.त्याला बरं वाटल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हती.रात्रभर तो जागाच असायचां." त्याला  जेंव्हा बरं वाटेल तेंव्हा मला समाधान मिळेल "  यासाठी तो देवाकडे रोज धावा करत होता.आता हळूहळू गणेशची तब्बेत सुधरत होती. समोरची माणसे तो ओळखत होता.बोलत होता.अचानक त्याची नजर गणेशकडे जाते , " अरे , गणेश तु आणि इथं ? " 

    " होय , गणेश मला तुझी बातमी समजली आणि मी लगेच आलो." 

      "  तू लवकर बरा व्हावा हिच माझी इच्छा आहे."  विनू म्हणाला.

     " तुम्हा सर्वाच्या व डॉक्टरांच्या कृपेने बरा होईन."  गणेश बोलला.

    गणेशमध्ये भरपूर फरक पडला होता.डॉक्टरांनी योग्य उपचार केलेमुळे गणेश पूर्णपणे बरा झाला होता.गाणेशच्या पत्नीने आता सुस्कारा सोडला होता.गणेश बरा होत आहे त्याबद्दल तीने देवाचे व गणेशचा मित्र विनूचे मनोमन आभार मानत होते.अखेर डॉक्टरांनी गणेशला महिनाभर उपचार करुन बरे केले.डॉक्टरांनी विनूच्या अगाध मैत्रीबद्दल विनूचे कौतुक केले.एक तपस्वी मैत्री जीवनाला आधार देते हे डॉक्टरांनी स्वतः पाहिले होते.हसता खेळता गणेश गप्पा मारत होता डॉक्टरांना नमस्कार करत होता.त्याला नवीन जीवन मिळाल्याचा आनंद वाटत होता.त्यांने आनंदाने पत्नी आणि मुलांना अलिंगन दिले.सारेजण खूश होते.समोरच विनू उभा होता .." मित्रा , तुझ्या आधाराने मी पुन्हा उभारी घेऊ शकलो " असे म्हणून विनूला गणेशने घट्ट मिठी मारली आणि हंबरडा फोडला.

  " संकटकाळात मित्राने साथ द्यायची नाही तर कोण देणार ..! " " तू नव्या जिद्दीने जीवन सुर कर माझी साथ तुला सदैव असेल " असे म्हणत विनूने त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसत धीर दिला.गणेश पूर्ण बरा झाल्याचे समाधान विनूच्या चेहऱ्यावर दिसत होते.लहाणपणापासून मैत्रीचे नाते निभावलेले असताना अशा कठीण प्रसंगात आपली मैत्री उपयोगात आली याचा  त्याला मनापासून आनंद झाला.गणेशने पूर्वीसारखे आपले जीवन सुरु केले.आणखी उत्साहाने त्याने गरुडभरारी घेतली मोठ्या कंपनीचा  मालक झाला.प्रसिद्धी त्याच्या पायाशी लोळण घेऊ लागली.पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने आपल्या बालमित्र विनूला कधीच विसरले नाही.गणेशने नवी कंपनी घेतली होती.प्रदिर्घ एरियात दिमाखदार सोहळा रंगणार होता.हजोरो माणसांची गर्दी होती.या शानदार कार्यक्रमात विनूला खास आमंत्रण होते." मित्रत्व  " या कपनीचे उद्घाटन गणेशचा मित्र विनूच्या हस्ते थाटामाटात करण्याचे नियोजन होते.ते अत्यंत रोमहर्षक पद्धतीने झाले आणि मित्रांना मित्रांने दिलेली साथ अजरामर झाली.सगळीकडे विनू आणि गणेशच्या आश्वासक मैत्रीची चर्चा रंगू लागली.मैत्री असावी तर अशी ..!!

    विनू आणि गणेशने लहाणपणापासून मैत्री केली.बालपण , प्राथमिक व माध्यमिक शिक्षण , नोकरीचा टप्पा , कौटुंबिक जीवन , संकटकाळ अशा विविध टप्यातील ही मैत्री बहरत चाललेली दिसली.मैत्रीची भावना मनात सजग ठेवली तर मैत्री फुलते व त्यामुळे जीवन सुखकर होते.

अशी असावी मैत्री 

  ती परस्परांना देईल जगण्याची खात्री…!!

      

         ©®नामदेवपाटील