बाबा ❤️#fathers_day #अलक

Happy father's day

अलक 

1.बाबा मरणानंतरही बापपणाला जगला 

" आता कसा इंजिनिअर होणार? सगळी स्वप्न मातीमोल झाले "... अश्विन हार घातलेल्या बाबांच्या फोटो पुढे अश्रू ढाळत उभा होता . 

" सगळं पूर्ण होणार , हे तुझ्या बाबाचे इन्शुरन्स आणि तुझ्या शिक्षणासाठी काढलेल्या पॉलिसी "...आई , ते बघून तो धाय मोकलून रडू लागला. 

 काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याने बाबांना नवीन बाईक साठी हट्ट केला होता तेव्हा बाबांनी नकार दिला होता , तेव्हा तो बाबांना कंजूस आणि काय त्यांचा मनाला लागेल असा बोलला होता. ते आठऊन त्याला आता स्वतःची लाज वाटली होती. 

_____________________________________________

2. शब्दाचे मोल 

" आवो, किती फाटला तो शर्ट , दुर्गी ला नवीन ड्रेस घ्यायची काय गरज होती, होती तिच्याजवळ. स्वतःसाठी कपडे आणायचे होते."..आई

" बोर्डात आली माझी पोरगी, तिला शब्द दिला होता , दिलेला शब्द पाळायला नग ? सुई धागा दे , शिवला की 2-4 वर्ष चालेल हा "... बाबा 

"आवो , तो ठेवला आहे कपाटात तो घाला, आता लग्नात हा असा फाटका घालाल व्हय?"..आई 

" माझी दुर्गी लाल दिव्याच्या गाडीतून येईल तेव्हा तिला सॅल्यूट मारील तेव्हा पाहिजे नवीन कडक शर्ट. "...बाबा 

बाबाचा विश्वास आणि त्यांना दिलेल्या शब्द तिने पाळला. काही वर्षात ती IAS ऑफिसर झाली.

_____________________________________________

3. प्रत्येक जीवाचा तो बाबा झाला. 

" बाबा , किती कष्ट पडतात तुम्हाला ?आमचं पोट भरते बाबा .मी जास्त काय घेऊन मागणार नाही तुम्हाला आणि पंक्याला पण समजाविल , येवढं काम नका करू "...श्यामा तिच्या बाबांच्या पायात रुतलेला काटा काढत त्यावर हळद लावत बोलत होती. 

"तुमचं पोट भरेल पण माझी या मातीची खूप लेकरं आहेत, त्यांची पोट कशी भरणार? "...बाबा 

" त्यांचा बाबा आहे ना त्यासाठी"... श्यामा 

" त्यांचा बाबांना पण श्यामाचा बाबाची गरज असते , अन् माझ्याजवळ श्यामा आहे माझी काळजी करायला , मग कसले पडताय कष्ट! "...डोक्याला पंचा गुंडाळत बाबा परत शेत नांगरायला लागला.  

_____________________________________________

4. अन् त्याने एका बापलाच बापाची गरज शिकवली 

" गुरुजी , तंबाखू नका खाऊ, वाईट असते ते "... 10 वर्षाचा चेतन घाबरत बोलत होता.

" किती वेळा तेच तेच सांगतो ? आता आपल्या मास्तरला सांगशील काय चांगले अन् काय वाईट ते ?माझी काळजी करू नको, माझं मी पाहून घेईल , चल हो तिकडे ".... गुरुजी 

" पण मग तुमच्या घराचं, पोरांचं कोण पाहिल गुरुजी ? तुमची काळजी नाही तुमच्या पोरांची काळजी आहे ."... चेतन 

" म्हणजे ?"... गुरुजी

" माझा बाप तंबाखू खात होता , कॅन्सर ने गेला. माझी आई माझा बाप झाली , पण तरीही ते लोकं आईला, बहिणीला त्रास देतात , बाबा पाहिजे होता ना गुरुजी ".. चेतन 

____________________________________________

5. संस्कार : एकमेकांच्या सुखासाठी 

" बाबा , असाच त्रास देणार आहात काय, एक गोष्ट नीट नाही करत , तुम्हाला शी - सू आली तर वेळेत सांगायला काय जातेय ? वेळ होतो ना मला ऑफिस ला जायला "... प्रिया

"लग्न कर आणि जा बरं , इथं माझ्या डोक्यावर बसली आहे , सतत ओरडत असते, त्यापेक्षा एखादा मुलगा चांगला "...बाबा , प्रिया गालात हसली.

" लहानपणी ओरडत होते ना, म्हणे संस्कार द्यायचे, शिस्त लावायची. आता मी बदला घेणार, मिळालेली संधी कशी सोडणार . पुढच्या जन्मात मागा मुलगा , या जन्मात मी सोडायची नाही तुम्हाला.".... प्रिया बाबांच्या हाताला पकडत त्यांना बाथरूम मध्ये नेत बोलत होती.

" देवा , जन्मोजन्मी हीच मुलगी दे !".. बाबा मनात 

___________________________________________

6. अन् त्याला बापाचं काळीज समजलं 

बाबाने बाईक ट्रीप साठी मित्रांसोबत जायला नकार दिल्याने सागर रागाने चरफडत घराबाहेर पडला. थोड्या वेळाने परत आला आणि बाबांना जाऊन मिठी मारली... " सॉरी बाबा , I love you Baba "... 

तो बाहेर पडला होता तेव्हा एक गृहस्थ रस्त्यावरील खड्डे त्यांच्या जवळ असलेल्या पोत्यातील सामग्रीने बुजवताना दिसले, आणि तेव्हा त्याला कळले त्यांचा एकुलता एक मुलगा रोड अपघातात गेला , आणि त्यांचं ते वाक्य त्याच्या डोळ्यात अश्रू देऊन गेले. 

"येवढाच प्रयत्न करतो कोण्या बापावर त्याचं लेकरू गमावण्याची आणि कोणत्याच लेकरू वर त्याचा बाप गमावण्याची वेळ येऊ नये ".

______________________________________________

7. सन्मान शब्दाचा अर्थ शिकवणारे बाबा 

" आई , रडू नको , तुला बाबा म्हणाला होता ना तू रडतांना अजिबात छान नाही दिसत , आणि तो त्याचा आईचा सन्मान राखायला जात आहे . बघ थोड्या दिवसांनी मी बाबांच्या या कपड्यात फिट होईल आणि बाबा सारखीच तुझी आणि भारतमातेची काळजी घेईल. बाबा सारखाच मी माझ्या दोन्ही आईंचा सन्मान राखेल ."... चिनू आपल्या बाबांच्या आर्मी युनिफॉर्म मध्ये आपल्या रडणाऱ्या आईचे डोळे पुसत होता. आईला आपल्या चिनूवर अन् त्याचा बाबाने त्याचा समोर ठेवलेल्या ध्येयावर, उत्कृष्ट शिकवणुकीवर गर्व वाटला . चिनू सुद्धा मोठा होऊन आर्मी जॉईन करत आपल्या वडिलांप्रमाणे आपल्या दोन्ही आईंचा , आणि प्रत्येक स्त्रीचा सन्मान राखतो आहे. 

_____________________________________________

8. आयुष्याचे मार्गदर्शक बाबा  

" काय झालं , माझी परीराणी अशी रडत रुसून बसली आहे ?"..बाबा 

" बाबा, परी अशी काळी असते काय? शाळेत कोणीच माझ्यासोबत मैत्री करायला तयार नाही, त्या बाजूच्या मावशी सुद्धा आईला म्हणाली मला लग्नासाठी चांगला मुलगा मिळणे कठीण आहे"..प्रीती 

" बाबासाठी तर त्याची मुलगी परी असते, त्याला रंगाने काही फरक पडत नाही. आणि तू ठरव तुला गुळमुळीत क्यूट मांजर व्हायचं की वाघीण बनायचं?"...बाबा काही उत्तम उदाहरणे देत प्रीतीला समजावत होता.

आज प्रितीच्या छातीवर मेडल आणि स्टार्स वाढत होते. तिच्या कर्तबगारीच्या सौंदर्याची भुरळ अख्ख्या देशावर पडली होती.   

_____________________________________________

9. आयुष्याचा रक्षक बाबा 

" माझे बाबा असते तर त्यांनी मला असे बेल्ट ने मारले नसते , मी या घरातून चालला जाईल. "... नंदू ओक्साबोक्षी रडत होता. 

" परत घर सोडून जायची गोष्ट केली तर तंगड्या तोडून ठेवीन ."...मामा 

काही वर्षांनी..

नंदूने मामाला गच्च मिठी मारली आणि रडू लागला.

" काय पोरा, काय प्रोब्लेम झाला काय?"...मामा 

" Thank you mam , त्या दिवशी तुम्ही मला त्या गल्लीतल्या मुलांपासून, आणि त्या वाईट सवयी पासून दूर ठेवायला मारले नसते तर आज मी पण त्यांचा सारखा गुंड झालो असतो आणि जेल मध्ये असतो. " 

आज मामा मधला बाप त्याने अनुभवला होता. 

_____________________________________________

10. आदर्शपणा जपलेला बाबा  

" किती मुलं तुला प्रपोज करतात , सगळ्यांना तू नकार देतेस ? मग पाहिजे तरी कसा मुलगा तुला?"..सीमा 

"एक पण लायकीचे नाहीत . सुपर हिरो हवा मला. "... दिव्या 

" असे कुठे कोण असते काय ?"... सीमा

" आहे ना , माझा बाबा! मला माझ्या बाबा सारखा मुलगा हवा ,जो निर्व्यसनी आहे , खूप स्ट्राँग आहे, कशीही परिस्थिती आली तरी खचत नाही, आमच्या पूर्ण परिवाराची काळजी घेतो, माझ्या आईच्या आईवडिलांची पण काळजी घेतो , माझ्या आईचा आणि सगळ्या बायकांचा सन्मान करतो, आईसोबत खंबीरपणे उभा रहातो, आईला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन आणि हिम्मत देतो, आम्हा सगळ्यांवर खूप खूप प्रेम करतो "... दिव्या 

" तुझ्यातला बाबा जिंकला , आता पोरगी कुठलच चुकीचे पाऊल उचलणार नाही आणि चुकीचा व्यक्ती निवडणार नाही "... आजीने बाबांची पाठ थोपटली . बाबा ते ऐकून गालातच हसला. 

_____________________________________________

Thank you 

©️®️ मेघा अमोल