बाबा.

बाबा

खरंतर \"बाबा\" ह्या विषयावर लिहायला पितृदिनाचा मुहूर्त नको असतो. पण धकाधकीच्या आयुष्यात निवांत वेळ मिळत नाही अन् मनातलं मनातच राहून जातं.


जुलै महिन्यात बाबांना जाऊन आठ वर्ष होतील. मला लिहिता यायला लागल्यापासून बाबांबद्दल लिहिण्याचं हे पहिलंच वर्ष !

माझ्या बाबांनी स्वप्नं बघितलीत.. पण ती आमच्यासाठी नव्हे.. स्वतःसाठी !

बाबांना मुळातच मुलांसाठी स्वप्नं बघणं मान्य नव्हतं. मुलांसाठी बघितलेली स्वप्नं आणि मुलांकडून असलेल्या अपेक्षा यातील सीमारेषा अतिशय धूसर असते असं ते म्हणत. मुलांसाठी पाहिलेल्या स्वप्नांतून नकळत अपेक्षा निर्माण होतात अन् त्या अपेक्षांचं ओझं जाणता-अजाणता मुलांवर लादलं जातं हे त्यांना मुळीच मान्य नव्हतं.

हां, त्यांनी स्वतः स्वप्नं जरुर बघितलीत..आमच्यासाठी ! आम्ही अगदी लहान असताना बाबा सायकलवरून ऑफिसला जात. पण त्यांनी स्वप्न बघितलेलं.. त्यांच्या मुलींना स्कूटरवरून कॉलेजात पाठवल्याचं..! आणि खरंच आम्ही एफ.वाय.ला असताना त्यांनी आमच्यासाठी कायनेटिक होंडा खरेदी केली. पस्तीस वर्षांपूर्वी आमच्या शहरात स्कुटरवरून कॉलेजात जाणाऱ्या आम्ही पहिल्याच मुली!

बाबांच्या तत्त्वाप्रमाणे त्यांनी कधी आमच्या शिक्षणाबद्दल स्वप्नं बाळगली नाहीत ना कधी आमच्या मार्कांबद्दल ! त्यांना रूढ शिक्षणपद्धतीत फोलपणा जाणवत असे अन् ते सतत तो आमच्या समोर मांडत. \"पढतमूर्ख\" होण्यापेक्षा \"व्यावहारिक\" असावं असं त्यांचं मत होतं

आम्हा मुलींबाबत किंवा नातवंडांबाबत त्यांच्या कोणत्याही अवास्तव अपेक्षा नव्हत्या. प्रत्येकाची बुद्धी अन् आकलनशक्ती वेगळी ! त्यामुळे सख्ख्या, चुलत, मावस, मामे, आते भावंडांमध्येही तुलना त्यांना मान्य नव्हती. सर्वात मुख्य म्हणजे स्वतःची अपूर्ण राहिलेली स्वप्नं मुलींकरवी पूर्ण करवून घेण्याची जबरदस्तीदेखील नव्हती.

मला आठवतं एकदा आई कुणासमोर तरी म्हणालेली.. की "मुलींकडून फार अपेक्षा नाहीत..त्यांनी एका वर्गात दुसऱ्यांदा बसू नये म्हणजे झालं !"  त्यावर बाबा लगेच म्हणाले, "मुली नापास झाल्या तरी मला चालेल.. पण परिक्षेत उत्तीर्ण होण्याचा ताणदेखील त्यांनी घेता कामा नये !"

परीक्षेत मिळालेले गुण आणि आयुष्यातील यश या दोन्हींचा अर्थाअर्थी संबंध नसतो हे जवळपासचे अनेक दाखले देऊन आम्हाला ते पटवून सांगत.

मला दहावीत 68 टक्के गुण मिळाले. त्याकाळी हे गुण फारच चांगले होते. इतके चांगले गुण मिळाल्यावर विज्ञान शाखेतच प्रवेश घेण्याची सर्वसाधारण अपेक्षा असे. पण बाबांनी कधी तशी सक्ती केली नाही. \"तुम्हाला जे आवडेल ते शिका अन् जे आवडेल तेच करा\"  हेच त्यांनी आमच्याबद्दल बघितलेलं एकुलतं स्वप्न !

आम्ही मुलींनी नोकरी करावी असा आईचा आग्रह असे. बाबांनी मात्र कधी असा आग्रह धरला नाही. ह्याउलट आईने आमच्यावर नोकरी करण्यासाठी दबाव आणू नये असेही ते तिला सुचवत.

मात्र जेव्हा आम्ही एलआयसीची परीक्षा लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो तेव्हा आमचा नोकरी करण्याकडे असलेला कल बघून मुलाखतीची तयारी करवून घेण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मुली नोकरी करत असल्याचा सार्थ अभिमानही त्यांनी शेवटपर्यंत बाळगला.

नोकरीत प्रमोशन वगैरेंच्या नादी लागून आम्ही स्वतःवरील ताण वाढवून घेऊ नये असे त्यांना वाटे. शिवाय प्रमोशनमुळे ओघानेच येणाऱ्या सततच्या बदल्या, लहान गावात एकटीनं रहाणे ह्याकरिता ते फारसे अनुकूलही नव्हते. त्याऐवजी आम्ही संथ, सुरक्षित आणि निवांत जीवन जगावे अशी त्यांची इच्छा होती. नोकरीतल्या प्रमोशनपेक्षाही \"आयुष्य सर्वांगानं  समृद्ध होणं जास्त महत्त्वाचं\" असं त्यांना वाटे.

अर्थातच मी त्यांची इच्छा झुगारून अन् बंड पुकारून प्रमोशनचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी माझ्या निर्णयाचा आदर‌ केला आणि पुढे आलेल्या अडचणींच्या प्रसंगांत सोबतही..!

वयाच्या अडतिसाव्या वर्षी मी बुद्धिबळ शिकले आणि ऑफिसच्या स्पर्धांमध्ये खेळायला लागले.  बाबांनी त्याकरिता माझं कौतुकही केलं अन् प्रोत्साहनही दिलं. मात्र स्पर्धा जिंकण्याचं दडपण मात्र कधीच लादलं नाही.

बाबांनी आम्हा मुलींबाबत ना काही स्वप्न पाहिलीत ना कधी काही अपेक्षा ठेवल्या. \"आयुष्यात यश मिळवण्यापेक्षा समाधान मिळवणं जास्त कठीण..अन् ते मिळविण्यात खरा आनंद \" असे ते म्हणत.

माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण म्हणजे \"ई टीव्ही मराठी\"च्या \"कोण होईल मराठी करोडपती\"  ह्या कार्यक्रमाकरिता माझी हॉटसीटवर निवड झाली अन् मी टीव्हीवर झळकले ! तेव्हा बाबांच्या डोळ्यांत मी चमक पाहिली.. कधीही न बघितलेल्या स्वप्नाच्या पूर्तीची !!