बदललेली भुमिका - लघुकथा

Feminism, Mother - Daughter relation

बदललेली भुमिका 

( आज जागतिक मासिक पाळी आरोग्य दिनानिमित्ताने बरेच लेख, मेसेजेस शेअर होतायत. खरंतर मासिक पाळीला सुरुवात म्हणजे आपल्याकडे मुलगी वयात येणं, मुलगी मोठी होणं असं समजलं जातं. हि मुलीच्या शरिरातील नैसर्गिक प्रक्रिया पण त्यासंबंधी अनेक श्रद्धा अंधश्रद्धा आपल्या समाजात आहेत. मुलींच्या शरिरातील बदलांमुळे तू मोठी झालीस किंवा 'बाई ' झालीस हे तिच्या मनावरती बिंबवण्यापेक्षा तिच्याशी घरातल्या स्त्रीने मैत्रीचं नातं निर्माण करण्याची गरज असते. आजची ही आई मुलीची लघुकथा ही तशीच आहे. )

"चिनु, चल आवरलं का ? नंतर उशीर झाला तर माझ्या नावाने बोंबाबोंब करतेस."

"हो ग आई"

"टिफिन घेतलास?"

"हो,घेते." टेबलवरचा टिफिन बॉक्स उचलून बॅगेत टाकण्याआधी तिनं तो उत्सुकतेनं उघडुन पाहिला.

"हे काय! पालकची भाजी " डब्यातली पालकची भाजी आणी चपाती पाहुन चिन्मयीचा चेहरा हिरमुसला.

"मम्मी काय गं हे,आय डोन्ट लाईक इट."ती नाराजीच्या सुरात आईला म्हणाली.

"हो गं,पण पीरियडसच्या दिवसात असं पौष्टिक अन्न खावं. शरिरातील अशुद्ध रक्त बाहेर पडताना शरिराला उर्जेची मोठ्या प्रमाणात गरज असते. एकुणच तुमच्या वयाच्या सर्वच मुलांनी खुप प्रोटिन्स,मिनरल्स ज्यातुन मिळतात असे पदार्थ खायला हवेत."

"ओ,मम्मी नॉट अगेन." आपल्या दोन्ही कानांवरती हात ठेवत तिने मानेने आईच्या बोलण्याला 'नो' म्हटलं.

"मम्मी,आय नो.हे सर्व तू मला खुप पुर्वी सांगितलं आहेस.पीरियडस म्हणजे काय इथपासुन काय खावं- प्यावं इथपर्यंत.हा तेव्हा फस्ट टाईम इंन्टरेस्टिंग वाटलं होतं ऐकायला बट आता नको."

"ओ.के.....ओ.के.." म्हणत आईने शरणागती पत्करली.

            टिफिन बॉक्स उचलुन तिनं बॅगेत कोंबला.दारावरची बेल वाजली तशी तिने  बॅग पुन्हा चेक केली. "चल,बाय सि.यु. निमिषा आली." विजेच्या वेगाने दार उघडुन ती निमिषा सोबत गेलीसुद्धा. चिन्मयीची आई मात्र गॅलरीतुन त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बराचवेळ पाहत राहिली.

..........................

               चिन्मयीचं हल्ली बदलेलं वागणं आईला अस्वस्थ करत होतं. किती मोठी झाली ना चिनु! तिला आठवली ती नर्सरी स्कूलमध्ये तिचा हात पकडून पाउल टाकणारी चिनू. आपला चिमुकला हात तिच्या हातातुन सुटताना आई जाऊ नको हा घरि मला सोडून असं निरागसपणे बोलणारी चिनू. पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर रोज आदित्यच्या बाईकवर आपल्या दोन्ही हातांनी त्याला घट्ट बिलगून बसणारी, बाईक स्टार्ट झाल्यावर इमारतीच्या गॅलरिकडे पाहून आईला टाटा करणारी चिनु. किती खात्री असायची ना तिला मी गॅलरीतून तिला पाहतेय!  रेल्वेस्टेशन,भाजी मंडई अगदि देवळातही तिचा हात सतत माझ्या हातात देणारी चिनु! आई आपल्यासोबत आहे हा विश्वास असायचा त्या स्पर्शात. हल्ली सगळं बदललंय पण अचानक बदलंल कि चिनु मोठी झाली. छे! मोठी कुठे आता तर चौदा वर्षांची आहे ती! तरि हल्ली तिच्या सोबत कसं वागावं हेच समजत नाही. कधी, कोणत्या गोष्टींवरून चिडेल, रागवेल सांगता येत नाही. आता परवाचीच गोष्ट, शाळेतुन घरि आली तीच उड्या मारत. खुशीचं कारण म्हणजे दोन दिवसांची शाळेची सहल जाणार होती माथेरानला. मी आढेवेढे न घेता दुसर्‍या दिवशी फि चे पैसे आणि परवानगीपत्रावरती सही देखील दिली. बोलता बोलता म्हटलं कि,'परमिशन तर आम्ही दिली पण तो दर्‍याखोर्‍याचा भाग आहे.उगीच कुठेतरी जाऊन सेल्फि काढु नका." या वाक्यावरती ती भडकली आणी तडातडा निघून गेली. रोजचं झालंय तिचं असं वागणं. अर्थात मी पूर्ण वेळ घरि असते म्हणून मला ते आदित्यपेक्षा जास्त जाणवतं असं त्याचं म्हणणं असतं. शेअरिंग करायला, खेळायला दुसरं भावडं नाही एकटीने वाढण्याचा  परिणाम असेल का हा. आदित्यची तेव्हा नवी नोकरी होती. तुटपुंज्या पगारात मुंबईत राहणं,मुलांना वाढवणं सोप नाही म्हणून एकच अपत्य असावं हा निर्णय आमचा होता. बरेच उलट सुलट विचार तिच्या मनावर आदळत होते. चिनू हळूहळू मोठी होतेय हे तिच्या लक्षात येतं होतं.  गृहिणी असली तरि ती सुशिक्षित,जागरूक  पालक होती. बर्‍याच विचारांती ती एका निष्कर्षापर्यंत येऊन पोचली. रात्री आदित्यच्या कानावर या सार्‍या गोष्टी घातल्या. चिनूचं बदललेलं वागणं,वाढत वय यावर त्यांच्यातही बर्‍यापैकी चर्चा झाली. तिच्या निर्णयावरती आदित्यनेही आनंदाने 'गो अहेड' चा हिरवा कंदिल दिला.

............................

         दुसर्‍या दिवशी रविवार होता. चिन्मयी खुश होती. आज बर्‍याच दिवसांनी आई तिच्या डान्सक्लासला तिला  न्यायला आली होती. क्लासरूममधून बाहेर पडल्यावर समोर स्कूटीवर बसलेली आई पाहून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. मम्मी, मम्मी ओरडत ती धावत तिच्यासमोर येऊन उभी राहिली.

        "वाव मम्मी! यु लुक्स सो ब्युटिफुल हा, आज पंजाबी ड्रेस! काय स्पेशल?" आईला चिडवत पापण्या मिचकावत ती म्हणाली. "स्पेशल नाही गं. फॅमिली पिकनिकला गेलो कि वापरतेच ना मी असे ड्रेसेस म्हटलं आज पण बघु ट्राय करून." हसत हसत ती म्हणाली. चिनु पटकन स्कुटीवरती बसली. तिच्या खांद्यावर उजवा हात टाकुन एखादी मैत्रिण बसावी तशी. क्षणभर ती विसरून गेली कि ही आपली चिनु आहे. 

" चल कुठे जाऊया?" स्कूटी स्टार्ट करित तिनं प्रश्न केला.

"यु मिन टु से आपण घरि नाही जात आहोत!"

नाही,नाही. पप्पा मित्रांसोबत बाहेर गेलाय सो दोघींनी घरि जाऊन बोअर होईल." आईने हेल्मेट चढवित म्हटलं.

"ओके बॉस." आईच्या बोलण्याला तिनं दुजोरा दिला.

             आईच्या स्कूटीवर मागे असं बसुन मुंबईचे रस्ते, माणसं,गाड्या न्याहळताना तिला भलताच आनंद होत होता. वेगवेगळी दुकानं,ईमारती,मॉल्स चिनु बोटाच्या निर्देशाने आईला दाखवत होती. चिनुचा डान्स क्लास ते घर या पट्यात  एवढी दुकानं,गल्ल्या आहेत हे आई बारकाईने प्रथमच पाहत होती. 

.........................

               क्षितिजाच्या दिशेने झुकणारा सूर्याचा लाल गोळा, निवळलेलं ऊन,लांबवर पसरलेली सुर्यकिरणं, सुर्य जसा जसा लयाला जातो तसे क्षणा क्षणाला बदलणारे आकाशाचे रंग पाहुन चिनु अवाक झाली.

"वाव मम्मी! इटस सो ब्युटिफुल ना!" तिनं पायातले चप्पल बाजुला सारले आणी वाळूत उड्या मारू लागली. फेसाळणार्‍या लाटा दोघींनी हातात हात धरून पायावरती आदळु दिल्या. कितीतरि दिवसांनी इतका वेळ चिनुने तिचा हात इतका घट्ट हातात धरला होता. त्या हाताकडे ती स्तब्ध नजरेनं पाहतच राहिली.

            दोघींनी वाळूत बसुन चौपाटीवरच्या भेळचा आस्वाद घेतला. "मम्मी,तुझे केस किती मस्त दिसतात.पाठिवर मोकळे सोडले कि छान दिसतात हा." आईच्या वार्‍यावर उडणार्‍या मोकळ्या केसांकडे पाहत ती म्हणाली. "माझेपण केस मी असेच ठेवणार." ती आईकडे पाहत म्हणाली.

"हं...त्यासाठी केसांची नीट काळजी घ्यावी लागते. तुम्ही मुली केसांना कलर करता, वेगवेगळ्या हेअरस्टाईल करता केस कमकुवत होतात."

"हं.मी नाही करणार हा!" ती आईच्या केसांवरती हात फिरवत म्हणाली. तिला माहित असलेल्या वेगवेगळ्या मेकअप टिप्सही तिनं आईला दिल्या. याशिवाय ट्रिपला कोण कोण फ्रेंडस येणार आहेत,काय तयारी सुरू आहे याबद्दलही सांगितलं. तिचा वर्ग, मित्र मैत्रिणी, शिक्षक यांच्याविषयी ती भरभरून बोलत सुटली. आई कान देऊन सारं काही ऐकत होती. जणू यासाठीच ती इतके दिवस आसुसली होती. त्यांच्या गप्पात दोन तास कसे निघून गेले ते दोघींनाही कळलं नाही. आईनं घड्याळात पाहिलं तर संध्याकाळचे सहा वाजलेले. मग चिनु अनिच्छेनेच उठली. पण आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडत होता. आईचं वेगळचं रूप ती पाहत होती. दोघींनी आता दररोज 'मॉर्निंग वॉक'ला जायचंही ठरवलं.

             दोघी एकत्रपणे वाळूतुन चालु लागल्या. दोघींची पावलं वाळूत उमटू लागली. आईनं त्या पावलांकडे पाहिलं. तिचा हात धरून चालणारी ती चिमुकली पावलं आता मोठी झाली होती. या नव्या पावलांसोबत चालायचं तर सतत सुचना, सल्ले देणार्‍या आईची नव्हे तर सगळं काही शेअर जिच्यासोबत करता येईल अश्या तिच्या वयाच्या मैत्रिणीची चीनुला गरज होती. आईची भूमिका आता बदलली होती. मागे वळून चिनूच्या पावलांकडे पाहताना आई छानसं हसली. तिची लेक आता मोठी होत होती.

समाप्त