बघू पुढे काय होईल ते...भाग ११

एक कथा


बघू पुढे काय होईल ते…भाग११
मागील भागावरून पुढे…

आनंद सुधाकरला त्या होलसेल व्यापाराकडे घेऊन गेला. होलसेल व्यापाराची सुधाकरला ओळख करून दिली.. सुधाकर म्हणाला ,

"साहेब मी नवीनच धंदा सुरू करायचा विचार करतोय तर त्याच्यासाठी मला जे रॉ मटेरियल लागेल ते तुम्ही मला किती दिवसांच्या उधारीवर देऊ शकता?"

"हे बघा सुधाकर साहेब आनंदने तुमच्याबद्दल मला सगळं सांगितलं आहे. अशा अडचणीच्या वेळेला आम्ही नेहमीच मदत करत असतो. अचानक नोकरी गेली तरी तुम्ही न घाबरता नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय यांचा मला फार आनंद झाला. व्यवसायामध्ये पडायचा विचार फार कमी लोक करतात. एखादा असता तुमच्या जागी तर तो नोकरी शोधत बसला असता पण तुम्ही व्यवसाय करताय ही खूप आनंदाची गोष्ट आहे. " व्यापारी म्हणाला

"हे खर आहे साहेब पण सगळ्यांना पैशाचं पाठबळ लागतं ना." सुधाकरने मुख्य अडचण सांगितली.

"तुम्ही त्याची चिंता करू नका तुमचं फूड लायसन्स निघायचं ना अजून?" नेमचंदने विचारलं.

" हो साहेब. म्हणूनच म्हटलं फूड लायसन्स निघाल्यावरच मी तुमच्याकडून सामान घेईन." सुधाकर.

"असं करा तुम्ही फुड लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करा. ते काही जास्त दिवस लागत नाही. फूड लायसन्स मिळालं की मग तुम्ही स्टिकर्स छापून घ्या. त्याच्यावर तुम्ही कोणतं नाव देणार आहे तुमच्या बिझनेसला ते नाव आणि त्याच्या खालोखाल वजन, पॅकिंगची तारीख असं ते सगळं छापून घ्या."


यावर आनंद म्हणाला

" सुधाकर दादा माझा एकजण ओळखीचा आहे. तो सगळे स्टिकर्स वगैरे छापून देतो. आणि मी त्याला सांगितलं आहे. तो आपल्याकडून दोन हप्त्यात पैसे घेईल. त्याची तुम्ही काळजी करू नका."

सुधाकर यावर म्हणाला,

"सगळं व्यवस्थित होईल असं समजायला हरकत नाही. पण आधी काय करू ?" सुधाकरने नेमचंदलाच विचारलं.

यावर तो होलसेल व्यापारी नेमचंद म्हणाला,

" हे बघा आधी प्लास्टिकच्या पिशव्या असतात ना ज्याच्यात तुम्ही पहिले सॅम्पल साठी पीठ किंवा मसाले द्याल त्या दुकानदाराचे नाव देतो. त्याला माझं नाव सांगा. तो तुम्हाला बरोबर रेट लावेल. आधी छोट्या पिशव्या व अर्ध्या किलोच्या पिशव्या घ्या. तुम्ही सुरुवातीला सगळीकडे सॅम्पलच द्याल. तुम्ही माझ्याकडून जे सामान्य न्याल त्याची सगळी पीठं किंवा मसाले जे काय करणार असाल ते तयार करून घ्या. जसं सॅम्पल आवडल्यावर ऑर्डर आली की अर्ध्या किलोच्या पिशव्या वापरा." नेमचंद म्हणाला.

"ठीक आहे सर तुम्ही जसं सांगता तसंच मी करीन. मी फक्त एवढेच म्हणीन की फूड लायसन्स आल्याशिवाय मी तुमच्याकडचा माल उचलणार नाही कारण तुम्ही महिन्याभराची मुदत देणार तर महिन्या भराची मुदत आत्ताच संपून जाईल." सुधाकरने स्पष्टीकरण दिलं.

" ठीक आहे नं. काय घाई आहे? तुमचं सगळं होऊ द्या आणि मग या. मग मी तुम्हाला सगळं सामान देतो." नेमचंद व्यापारी म्हणाला

"बर साहेब मला खूप बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून." सुधाकर मनापासून नेमचंदला म्हणाला.

असं सुधाकर म्हणाल्यानंतर त्या व्यापा-याला शेकहॅंड करून सुधाकर आणि आनंद दुकानाच्या बाहेर पडले. सुधाकर आनंदला म्हणाला,

" आनंद खरच रे मागच्या जन्मी काहीतरी मी पुण्य केला असेल म्हणून तुझ्यासारखा मित्र मिळाला की जो मला या सगळ्या गोष्टीची माहिती देतो आहे. हे तर मला काहीच माहिती नव्हतं. मी आपला दहा ते पाच काम करणारा माणूस."

"सुधाकर दादा तुम्ही नका चिंता करू.मी आणि मुकेश तुमच्याबरोबर कायमचे आहोत. मी उद्या माझ्या मोहोल्यातून दोन-तीन बायकांना घेऊन येतो. त्यांच्याशी तुम्ही बोलून घ्या. जेव्हा आपण माल उधारीवर आणू तेव्हा त्यांना कामाला बोलवू." आनौद म्हणाला.

" ठीक आहे. तू बघून घे. पण मला विश्वासू बायका हव्यात. कारण त्या घरात बसून काम करणार. घरांमध्ये इरावती आहे. तिची तब्येत अशी आहे." सुधाकर काळजीने म्हणाला.

"ती चिंता नका करू. माझ्या ओळखीच्याच बायका मी घेऊन येणार. बाकी दुसऱ्या कोणालाही विचारणार नाही. त्या अतिशय नीट नेटक्या आणि स्वच्छ राहतात अशाच बायकांना घेऊन येईन." आनंद

"ठीक आहे. मग मी निघतो." सुधाकर म्हणाला.

" निघा तुम्ही सुधाकर दादा. मी पण आपल्या पानठेल्यावर जातो." आनंद म्हणाला.

आनंद आपल्या पानठेल्यावर आला तेव्हा मुकेश त्याची वाटच बघत असतो. आनंद आल्या आल्या मुकेश ने आनंदला विचारलं,

"काय रे झाली का भेट? झालं का साहेबांचं काम?" मुकेशच्या स्वरातील अधीरता लपत नव्हती.

"हो झालं. आज साहेबांनी मला सांगितलं बर का… ते म्हणाले की मुकेश आणि तू दोघांनी मला दादा म्हणायचं. कारण मी साहेब होतो मी आता साहेब नाही त्यामुळे तुम्ही मला आता दादा म्हणायचं." आनंद

" अरे खरच आहे रे किती कठीण परिस्थिती आली त्यांच्यावर आपण त्यांना मदत केलीच पाहिजे." मुकेश म्हणाला यावर आनंद म्हणाला

"मुकेश आपण कसेही करू पण आपण त्यांचा व्यवसायात नीट जम बसेपर्यंत त्यांना मदत करत राहू. तू असं कर तुझ्या भावाला पेपरच्या स्टॉलवर बसव. मी माझ्या चुलत भावाला सागरला घेऊन येतो.तो बसेल पानठेल्यावर. मी काकांना सांगतो की माझा पानठेला काही दिवस सागरला सांभाळू द्या. आपण दोघे जितकी मेहनत घेता येईल सुधाकर दादांच्या बिझनेस साठी तेवढी घेऊ." आनौद

" खरं बोललास तू.आपण त्यांना नक्कीच मदत करू. आता सध्या काय परिस्थिती आहे?"मुकेश ने सगळं जाणून घेण्यासाठी प्रश्न केला.

"अरे…आता उद्या त्यांना म्हटलं आहे की फूडलायसन्स साठी अप्लाय करू. उद्या मी सकाळी त्यांच्या घरी जाईन आणि त्यांच्या लॅपटॉप वरून फूड लायसन साठी अप्लाय करून देईन त्या साइटवर. मग सगळी कागदपत्र जमा करून देऊ. एक आठवडा फारतर लागेल फूड लायसन्स मिळायला. ते मिळालं की माझा मित्र नाही का रे रवी… तो सगळे स्टिकर्स वगैरे छापून देतो."

" हा.. हा.. तो तुझ्या मोहल्यामध्ये राहणारा." मुकेश म्हणाला.

"हो.. हो तोच. त्याच्याकडे मी दादाला घेऊन जाणार आहे. मग जसे पाहिजे तसे स्टिकर्स आपण त्याच्याकडून छापून घेऊ. मी त्यालाही म्हटलं की दादा इन्स्टॉलमेंट वर पैसे देतील कारण सध्या त्यांच्याकडे पैसे नाहीत. तर तो तयार झाला आहे." आनंद

" हे बरं झालं आनंद. तुझ्या ओळखीमुळे हे काम लवकर आणि जरा स्वस्तात होईल." मुकेश म्हणाला.

" नेमचंद व्यापारी म्हणाले की आधी छोटी सॅम्पलची पाकिट घ्या आणि अर्धा किलोची पाकीट घ्या. त्यांनी ती पाकीटं विकणा-या दुकानदाराचे नाव आणि नंबर दिला आहे. त्याला नेमचंदचं नाव सांगायचं आहे म्हणजे तोही सुधाकर दादांकडून एकदम पैसे घेणार नाही आणि दरसुद्धा वाजवी लावेल मी ती सॅम्पलची पाकीटं एकदोन दिवसांत घेऊन येईन." आनंदने मुकेशला सविस्तर सांगीतलं.

"आनंद कामासाठी बायका कुठे बघितल्यास का?" मुकेश ने महत्वाचा प्रश्न आनंदला विचारला.

" हो. आमच्या मोहल्ल्यातच आहे ना. एक शांता मावशी आहे, तिची मैत्रीण आहे वंदना आणि तिची बहीण राजश्री आहे. या तिघी माझ्या ओळखीच्या आहेत आणि भरवशाच्या बायका आहेत. तिघींना घेऊन जाईन मी उद्या सुधाकर दादांना भेटायला म्हणजे ते बोलून घेतील. पण दादा म्हणाले की सध्या तरी मी त्यांचे पगार देऊ शकणार नाही." आनंदने सांगीतलं.

" याची कल्पना त्या बायकांना आधी दे. पैशाचा प्रश्न आहे. सगळं स्पष्ट बोललेले बरं. त्या तयार झाल्या तर…त्यांना सुधाकर दादांकडे घेऊन जा." मुकेश म्हणाला.

" हो तसंच करणार आहे.आज संध्याकाळी जाईन त्यांच्याकडे. तश्या त्या तिघी पैशासाठी अडून बसणारं नाहीत. माझ्या ओळखीचं काम आहे म्हटल्यावर नाहीच अडून बसणार." आनंद म्हणाला.

" हे सगळं खरं असलं तरी तू स्पष्टपणे त्या तिघींशी बोल. एकदम त्यांनी पैशाचा विषय ताणून धरला तर सुधाकर दादा अडचणीत येतील. दादांनी आत्ता पैसे देणं शक्य नाही असं सांगितलं आहे तर तू स्पष्ट बोल."

" हो. बोलीन. तुझं झालं का जेवणं?" आनंदने मुकेशला विचारलं.

" जेवणारच होतो तेवढ्यात तू आला.चल दोघंही जेऊ." मुकेश म्हणाला.नंतर दोघंही पानठेल्यातच उभ्या उभ्या जेवले.

****
सुधाकर घरी आल्यावर इरावतीने विचारलं

" भेटला का तो व्यापारी?" इरावती

" हो.आनंदने त्यांना आधीच माझ्याबद्दल सगळं सांगितलं होतं त्यामुळे त्यांनी माल ऊधारीवर द्यायला खळखळ केली नाही.तो व्यापारी आनंदच्या पानठेल्यावर नेहमीच येत असतो त्यामुळे बरं झालं. ओळखीने काम झालं. आता फूड लायसन्स आधी काढावं लागेल. ते मिळालं की मग स्टीकर्स छापावी लागतील. आपण नाव काय ठेवायचं आपल्या व्यवसायाचं?"

सुधाकर ने इरावतीला विचारलं.

"आजच मी एक नाव वाचलं बाळासाठी. मला खूप आवडलं." इरावतीच्या लाजत लाजत बोलण्याने सुधाकरला हसू आलं.

"अगं आपलं बाळ यायला खूप अवकाश आहे. आधी आपल्या व्यवसायाचं बाळ येईल. त्याचं नाव काय ठेवायचं?" सुधाकर ने हसतच इरावतीला विचारलं.

" मला जे नाव आवडलं ते सांगू?" बालीशपणे इरावतीने प्रश्नं केला.

" सांग. नंतर व्यवसायासाठी कोणतं नाव ठरवायचं तेही सांग." सुधाकर म्हणाला.

"मला आपल्या बाळासाठी आणि व्यवसायासाठी दोन्ही साठी हेच एक नाव आवडलं." इरावती

" कोणतं?"

" ऋषी…" डोळे मिचकाऊन इरावती म्हणाली. सुधाकर इरावतीच्या या विभ्रमाकडे चकीत होऊन बघू लागला.

" असं काय बघताय?" लाजून इरावती म्हणाली.

" तुला ऋषी हे नाव इतकं आवडलं आहे का?" सुधाकर ने विचारलं.

" हो. बाळासाठी आणि आपल्या कामासाठी
दोन्ही साठी."


इरावती हळूवारपणे म्हणाली. सुधाकरला वाटलं ऋषी हे नाव इरावतीला आवडणं म्हणजे हे सुद्धा तिचे डोहाळे असू शकतात. डोहाळे हा शब्द डोक्यात आल्यावर सुधाकर मनोमन आनंदला. कारण तो बाबा होणार याचा आनंद त्यांच्या मनात ऊचंबळून आला.

" आपण ऋषी हेच नाव ठेऊ. खूष…?" सुधाकर हसत म्हणाला.

" हो." इरावती लाजली.


" मग माझ्यासाठी छान चहा कर.हा आनंद सेलीब्रेट करू." सुधाकर इरावतीकडे बघून डोळे मिचकावत म्हणाला. इरावती एक मुरका मारून स्वयंपाक घरात चहा करायला गेली. सुधाकरच्या चेह-यावर आनंद पसरला.
__________________________
क्रमशः बघू पुढे काय होईल ते…भाग११
सुधाकर ला मदत करण्यासाठी चांगल्या बायका मिळतील? बघू पुढील भागात.
लेखिका…मीनाक्षी

🎭 Series Post

View all