Mar 02, 2024
स्पर्धा

बाबा नावाचं रसायन #fathers_day #अलक

Read Later
बाबा नावाचं रसायन #fathers_day #अलक

#fathersday #अलक

१. ग्रिटींग कार्ड

  शलाका जोरजोरात पाय आपटत घरात येते. तिचा नूर बघून तिची आजी तिच्याजवळ येऊन बसते आणि बोलते, "काय झालं तरी काय माझ्या शालूला...?" "आजी तुला माहिती आहे का आज फादर्स डे आहे... माझ्या सगळ्या फ्रेंड्सनी ड्राॅईंग क्लासमध्ये त्यांच्या बाबांसाठी ग्रिटींग कार्ड बनवले, म्हणून मी पण बनवले. यावर ती विधी बोलते कशी, तुझे बाबा तर देवाघरी गेले काय उपयोग तुझा हे कार्ड बनवून..?" यावर तिच्या आजीने मायेने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलली, "अगं फादर्स डे म्हणून बाबालाच देतात का कार्ड....! जो कर्तव्य पार पाडतो तो बापापेक्षा कमी नसतो." आजीच्या या वाक्यावर शलाका धावतच कार्ड घेऊन आईच्या खोलीत गेली आणि बोलली, "आई.. Happy Fathers day...!"

______________________________________

२.  सावत्र बाप

   "किती वेळा सांगितलं आहे मी तुम्हाला..! मी तुम्हाला माझा कोणीच मानत नाही. माझ्यावर तुमचं ते खोटं प्रेम दाखवू नका.. माझ्या आईसारखं मी फसणार नाही." रागातच रोहन श्री. जगताप यांच्यावर ओरडून सायकल घेऊन घराबाहेर पडतो. थोड्या वेळाने फोन खणखणला आणि रोहनचा अपघात झाला हे कळताच डाॅ. जगताप त्यांच्या पत्नीसवे दवाखान्यात येतात. रोहनचे रक्तगट दुर्मिळ असल्याने उपलब्ध होत नव्हतं. जगताप यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले रक्त देऊन रोहनचा जीव वाचवला. रोहन शुद्धीवर आल्यावर जगतापांचा हात हातात काही बोलणार इतक्यात जगताप बोलले, "बेटा..! खूप मार लागला आहे तुला, जास्त बोलू नकोस. आणि एक गोष्ट सावत्र असलो तरी तुझा बापच आहे मी, हे लक्षात ठेव.


________________________________________

३. बाबा तुम्ही परत  आलात....!

   आदित्य कितीतरी वेळ लेबर रूमच्या बाहेर येरझारा घालत होता. थोड्या वेळाने एक नर्स दुपड्यात गुंडाळलेला एक चिमुकला जीव घेऊन येते आणि त्याच्या हातात देते आणि "अभिनंदन, मुलगी झाली तुम्हाला.." असे म्हणून निघून जाते. आदित्यने एकवार लेकीकडे न्याहाळून बघितले. लेकीच्या उजव्या डोळ्याखाली आणि डाव्या कानाच्या पाळीला काळा तीळ होता जसा त्याच्या वडिलांना पण होता. एका वर्षापूर्वी त्याचे बाबा अंथरूणावर खिळून होते आणि सारखे बोलत असत, मी पुनर्जन्म घेतलाच तर आदित्य तुझं मूल म्हणूनच जन्माला येईल रे..! करशील ना माझे लाड तेव्हा पण जशे आत्ता तू आणि सुनबाई करता..?  
   हे आठवून आदित्यने लेकीला छातीशी कवटाळले आणि बोलला, "बाबा...! खरंच तुम्ही परत आलात...!"

_________________________________________

४. सेल्फी...

   "डॅडू.. इकडे बघा ना जरा. मला आपला सेल्फी काढायचा आहे; फादर्स डे आहे ना आज...!" खूप excite होऊन गाथा तिच्या बाबांना सांगत होती. "काय तुम्हा आजकालच्या पोरांचं नवं फॅड आलंय आजकाल ते सेल्फीचं.. आई बापाविषयी आदर ठेवावा मनात. या सेल्फीचा शो मारण्याची गरज नाही." त्यावर शांतपणे बसत गाथा बोलली, "डॅडू.. आजकालची आम्ही पोर का इतकी वाईट आहोत का...? आम्ही पण आमची प्रत्येक जबाबदारी चोखपणे पार पाडतो, जेव्हा अंगावर पडते तेव्हा का असेना.. आम्हालाही तुमचा आदर आहे, फक्त व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे; जशी की ही सेल्फी..! पण जाऊद्या मी जाते अभ्यास करायला.
  यावर तिच्या बाबांनी तिला जवळ घेतलं आणि छानसा सेल्फी काढला आणि स्टेटसला ठेवला आणि खाली लिहीले होते, "Celebrating fathers day with my little mommy..!"

__________________________________


५.  दत्तक 

     आरव माळी, एक पस्तिशीतला तरूण आज सावली वृध्दाश्रमात आला होता. त्याचा चेहरा न्याहाळत न राहवून तिथल्या संचालकांनी त्याला विचारले, "काय रे बाळा तुझ्या आई बाबांना इकडे ठेवायला चाचरतोय का...?" त्यावर कसनुसं हसून आरव बोलला, " नाही ओ.. काका..! आज फादर्स डे ना..! माझ्या मुलींनी मला छान गिफ्ट म्हणून ग्रिटींग कार्ड आणि चाॅकलेट दिलं. लहानपणापासून अनाथ आहे मी.. बाप होण्याचा आनंद अनुभवतोय पण मुलगा होण्याचा आनंद अनुभवता आला नाही कधी. तुम्ही मला एक बाबा दत्तक द्याल का...?"

_________________________________________

६. सेलिब्रेशन

  "काय रे गौतम...! आज मस्त जंगी पार्टी होती सुहासच्या घरी..! का आला नाहीस...?" केतनने आपसूकच गौतमला विचारले. 
यावर गौतम बोलला, "अरे आज फादर्स डे होता ना.. मग काय..? वृध्दाश्रमात जाऊन बाबांसोबत फादर्स डे चं सेलिब्रेशन केलं, म्हणून पार्टीत यायला जमले नाही.
________________________________________

७. ते पण माझे बाबाच....

  "नयन..! पुन्हा एकदा विचार करून निर्णय घे. तुझी लेक आत्ताशी पाच महिन्यांची आहे. त्यांच्या पोटच्या पोरीने नकार दिला पण तू सून असुनही तुझी किडनी देत आहेस त्यांना..!" नयनच्या सासूबाई डोळ्यात पाणी आणत तिला समजावत होत्या. "आई..! अप्पांनी माझ्यात आणि वन्स यांच्यात कधीच फरक केला नाही. जर यांची किडनी जुळली असती तर यांनीच दिली असती. मीच आप्पांना किडनी देणार. जसे माझे बाबा आहेत तसे अप्पा पण माझे बाबाच आहेत आणि झपाझप पाऊले टाकत नयन ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेली.
____________________________________

८. आईच माझी बाबा

 "बेटा, वैदेही...! माफ कर मला. चुकलो मी.. सगळं काही तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे. तू जर हो बोललीस तर तुझी आई मला सहज स्वीकारेल...!" वैदेहीचे बाबा तिला विनवण्या करत होते. वैदेहीने एकवार आईच्या भरलेल्या डोळ्यांकडे बघितले आणि बोलली, "हे बघा मि. पाटील..! जेव्हा मी जन्मले तेव्हा मी मुलगी आहे म्हणून तुम्ही माझ्या आईला सोडले. तेव्हाच तुमचे अस्तित्व आमच्यासाठी नामशेष झाले आहे. आणि मी वैदेही शशिकांत पाटील नसून वैदेही अनघा मोरे आहे; तर आता तुम्ही जा इथून." हे ऐकून तिचे बाबा तिच्या घराबाहेर निघून जातात.
__________________________________

९. यंदा कर्तव्य आहे...!

    "कुणाल तू तर बावळट आहेस पण नित्यालाही स्वतःमध्ये सामिल केलंस. अरे फादर्स डे च्या नावाखाली हे काय गिफ्ट देतं तरी का कोणी...? माझ्या डोक्यावर बाॅम्ब फोडायचा बाकी ठेवलाय तुम्ही.." निशिकांतराव आपल्या दोन्ही मुलांवर चिडून बोलले. यावर त्यांची लाडकी लेक नित्या बोलली,"बाबा..! आई गेल्यानंतर आम्हा दोघांसाठी तुम्ही दुसरं लग्न केलं नाही. आता आम्ही आमच्या संसाराला लागलो. तुमचा एकटेपणा जाणवतो आम्हाला आणि तुमच्या क्लबमधल्या एव्हरग्रीन सिअअंगल शारदा काकूंना तुम्ही लाईक करता हेही आम्हाला ठाऊक आहे. " यावर निशीकांतरावांना काहीच बोलता आले नसल्याने ते फक्त हलकेच हसले. यावर कुणाल बोलला, "ओह हो..! What a smile..! म्हणजे यंदा कर्तव्य आहे...!"
___________________________________________

१०. श्रेय...

    "तर आजच्या कार्यक्रमाची उत्सवमूर्ती आहेत आहे.. मिस. विहाना वामनराव बांदल... ज्यांनी आजवर एकशे साठ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्ण पार पाडली तेही इतक्या कमी वयात..... !" टाळ्यांच्या गजरात सगळे विहानाचं कौतुक करत होते. पण तिची नजर दूरवर उभे असलेले तिचे बाबा यांच्यावर खिळून होती. पुरस्कार वितरण झाल्यावर निवेदकाने तिच्याकडे दोन शब्द बोलण्यासाठी म्हणून माईक दिला आणि ती बोलू लागली, "खरं तर या पुरस्काराचे खरे मानकरी मी नसून माझे बाबा आहेत, जे मला नेहमी काही घेण्यापेक्षा काही देण्यात खूप सुख असतं हे शिकवत आलेत. माझ्या सगळ्या यशाचे श्रेय मी माझ्या बाबांना देते." आणि धावतच जाऊन बाबांच्या पाया पडली आणि तिच्या गळ्यातील पदक बाबांच्या गळ्यात घातले.


~ऋचा निलिमा

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//