Feb 24, 2024
वैचारिक

पडद्यामागचा हिरो

Read Later
पडद्यामागचा हिरो

“काकू, आज रात्री तरी टिफिन मिळेल का?”- शुभदाला आज दिवसभरातील सातवा फोन होता.

“पृथ्वी, मी तुम्हाला चार दिवस आगाऊ सांगितलं होतं.. की आज मला नाही जमणार."- शुभदाचा स्वर आता हळूहळू जडावलेला होऊ लागला होता.

'बरं काकू, पण उद्या पक्का न?'- पलीकडून आर्जव सुरूच.

'हो.'- भरल्या डोळ्यांनी शुभदाने फोन ठेवला आणि पुनः ती सुदेशच्या फोटोकडे पाहत राहिली.

'ताई, तू तरी सांग न तिला. दिड वर्षे झाली बाबाला जाऊन. अजून किती दिवस त्याच्या आठवणीत तिने असा स्वतःला त्रास करून घ्यायचा?'- एकवीस वर्षाचा शुभदाचा लेक; आयुषने त्याच्या चोवीस वर्षीय बहिणीला; योगिताला विचारलं.

'आयुष, तू विसरलास का रे बाबाला? तुला नाही आठवत का तो?'- इतका वेळ किचनमध्ये पाठमोरी असलेली योगिता आयुषकडे फिरलीच ती रडून रडून सुजलेल्या डोळ्यांनी.

'ताई? तू पण?'- आता आयुषही काहीसा रडावलेला झाला.

'मी पण कुठे विसरलोय त्याला? त्याची केमिस्ट्री वेगळीच होती ना ग? नाही कळला तो आपल्याला कधी! त्याच कर्तव्य त्याने अगदी परफेक्ट केलं पण आपल्यात तो कधीच का नाही मिसळला ग? का तो कधी आपला मित्र बनला नाही?'- आयुष भावुक झाला असला तरीही काहीसा चिडचिडा झाला.

'हम्म..'- योगिताला शब्द फुटत नव्हते, फक्त डोळ्यातलं पाणी तेवढं थांबलं नव्हतं.

'ताई, अग आपणच असं कोसळलो तर आईला कोणी सावरेल ग?'- आयुष समजूतदारपणे बहिणीच्या जवळ जात बोलला.

'तुला काय वाटतं रे, मला नसतील पडले हे सगळे प्रश्न? घरात त्याचा सगळ्यात जास्त विरोध मीच नव्हती का करत? तो होता तेव्हा मला लाजच वाटायची त्याला बाबा बोलताना. त्याच राहणं, वागणं अगदी गबाळ्यासारखं. नकोसा वाटायचा तो मला. माझ्या मैत्रिणींचे बाबा कसे अगदी टापटीप. एकदम हिरो सारखे. आणि आपला बाबा? पण माझा बाबा हा पण हिरोच होता हे कळायला मला त्याच्या मरणाची वाट पाहायला लागली रे. खूप उशिरा कळलं त्याच वागणं. पण तू बोलतोस तेही ठिक. आपणच तुटलो तर आईला कोणी सांभाळेल?'- योगिता डोळे पुसत उठली आणि चहा करायला वळली. 

आयुषही तिच्या मागून आजच्या जेवणात मदत करायला वळला.

--#--

'तुम्हीं जे बोलयचात तेच खरं झालं ओ! अगदी तसच्या तसं. तुम्हीं म्हणयचात ना की मी नसेन तेव्हा तुम्हांला माझं नसणं जाणवेल; अहो, तसंच होतंय ओ. आज शुभदा किचन केवढं मोठं झालंय. तीनशेहून अधिक लोक आपल्याकडून जेवण नेतात. तुम्हीं लावलेल्या रोपट्याचं झाड होताना पहायला तरी तुम्हीं असायला हवं होतात. मला उंच आकाशात भरारी घेताना पहायला तरी तुम्हीं हवे होतात. मला पंख देऊन तुम्हीं तेवढे मरणाच्या दरीत कोसळून गेलात. का ओ? का?'- शुभदाचा आंतरीक आक्रोश तीव्र होत चालला होता.

रडता रडता शुभदा नकळतपणे भूतकाळात शिरली. लग्न होऊन ती शुभदा राणेची, शुभदा सुदेश मोहिते झाली. एकत्रित कुटुंबात त्या दोघांमध्ये प्रेम फुलायला काहीसा अंमळ उशीरच झाला. हळूहळू दोघांमध्ये प्रीत आणि समज दोन्हीं वाढू लागली. योगिताच्या रुपात सांसारिक वेलीवर पहिलं फुल उमललं.

काही काळ इवल्याश्या बाळाचे लाड करण्यात गेले की निर्दयी नियतीचा घाला दोघांच्या सुखी आयुष्यावर पडला होता. सुदेशची स्थिरस्थावर नोकरी अचानक सुटली आणि त्याला नाईलाजाने कमी पगाराची नोकरी पत्करावी लागली.

हळूहळू, घरच्या खर्चावर आणि पर्यायाने हक्काची म्हणून शुभदाच्या खर्चाला कात्री लागू लागली, अन तिथेच हलक्याफुलक्या ठिणग्या उडायला सुरू झाल्या. दर शनिवारी सुदेशच्या हातून अबोलीचा गजरा माळून घेतानाचा शुभदाचा आनंद आता काळाआडच गेल्यात जमा होता. छोट्या-मोठया कुरबुरी वाढू लागल्या होत्या अन त्यातच आयुष नावाचं दुसरं आव्हान अनवधानाने जन्माला आलं. जन्मतःच त्वचा रोगाने बाधित असणाऱ्या आयुषला सुदेश आणि शुभदाने रक्ताचे पाणी करत निरोगी केले होते. डॉक्टरांच्या उपचारावर अमाप रुपये खर्च करीत त्यांनी आयुषच्या त्वचाविकारावर मात केली होती.

मात्र यानंतर सुदेशची काटकसर अगदीच टिपेला पोचली होती. मुले आताशी मोठी होऊ लागली होती. बाहेर लोकांकडे रंगीत टीव्हीवर केबल नेट असताना त्यांच्याकडच्या ब्लॅक न व्हाईट टीव्हीवर केवळ सरकारी कार्यक्रम पाहताना ती मुलं हिरमसून जात असत. लोकांकडच्या फ्रिजच्या पाण्याला सुदेशने माठाचा पर्याय ठेवला होता. नवीन कपडे केवळ वाढदिवशीच. अगदी दिवाळीतही नवीन कपडे नाही म्हणजे नाहीच. बापाच्या कंजूसपणाला मुले अगदी त्रासून जाऊ लागली होती. नकळत बाप- मुलांच्या नात्यात अंतर येऊन ते दिवसेंदिवस वाढू लागलं होतं. मुलांची मनस्थिती शुभदाला कळत असली तरी सुदेश तिलाही धुडकावून लावत असल्याने तिचाही नाईलाज होताच.

नशिबाने दोन्हीं मुलांना आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सुदेशने त्यांना पाहिजे तितका पैसा पुरवला होता. योगिताला अगदी डोनेशन भरून त्याने मास मिडिया मध्ये प्रवेश घेऊ दिला होता. आयुषने फ़ॉरेन्सिक मध्ये अभ्यास सुरू केला होता.

योगिता काहीशी तापट होती अन त्यात अभ्यासाच्या निमित्ताने सोबत असलेल्या सहविद्यार्थ्यांचें आणि त्यांच्या पालकांचे राहणीमान पाहून तिला आपसूकच आपल्या वडिलांची भयंकर चीड येत असे. सुदेशने तिच्या मनात नसताना कराटे क्लासला तिचे नाव घालताच साऱ्या असंतोषाचा भडका उडाला होता. कधी नव्हें तेव्हा  शुभदाही पेटून उठली होती. दोघीं मिळून सुदेशशी भांडत होत्या. आयुषही काही वेळातच त्यांना शामिल झाला होता. साऱ्यांच्या बोलण्याने दुखावूनही सुदेश केवळ शांतच होता.

'तुला कराटे शिकावेच लागतील. नाहीतर दरवाजा उघडा आहे. तू इथून तोंड घेऊन जाऊ शकतेस.'- सुदेश शांतपणे उत्तरला होता.

'जर ती गेली तर आम्हीही जाऊ.'- शुभदा चवताळून बोलली.

'हो, चालेल.'- सुदेशने जुजबी उत्तर दिलं.

'आमच्या असहाय्यतेचा तुम्हीं फायदा घेताय. तुमच्या घरासाठी मी माझं सर्वस्व दिलं. नाहीतर मी ही नोकरी करू शकली असती. आणि मी नोकरी केली असती तर आज हे असं तुमच्या ताटाखालचं मांजर बनून राहण्याची वेळ आली नसती. तुमच्या हिटलरशाहीपासून दूर नेलं असतं मुलांना. सुखी ठेवलं असतं. शेजारच्यांची कुटुंब बघा, कशी हसून खेळून आहे. कोणाला लाज वाटत नाही सांगायला की हा माझा बाप आहे म्हणून. आणि इकडे?'- शुभदाचा तोल ढासळू लागला होता.

'आयुषच माहीत नाही पण मला लाज वाटते तुम्हांला बाप म्हणवून घेताना!'- योगिता संतप्तपणे व्यक्त झाली.

'आणि मलाही! मलाही माझं मन नसताना घरकाम करण्याची सक्ती करून ठेवलीय.'- आयुषने ही री ओढली.

'बरं. मला विचार करू द्या. मी तुमच्या सुटकेसाठी काही करता आलं तर पाहतो.'- सुदेश हलकं हसून बोलला.

त्या रात्री सगळं जेवण अगदी शांततेत झालं. सुदेशने आपलं जेवण संपवलं आणि तो तसाच बसून राहिला.

'शुभदा, तुझ्या हातात आधीपासूनच छान चव आहे. तू पोळीभाजी केंद्र का सुरू करत नाहीस??'- सुदेशच्या प्रश्नावर योगिताला पार ठसकाच लागला, शुभदाचा तर आ वासलेला तसाच राहिला होता.

'आणि त्यासाठी लागणारे पैसे? भांडवल?'- आयुषने प्रश्न केला.

'मी देईन.'- सुदेश शांतपणे बोलला.

'खरंच?'- शुभदाला अजूनही विश्वास बसत नाही.

'हे घे!'- सुदेशने चेक पुढे केला.

'एक लाख?'- शुभदा जवळपास किंचाळलीच.

'हो, तुझाही या पैशांवर हक्क आहेच. त्यामुळे मी या पैशांचा तुला हिशोब विचारणार नाही. तुम्हीं तुमच्या अंदाजाने तुझा व्यवसाय सुरू करा. मी काही त्यात पडणार नाही.'- सुदेश गंभीर होत बोलला.

'तेच चांगलं!'- नकळत योगीताच्या तोंडून उद्गार बाहेर पडले.

'बरं, जशी तुमची आज्ञा!'- हसत सुदेश उठून किचनमध्ये आपलं ताट धुण्यासाठी वळला होता.

'नक्की अकाऊंट मध्ये पैसे असतील ना? नायतर हा माणूस आज अचानक एवढा उदार?'- आयुषला सुदेशचा बाप म्हणून उल्लेख करतानाही लाज वाटत होती.

'उद्याच बँकेत चेक टाकून देऊ'- योगीता बोलली.

ती रात्र तिघेही झोपलीच नव्हती, खूप साऱ्या चर्चानंतर सुदेशच्या हिटलरशाहीला विरोध म्हणून 'शुभदा किचन' नाव फायनल झालं होतं. व्यवसायाची सुरुवात योगिता आणि आयुषच्या घरापासून दूर राहणाऱ्या मित्र-मैत्रिणींना डबे पुरवण्यापासून झाली होती. हाताला विलक्षण चव असणाऱ्या शुभदाच्या जेवणाला दिवसेंदिवस मागणी वाढू लागली होती. घरात आता हळूहळू रंगीत टीव्ही, फ्रिज, मोबाईल फोन प्रवेश करते झाले होते आणि यावेळेस सुदेशच्या परवानगीची कोणालाच गरज नव्हतीच. सुदेशही एका पराभूत योध्याप्रमाणे शांत बसत होता.

'याला म्हणतात जगणं. नायतर आधीच आपलं खुरड्यातलं जीवन. याक! आठवून सुद्धा अंगावर शहारा फिरतो!'- एक दिवस योगीताने सुदेशला टोमणा मारलाच.

'वेळ प्रत्येकवेळी सारखीच नसते बाळा.'- सुदेश मान खाली घालुन बोलला. एक अनामिक भीती त्याच्या चेहऱ्यावर होती.

'आता आमचं लाईफ बदललंय. तुम्हीं शक्य तेवढं लांबच रहा आमच्यापासून.'- आयुष जळजळीत शब्द फेकत बोलला.

'बरं. जशी तुमची आज्ञा! पण जेव्हा मी नसेन तेव्हा तुम्हांला माझं अस्तित्व नक्कीच जाणवेल.'- सुदेश हसत घराबाहेर पडला होता.

सारं सुरळीत चालू असताना, करोना महामारी भारतात शिरकाव करू लागली होती. प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीमुळे व्यवसाय ठप्प होऊ लागले होते. लोकांच्या आरोग्यासाठी सरकारचाही नाईलाज होत होता.

बदललेल्या गणितांची झळ शुभदा किचनलाही बसली होती. घरात जमा करून ठेवलेलं साहित्य खराब होण्याच्या मार्गावर होतं. 
तिघेही चांगलेच तणावात होते. साहित्य फुकट तर जाणारच होतं पण जम बसू लागलेल्या व्यवसायाची रया जाण्याची वेळ आली होती.

'मी एक सुचवू?'- सुदेशने दुरूनच विचारलं.

कोणीही काहीच बोलले नव्हते की कोणी सुदेशकडे ढुंकूनही पाहत नव्हतं.

'माफ करा, मला माहितेय की माझ्या मताला तुमच्या लेखी किंमत नसणार आहे पण तरीही सुचवतो. तुमचं सामान असंही वायाच जाणार आहे. बाहेर खूप जणांचे भुकेने हाल होत आहेत. जमलं तर त्यांना मोफत जेवण पुरवता आलं तर पाहाल का? वाटलं तर त्यांचे पैसे मी देईल. तुमचंच नाव होईल की जे पुढे तुम्हांला कामी येईल. बघा, विचार करून सांगा.'- एवढं बोलून सुदेश आतल्या खोलीत गेला होता.

'आई, हा खरंच चांगला उपाय आहे. पण आश्चर्य म्हणजे राक्षसाच्या तोंडून असे विचार निघणं म्हणजे?'- योगिताच्या बोलण्याला शुभदा अन आयुषने खळखळून दाद दिली होती.

तेव्हाच आतल्या खोलीत सुदेशच्या पायावर काही गरम थेंब पडले होते. आपला राक्षस म्हणून झालेला उल्लेख त्याला चांगलाच दुखवून गेला होता.

'आई डब्बे तर बनले पण एवढया भयंकर परिस्थितीमध्ये धोका पत्करून बाहेर जाणार कोण ग?'- आयुषने आपली भीतीयुक्त शंका जाहीर केली.

'मी जाऊ? सगळ्या डब्यांचा वाटलं तर तुम्हांला हिशोब देईन!'- सुदेशने सहज विचारलं.

'हो.'- तिघेही एकसुरात बोलून गेले.

सारे डब्बे आपल्या स्कुटरवर कसेबसे सेट करून सुदेश बाहेर पडला. बाहेर पडताना त्याचे डोळे भरून आले होते.

'इतका तिरस्कार करतात माझा? कोणालाही सांभाळून जा म्हणून बोलावसं वाटलं नाही?'- त्याच्यातला पुरुष अश्रू बाहेर सांडू देत नसला तरी आतमध्ये तो पूर्णपणे तुटून गेला होता.

पुढचे काही दिवस त्याचे हे कार्य अविरत चालूच होत. अचानकपणे एक दिवस त्याने घरी फोन करून तो काही दिवस घरी येऊ शकत नसल्याचे सांगितले होते.

'आई, आता काय करावं? बाहेर तर आजार चांगलाच फोफावला आहे. आता बाहेर पडणं म्हणजे मृत्यला आमंत्रण देण्यासारखं असेल.'- आयुषने पुनः भीती व्यक्त केली. 

'आई, आपण थांबवू आता हि समाजसेवा. पुरे झालं एवढं. त्यांनी काही रक्कम जमा केली का? ते बोलले होते ना की याचे पैसे ते देतील म्हणून?'- योगीताने सुदेशचा बाप म्हणून उल्लेख करणं स्पष्टपणे टाळत आईला प्रश्न केला.

'हो, मी आयुषला कालच म्हटलं की काही रक्कम माझ्या खात्यात त्यांनी जमा केली आहे.'- शुभदाच्या उत्तरावर आयुषनेही मान डोलवत दुजोरा दिला.

'आई, पण ते नसले की किती मोकळं मोकळं वाटतं ना ग? '- योगीताने हसून प्रश्न केला तसे तिघेही खळखळून हसले.

इतक्यात योगीताच्या मोबाईलवर तिच्या मैत्रिणीचा फोन वाजला आणि ती तिनताड उडालीच. घाईत तिने मैत्रिणीने पाठवलेली लिकं ओपन केली आणि काहीशी अस्वस्थ झाली.

'आई, आयुष.. अरे यार! हे बघा.'- ती गडबडीने दोघांच्या जवळ मोबाईल घेऊन जात बोलली.

व्हिडीओ मध्ये भर उन्हात; गरिबांना, पोलिसांना आणि इतर गरजूंना जेवण पुरवणाऱ्या सुदेशची लोक थांबवून चौकशी करत होते, त्याची तारीफ करत होते. तो मात्र सर्वांना एकच सांगत होता-' मी शुभदा किचनमध्ये काम करणारा एक साधारण कामगार आहे. सारे श्रेय शुभदा मॅडम आणि त्यांच्या मुलांचे आहे. त्यांना जेवण आणि पॅकिंग करायचं असतं म्हणून हे काम मी माझ्याकडे घेतलं आहे. तुम्हांला आशीर्वाद द्यायचे झालेच तर शुभदा किचनला द्या.'

'योगी, ते कुठे असतील ग?'-आज इतक्या दिवसांनी पहिल्यांदाच शुभदाला सुदेशची काळजी वाटू लागली होती.

पुढिल काही दिवसांत शुभदा किचनचे नाव सोशल मीडियावर गाजू लागलं होतं. शुभदा, योगिता, आयुष आता चांगलेच प्रसिद्ध झाले होते. सगळीकडून होत असलेल्या कौतुकामुळे तिघेही भारवल्यागत झाले होते. साऱ्या आनंदात सुदेशची आठवण कधीच मागे पडली होती.

आता लोक स्वतःहून शुभदा किचनलाच फोन करून जेवण मागवू लागले होते. हा हा म्हणता शुभदा किचनचे तीनशेहून अधिक ग्राहक झाले होते.

'कोणी आहे का घरी?'- एक दिवस अचानकपणे एक व्यक्ती दरवाज्यात उभी राहून बोलली.

'शुभदा मॅडम? तुम्हींच का? ' -त्या व्यक्तीने विचारलं.

'हो? पण आपण?'- शुभदा दूर उभी राहूनच बोलली.

'मी रामजी. अबक नर्सिंग होमचा कर्मचारी. हे पत्र तुमच्यासाठी. सुदेश रावांनी दिलंय. येतो मी. खूप मस्त माणूस होता.'- पत्र देऊन तो व्यक्ती पुढील कोणत्याच उत्तराची अपेक्षा न बाळगता तिथून निघाला होता.

'मस्त माणूस होता??'- शुभदाच्या कानात शब्द घुमले आणि तिच्या मनात भीतीची हलकी लहर निर्माण झाली. 

तिने पटकन पत्र उघडलं की तेवढ्यात   योगिता आणि आयुष आले.

'शुभदा, आयुष अन योगिता.
आशा करतो की तुमचं शुभदा किचन आता यशाची शिखरं गाठत असेल. आशा कसली; मला खात्रीच आहे. शुभदाच्या हातात चवच अफलातून आहे. सर्वप्रथम माझ्या आजवरच्या वागण्याची मी माफी मागतो. तुम्हीं माफ करणार नसला तरीही माफी मागून मी माझ्या पुढील प्रवासासाठी निघतोय. 
योगिता, आजकलच्या जमान्यात मुलीला एकवेळ स्वयंपाक नाही आला तरी स्वसंरक्षण आलंच पाहिजे. काळाची गरज आहे. लॉकडाऊन नंतर तू कराटे प्रशिक्षण तेवढे पुर्ण करशील. क्लासची संपुर्ण फी मी आगाऊ भरून ठेवली आहे. मागे टीव्हीवर एक जाहिरात पाहून तू बोलली होतीस की मला लग्नात असाच हार हवा आहे. मी तसलाच डायमंडचा हार तुझ्यासाठी घेऊन ठेवला आहे. पत्रासोबत बँकेच्या लॉकरची डिटेल्स पाठवत आहे.
आयुष, आत्ताच्या जमान्यात मुलांनाही स्वयंपाक येणं गरजेचे झाले आहे, म्हणजे लॉक डाऊन सारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर तुमच्यावर उपाशी राहण्याची वेळ येणार नाही, तसेच तुझ्या पत्नीच्या आजारपणात त्याचा तुला उपयोग होईल. विकतच्या अन्नापेक्षा हाताने बनवलेल्या अन्नात माया खूप जास्त असते रे! तुझ्या फ़ॉरेन्सिक कॉलेजसाठी लागणाऱ्या सर्व खर्चाची मी आधीच तजवीज करून ठेवली आहे. मी काही रक्कम तुझ्या नावे फिक्स्ड डिपॉझिट मध्ये ठेवली आहे; तू तिचा योग्य तो विनियोग करू शकतोस.
शुभदा, घरात सगळ्यात जास्त अन्याय मी तुझ्यावर केला आहे. इतका की तुझी माफी मागण्याचीसुद्धा हिम्मत नाही माझ्यात! माझी चांगली नोकरी गेली आणि आपल्याला आर्थिक चणचण भासू लागली. मनात नसताना मला कंजूसपणाचा मुखवटा चढवावा लागला. मलाही तुझे आणि मुलांचे लाड करावेसे वाटायचं पण तुमच्या भविष्याची चिंता सगळ्यावर मात करून जायची ग! असो, सोड जाऊ दे सगळं. तू आता सुखात रहा. राहतं घर मी तुझ्या नावे करतोय. तसेच तुझ्या आवडीचा लक्ष्मीहार, मोहनमाळ, आणि मोत्यांच्या बांगड्या बॅंकेच्या लॉकर मध्ये आहेत.
तुम्हां तिघांना सांगतो, आज या क्षणाला मला माझ्या वागण्याचा पश्चाताप बिल्कुल जाणवत नाहीये. लॉकडाऊन काळात शेजारच्या साठेंचा रंगीत टीव्ही बँकेने नेला, पाठकांची दुचाकी फायनान्स कंपनीने नेली, घोष बाबूंना ऍडमिट केलं तेव्हा त्यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये भरायला डिपॉझिट रक्कम नव्हती. पण आपल्यावर मात्र तशी कोणतीच वेळ आली नाही. देवाची कृपाच म्हणायची. पत्रासोबतच एक अजून लिफाफा असेल त्यात माझं मृत्युपत्र आहे आणि डेथ सर्टिफिकेट सुद्धा. मी  रामजी काकांना तशी विनंती करूनच जातोय. दोन्हीं कागदपत्रे दाखवल्यावर तुम्हांला बँकेतल्या लॉकरची कस्टडी मिळेल. चला, तुमचा फारसा वेळ घेत नाही. 
-कुणाचाच कोणी नसलेला
सुदेश"

पत्र वाचून संपलं आणि तिघेही अगदीच सुन्न झाले होते, अगदी निर्जीव पुतळा. कोणालाच काही सुचत, सुधरत नव्हतं. बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत नव्हता. 

शेवटी आयुष ने गुगलवरून अबक नर्सिंग होमचा फोन नंबर आणि तिथून रामजी काकांचा फोन क्रमांक मिळवला. त्यांच्याशी बोलणं संपण्याच्या आधीच त्याच्या हातून फोन गळून पडला होता.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुदेश चार दिवस आधीच इहलोक सोडून गेला होता. करोना काळात लोकांना जेवण पोहचवतानाच त्याला स्वतःला करोनाची लागण झाली होती. गरिबीच्या काळात दुपारचे जेवण कायमच टाळत आल्याने त्याला ब्लडप्रेशरचा त्रास लागला होता न तोच त्रास त्याच्या कोविडच्या प्रतिकाराच्या दरम्यान त्याला हरवून गेला होता.

प्रिय वाचक, 
सादर कथा हि कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्यासाठी किंवा अमुक एका प्रवृत्तीचा उदोउदो करण्यासाठीही नाही. कथेचं सारं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर व्यक्ती चूक की परिस्थिती हा कायमच गूढ प्रश्न आहे. आपण जर तो वेळीच सोडवला तर नात्याच्या बऱ्याच विटंबना वेळेत टाळता येतील.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..

//