बदल..

हि कथा बदलाची.. एका नव्या नांदीची..
कौटुंबिक कथा..

बदल 

"आई.. माझी इतिहासाची वही कुठे आहे गं?”

गार्गी ओरडत होती.

"टेबलाजवळच्या कप्प्यात आहे बघ.”

उमाने किचनमधूनच ओरडून सांगितलं.

"आई.. माझा शाळेचा ड्रेस इस्त्री करून दे ना मला शाळेला उशीर होतोय.”

एकीकडे पार्थ आईला आवाज देत होता.

"हो रे बाळा, थांब करते."

उमाने पार्थला उत्तर दिलं.

"ये उमा.. माझी कालची फाईल कुठे आहे? सापडत नाहीये."

एकीकडे कौस्तुभ उमाचा नवरा आवाज देत होता. दुसरीकडे देवघरातून सासूबाई आवाज देत होत्या.

."उमा.. पूजेसाठी फुलं आणलीत का?"

"सुनबाई.. माझा बिनसाखरेचा चहा झाला का?"

दुसऱ्या खोलीतून सासरे आवाज देत होते. 

"वहिनी, माझा टिफिन झाला का? मला कॉलेजला जायला उशीर होतोय." 

कॉलेजला जाणारी तिची छोटी नणंद सावी आवाज देत होती आणि किचनमध्ये उमा घामाघूम.. सकाळचे सर्वांचे डबे करण्यात व्यस्त. सकाळच्या प्रहरात उमा अगदी अष्टभुजा धारण केलेल्या देवीसारखी भासायची. सर्व कामे उरकता उरकता तिची नेहमी त्रेधातिरपीट उडायची. रोज सकाळी हेच दृश्य. घरातल्या सर्व मंडळींच्या आधी उठून सर्वात शेवटी झोपून सुद्धा तिची ही गडबड नेहमीचीच पण आज मात्र उमा रडकुंडीला आली. खरंतर आज सकाळपासूनच तिला थोडी कणकण जाणवत होती. डोकं जड झालं होतं. अंग तापाने फणफणत होतं आणि त्यात भरीसभर म्हणून की काय! साऱ्यांनी तिच्या मागे पिरपिर लावलेली. तिलाच उमजत नव्हतं कोणाकडे लक्ष द्यावं. सगळ्यांचं उरकून तिला श्वास घ्यायलाही निवांत वेळ मिळत नव्हता. ती तशा आजारी अवस्थेतही सर्वांचं सारं करत होती पण कोणालाही तिच्या आजारपणाची साधी दखलही घ्यावी वाटली नाही किंबहुना सर्वांनी तिच्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केलं. सर्वजण आपापल्या कामानिमित्त घराच्या बाहेर पडले. उमाने थोडीफार कामं उरकली. डोकं प्रचंड दुखत असल्याने थोडा वेळ आडवं पडावं या उद्देशाने ती बेडरूममध्ये आली. तिला सर्वांचाच खूप राग येत होता.

“कोणाचं आपल्यावर प्रेमच नाही. सगळे फक्त माझ्या मागे लागलेले असतात. फक्त कामापुरतं माझ्याशी गोड बोलुन उपयोग करून घेतात. मला काहीच जमत नाही. मी कोणाला आवडत नाही.”

तिच्या मनात विचारांची गर्दी झाली. डोळ्यातून उष्ण पाण्याच्या धारा वाहू लागल्या. तिला तो दिवस आठवला. मोहित्यांच्या घराचं माप ओलांडून, गृहप्रवेश करून ती सासरी आली. त्या दिवसापासून ते आजपर्यंत ती कुटुंबातल्या प्रत्येकासाठी फक्त राबतच होती. लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा झाली आणि उमाच्या सासूबाईंनी स्वयंपाकघरातून निवृत्ती घेतली. तिच्याकडे स्वयंपाकघराची जबाबदारी दिली ती आजपर्यंत तिच्याचकडे., उमाचं बारावीचं शिक्षण संपलं. त्यावेळी कोणीतरी मोहित्यांचं सुयोग्य स्थळ सुचवलं. उमाच्या आईवडिलांना मुलगा, घर पसंत पडलं आणि त्यांनी लहान वयात उमाला लग्नाच्या बंधनात अडकवून टाकलं. संसार म्हणजे काय? याचा तिला गंधही नव्हता पण मोठ्या कौशल्याने तिने परिस्थिती सांभाळली होती. सासूबाई सून आल्यानंतर घरकामातून संन्यास घेत जबाबदारी झटकून मोकळ्या झाल्या. देवपूजा, कीर्तन यात गुंग झाल्या. उमाचे सासरे कडक शिस्तीचे. सगळ्या गोष्टी जागच्याजागी लागायच्या. सर्व कामे वेळच्यावेळी व्हावीत असा त्यांचा हट्ट असायचा. उमाची दमछाक व्हायची पण तरीही उमा सारं नीट सांभाळण्याचा प्रयत्न करत होती. 

कौस्तुभ, उमाचा नवरा एका मल्टिनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्यावर नोकरीला होता. उमाने कधी कौस्तुभला साधं बिछाना आवरायला सांगितलं तरी तिच्या सासूबाई तिच्यावर नाराज व्हायच्या. टोमणे मारत म्हणायच्या,

"आमच्या घरी पुरुषांना घरकाम सांगत नाही. ती बायकांची कामे आहेत. ते बाहेर जाऊन कष्ट करून कुटुंबासाठी राबतात आणि परत घरी आल्यावर त्यांना घरातली कामे सांगायची? आमच्यावेळीस नव्हतं बाई असं!"

असं ऐकल्यावर कौस्तुभ काहीच करायचा नाही. मग सारं उमालाच करावं लागायचं. सगळ्यांच्या हाताखाली करून ती दमून जायची. त्यानंतर काही वर्षातच तिच्या संसारवंशवेलीला आलेली गार्गी आणि पार्थ ही दोन फुलं. मग तर काय.. ती अजूनच जबाबदारीच्या दडपणाखाली दबली गेली. मुलांचं संगोपन करताना दिवस कधी संपायचा तिला कळायचंही नाही. तिची कॉलेजला जाणारी धाकटी नणंद घरातल्या कोणत्याच कामाला हात लावायची नाही. ती मदत करू शकली असती पण सासूबाई तिला काम करू द्यायच्या नाहीत म्हणायच्या,

"सासरी गेल्यावर प्रत्येकीला करावंच लागतं, करू दे की तोवर इथे आराम.."

जणूकाही कुटुंबाची जबाबदारी घेण्याचा मक्ता फक्त घरच्या सुनेचाच असा विधिलिखित कायदाच होता. पार्थ आणि गार्गीला उमा घरातली छोटी छोटी कामे सांगायची तेही सासूबाईंना आवडायचं नाही. मुलं आजीआजोबांच्या फाजील लाडानं उमाचं ऐकेनाशी झाली. उद्धट बोलू लागली. उमाची अवस्था घरकामासाठी येणाऱ्या कामवाल्या बाईपेक्षा वेगळी नव्हती पण आज  मात्र उमा उद्विग्न झाली होती. तिला या सगळ्या वातावरणाचा प्रचंड त्रास होत होता. जीव अगदीच त्रासून गेला होता. तिचं मन त्वेषाने पेटून उठलं होतं. जणू आक्रोश करत होतं.

"मला सुटका हवीय, मला बदल हवाय."

दिवसभर उमा आपल्याच विचारांच्या तंद्रीत स्वतःच्या खोलीतच बसून होती. मन दुःखानं भरून गेलं होतं. संध्याकाळ झाली तरी तिला बिछान्यातून उठावंसं वाटत नव्हतं.

“चला, उठायला हवं.. दिवेलागणीची वेळ झाली आणि आईबाबांच्या चहाची सुद्धा. त्यांना चहा द्यायला हवा.”

उमा स्वतःशीच बडबडत उठली. अंगात कणकण होतीच. तिने सर्वांच्या आवडीचा आल्याचा चहा टाकला. इतक्यात कौस्तुभही ऑफिसवरून घरी आला. तिने सर्वांना चहा दिला पण आज कोणीही तिच्याशी काहीही न बोलता शांतपणे चहा घेत होते. कौस्तुभ तर वर्तमानपत्रात डोकं घालून वाचत बसला होता.कोणाचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं. पुन्हा उमाला वाईट वाटलं. काहीही न बोलता उमा स्वयंपाकघरात गेली. वरणभाताचा कुकर लावला. पोळ्या केल्या.

“आई, भाजी काय करू?”

उमाने सासूबाईंना विचारलं. तश्या त्या चिडून म्हणाल्या.,

“कर काहीतरी.. रोज काय गं तोच प्रश्न? तुला जे करावंसं वाटतं ते कर..”

सासूबाईंनी फटकारल्यामुळे उमा अजूनच व्यथित झाली. तिने तिच्या आवडीची मटरपनीरची भाजी केली. कोशिंबीर केली. पापड तळले. स्वयंपाक झाला. जेवण करण्यासाठी तिनं सासुसासऱ्यांना, कौस्तुभ,छोट्या नणंदेला सावीला आणि पार्थ आणि गार्गीला आवाज दिला पण कोणीच तिच्या बोलवण्याकडे लक्ष देत नव्हतं. सारेजण तिचं ऐकून न ऐकल्यासारखं करत होते. आता मात्र तिला त्यांच्या वागण्याचा प्रचंड त्रास होत होता. ती रागाने रडत तिच्या खोलीत जाऊन बसली. डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागल्या. इतक्यात बाहेरच्या खोलीत जोरदार धमाका झाला. स्फोट झाल्यासारखा आवाज आल्यानं उमा घाबरली. काय झालं हे पाहायला ती धावतच बाहेरच्या खोलीत आली. बाहेरच्या खोलीत अंधार होता. ती खोलीत येताच पटकन दिवे लागले आणि एकच जल्लोष ऐकू आला.

“हॅपी बर्थडे टू यू.. हॅपी बर्थडे डियर मम्मा.. हॅपी बर्थडे टू यू..”

टाळ्यांचा आवाज येत होता. समोर टीपॉयवर केक ठेवला होता आणि मेणबत्या पेटवल्या होत्या. कौस्तुभ, सावी, सासुसासरे आणि मुलं तिच्याकडे आनंदाने पाहत होती. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होती. उमाच्या डोळ्यात आश्चर्यमिश्रित आनंद झळकत होता.

“अगं बाई, आज माझा वाढदिवस आहे.. कामाच्या गडबडीत साफ विसरून गेले पण या साऱ्यांच्या लक्षात होतं?”

तिला खूप आनंद झाला. मुलांनी तिच्या हाताला धरून केकजवळ आणलं. उमाने केक कापला. सर्वात आधी पार्थ गार्गीला केक भरवला. मग सावीला भरवला. मग सासूबाईंनी तिचं औक्षण केलं. उमाने सासुसासऱ्यांना वाकून नमस्कार केला. त्यांनी आशीर्वाद दिला. कौस्तुभ या साऱ्या आठवणी कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होता. उमाच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद त्याने टिपून ठेवला होता. इतक्या सुंदर सरप्राईजने उमा भारावून गेली होती. डोळ्यांतून तिच्या खळकन आनंदाश्रू तरळले. इतक्यात गार्गी ओरडली.

“पप्पा, तुम्ही मम्माला केक भरवा ना.. मी फोटो काढते तुमच्या दोघांचा..”

सर्वांनी गार्गीच्या बोलण्याला दुजोरा दिला. कौस्तुभ पुढे आला आणि केकचा एक तुकडा त्याने उमाला भरवला. उमा लाजली.

“आता मम्मा तू पप्पाना केक भरव..”

पार्थ उमाकडे पाहत म्हणाला.

“काय रे हे.. आता काय आम्ही लहान आहोत का? तुम्ही करा मस्त एन्जॉय..”

उमाच्या वाक्यासरशी पार्थ लाडीक रागवत म्हणाला.

“ते काही नाही.. तू पप्पाना केक भरवायचा.. लवकर भरव.. मी फोटो काढतोय.”

नाही हो करत उमाने लाजत कौस्तुभला केकचा छोटा तुकडा भरवला. कौस्तुभनेही केक खाल्ला. मग त्याने उमासाठी आणलेलं गिफ्ट तिच्या हातात दिलं. सावीने उमासाठी मोत्यांच्या बांगड्या आणल्या होत्या. उमासाठी हा अनपेक्षित सुखद धक्का होता. सर्वांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या. थोड्या वेळाने कौस्तुभने बोलायला सुरुवात केली.

“आज माझ्या ऑफिसमध्ये एक वेगळी घटना घडली आणि त्यामुळेच मला माझी चूक उमगली. ऑफिसच्या मिटिंगनंतर माझ्या साहेबांनी मला केबिनमध्ये बोलवून घेतलं आणि म्हणाले.,

“कौस्तुभ, मी दुपारनंतर नाहीये. उद्याच्या मिटिंगचं प्रेसेंटेशन तयार करून ठेव.. आज मी आणि माझी पत्नी एका नाटकाला चाललो आहोत. ही बघ नाटकाची तिकिटे..”

असं म्हणत त्यांनी आपल्या मोबाईलमधली ऑनलाईन बुक केलेली नाटकाची दोन तिकिटे दाखवली. नाटक संपल्यावर रात्रीचं जेवणही बाहेरच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मी त्यांचा कॅबिनच्या बाहेर आलो. मनात विचारांचं वावटळ घिरट्या घालू लागलं. मी आठवू लागलो की उमाला शेवटचं बाहेर जेवायला कधी घेऊन गेलो आणि आश्चर्य म्हणजे मला काहीच आठवतच नव्हतं कारण पार्थच्या जन्मानंतर उमा आणि मी एकटे कधी कुठे बाहेर गेलोच नाही. माझं मलाच खूप वाईट वाटू लागलं. मला एकदम आठवलं की, आज उमाचा वाढदिवस.. मग मी ठरवलं आजचा हा दिवस उमासाठी स्पेशल बनवायचा. मी सावीला कॉल केला आणि तिने मुलांना.. त्यानंतर आम्ही सर्वांनी मिळून उमाला सरप्राईज द्यायचं ठरवलं. काय उमा आवडलं का तुला आमचं हे छोटंसं सरप्राईज?”

उमाच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. तिने आनंदाने मान डोलावली. आज इतक्या वर्षानी पहिल्यांदा तिच्या कौस्तुभने तिचा वाढदिवस लक्षात ठेवून इतक्या सुंदरपणे साजरा केला होता. आजचा तिचा दिवस खास बनवला होता. पण चाललेला हा सगळा प्रकार सासूबाईंना मुळीच रुचत नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट दिसत होतं. कौस्तुभने ही गोष्ट बरोबर हेरली आणि तो आईजवळ बसत तिचा हातात घेत म्हणाला.,

“आई, उमा आपल्या सर्वांसाठी इतकं करते. काय हवं नको ते पाहते. आपली काळजी घेते पण आपण काय करतो? तिला गृहीत धरतो. हे चुकीचं नाहीये का आई?”

आपल्या मुलाच्या प्रश्नाने सासूबाईं नाक मूरडत म्हणाल्या.,

“त्यात काय इतकं? प्रत्येक बाईला हे सगळं करावंचं लागतं. आपल्या नवऱ्याची, मुलांची, सासरच्या माणसांची काळजी घेणं, त्यांना जपणं हे प्रत्येक सुनेचं कर्तव्यच आहे. आम्ही नाही केलं आमच्या कुटुंबासाठी? आमच्यावेळेस नव्हते बाई असले चोचले.. नाही कोणाला आमच्यासाठी इतका वेळ होता..इतकी वर्षे मी केलं तेंव्हा बरं तुला दिसलं नाही आणि आता बायकोचे कष्ट बरे दिसलें तुला?”

सासूबाईंनी उमाकडे जळजळीत कटाक्ष टाकला. उमा हिरमूसली. पुन्हा कौस्तुभ बोलू लागला.

“बरोबर आहे आई तुझं.. कुटुंबासाठी हे सगळं करणं हे सुनेचंच कर्तव्य आहे. पण मग मला सांग कुटुंबातल्या बाकीच्या सदस्यांचं तिच्यासाठी काहीच कर्तव्य नाही? आपली काहीच जबाबदारी नाही? आई, तू कष्ट करतानाही मला त्रास होत होता पण तू ही कामे बायकांची आहेत म्हणून मला आणि बाबांना काहीच करू दिलं नाहीस. चूकच होती ती आमची. आई, तुझ्याकडे तेंव्हा कोणी लक्ष दिलं नाही. तुझ्यासाठी कोणी वेळ दिला नाही म्हणून तुलाही वाईट वाटलंच ना.. कित्येकदा माझ्यासमोर तू बाबांना बोलूनही दाखवलंस. मग आई, ही चूक आपण सुधारायला नको का? उमाने तिची कामे कर्तव्य म्हणून नाही तर प्रेमापोटी करावी असं मला वाटतं आणि म्हणून त्यासाठी सर्वात आधी आपण तिला कुटुंबाचा एक महत्वाचा भाग म्हणून स्वीकारायला हवं. घरातल्या प्रत्येक लहानसहान निर्णयात तिचं मत विचारात घ्यायला हवं. तिचं असणं आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाचं आहे याची तिलाही जाणीव करून द्यायला हवी.”

कौस्तुभने थोडं थांबून उमाकडे पाहिलं आणि म्हणाला.,

“उमा, आजवर आम्हा सर्वांच्या हातून कळत नकळत का होईना तुझं मन दुखावलं गेलं. सर्वांनी तूला गृहीत धरलं. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने तुला सॉरी म्हणतो. यापुढे अशी चूक होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. आमच्या सर्वांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू मला कायम आमच्याजवळ हवी आहेस आणि म्हणूनच यापुढे तू स्वतःला वेळ द्यायचा. स्वतःच्या तब्बेतीची काळजी घ्यायची. तुझे छंद जोपासायचे. तुला जे आवडतं, खावंसं वाटतं ते सारं तू करायचं. उद्या पासून माझ्यासकट सगळे तुला घरकामात मदत करतील. जशी तू सर्वांची काळजी घेते तशी सर्वजण मिळून तुझी काळजी घेतील. आणि महिन्यातून एकदातरी आपण दोघं बाहेर फिरायला जात जाऊ. आयुष्य मस्त एन्जॉय करू. आणि उमा, पुन्हा एकदा सॉरी..”

आपल्या नवऱ्याचे बोल ऐकून उमा भारावून गेली. सावी आणि मुलांनी त्यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. सर्वांनी तिला मदत करण्याचं कौस्तुभला वचन दिलं. सासऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सासूबाईंना रुचलं नव्हतं तरी त्यांनी कसलाच विरोध केला नाही. मुलं, सावी उमाला येऊन बिलगली. उमाने मायेने सर्वांना जवळ घेतलं. तिने कौस्तुभकडे प्रेमाने पाहिलं. आपल्या नवऱ्याबद्दल रास्त आभिमान तिच्या मनात दाटून आला होता. तिला हव्या असलेल्या बदलाची ही एक नांदी होती.. एक नवी सुरुवात होती..

पूर्णविराम..

©निशा थोरे (अनुप्रिया) 


नमस्कार मैत्रिणींनो,

बहुतांशी घरात हेच दृष्य आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक घरात अशी एकतरी उमा असतेच. बहुतांशी घरात आईच्या मागे साऱ्यांची पिरपिर सुरू असते. ती एकटी सारं निभावून नेण्याचा प्रयत्न करत असते. काही घरात तर घर सांभाळून ऑफिसला जाणारीही.. ऑफिस आणि घर ही तारेवरची कसरत मोठ्या कौशल्याने हाताळणारी. अशा वेळीस प्रत्येक घराने, कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी तिची व्यथा समजली पाहिजे. मुलगा मुलगी भेद न करता सर्वांनी मिळून सहकार्य करायला हवे. घर सर्वांचं आहे त्यामुळे ते सांभाळण्याची जबाबदारी तिची एकटीची नव्हे तर सर्वांची. हे उमजलं की सारंच सुरळीत होईल. साऱ्यांची पिरपिर थांबली की मगच तिची ही त्रेधातिरपीट आपोआपच थांबेल. नाही का? 

समाप्त..
© निशा थोरे (अनुप्रिया)