बाबा.. समजून घेतांना #fathers Day#अलक

Short Stories

बाबा.....समजून घेतांना

1)

"मान्य आहे कॉलेज लांब आहे, त्रास होईल मला पण बाबा मी तुमची गाडी नेऊ आणि तुम्ही?
"अरे, मला मधुमेह निघाला,डॉक्टरांनी मला व्यायाम करायला सांगितला, सायकलने गेलं तर तेवढाच व्यायाम"
चांगला गोड चहा हातात देत बायको म्हणाली, घ्या बिनासाखरेचा चहा. दोघांचे डोळे एकमेकांशी बोलत होते.

_______________________

2)

"बाबा, तुम्ही चूप बसा. उगीच शहाणपणा शिकवू नका" नातू आपल्या वडिलांवार ओरडताच,"अरे, बाबांशी असं बोलतात का?"असं म्हणतं
नातवावर रागावणाऱ्या म्हाताऱ्या वडिलांशी नजारानजर होताच त्याने अपराधीपणाने नजर दुसरीकडे वळवली..

_________________________

3)

नवऱ्याच्या मृत्यूनंतर आठ वर्षाच्या मुलीची आई असलेल्या तिने दहा वर्षाच्या मुलींचा बाप असलेल्या त्याच्याशी दुसरं लग्न केलं. त्याची मुलगी आणि तिची मुलगी त्याच्यासोबत बेडरूममधे खेळत होती.तितक्यात ती आली आणि आपल्या मुलीला बाहेर घेऊन गेली. आईला फोन करुन सांगितले, "आई आजपासून पिहू तुझ्यासोबत राहील.मनात म्हणाली, बाप होणं सोपं नसतं!"
________________________

4

"रडू नको बाळ. आता येतोय मी "
"माझ्या मुलीवर हात उचलतोय व्हयं. थांब दाखवतोच "असं म्हणतं गाडी काढायला गेला."अहो आपली मुलगी जिद्दी आहे, चुकलं असेल तिचंही. थोडं शांतपणे घ्या. अशी आर्जव करणाऱ्या बायकोच्या एक थोबाडीत देत म्हणाला मला शहाणपणा शिकवायचा नाही!

___________________________

5)

दवाखान्यात भरती,मरणाच्या दारात असलेल्या लहान मुलासाठी औषध घ्यायला गेलेला तो पैसे कमी पडले म्हणून दुःखी मनाने परत येत असताना एक अपघात दिसला.गाडी स्लिप होऊन लहान मुलगा गाडीखली दबला होता आणि बापालाही लागलं होत..बाप जिवाच्या आकांताने मुलाला वाचविण्यासाठी मदत मागीत होता.. हा गेला तेवढ्यात त्याचं लक्ष पडलेल्या बटव्यावर गेलं.. बटवा उचलला आणि पसार झाला.

_________________________

6)

"बाबा, ताईची आणि ताईच्या मुलीची जबाबदारी माझी.मुलीला वडिलांची कमी जाणवू देणार नाही "असं मनात बोलला आणि कावळा शिवला.

________________________


7)


"अरे, मला इथे करमत नाही . मी आपला गावालाच बरा!"
आता वय झालंय तुमचं.. तुम्ही एकटे कसे राहाल बाबा?"
" माझं काय? जगेल कसाही... मी इथे राहिलो तर तूझ्या संसारात रोजची वादळं येणार "आपली पिशवी भरीत बाबा मनात म्हणाले.

________________________


8)


"आई,भाजीत मीठ कमी झालंय!"

अरे,मीठ घेण्यापूरते तरी कमवतो का?असं उनाडक्य करणाऱ्या पण बुद्धिमान असलेल्या मुलाला वडील म्हणताच त्याचा अहंकार दुखावल्यामुळे तो घरातून बाहेर पडला ते थेट अधिकारी झाल्यावर बाबांच्या अंतसंस्कारालाच आला पण बाबांविषयी एक अढी कायम ठेवून.
बाबांनी मृत्यूपत्रासोबत एक चिट्ठी ठेवली होती... "अरे, फांदी तोडल्याशिवाय पक्षी उडत नसतात "!

____________________

9)

कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे प्रेताला अग्नी द्यायला मुलगा नकार देत होता.. "त्यांना कुणी सांगितलं होतं बाहेर फिरायला? आताच कुठे मी कोरोनातून बरा होतोय. करू देत हॉस्पिटलला अंतसंस्कार "
आई म्हणाली, अरे तू बेशुद्ध पडला असताना तूझ्या बायको मुलाला व मला वेगळं ठेवून बाबांनी एकट्याने तुला गाडीत घालून नेले आणि तेथूनच कोरोना घेऊन आले.

__________________________


10)

घरात मायलेकांचा दंगा सुरु असताना बाबा आले तसं सगळं घर शांत झालं.
"गेल्या वीस वर्षांपासून मी घरासाठी खस्ता खातो पण प्रेम मात्र तुझ्याच वाट्याला..मी मात्र उपेक्षित! रागावतो कधी पण भल्यासाठीच ना? इतक्या वर्षाची खदखद त्याने बोलून दाखविली.
"अहो, प्रेम असून चालत नाही कधी व्यक्त करणेही गरजेचं असतं "


_________________________


@अर्चना अनंत धवड