दुर्दैव

तुला माहितीये मला आज तिचा राग पण येतोय..का तिला कळतं नव्हतं की, नातू स्वार्थासाठी बोलतोय तिच्या?

केशवराव व त्यांची पत्नी वसुधा घरी आले. अंघोळ केली आणि त्यांच्या खोलीत जाऊन बसले. केशवरावांचा इतका वेळ रोखून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला. ते ढसा ढसा रडत होते. वसुधा सुद्धा त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला तिचे अश्रू अडवता येत नव्हते. ती आधीच खूप हळवी होती त्यात रडू आवरणे तिला जमलेच नाही कधी. पण पहाडा सारखा माणूस असा रडतो ह्यामुळे तिला अजूनच वाईट वाटत होतं.

तेवढ्यात त्यांचा मुलगा आणि सून तिथे आले, त्यांना असं रडताना बघून सावरण्याचा प्रयत्न करत होते. “आई बाबा तुम्ही असे रडू नका, जे झालं ते काही आपल्या हातात नव्हतं."

केशवराव जरा सावरत बोलू लागले.

“जी गेली ती माझी सख्खी बहीण होती पण कधीच सुख नाही मिळालं तीला. एक दिवस सगळ्यांनाच जायचं आहे पण तिच्या सारखं दुर्दैवी नशीब नको. आयुष्यभर कष्ट केलेरे तीने."

“तुला सांगतो वसुधा.. मला चांगलं आठवतं. मी तसा लहान होतो पण कळण्याईतपत मोठा होतो. ही माझी बहिण लता तिच्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन आमच्याकडे आली ती कायमचीच. डोक्याला पदर पकडुन आमच्या दारात ती उभी राहिली आणि तिथेच बेशुद्ध पडली. रक्ताने माखलेली, तिच्या डोक्यावर तिच्याच नवऱ्याने कुऱ्हाड घातली होती. कसा बसा जीव वाचवून जीवाच्या आकांताने मुलाला घेऊन पळाली. बऱ्हाणपूर हून भुसावळच्या ट्रेन मध्ये कशी बसली तिचं तिला सुद्धा आठवत नव्हतं. त्या नंतर तिला आई बाबांनी परत पाठवले नाही. घटस्फोट झाला नाही त्यांचा पण ते वेगळे झाले."

“त्यावेळेस आमची परिस्थिती बेताची होती. आईवडील किती दिवस पुरे पडतील म्हणून तिला तिच्या पायावर उभं करणं पण गरजेचं होतं. त्यामुळे तिला त्यांनी जवळच भड्याने वेगळं घर घेऊन दिलं. जेणेकरून तिच्यावर लक्ष राहील. तिथे ती राहायची. शिकलेली नसल्याने नोकरी मिळणं कठीण होतं. पण पोटापाण्यासाठी आणि मुलासाठी काही कमावणं गरजेचं होतं. मग कधी कोणाच्या शेतात मजुरी कर, कधी भाजी वीक, कधी अंडे असं करत दिवस ढकलत होती, मधून मधून आई बाबा तिला मदत करत. हळू हळू तिने पैसे जमवले आणि एक छोटी खोली विकत घेतली. त्यासाठी बाबांनी पण जरा मदत केली."

"तिला बिचारीला जगण्याची एकच आशा होती ती म्हणजे तिचा मुलगा. स्वभावानी तो चांगला होतं. पण मोठा होता होता वाईट वळणाला लागला. त्याला दारूचं व्यसन लागलं. लग्नं झालं की सुधरेल या आशेने त्याचं लग्नं करून दिलं. पण तिला ना मुलाच सुख मिळालं ना सूनेचं नाही नातवाच. लग्नानंतर तिची सून काही दिवसातच घर सोडून निघून गेली, त्यात तिला दिवस गेले होते."

" त्यादिवशी खूप खुश होती ती , येणाऱ्या जाणाऱ्यांना सांगत होती माझ्या मुलाला मुलगा झाला... मी आजी झाली. आता सगळं चांगलं होईल. पण तिची ती आशा कधीच पूर्ण झाली नाही. तिची सून नातवाला घेऊन परत आलीच नाही. तिच्या सूनेला घ्यायला पण गेलो होतो आम्ही, तरी ती नाहीच आली. त्यामुळे मुलगा अजूनच दारू पिऊ लागला. त्याला आम्ही खूप समजावलं. नोकरीला पण लावून दिलं, पण व्यसनाने सगळं वाया घालवलं".

"एकदा त्याला कावीळ झाली होती, डॉक्टरांनी त्याला दारू प्यायला मनाई केली होती, तरी तो दारू प्यायलाच. एकच घोट गेला असेल पोटात त्याच्या कि लगेच तो कोसळला आणि तिने तिचा पस्तीस वर्षांचा तरुण मुलगा गमावला ... तुला आठवतं ना वसुधा हे?"

वसुधा मान डोलवत होती, डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्यांची सून आणि मुलगा पण ऐकत होते. त्यांना सर्वांनाच सगळं माहित होतं पण केशवराव व्यक्त होत होते.

केशवराव पुन्हा बोलू लागले.

" शेवटी कसा ही असला तरी तो तिच्या जगण्याचा आधार होता. पूर्ण खचली होती ती, तरी सुद्धा जगत होती नातवाची मुलाची आठवण काढत."

 "बाबा गेल्यानंतर आई आणि ती दोघींना किती म्हणतं होतो आपण. या इथे पण नाही आल्या दोघी."

"माझी आई गेल्यावर तिचा नातू आला होता भेटायला. त्याला म्हटलं आजी आठवण करते तुझी, घेऊन जा तिला तर म्हणाला कसा, मी कसं नेऊ? माझी बायको नाही करणार तिचं. तुम्ही जर तिचं घर माझ्या नावावर करून दिलं तर मग जाईल घेऊन.. हारमखोर कुठला. तरी तिचा जीव त्याच्यासाठी तुटत होता. मला म्हणायची...’ भाऊ मी गेल्यावर माझ्या नातवाला दे माझं जे काही आहे ते’.

"आपण तिला असं वाऱ्यावर नव्हतो सोडू शकत, आई होती तोपर्यंत त्यांचा एकमेकींना आधार होतं, पण आता ती एकटी होती म्हणून घेऊन आलो तिला आपल्याकडे. शक्य ते सगळंच केलं आपण."

"तुला माहितीये मला आज तिचा राग पण येतोय..का तिला कळतं नव्हतं की, नातू स्वार्थासाठी बोलतोय तिच्याशी. पदोपदी तिला समजावत होतो आपण. तरी तिला काही कळले नाही. परवा त्याला सांगितलं आजीची तब्बेत बरी नाही ये तू, तर नाही म्हणाला...

आणि ....

आज...

केशवरावांचे अश्रू अनावर झाले... त्यांच्या मुलाने त्यांचा हात पकडून ठेवला. ..

"आज ती गेली, कायमची तरी तिच्या नातवाने यायला नकार दिला. मला घर मिळालं नाही त्यामुळे तिचा आणि माझा काहीही संबंध नाही. तुमची बहीण आहे तुम्ही करा तुम्हाला काय करायचे ते. असं बोलला तो. ज्याच्यासाठी इतका जीव काढत होती. तो साधा अग्नी द्यायला सुद्धा नाही आला. मतलबी कुठला."

"नवरा आहे पण तो येणार नव्हताच. ज्यांनी नीट वागवल नाही तिला तो काय तिचे अंत्यविधी करणार."

"आणि सर्वात वाईट म्हणजे, आपल्या हिंदू धर्मानुसार जर पती किंवा मुलगा किंवा नातू जिवंत असेल तर इतर कोणी अग्नी देऊ शकत नाही, त्यामुळे मला सुद्धा भटजिंनी अग्नी देऊ दिला नाही.'

तिला मशीन मध्ये...

त्यांना शब्द फुटत नव्हते...

काही वेळ असाच गेला, सगळेच रडत होते.

"बिचारीला ना संसार सुख मिळालं, नाही मुला- नातवंडांच, नाही अग्नी मिळाला आणि आता तिचा दशक्रिया विधी होणार नाही की काही नाही. काय नशीब घेऊन आली होती बिचारी देव जाणे.. किती दुर्दैव तिचं." 

"आपण तिच्या नावाने काही दान करू, इतकचं करू शकतो आपण."

धन्यवाद

तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा. तुमचा अभिप्राय लेखकासाठी मोलाचा असतो. कथा आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.