बाबा नावाचं आभाळ...# Fathers_day#अलक

Baba Navach Aabhal, Fathers Day
"चल मेरे घोडे टिक टिक टिक".. "चल मेरे घोडे टिक टिक टिक"... कामाच्या जागी मोठ्या हुद्द्यावर साहेब असलेला तो, लेकरासाठी त्याचा घोडा बनतो.. अंगाखांद्यावर खेळणा-या लेकराला स्वर्गीय आनंद देणारा, 'बाबा' च तर असतो....

--------------------------------------------

जबाबदारीने पिचलेल्या आयुष्यात, सतराशेसाठ व्याप सांभाळत, आपल्या लेकरासाठी दिवसरात्र झटणारा, मरमर कष्ट करणारा, सतत आपल्या कामात व्यस्त रहाणारा, बाबा!! अनेकदा त्याच्या लेकरांना कळतच नाही.
--------------------------------------------

आई, कळा सोसते.. बाळाला जन्म देते... बाळाच्या जन्माच्या वेळी दवाखाण्याच्या बाहेर इकडून तिकडे फे-या मारणारा बाबा.. मुलगा असो की मुलगी...मोठ्या मनाने बाळाचं स्वागत करणारा.. भेदभाव न करणारा, माझं लाडाचं कोकरू म्हणत, इवल्याशा जीवाच्या येण्याने स्वत:चं आयुष्य बाळासाठी वाहून देणारा बाबा, प्रत्येक लेकराचा पहिला मित्र असतो.

--------------------------------------------

शुभमंगल सावधान!! डोक्यावर कर्तव्यपूर्तीच्या चार अक्षता टाकून... नव-या मुलाकडच्या मानापानात दिवसभर व्यस्त असलेला 'बाबा'.. लेकीच्या पाठवणीच्या वेळी कोप-यात उभा राहून, "दिल्या घरी तू सुखी रहा" म्हणून आशिर्वांदाचं शिंपण करतो.. अश्रूंचा डोह पापणीआड तो कसाबसा लपवतो. "बाबा" नावाच्या आभाळाला बरसता येत नाही, तेच खरं...

--------------------------------------------
एक दिवसही माहेरी न ठेवणारा.. सोबत नेऊन सोबत घेवून येणारा.. आजपर्यंत बायकोवर नवरेगिरीचा तोरा मिरवणा-या त्याच्यातला... "बाबा"..
आली तशी दोनचार दिवस राहू द्या हो आमच्या लेकीला, म्हणत जावयाला हात जोडून आर्जवी विनवणी करतो... बायकोवर केलेल्या अन्यायाचं प्रायश्चित्त डोळ्यातल्या आसवांमधून करताना, लेकीच्या पाठीशी मात्र खंबीरपणे उभा राहातो.

-------------------------------------------

बाबांच्या प्रेमळ दोन शब्दांसाठी मुकलेल्या, पाठीवर प्रेमाने हात फिरवण्यासाठी जराही वेळ नसल्याचा आव आणणारा कठोर, कडक स्वभावाचा "बाबा".. वयात आलेल्या लेकरांची मग तो मुलगा असो की मुलगी, जरा जास्तीचं चौकशी करतो, काळजी घेतो, सुरक्षिततेच्या दृष्टीने जरा जास्तीत जागरुक राहातो.. खरचं बाबा नावाचं आभाळ कित्ती संवेदनशील असतं.

---------------------------------------------

"वंशाला कुलदिपक हवा", म्हणत मुलीच्या जन्माने नाखुश अनेक वर्ष लेकीचा तिरस्कार करणारा तिचा बाबा...
माझ्या लेकीचा आज ख-या अर्थाने दूसरा जन्म झालाय... तुझ्या लेकीचा जन्म, तर नऊ महिन्यापूर्वी माझ्या लेकीच्या उदरात झाला.. "मुलगा मुलगी होण्यासाठी स्त्री एकटी जबाबदार नसते"
पोटतिडकीने सांगून गोड गोजि-या त्याच्या वंशाच्या पणतिला जावयाच्या हाती सोपवतो. दोन्ही बापाच्या लेकींच्या जन्माचा आज ख-या अर्थाने सोहळा साजरा होतो.

--------------------------------------------

चेहरा उतरवून एका जागी गपचूप बसलेल्या... पोट दुखतयं, कंबर दुखतेय, तर पाठ दुखतेय, म्हणत आईची आतुरतेने वाट बघणा-या अस्वस्थ असलेल्या लेकीला, काय झालयं? काही दुखतयं का? काहीही न विचारता, हातात सरबताचा ग्लास नी पाठ, पोट शेकून घे म्हणत गरम पाण्याची पिशवी लेकीच्या हाती देतो.. न सांगताच बाबाला सगळं कसं ना कळतं..

--------------------------------------------

जेवण झालं का? औषध घेतलीत का? हे फक्त दोन वाक्य नाहीत तर सुरकुतलेल्या आयुष्याचा आधार असतात.. कधी प्रेमाने तर कधी प्रेमळपणे दटावताना... म्हाता-या आईवडीलांची चौकशी करणारा तो, नकळत त्यांचा "बाबा" चं तर होवून जातो..

---------------------------------------------


पप्पा पप्पा, करुन अंगाखांद्यावर खेळणा-या एकुलत्या एका लेकाचं पार्थिव आज घरी आलं.. मोठ्या अपघाताने घात केला होता. आपली त्याची साथ इथपर्यतच आवंढा गिळत, कोलमडून पडलेल्या बायकोच्या पाठीवर हात फिरवत तिला समजवताना... नकळत तो तिचा "बाबा"चं झाला..

अलक, कशा वाटल्या कमेंट करुन नक्की कळवा.. तुमच्या कमेंट्स लिखाणाला प्रोत्साहन देतील.
-©®शुभांगी मस्के...