बाब्या

Story about Diwali celebration

देसाई चाळ आज दिपावली निमित्ताने छान सजली होती. दरवर्षीप्रमाणे चाळीत सर्वांनी सारखेच आकाशकंदील लावले होते त्यामुळे चाळीची शान अजूनच खुलून दिसत होती. राण्यांची लेक आणि सून रांगोळी काढण्यात सराईत होत्या त्यामुळे आज पहिला दिवस म्हणून चाळीतल्या पंधरा खोल्यांची त्यांच्याकडून रांगोळी काढून घेण्यासाठी चढाओढ सुरू होती अन विशेष म्हणजे त्या दोघीही न कुरकुरता आपली कला मुक्तदिलाने सगळीकडे समान मांडत होत्या. त्यांच्या रांगोळ्या पाहून कुण्या आजीची बोटे आपसूक कडकडा मोडली जायची तर कोणाच्या तोंडून कौतुकाची दाद बाहेर पडत होती.

'व्वा! मस्त रांगोळी आहे ओ'- खांद्यावर विरलेला शर्ट आणि जागोजागी ठिगळं लावलेली हाल्फ पॅन्ट घातलेला बाब्या चाळीत प्रवेश करता करताच बोलला.

ऐन सणाला बाब्याला तसं पाहून राणे कुटुंब तोंड वाकडे करत दरवाजाआड गेलं होतं. त्यांच्या दुर्लक्ष करण्याचा विषाद वाटून न घेता बाब्या चाळीतल्या घरांना केलेली रोषणाई डोळ्यांत साठवत पुढे पुढे सरकत, परबांच्या दारी पोहचला होता.

'गे परबीन माय!'- बाब्याने नेहमीच्या शैलीत परबकाकूंना आवाज दिला.

चाळीबाजूच्याच झोपडपट्टीमध्ये राहणारा बाब्या कधीकाळी भीक मागत मागत एकदा देसाई चाळीत शिरला होता. त्याचा अवतार पाहून काहींनी अक्षरशः हकलवून लावलं तर काहींनी नाक मुरडत एक-दोन रुपये त्याच्या हाती टेकवले होते. फक्त परब काकूनीं त्याला घरातल्या गरमागरम चपात्या आणि भाजी खाऊ घातली होती आणि तेही दरवाजाजवळ खुर्चीत बसवून. त्या दिवसापासून बाब्या आणि परब कुटुंबियांचे चांगले जमले होते. परबांची काही कामे असतील जसे की दुकानातून वाण-सामान आणणे, दळण आणणे अशी कामे बाब्याला हक्काने सांगितली जात आणि त्याबदल्यात बाब्याला कधी खाण्याचे जिन्नस तर कधी पैसे दिले जात होते.

'परबीन माय.'- बाब्याच्या तिसऱ्या हाकेलाही उत्तर आले नाही तसा बाब्या मनोमन खजील झाला आणि परत जाण्यासाठी मागे वळलाच होता की दरवाजा उघडला गेला होता आणि दारात परबकाकू उभ्या होत्या. पाणावलेल्या डोळ्यांनी अन दुखावलेल्या चेहऱ्यांनी.

'बाबा, पण तुम्ही कशाला उगीच फटाके आणलेत? गरजच काय होती? अहो, मी इकडे सोशल मीडियावर फटाके टाळा, प्रदूषण टाळाच्या पोस्ट करतोय आणि तुम्ही सोहमला थेट फटाके आणून दिलेत? अहो, माझी ऐपत नव्हती का त्याला फटाके आणून द्यायची?'- परबकाकूंचा मुलगा वडिलांशी तावातावाने बोलत होता.

परबकाकूनीं हातानेच बाब्याला दरवाजात थांबवलं आणि त्या फराळ घेऊन आल्या. त्या येईपर्यंत बाब्याला झाला प्रकार लक्षात आला होता. तोही निमूटपणे फराळ घेऊन माघारी परतला होता.

संध्याकाळ होत आली तसे आसमंतात फटाक्यांचे आवाज उमटू लागले होते. छोटे-मोठे सारेजण रस्त्यावर होते. देसाईचाळीच्या मैदानातही चाळीतले लोक फटाके फोडत होतेच. अशावेळी अचानक बाब्या तिथे आला आणि थेट परबांच्या घरी जाऊन धडकला होता.

'मेहुल दादा. गे परबीन माय, मेहुल दादा आहे का?'- बाब्याने आज पहिल्यांदाच परबकाकू सोडून दुसऱ्या कुण्याची विचारपूस केलेली पाहून परब कुटुंबीय चपापले होते.

'हा, बोला काय काम आहे?'- मेहुलने बाहेर येत विचारले.

'दादा, थोडं अर्जंट काम होतं. माझ्यासोबत मोजून पंचवीस पाऊलं याल का? काहीतरी महत्वाचं दाखवायचं आहे.'

'मला नाही वेळ. आणि मला काय दाखवायचं आहे?'

'दादा, नाही म्हणू नका प्लिज. तुमच्या नजरेतून खूप जणांना दाखवायचं आहे. प्लिज. मी.. मी पुढचे दहा खेप तुमची काम विनामोबदला करेल. पण आता चला.'- बाब्या हात जोडून आर्जव करू लागला तसे नाईलाजाने मेहुल त्याच्या पाठोपाठ निघाला होता.

काही अंतर चालताच एक झोपडपट्टी सुरू झाली होती. त्याआधी असलेल्या मैदानात आजूबाजूच्या परिसरातील मुले फटाके फोडत होती. झोपडपट्टीमधली बारकी-मोठी मुले बाजूलाच एका कोपऱ्यातून ते फटाके पाहत होते. एखादं रॉकेट उंचावर गेल्यावर, फुटल्यावर रंगाची उधळण करायचे आणि ते पाहून एखादा बारका आनंदाने उड्या मारत टाळ्या पिटायचा आणि मग बाकीचे मुले त्याला दरडावून शांत करायचे. फटाके उडवून मुले दमली की काही वेळ विश्रांतीसाठी घरी जाऊन येत. त्या वेळेत झोपडपट्टीमधील मुले मैदानात धाव घेऊन लगबगीने शोध घ्यायची. न फुटलेल्या फटाक्यांचा आणि उसन्या आनंदाचा. असे फटाके गोळा करून ते मग फोडायचे आणि त्यात समाधान मानायचं. मघासचा बारका आता वात पेटवण्यासाठी हट्ट करायचा मग छोट्यातला छोटा फटाका त्याला देऊन शांत केलं जात होतं. मेहुल एका कोपऱ्यात उभं राहून हे सारं पाहत होता. समोर चालू आहे ते चूक की बरोबर याच द्वंद्व त्याच्या मनात सुरू झालं होतं.

'दादा,आजच्या घडीला निव्वळ भारतात १६ मेट्रिक टन इतका ई-कचरा तयार होतो. ई-कचरा म्हणजे जुने मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे. मग प्रदूषण फक्त फटक्यांनीच होत असेल का?'- बाब्याने शांतता भंग केला होता.

'पण असा विचार करून आपण फटाके फोडले तर प्रदूषण होणारच ना? आणि फटाके उडवून काय मिळतं?'- मेहुलने तोंड वाकडं करत उत्तर दिलं.

'एरव्ही डायट पाळताना मध्येच एखादा चमचमीत पदार्थ आपल्या समोर यावा आणि आपण तो खावा त्यावेळेस आपल्याला काय मिळतं? क्षणिक आनंद? जीवनाचा तो क्षण जगल्याचे समाधान? बरोबर? आणि ती चिटिंग पचवायला आपण पुढे जोमाने व्यायाम करून जास्तीच्या कॅलरी कमी करतो. बरोबर?'

'हो. पण त्याच इकडे काय?'

'दिवाळीचे दिवस तीन. तीन दिवसांत चिटिंग म्हणून फटाके फोडायचे आणि उरलेले दिवस व्यायाम समजून जास्तीची झाडं लावायची, वर्षभर जगवायची.'

'इतकी झाडं लावायला जागा कुठे आहे?'

'मग व्यायाम बदलायचा. जमेल तितकी झाडे लावायची. गरज असतील तितकीच इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरायची. शक्य असेल तेव्हा तेव्हा सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. प्लॅस्टिकचा वापर टाळावा. एवढं केलं तरी प्रदूषण थांबेल ना?'- बाब्या अगदी निर्विकार चेहऱ्याने प्रश्न विचारत होता.

'हम्म. हो. पण हे सांगायला इथे आणायची काय गरज?'

'मी तुम्हाला तिथे चाळीत सांगितलं असतं तर तुम्ही मला धुडकावून लावलं असतात. पण इथल्या गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुमच्या मनाची झालेली घालमेल तुम्हाला समजवताना कामी आली. असं सणाच्या दिवशी घरच्यांना वाईट वाटेल असं बोलू नये दादा. तुम्हाला किमान कुटुंब आहे. त्याला जपा.'- बाब्या डोळे पुसत बोलत होता.

'तुम्ही इथेच उभे रहा, मी आलोच एक पाच मिनिटांत.'- एवढं बोलून मागे वळून घराकडे धावत सुटला होता. बाब्या तिथेच उभा राहून मुलांच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता.

पुढच्या पंधरा मिनिटांत अख्ख परब कुटुंब तिथे आले होते. सोहमच्या हाती परब काकांनी आणलेले फटाके होते. मेहुलने आवाज देत झोपडपट्टीवाल्या मुलांना जवळ बोलवले होते. प्रत्येकाच्या हाती काही फटाके देऊन त्यांनी सर्वांनी एकत्रितपणे फटाके उडवण्याचा आनंद घेतला होता. सारेजण खुश होते. परब काका आणि काकू कित्येक वेळा बाब्याजवळ येऊन त्याला धन्यवाद देऊन गेले होते.

मुलांचा आनंद पाहून मेहुल अधिक फटाके आणायला निघाला तसे बाब्याने त्याला अडवले होते.

'बस झालं दादा. आता अजून नको. जगली ती पोरं. आता अजून आनंद दिलात तर अतिरेक होईल. आणि अतिरेक झाला तर त्यांचा विवेक संपेल.'- बाब्या कसल्याशा दुःखद आठवणीने कळवळून बोलत होता.

'बाब्या, तुला एवढं सगळं समजतं. मग तू इथे?'

'माझं पण कुटुंब होतं दादा. अशाच दिवाळीच्या वेळी मी बाहेर होतो. वस्तीतल्या पोरांनी फटाक्यांचा हैदोस मांडला होता. रॉकेट कसेही उडवत होते. अशाच एका दुर्देवी वेळेला एक रॉकेट घुसले ते थेट आमच्या घराच्या केरोसीन कॅनवर आदळले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. मी घरी पोहचेपर्यंत ऐन दिवाळीत माझ्या आयुष्याचं मातेरे झालं होतं. संपलं होतं सगळं.'- बाब्या आता हुंदके देत रडू लागला होता.

'तरीही तुम्ही, फटाके?'

'मी म्हटलं ना, अतिरेक वाईट. गोडाची शरीराला गरज असते पण अतिगोड म्हणजे मधुमेह तसंच काहीसं.'- बाब्या एखाद्या योग्याप्रमाणे बोलत होता.

शेवटी सर्वांना त्याच बोलणं पटलं तसं, मेहुलने वस्तीतल्या मुलांना दुकानातून चॉकलेट्स घेऊन देऊन निरोप दिला होता.

परब कुटुंबीय परतले तरी बाब्या मात्र तिथेच घुटमळत होता. अजून एका मेहुलच्या शोधात..वस्तीवरच्या मुलांच्या आयुष्यात अजून रंग भरण्यासाठी..

-समाप्त
©® मयुरेश तांबे.