बघू पुढे काय होईल ते..भाग१२

एक कथा


बघू पुढे काय होईल ते…भाग१२
मागील भागावरून पुढे…

आज सकाळपासून इरावती उलट्यांनी हैराण झालेली होती. एक थेंब पाणी तिच्या पोटात ठरत नव्हतं आणि त्यामुळे ती थकून गेली होती. कशीबशी ती पलंगावर आडवी पडली आणि तिच्या बाजूला सुधाकर हळूच बसला. तिचा हात हातात घेऊन थोपटला.

त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं ते बघून इरावती म्हणाली

"अहो रडता कशाला?" सुधाकरच्या रडण्या मागचे कारण न कळून इरावतीने विचारलं.

" इरावती बाळ आपल्या दोघांचा आहे पण बघ ना आईलाच किती सगळा त्रास सहन करावा लागतो. म्हणून मन थोडं गलबललं." सुधाकर म्हणाला

" अहो, आईचं हे उदात्त कर्म आहे. बाळाला जन्म देणं हे सुर्जनात्मक कार्य आहे." इरावती हसत म्हणाली.


" हो गं ते सगळं ठीक आहे पण त्याचा किती त्रास होतोय तुला. तुझ्यातला अर्धा त्रास सुद्धा मी घेऊ शकत नाही याचं वाईट वाटतंय." सुधाकर इरावतीचा हात थोपटत म्हणाला.


"तुमच्या भावना मला समजतात आहे. पण… ही सगळी जबाबदारी आईवरच असते ना..! तुम्ही नका त्याची काळजी करू. हा सगळा त्रास सहन करायला परमेश्वरच आईला बळ देत असतो."इरावती सुधाकरचा हात हातात घेऊन म्हणाली.

" तुला इतका त्रास होतोय पण माझी नोकरी गेल्यामुळे मी सगळ्या कामाला बाई सुद्धा लावू शकत नाही.नेमकी याचं वेळी आमची कंपनी का बंद पडावी. आपल्या संसार वेलीवरचं हे पहिलं फूल यांचा आनंद घेण्याऐवजी तुझी काळजी घेण्यासाठी पैसा कुठून आणू ही चिंता सतावते."

सुधाकर अजून भावनाविवश झाला. इरावती हळूच उठून बसली आणि म्हणाली,

" या सगळ्या गोष्टी परमेश्वराने ठरवल्या आहेत त्यात आपण काय करणार? कदाचित आपलं बाळ पोटात असल्या पासूनच टणक व्हावं ही परमेश्वराची इच्छा असेल असं समजा. तुमची नोकरी घालवून परमेश्वरानेच आपल्या समोर आर्थिक चणचण निर्माण केली पण त्याच वेळी रूक्मीणी मावशीचा मदतीचा हात पाठवला हे आपण लक्षात घ्यायला हवं." इरावती म्हणाली.

सुधाकरला ते पटलं. त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू इरावतीने हळूच पुसले आणि हसत म्हणाली,


" बाळाला आवडणार नाही बरं…त्यांचे बाबा असे रडले तर…!" इरावती म्हणाली.

" हं…आता नाही रडणार." सुधाकर

"बरं मी काय म्हणते आपण तुमच्या अण्णा काकांकडे जाऊया कारण तुम्ही तुमच्या आई-बाबांना तुमची नोकरी गेली माझी प्रेग्नंसी यातलं काहीही सांगितले नाही.मला उलट्यांचा इतका त्रास होतो. तुम्ही कामासाठी बाहेर पडला की मी घरी अशी एकटी राहीन. उलटी होऊन थकून पडले तरी कळणार नाही. कोणीतरी मदतीला हवं हो."


यावर सुधाकरही विचार करून तो म्हणाला,

"तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण संध्याकाळी जाऊया काका काकूंना भेटायला आणि त्यांना सांगू." सुधाकर म्हणाला.

"आधी काकांना फोन करा. आज रविवार आहे शीरीष आणि राहूलला सुट्टी असल्याने त्यांचा काही कार्यक्रम ठरला असेल तर आपण अचानक जाण्यामुळे अडचण यायला नको." इरावतीने सुधाकरला सुचवलं.


"हो तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी आत्ताच फोन करून विचारतो." सुधाकर


सुधाकर आण्णा काकांना फोन लावतो.

"हॅलो…" पलीकडून अण्णांचा आवाज आला.

" आण्णा काका सुधाकर बोलतोय."

" बोल. खूप दिवसांनी फोन केलास. इरावती कशी आहे?"

" इरावती छान आहे.खूप दिवसात भेट झाली नाही म्हणून आम्ही दोघं यायचा विचार करतोय." सुधाकर म्हणाला.

" अरे मग या…विचारतो कसला?"

"आज शिरीष आणि राहूलला सुट्टी असल्याने तुमचा काही कार्यक्रम असेल आणि आम्ही अचानक आलो तर…! म्हणून फोन केला." सुधाकर जरा सविस्तर बोलला.

" अरे तुम्ही काकाकडेच येणार आहात नं? मग ही औपचारिकता कशाला? शिरीष आणि राहुलचे विथ फॅमीली काही कार्यक्रम असलेही तरी आम्ही दोघं घरीच आहोत.या दोघं. रात्री जेवायला इकडेच थांबा. कधीपर्यंत येतात?" आण्णा काकांनी सुधाकरराव विचारलं.

" संध्याकाळी सात पर्यंत येऊ." सुधाकर म्हणाला.

" चालेल.ठेऊ?" आण्णा काकांनी विचारलं.

" हो ." सुधाकरने फोन ठेवला. त्याचा चेहरा आता बराच शांत झाला.

"आण्णा काकांकडे गेलो की माझी प्रेग्नंसीची बातमी सांगूच पण तुमच्या नोकरी बद्दलही सांगू. आपण जो व्यवसाय करायचा ठरवलं आहे तेही सांगू. काका काकूंचा सल्ला आपल्याला उपयोगी पडेल." इरावती.

" तू म्हणतेस ते बरोबर आहे. आमच्या वैजयंती काकू फार सुग्रण आहेत. तयार आणि कोरड्या पिठांबरोबर काही अॅटम त्या सुचवू शकतील." सुधाकर.

" तेच म्हणतेय मी." इरावती म्हणाली.

" इरावती आता मला खूप बरं वाटतं आहे. मघाशी मला फार टेन्शन आलं होतं." सुधाकर

" प्रेग्नंसीमध्ये काही गोष्टी खूप नाॅर्मल असतात. जसं की मला उलट्या होतात. खूप काही वेगळा त्रास व्हायला लागला तर चिंता असते. पुष्कळदा तीन महिन्यानंतर उलट्या थांबतात. आज आपण काकांकडे जाऊ तेव्हा काकूंना विचारू त्यांच्या ओळखीचे कोणी गायनिक डाॅक्टर आहेत का? असतील तर काकूंना बरोबर घेऊन आपण जाऊ. आणि हो मला अजून तीन महिने पूर्ण व्हायचे आहेत. मला रिक्षाने काकांकडे जाता येणार नाही. खड्ड्यतून रिक्षा गेली आणि धक्का बसला तर काहीतरी त्रास होईल." इरावती

" असं होतं का?" सुधाकर ने विचारलं.

" हो." इरावती म्हणाली.

" मग आपण टॅक्सीने जाऊ. म्हणजे धक्का बसणार नाही." सुधाकर म्हणाला.

सुधाकर आणि इरावती बोलत असतानाच दारावरची बेल वाजली.

" बहुदा आनंद आला असावा. तू आराम कर. आम्ही बाहेरच्या खोलीत आहोत.फूड लायसन्स साठी अप्लाय करतो."

" ठीक आहे." म्हणून इरावती हळूच पलंगावर लेटली.


*****

आनंद आणि सुधाकरने मिळून लॅपटॉप समोर बसून त्याच्यावरन फुड लायसन्स साठी अप्लाय केला. हवी ती कागदपत्रे साईटवर अपलोड केली‌.


सगळ भरून झाल्यानंतर आनंद सुधाकरला म्हणाला,


"दादा आता मी त्या प्लास्टिकच्या दुकानात जातो त्या दुकानदाराचा नेमचंद व्यापाऱ्याने नंबर दिला आहे ना त्या नंबर वर फोन करून विचारता का ? म्हणजे मी जाऊन घेऊन येतो."

" हा ठीक आहे. मी करतो फोन पण एक काम कर तू केव्हा जाणार आहेस पाकीटं आणायला?"

"मी संध्याकाळी जाईन." आनंद म्हणाला.

"ठीक. असं कर संध्याकाळी तू पाकिटं घेतलीस की तुझ्याकडेच ठेव. मी आणि इरावती संध्याकाळी इथे माझ्या काकांकडे जाऊ. मी अजून माझ्या आई-वडिलांना माझी नोकरी गेली आणि इरावती प्रेग्नंट आहे हे कळवलेलं नाहीये. काकांना सगळं सांगीन जेणेकरून कधी गरज वाटली तर मी इरावतीला काकांकडे ठेऊन कामासाठी मला बाहेर जाता येईल. इरावती सध्या ऊलट्यांनी खूप हैराण आहे. तिला जेवणही जात नाही.अशा स्थितीत तिला एकटं घरी ठेवणं बरोबर नाही. इरावती काकांकडे असेल तर मला चिंता राहणार नाही." सुधाकर आनंदला म्हणाला.


" हो दादा बरोबर म्हणताय तुम्ही. तुमच्या काका काकूंचं वहिनींकडे लक्ष राहील." आनंद

"सगळी परिस्थिती म्हणून आज काका काकूंना सांगणार आहोत म्हणून आम्ही आज त्यांच्याकडे जाऊ. त्यांच्याकडे इरावती असल्यावर मग आपल्याला कुठे जायचं असेल, संपल्स पोचवायचं असेल तर तुझ्या एकट्यावर जबाबदारी येणार नाही. मी पण काही ठिकाणी जाऊ शकेन. आनंद बायकांना तू कधी घेऊन येतोयस? म्हणजे त्यांच्याशी पण भेट होईल.?"

"दादा त्या आता पोहोचतीलच. तुमचा पत्ता त्यांना दिला आहे. मी त्यांना निघतानाच फोन केला होता. त्या अर्ध्या तासात इथे येऊन पोचतील. त्यांना तुमची ओळख करून देईन. तुम्ही सगळं त्यांच्याशी बोलून घ्या."

आनंद हे म्हणत असताना त्या बायका सुधाकरच्या घरी येऊन पोहोचल्या.

शांताबाई नमस्कार करून म्हणाली,

" नमस्कार साहेब मी शांतामावशी ही वंदना आणि ही तिची बहीण ही."

सुधाकर नमस्कार करून म्हणाला,


"शांत मावशी मी छोटासा व्यवसाय सुरू करतोय. अजून माझ्या मालाला डिमांड नाहीये कारण मार्केट मध्येच अजून माल आणायचाच आहे." सुधाकर म्हणाला.

"साहेब तुम्ही कशाला काळजी करता? जेव्हा तुमचा माल विकला जाईल, जेव्हा तुमची परिस्थिती नीट होईल तेव्हा तुम्ही आम्हाला पैसा द्या तोपर्यंत आम्ही तुमच्याकडे बिन पगारी काम करायला तयार आहोत. आनंदने आम्हाला सगळं सांगितलेलं आहे."

"हो मावशी आनंदने जरी सांगितलं असेल तरी पण तुम्हाला किती दिवस करावे लागेल बिन पगारी सांगू शकत नाही." सुधाकर ने स्पष्ट सांगितलं.


त्यावर वंदना म्हणाली,

"साहेब असं काय करता? तुम्हाला जितके दिवस पैसे देणे जमणार नाही तितके दिवस आम्ही बिन पगारी करू. वाटल्यास तुम्ही लिहून ठेवाना ज्या दिवशीपासून आम्ही काम करायला लागलो ती तारीख आणि महिना लिहून ठेवा म्हणजे तुम्हालाही कळेल किती दिवसाचे पैसे द्यायचे राहिलेत ते." वंदना


यावर शांता मावशी म्हणाल्या,

"साहेब तुम्ही त्याची फिकर करू नका. आम्हाला या सगळ्या कामाची सवय आहे. आम्ही बाकीच्या ठिकाणी कामाला जातो आम्ही रिकामटेकडी नाहीये. एक तास दिवसाचा तुमच्याकडे आम्ही देऊ. सुरुवातीला आपल्याला एवढा वेळ पुरेसा आहे. आता तुम्ही सामान आणलं की त्या हिशोबाने सगळे पीठ तयार करून ठेऊ. मसाले तयार करून ठेऊ.आणि मग ते छोटे छोटे पॅकेटमध्ये बांधून दुकानात ठेवल्यानंतर त्याची विक्री कशी होते? कधी होते हे समजायला टाईम लागेल ना?"

सुधाकरने यावर होकारार्थी मान हलवली. मग आनंद म्हणाला,

" हे बघा दादा याची तुम्ही काळजी करू नका.या रोज येतील. सध्या आपण सामान आणल्यावर सगळी पीठे वहिनी सांगतील त्या प्रमाणात या तिघी तयार करतील. त्याच्यानंतर मसाले करतील ही सॅम्पलची पाकीट विकल्या गेल्यानंतर जेव्हा जास्त पीठं आणि मसाले तयार करण्याची वेळ येईल तेव्हा या तिघींना जास्त वेळ बोलाऊ. बरोबर बोललो नं शांतामावशी?"

" हो बरोबर बोलला तू. साहेब पैसे कुठे पळून चाललेत? त्याची चिंता आत्ता नका करू.आनौदने हे काम आम्हाला सांगितलं म्हणजे हे काम आम्ही नीट करणार. तुम्ही सामान आणलं की आनंद आम्हाला सांगेल मग आम्ही येऊ. सगळं काम इथं घरातच करायचं का?"

" हो.सध्यातरी घरीच करू.नंतर व्यवसाय वाढला की जागा बघता येईल."

" इथपण जमेल. जागा आत्तापासून नका घेऊ. खूप भाडं जाईल. तुमचा व्यवसाय आधी छान चालू द्या." वंदना म्हणाली.

" तेच ठरवलंय." सुधाकर म्हणाला.

" येऊ का आम्ही. तुम्ही बिनघोर -हावा." शांतामावशीने असं म्हटल्यावर सुधाकरला धीर आला.

शांताबाईंनी, वंदना,सई गेल्यावर सुधाकर आनंदच्या खांद्यावर थोपटत म्हणाला,

" आनंद तुझ्या आणि मुकेशसारखा मित्र असल्यावर व्यवसायात कितीही अडचणी आल्या तरी मी त्या सोडवू शकेन यांचा विश्वास आहे मला." सुधाकरच्या या बोलण्यावर आनंद हसून म्हणाला,

" दादा तुम्ही आमच्या वर एवढा विश्वास ठेवला आहे त्याने भारावून गेलो आहे.मला काय बोलावं सुचत नाही."


" काहीच नको बोलूस.माझ्या भावना तुझ्या मनापर्यंत पोहचल्या तशाच तुझ्या भावना पण माझ्या मनापर्यंत पोचल्या. ही वेळ आपल्या मनात जपून ठेवण्यासारखी आहे."

" हो…दादा" आनंदच्या डोळ्यात पाणी आलं ते त्याने अलगद पुसलं.

___________________________
क्रमशः बघू पुढे काय होईल ते…भाग१२
आण्णा काका आणि काकू सुधाकरला पाठींबा देतील का?
बघू पुढील भागात.
लेखिका…मीनाक्षी वैद्य.

🎭 Series Post

View all