बागायतदार

This is a very thrilling story from the village side. It's describing the old culture and ridiculous tradition of rural area people. It is very shocking story with lots of suspicious thing including in it. The story tells about the nature of selfish


             सदा पाटील बिगिबिगी त्येजी जिप्सी काढून खैराच्या माळावं पोचला. तवर बाबू खलाट्यानं तिथं समदी यवस्था लावून ठिवल्याली. कठापुरातनं संबर नंबरी पाणाडी बोलिवल्याला. गावातली धा पंधरा जाणती माणसं बोलिवल्याली. नारळ सोलून तयार ठिवल्याला. पावशेर खडीसाखर आणल्याली. आज पाटलाच्या नव्या हिरीसाठनं जागा पक्का करायचा म्हवरंत काढल्याला सदा पाटलानं. आन त्ये बी गावात नव्यानं ऱ्हायाला आल्याल्या आश्शील जगमाकडनं. सदा पाटलाला तर लय आस लागून राहिल्याली. कारण ह्या आंदी त्येज्या तब्बल तीन हिरींला आन चार बोरींला फकस्त दगुड लागला व्हता. पाण्याचा यक टाक न्हवता तिथं. पाक संबर फुटापातूर हिरी आन चारेकशे फुटापातूर बोरी निवून बी फकस्त फुफुटाचं पाटलाच्या नशिबी आला व्हता. बापाचा पिढीजात सावकरीचा धंदा आसल्यामुळं खर्चाला काय पाटलानं हायगय केली नव्हती पर नशिबातचं दगुड आसल्यावं पाणी कशाचं लागतंय वं ? यकतर त्येंचा तालुका म्हंजी जलमाचा दुस्काळीं भाग म्हणून समद्या जिल्ल्यात परसिद्ध व्हता.
               त्येज्यामुळं आज सदा पाटलाला कवा न्हायी त्ये लय टेन्शन आल्यालं. कारण ह्या बारीला सवाल फकस्त पैक्यांचा नव्हता तर पाटलाच्या इज्जतीचा व्हता. घरची चाळीस यकर जमीन निस्त्या पाण्या आबावी गेली चाळीस वरसं मोकळी पडून व्हती. पिढीजात सावकारीचा धंदा आसल्यामुळं लागीचं पायीजे त्ये सामानं पायीजे तवा मिळायचं पाटलाला गावात पर म्हणावी आशी इज्जत काय मिळत नव्हती गावात पाटलाच्या घराला. माणसं रामराम करायची पर जीवाच्या भ्यानं. आसपासच्या समद्या गावातल्या पाटलांनी हिरी काढून, आल्या-ऊसाची शेती पिकवून, वट मधी ऱ्हावूनं सोत्ताला ‘ बागायतदार ’ ही इज्जतदार पदवी मिळवून घेतल्याली. आता त्येंच्या पंचक्रोशीतल्या समद्या पाटील घराण्यात फकस्त सदा पाटीलचं तेवढा ‘ सावकार ’ म्हणून शिल्लक ऱ्हायल्याला. आपल्याला बी लोकांनी बागायतदार म्हणून हाक मारावी आशी लय मनापास्नं इच्चा व्हती त्येजी. म्हणून तर गुरावांनी म्हैनत घिवून दिनरात यक करत व्हता पाटील. पर दरबारीला हिरीतनं निगणाऱ्या दगुड धोंड्यामुळं आन मातीच्या फुफुट्यामुळं त्येज्या ह्या इच्चेचा पार इस्कुट हुन जायाचा.
              शिवा पाणाड्यानं मंग यका हातावं नारळ घिवून पाटलाच्या रानातनं चालायं सुरवात केली. खालवर धा यक यरजाऱ्या घातल्या त्येनं पाटलाच्या रानात पर त्येज्या हातातला नारळ काय जागचा हाल्ला न्हायी. पाटील आन तिथली समदी माणसं काळजीत पडली. आंबाबायच्या डोंगराकडनं यक वडा त्वांड काढीत पाटलाच्या रानापातुर आल्याला. रानाच्या त्याचं कोपऱ्यावं जाऊन शिवा पाणाडी थांबला. टुणकन उडी हाणून त्येज्या हातावं उबा ऱ्हायल्याला नारळ समद्या गावकऱ्यांनी पाह्यला आन त्येंनी त्येपल्या त्येपल्यात कालवा करून दिला. सदा पाटलाला तर आतनं उकळ्याचं फुटायं लागल्या. 
              मंग किश्या जाधवानं हातावं मळल्याली तंबाकू तोंडात टाकली आन म्हणला, “ म्या म्हणल्यालो कनाय... त्या वड्याच्या आंगालाचं पाणी आसणारं म्हणून... आवं तथनंचं चार पाच नळ गेल्याती आपल्या गावच्या आडाला. त्यो वलावाचं सांगतुय... बगा की गवात कसं हिरवंगार झालंय त्ये.” मंग समद्या माणसांनी व्हय म्हणून त्येज्या बोलण्याला दुजोरा दिला.
               सदा पाटलानं बाबू खलाट्याच्या हातावं साट्कन टाळी दिली आन म्हणला, “ बाकीच्या संबर तरी नेल्या बाबुराव... मंग आता ही दीडशे फूट का खॉलं जायना... पर हिला पाणी लागल्या बगर हिला सोडायची न्हायी बग.” बाबू खलाट्यानं बी व्हय म्हणून मान डोलावली.
               झालं. पुना यक चांगला म्हवरत बगून सदा पाटलानं हिर खांदाय चालू केली. पयल्यांदा पॉकलँड लावून साठेक फूट खॉल नेली हिर. आन मंग पुना यारी लावून लाम तिकडची सोलापुरातनं आणल्याली पंधरा माणसं लावली रोजानं कामाला. गडी लय तरबेज व्हतं कामात. खसाखसा फुटाफुटानं हिर खॉल न्येला लागलं. फकस्त त्येंच्या जेवणाची तेवढी सोय करायं लागली पाटलाला पाटलीण बायला सांगून. रोजच्याला तीसेक जास्तीच्या भाकऱ्या टाकाय लागायच्या पाटलीण बायला. दमून जायाची बिचारी सकाळ संध्याकाळ त्यो रेटा थापता थापता. पर त्वांड वर करून कंदी पाटलापुढं बोलायची न्हाई ती. पाटलाचा धाकचं हुता तसा.
            यवढी चार पाच लाखाची हिर खांदाय काढली तरी सादं कौतुकानं बगाय म्हणून बी खैराच्या माळावरलं कुतरं सुदीक पाटलाच्या हिरीकडं फिरकत नव्हतं. त्येला कारण बी तसंच व्हतं. पाटलानं खैराच्या माळावं जी जमीन खरेदी केलती कनाय ती त्याला सुखासुखी मिळाली नव्हती. ज्याच्या नावावर ती जमीन व्हती त्यो रामा खैरे त्याला आडवा पडल्याला खरीदीच्या टायमाला. यकराला दोन लाख देतो म्हणल्यावं बी त्यो पाटलाला वंगला नव्हता. मंग पाटलाचा आट्टा हाल्ला. त्येनं जबरदस्ती आंगठा घिवून रामा खैऱ्याला संपवायचा डाव आखला आन त्यो बाबू खलाट्याच्या मदतीनं आगदी यवस्थित पार बी पाडला. 
               गावात आन माळावं समद्यास्नी ह्या गोष्टीची पुरती खबर लागली पर कुणी तोंडातनं ब्र सबुत काढला न्हायी. कारण जवळपास समद्या गावावर पाटलाचा वचक व्हता. समदा गाव पाटलाचा कर्जदार व्हता. जर कुणी वाकड्यात शिरला आसता तर पाटलानं त्येज्या घराची बी जिथल्या तिथं इल्हेवाट लावली आसती. आगदी मापात. 
             रामा खैऱ्याची बायकू संपी तेवढी समद्या गावातनं बोंबलत हिंडायची का सदा पाटलानं माज्या धन्याला मारलं म्हणून. पर त्या यडीचं कोण आयकतंय तवा. हाबका बसल्याला तिला नवऱ्याच्या अकाली जाण्यानं. गावची ल्हानसानं पोरं दगडी बिगडी मारून उलट तिलाचं मरणाचा तरास द्येची. काय काय तर भादव्यात जनामल्याली कुतरी तिला यकटीला घाटून, तिज्या यडेपणाचा फायदा घिवून तिज्या सरीराचं लचकं बी तोडायची. पर तिला कायीचं कळायचं न्हायी त्यातलं. उगा आपली थंड सरीरानं गपचूप पडून ऱ्हायाची ती. आन त्येज्यामुळं त्या कुतऱ्यांचं बी चांगलंच फावल्यालं. वाटंल तवा तिला खायाला दिवून, गंडवून मागं मागं बोलवून ऊसाच्या फडात निदान कळकीच्या बेटात तिला घिवून जायाच्या ह्या लिंगपिसाट अवलादी. तिला काय ? दोन तीन दिवस उपाशी ऱ्हायल्यामुळं पोटासाठी गुमान शिर्डीवानी मागं मागं जायाची ती. आन मंग गावातली ती सोत्ताला वाघ म्हणवून घेणारी, आंगासाठी हपापल्याली कुतरी नितरासपणं तिजी शिकार करायची.
               पाटलाच्या हिरीचं काम पाक नव्वद फुटावं आलं तरी हिरीला काय पाणी लागंत नव्हतं. शिवा पाणाड्यानं सांगितल्या परमानं सत्तर यक फुटावंचं पयला नळ लागाय पायीजेलं व्हता. पर तसं झालं नव्हतं. मंग सदा पाटलाची चिंता वाढली. त्यो देवाबिवाचं काय निगतंय का त्ये बगायला जगमाकडं गेला. मंग जगम त्येज्या पोथी पुराणात मागचं बिगचं, पितरांच काय निगतंय का त्ये हुडकाय लागला. यक दोन पुस्तक चाळल्यावं त्येज डोळं यकदम चमाकलं आन त्यो पाटलाला म्हणला, “ आवं पाटील... त्या जाग्यावं मायंदाळ पाणी हाय... पर त्ये काळं पाणी हाय रजेवं... त्ये आसं न्हाय खळाळणारं हिरीत.”
              “ आन मंग रं ? आता आणिक काय त्येजं गुरसाळं काढलंयस बाबा ?  नीट सांग कि जरा इस्कटून मर्दा.” पाटील जगमाच्या खांद्यावं हात टाकीत म्हणला.
               “ आवं पाटील... ह्ये पाणी आसं तसं न्हायी. काळ्या ताकतीनं बांधून ठिवल्यालं पाणी हाय त्ये. आन त्ये पाणी रगात मागतंय रगात. त्याबगर हिरीला पान्हा न्हाय फुटणार जी.”  जगम त्येज्या पोथी लाल फडक्यात आवळत म्हणला. 
               “ आन मंग... त्येला काय तवा ? दिव की बोकुड हिरीला निदान गावरान कोंबडा. का वं बाबुराव... आं... हाय का न्हायी ?” आसं पाटलानं म्हणल्या बराबर पाटील आन बाबू यकामेकाच्या तोंडाकडं बगून मोठ्यानं हसाय लागली. 
                मंग जगम त्येनला रागानं थांबवत म्हणला, “ आवं पाटील यड्यागत करू नका... हासण्यावारी घिवं नका. बोकडाच्या निदान कोंबड्याच्या रगतानं न्हाय सांत हुणार त्यो सैतान. त्येला माणसाचं रगात पायीजे. नरबळी पायीजे त्येला पाटील... नरबळी. आन त्ये बी तुमच्या हातनं.”
               आता पाटलाच्या मस्तकाला खाडकन यक झटका बसला. त्या धक्क्यातनं सोत्ताला सावरत मंग त्यो जगमाला म्हणला, “ ये जगमा... काय डोक्यावं बिक्यावं पडला का काय रं भडव्या ? माज्या हिरीत माणसाचं रगात सांडणार व्हय तू ? माज्या पोरांबाळानला सुख लागंल का रं किंवड्या ? त्येनला जलमाचं दळीन्द्री करून ठिवं आयघाल्या...आं  ?”
                 “ आवं पाटील... यवढा यकंच मार्ग हाय बगा तुमच्याकडं. निदान तुमी त्यो खड्डा खांदत खांदत पाक दोनशे फुटावं गेला तरी त्येला पाझर न्हाय फुटणारं जी. आन ह्यो यका भगताचा पक्का सबुत हाय. पुना मंग माज्या नावानं बोंबलू नगा का तुमच्या नशिबातं दगुडचं कसा निगला म्हणून. मंग तुमची आल्याऊसाची बागायती बी इसरा आन सोत्ताला बागायतदार म्हणवून घ्येची खाज बी.” जगम नाक फेंदारत बोल्ला.
                 मंग मातुर पाटलाचा जळफळाट झाला. त्येज्या डोसक्यात यक सनक दौडायं लागली. त्यो जगमाचं गचुंड आवळत म्हणला,“ ये भगताच्या पोटच्या... त्वांड सम्बळून बोल भाडखावं... निदान ही चुरुचुरु  चालणारी जीब हाय ना ती नरड्यात बोटं घालून वडून काढीन आन हातात ठिवीन... हां ? म्या बागायतदार हुणार म्हंजी हुणारचं. आन ही काळ्या दगडावरची रेग हाय ? धेनात ठिव बांडगुळा. काय म्हणला तू नरबळी द्येचायं ना ? आर दिला म्हणून समज. ह्यो सबुत हाय ह्या पाटलाचा... भावी बागायतदाराचा. लिव्हुन ठेव भाडखावं. तुज्या मायला मी तुज्या.”
                  मंग जगम भुवया उंचावत म्हणला, “ आंग आशी. आवं पाटील आमाला बी बगायचंय की तुमी बागायतदार म्हणून मिरावल्यालं. म्हणून तर जीव तोडून सांगतुय ना तुमास्नी. तर तुमचा आपला यकंच हेका.” 
                  मंग तिघांनी मिळून डोक्सं खाजवायं सुरवात केली. लय इचार केला आन यवस्थित यक डाव आखला. पाटलाच्या हिरीवं सोलापुरातनं जी माणसं कामाला आलती कनाय त्यात गणुबा नावाचा यक पांगळा माणूस व्हता. त्यो यारीवाल्याचा खास दोस्त व्हता. त्येला लय नेटाचं काम जमायचं न्हायी म्हणून यारीच्या डायव्हरनं त्येला फकस्त यारी रेटायला आन हिरीतनं माल वर काढणारी यारीची डबडी बदलायला ठिवलं व्हतं. बाबू खलाट्याला कळल्यालं का त्येज्या घरी आपलं म्हणावं आसं कुणी न्हायी म्हणून. त्येजी बायकू त्येज्या दारू ढोसण्याच्या सवयीमुळं कटाळून माह्यारंला निगून गेल्याली कायमचीचं. ह्ये सावज आलगद आपल्या जाळ्यात घावंल असा प्लान बाबू खलाट्यानं पाटलाला सांगितला आन पाटलाला त्यो पटला बी.
               दुसऱ्याचं दिशी बाब्या त्या गणुबासंग गॉड गॉडं बोलून त्येला देशी दारूच्या गुत्त्यावं घिवून आला. त्येला पॉट फुटंस तवर दारू पाजली. त्येला पार बेसुद व्हयाच्या गतीवं आणला आन तिथनं उशीरा हिरीच्या ठिकाणी घिवून आला. हिरीच्या कडंव ठिवल्याल्या यारीच्या शीटंव आणून त्येला झोपावला. बाकीच्या माणसांपास्नं लाम. म्हंजी कसं पाटलाला आलगद त्येजा डाव साधता यिल आसं. जगमानं सांगितल्या परमानं त्यो तिथनं गपचूप घरला निगुन आला. त्येनं पाटलाला समदा बेत यवस्थित सांगितला. पाटलाला तर कवा यकदा राच्च्या बारा वाजत्यात आसं झाल्यालं. यकदाच्या बारा वाजल्या आन त्यो चालत चालत खैराच्या माळावं आला. हाळूहाळू दबक्या पावलानं अंधारात रस्ता हुडकीत हुडकीत त्यो हिरीजवळ पोचला. त्येनं यारीपशी जाऊन पाह्यलं तर गणुबा निम्म्या मेल्याल्या आवस्थेत तिथं निपचित पडला व्हता. त्येनं यकदा त्येला हालवून त्यो सुदीत हाय का त्ये पाह्यलं. पर गणुबा पाक कोमात गेल्याला हुता. पाटलाला उकळी फुटली. त्येजा स्वास मोठा झाला. काळीज धडका घ्येला लागलं. 
                त्येनं मंग दोन्ही हाताचा जोर लावून गणुबाला उबा केला. सोत्ताचा डावा हात त्येनं गणुबाच्या कंबरंत घातला आन त्येजा उजवा हात आपल्या खांद्यांव टाकला. मंग त्यो त्येला घिवून हिरीकडं निगाला. पाय फरफटत फरफटत यक धा पंधरा पावलं टाकली न्हाई का तवरंच पाटील गणुबाला घिवून हिरीपशी पोचला. मंग त्येनं गणुबाला खाली जमिनीवं आडवा झोपावला. त्येज्या आंगावं जगमानं पुडीत बांधून दिल्यालं हाळद कुकु वाह्यलं. यका जाग्यावं उबं ऱ्हावून चारी बाजूला आंगारा फुकला. खिशात प्लास्टिकच्या पिशवीत बांदून आणल्याला धयभात हिरीच्या कडंकडंन इस्काडला. आता सांगितल्या परमानं जगमानं कापून दिल्यालं लिंबू मंतर म्हणत म्हणत तीन यळंला त्येज्या आंगावरनं उतरून हिरीत टाकायचं तेवढं बाकी ऱ्हायलं व्हतं. त्ये टाकून झाल्यावं मंग गणुबाला हिरीत ढकाल्लं की पाटलाचं काम फत्ते व्हणार व्हतं. 
           पाटलाच्या आधाशीपणामुळं म्हणा निदान आतातायीपणामुळं म्हणा पर पाटलाला उब्या उब्याचं डोळ्याम्होरं यक सपानं दिसाय लागलं का त्येजी हिर पाण्यानं काठोकाठ भरलीया. रानात ऊस, आलं दिमाखात डोलतंय. दारात पांढरीफेक स्कॉर्पिओ गाडी उबी हाय. त्यो पांढरी खादीची कापडं घालून टापमंदी घरातनं बाहीर पडलायं. समदं गाव ‘ बागायतदार... बागायतदार ’ आशी हाक मारतंय. आन त्ये आयकून पाटलाची छाती आभिमानानं भरून यतीया. पर ह्ये समदं यका घटकंत आटापलं. कारण गणुबाच्या चावाळंण्यानं पाटलाची तंद्री तुटली.
         मंग पाटलानं जास्त उशीर केला न्हायी. पाटदिशी मनातल्या मनात यक मंतर म्हणाय सुरुवात केली आन यका हातात लिंबू घिवून गणुबाच्या आंगावरनं उतरायं लागला. लिंबू उतरून झालं. तसाच मंतर म्हणत म्हणत त्यो हिरीजवळ गेला लिंबू टाकायला. त्यो लिंबू हिरीत टाकणार तेवढ्यात त्येज्या मागणं येगात कायतरी पळत आल्याचं त्येला जाणावलं. लगोलग त्येनं खिशातला लायटर काढला आन त्यो पिटवून मागं वळून बगितलं तर यडी संपी समदं क्यास मोकळं सोडून दात इचकत त्येज्या तोंडाम्होरं उबी हुती. संपीचा आवतार बगून पाटलाच्या पार कपाळात आल्या. त्यो कायतरी हालचाल करणार तेवढ्यात संपीनं पाटलाला यक जोरदार दणका दिला. हिरीच्या काठावं उबा आसल्यानं पाटलाचा तोल गेला आन पाटील हातात कापल्यालं लिंबू घिवून तसाचं धापदिशी हिरीत पडला. दुपारी सुरुंग उडावल्यामुळं हिरीत बरीचं मोठ्ठी दगडं बिगडं निगल्याली. त्यातल्याचं यका दगडावं खाडकन पाटलाचं डोक्सं आपाटलं. चिळकन यक रक्ताची चिपळी उडली आन पाटलाच्या मेंदवाचं चिथुडं समद्या हिरीत पसारलं. त्वांडाचा तर पाक भुगा झाला. आगदी त्वांड वळखून यिवं न्हाय आसा.
                सकाळपारी गणुबाला जाग आली तवा त्यो सहज म्हणून हिरीत डोकवायं गेला तर हिरीत रगताच्या थारुळ्यात पडल्याला मुडदा बगून त्येज्या गांडीवं गार आली. त्येनं मंग जोरंजोरानं बोंबलायं सुरुवात केली. तवा समद्या लोकांस्नी ही खबर लागली. पुलिस आलं आन त्येंनी त्या घटनेचा यवस्थित पंचनामा करून घ्येतला. पुलिसांनी कपड्यावरनं मयताची वळख पटावली आन गावकऱ्यांस्नी सांगितलं का ह्ये मयत सदा पाटलाचं हाय म्हणून. गावाला नक्की काय झालंय त्ये कळलं न्हायी पर आनंद मातुर पुरता झाला. गावापुढलं यक इघ्नं बिनबोभाट संपलं व्हतं. खैराच्या माळावल्या लोकांनी तर गुळाच्या पोळीचा निवद करून म्हसुबाला दावला. पाटलीण बाय तेवढी धाय मोकलून रडत व्हती. बाबू खलाट्याला नक्की काय घडलं त्येजा आर्थचं लागत नव्हता. कारण गणुबा तर पाक बेसुद आवस्थेत हुता. त्येनं पाटलाशी दोन हात करणं शक्य नव्हतं. मंग नेमकं ह्यो डाव साधला कुणी ह्या इचारानं त्येज्या डोसंक्याचा पार भुगा झाला. 
              हा ! यक मातुर झालं. त्या दिसापास्नं संपी आन त्यो जगम काय त्या गावात पुना कुणाला दिसली न्हाईत. संपी तर काय यडीचं हुती. आन त्यो जगम गेला आसंल सक्तीपीठाच्या देवदर्सनाला आसा लोकांचा समज झाला. कारण त्ये सारखं ज्येला त्येला गावात तसंच म्हणायचं का माजी तेवढीचं यक इच्चा आपुरी ऱ्हायली बगा आता. बाबू खलाट्याला तेवढी यक डाव संका आली जगमावं. म्हणून त्येनं त्येज्या परीनं ह्या परकरणात वायीचं लक्ष घातलं तर त्येला डोसक्याला मुंग्या आणणारी यक गोष्ट कळली. आन ती म्हंजी ही का त्यो जगम त्या यड्या संपीचा सख्खा भाव व्हता म्हणून. पर आता ह्या गोष्टीचा कायीचं उपेग नव्हता. कारण पाटलांच्या घरात बाबू खलाट्याला काडीची किम्मत ऱ्हायली नव्हती आता.
               पाटलीण बायच्या भावानं हिरीचं आर्धवट ऱ्हायल्यालं काम पुरं करून घितलं. बराबर आजून पाच फूट खाली गेल्यावं हिरीला कळशीनं पाणी वतल्यावं कशी धार लागती तश्या मापाचं दोन नळ लागलं. हिरीत पाणी खळखळायं लागलं. पाटलीण बायनं चाळीस यकरातली पंधरा यकर जमीन व्हवटायं काढली. आलं, ऊस रानात डौलायं लागलं. समदी लोकं जीवाला न भ्येता पाटलाच्या घराकडं इज्जतीनं बगायला लागल्याली. पर आता ह्ये समदं आनभावयला आन पाटलांची पाटीलकी मिरवायला पाटलांच्या बागायतीचा खरा वारसदार, त्येंचा बागायतदार मातुर काय या जगात जित्ता ऱ्हायला नव्हता.

समाप्त
                                               
 ----- विशाल घाडगे ©™✍