बघू पुढे काय होईल ते... भाग ८

एक प्रेम कथा


बघू पुढे काय होईल ते… भाग८

मागील भागावरून पुढे…

आज ऋषी बाबांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा काम करण्यासाठी म्हणून आला. त्यांच्या व्यवसायाचे एवढं मोठं स्वरूप ऋषी आज जाणीवपूर्वक बघत होता. फॅक्टरीच्या वरच्या मजल्यावर मोठं ऑफिस बघून ऋषीला खूप नवल वाटलं. ऋषी विस्फारलेल्या डोळ्यांनी कंपनीच्या नावाची लिहिलेली पाटी बघत होता. \"ऋषी इंटरप्राईजेस\" केवढं सुंदर वाटत होतं त्याला आपल्या नावाची पाटी बघून. तो इतका डोळे फाडफाडून वर बघत होता की त्याच्या पाठीवर त्याच्या वडिलांनी सुधाकरने थाप दिली आणि म्हंटलं

"काय…! आज ऋषी एंटरप्राईजेसला खरा खरा ऋषी भेट देतोय. कसं वाटतंय?"

आपल्या नावाचा बोर्ड बघून ऋषीचे डोळे ओलावले होते. तो सुधाकरला म्हणाला

"बाबा केवढे कष्ट घेतले हो तुम्ही एवढं सगळं निर्माण करायला." ऋषी

" हे बघ ऋषी कष्ट करावेच लागले कारण परिस्थितीच तशी होती." सुधाकर म्हणाला.

" बाबा मला फार काही आठवत नाही. पण तुम्ही हा व्यवसाय जेव्हा सुरू केला तेव्हा तुम्हाला काय अडचणी आल्या? त्या अडचणी तुम्ही कशा सोडवल्यात? आणि हा व्यवसाय एवढा मोठा करेपर्यंत तुम्ही किती कष्ट घेतले हे सगळं मला जाणून घ्यायचे आहे. बाबा तुमचा इथपर्यंतचा प्रवास माझी ऊर्जा असणार आहे. तुमचे कष्ट, तुमची मेहनत माझ्यासाठी ऊर्जा ठरणार आहे. म्हणून बाबा हे सगळं तुम्ही मला सांगा."


सुधाकरचे डोळे पाणावले. आपले डोळे पुसत सुधाकर म्हणाला…

" ठीक आहे ऋषी आज संध्याकाळी आपण जरा बाहेर जाऊया. असं करू आज आपण डिनर प्लॅन करूया. तिथे तुला सगळं सांगतो."

"डिनर… बाबा आईला सुद्धा घेऊन जाऊ."

"इरावतीला घेऊन जायचच आहे. कारण ह्या पूर्ण प्रवास मध्ये इरावती प्रत्येक क्षणी माझ्याबरोबर होती. त्याचमुळे मी एवढी मोठी झेप घेऊ शकलो. त्यामुळे आम्ही दोघं तुला सांगू आमच्या आयुष्याचा प्रवास. एक काम करतो मी आत्ता सामंतांना सांगतो आणि टेबल रीझर्व करायला लावतो."

"ठीक आहे." ऋषी म्हणाला.

सुधाकर आणि ऋषी ऑफिसमध्ये शिरले.

***


ऑफिसमध्ये शिरल्या शिरल्या सगळ्यांनी सुधाकर आणि ऋषी दोघांनाही गुड मॉर्निंग केलं. सगळ्यांना खाली बसायला सांगून सुधाकर बरोबर मध्ये उभा राहिला ऋषीच्या खांद्यावर हात ठेवून. ऋषीला मनातून खूप खूप आनंद व्हायचा जेव्हा सुधाकर ऋषींच्या खांद्यावर असा हात ठेवायचा.


सुधाकर म्हणाला…

" सगळ्यांनी ऐका आज पासून ऋषी आपल्या ऑफिसला जॉईन करतोय.ऋषी आता काय काय डिपार्टमेंट सांभाळेल याची यादी आता तुम्हाला मिळेल. त्याच्याशी कनेक्ट असणाऱ्या सगळ्यांनी आता रिपोर्टिंग ऋषीला करायचं."
ऑफिसमध्ये सगळ्यांनी ऋषीला वेलकम केलं.

एवढी ओळख करून देऊन सुधाकर ऋषीला आत आपल्या केबीनमध्ये आला

"ऋषी आठ दहा दिवस तू माझ्याच केबिनमध्ये बस. त्यानंतर तुझ्यासाठी बाजूची जी खोली आहे तिथे तुझी केबिन करणार आहे. "

" चालेल. मला सध्या बसून काम करायची नाही. सगळे विभाग बघायला हवे." ऋषी म्हणाला.

" हो.मी सामंतांना सांगतो."

सुधाकर ने सामंतना फोन लावला तोपर्यंत त्यांची सेक्रेटरी पत्राचा मजकूर घ्यायला आली.जो तिला नंतर मेल करायचा आहे.

" मे आय कम इन सर?"

" यसं…" सुधाकर म्हणाला.

त्या सेक्रेटरीने सुधाकर बरोबर ऋषीला सुद्धा गुडमाॅर्नींग केलं. त्यावर ऋषीने हसून मान डोलावली.

तेवढ्या वेळात सामंतपण आत आले.

सुधाकरने ऋषीला सगळ्या विभागात नेऊन तिथलं काम कसं चालतं ते सांगायला सांगीतलं. ऋषी सामंत बरोबर केबीनबाहेर पडला.

सुधाकर सेक्रेटरीला मेल काय करायचा तो मजकूर सांगू लागला.


****

त्यादिवशी संध्याकाळी वेलकम या थ्री स्टार हॉटेलमध्ये संध्याकाळी सुधाकर इरावती आणि ऋषी तिघही जेवायला गेले. छान गार्डन मधली सीट त्यांनी बुक केली होती सूप, सलाद आणि काही हवं ते त्यांनी ऑर्डर केलं आणि नंतर ऋषी म्हणाला

"बाबा आता मला सांगा ना तुमचं सगळा प्रवास तेव्हा सुधाकर आणि इरावती दोघेही एकमेकांकडे बघून हसले. सुधाकर ऋषीला आपला प्रवास सांगता सांगता भूतकाळात शिरला.

…..

सुधाकर आणि इरावती या दोघांचं नवीनच लग्न झालेलं होतं. सुधाकर एका छोट्याशा पण चांगल्या कंपनीत नोकरीला होता. खूप मोठा पगार नव्हता पण राजा राणीच्या संसाराला उपयोगी पडेल एवढा पगार त्याला मिळत होता. इरावती फार सोज्वळ साधी होती. तिला खूप चमक धमक या गोष्टींची आवड नव्हती. टुकीने थोडक्यात संसार करणारी होती. हे सगळं सुधाकरच्या आईला माहिती असल्यामुळेच सुधाकर आणि इरावतीचं लग्न ठरवण्यात आलं. सुधाकर आणि इरावतीच लग्न झालं.


सुधाकर खुश होता आणि इरावती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायची. हाच तिचा गूण सुधाकरला आवडत असे. इरावतीचा इतका शांत स्वभाव होता, इतकी छान पद्धतीने ती बोलायची की ते ऐकून सुधाकरला खूप हुरूप यायचा. हळूहळू त्यांच्या लग्नाला वर्ष होणार तेवढ्यात त्यांना बाळाची चाहूल लागली आणि मग तर दोघांची पावलं आनंदाने थिरकू लागली. सुधाकर आणि इरावती दोघेही आनंद सागरात डुंबत होते.

या आनंदावर विरजण घातलं ते कंपनीतल्या वाईट बातमीनं. नेमकं त्याचवेळी कंपनीचं दिवाळ निघालं. ज्या दिवशी सुधाकरला ही गोष्ट कळली त्या दिवशी त्याच्या पाया खालची जमीन सरकली कारण नुकतेच इरावतीला दोन अडीच महिने झालेले होते. आता सुधाकरला काळजी वाटायला लागली. नोकरी गेली आता पुढचं सगळं आयुष्य कसं घालवायचं? बाळाची जबाबदारी कशी घ्यायची? त्याचा संगोपन कसं करायचं? हे प्रश्न सुधाकरला भेडसावू लागले.


दुसरी चांगली नोकरी मिळाली पाहिजे. त्यासाठी धडपट जरी केली आणि नाही मिळाली चांगली नोकरी तर…

कंपनीतलाच त्याचा मित्र सुयश हे दोघेजण खूप छान मित्र होते. सुयशही याच चिंतेत होता.

सुयश आणि सुधाकर दोघेही त्या दिवशी याच गोष्टींवर विचार करत होते. सुयशचं नुकतच लग्न ठरलं होतं. सुयशला भीती वाटत होती की आपली नोकरी गेली हे कळलं तर आपलं लग्न मोडेल. सुधाकरला आपल्यापेक्षा सुयशची स्थिती गंभीर आहे लक्षात येताच सुधाकर सुरेशला म्हणाला,

"नको रे सुयश… असा अडचणीत आणणारा प्रश्न मनात आणूच नकोस. तू काय कर त्या मुलीला खरं खरं सगळं सांगून टाक आणि तिला म्हण तू ठरव. तू जे म्हणशील त्याला मी होकार देईन. एवढं ऐकूनही जर तिने होकार दिला तर चांगलीच गोष्ट आहे पण जर नकार दिला तर असं समजायचं की परमेश्वराची इच्छा आहे म्हणून हे सगळं घडलं."

सुधाकरच्या बोलण्याने सुयशला थोडा धीर आला.

सुयशला समजाऊन नंतर सुधाकर घरी आला. घरी आल्यानंतर सुधाकरचा चेहरा साहजिकच जरा उतरलेला होता. इरावतीला काळजी वाटली. तिने विचारलं


"का हो काय झालं? तुम्हाला आज बरं वाटत नाहीये का?"

सुधाकरने काहीच उत्तर दिलं नाही कारण त्याला माहिती होतं इरावतीला अजून तीन महिने व्हायचे आहेत. तिच्या मनावर कोणता ताण येणं योग्य नाही ‌ तिला जर काही वेडी वाकडे बातमी कळली तर… याचा इरावतीने ताण घेतला तर बाळावर परीणाम होईल. म्हणून तो काहीच बोलला नाही.


इरावतीने पुन्हा प्रश्न केला तेव्हा सुधाकर उडत उडत तिला म्हणाला


" अगं ऑफीसमध्ये जरा जास्त काम होतं. म्हणून थकल्यासारखं वाटतंय." सुधाकर

इरावतीचं सुधाकरच्या उत्तराने समाधान झालं.

त्या दिवशी रात्री सुधाकरने निश्चय केला की उद्यापासून आपल्याला कंपनीत जायचं नसलं तरी रोजच्यासारखा डबा घेऊन बाहेर निघायचं आणि नोकरी शोधायची. इरावतीला मात्र खोटं सांगायचं की आपण कंपनीत जातो. हे मनाशी ठरवलं तेव्हा सुधाकरला जरा शांत झोप लागली.
…..

दुसरा दिवस ऊजाडला इरावतीने नेहमीच्या घाईने सुधाकरसाठी जेवणाचा डबा पॅक करून दिला. सुधाकरची थोडीशी हळूहळू तयारी चालू होती.ते बघून इरावतीने विचारलं

"अहो आज काय घाई नाही का कंपनीत जायची? तर सुधाकर म्हणाला

" अग आज एक जरा मीटिंग आहे पण थोडी लेट आहे म्हणून जरा उशिरा चाललो आहे."

काहीतरी थाप मारून सुधाकर आपल्या तयारीला लागला पण त्याच्या हे लक्षात आलं की रोज रोज हीच थाप पचणार नाही कधीतरी खरं कारण तिला सांगावच लागेल. तेही सांभाळून सांगायला हवं.

कंपनीतून आपले पैसे कधी मिळतील हाही अंदाज त्याला येत नव्हता. तोपर्यंत पैशाची तजवीज करावीच लागेल. मग त्या दिवशी त्यांनी ठरवलं की रोज नेहमीच्याच वेळेला निघायचं आणि कुठेतरी वेळ काढायचा.

नोकरीसाठी कन्सल्टंट कडे चकरा मारणं सुरू करायला हवं. आपल्याच विचारात सुधाकर डबा घेऊन बाहेर पडला.
___________________________
क्रमशः सुधाकरराव नोकरी मिळेल का?
इरावतीला खरं कारण सुधाकर सांगू शकेल?
वाचू या पुढील भागात.
बघू पुढे काय होईल ते…

लेखिका.. मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all