बाबा चुकीचा नसतो... भाग अंतिम

आईवडील चुकीचे नसतात

बाबा चुकीचा नसतो… 


भाग ४ 


पूर्वार्ध :

ऋषी आणि धृती फ्लॅट बघून बाहेर नदी किनारी फिरायला येतात. खुप पाऊस असल्यामुळे बाजूलाच एक झोपडी जवळ आडोशाला जातात. 


आता पुढे… 


"बाहेर पाऊस खूप वाढला आहे, तर आम्ही इथे आडोशाला थांबू शकतो काय?" ऋषी त्या झोपडीतून आतमध्ये डोकावत आवाज दिला. 


"माझ्या या फाटक्या छताखाली तुम्हाला जागा भेटत असेल तर बघा.. रावा उभे.." एका स्त्रीचा आवाज आला. 


ऋषी आणि धृती आतमध्ये गेले.. बघतात तर काय पाऊले बुडेल एवढे पाणी झोपडीत साचले होते. एक कोपरा बघून दोघंही उभे झाले. दोघांचीही नजर झोपडीत फिरत होती. ५ ते ९-१० वयाची तीन छोटी मुलं एका कोपऱ्यात असलेल्या लाकडी संदुकावर, एक जुने ब्लँकेट गुंडाळून गुपचूप केविलवाण्या नजरेने बघत थंडीमुळे कुडकुडत बसली होती. बाजूला एक बाज होती. छताच्या एका कोपऱ्यात 35-40 वर्षाची स्त्री चुलीवर काहीतरी बनवत होती.. त्यावर एक मध्यम वयीन पुरुष उबडाताबडा पडला झोपला होता, त्या स्त्रीचा पती असावा. अधेमध्ये काही भांडे, बादली छतातून पडणारे पाणी जमा करत होत्या..त्या भांड्यांच्या क्षमतेने सुद्धा उत्तर दिले होते. त्यांनी वरती बघितले छताची अक्षरशः चाळणी झाली होती.. 


"काय रे पोरा, काय बघतियो.. माझा फाटका संसार?" ती स्त्री म्हणाली.


"ह, काही नाही.." ऋषी उत्तरला. 


"यावर्षी पावसाने जीव काढला बघ.. कधी जातो असं वाटतेय.. पोरांना खाऊ घालायास घरात एक अन्नाचा कण नाय.. घर तरी कसं म्हणू यास..डोक्यावर छप्पर नाय की दार नाय. असे दोन काळे मणी गळ्यात बांधले म्हणजी संसार होतो का? बापाला जड झाली होती तर काही मागचा पुढचा इचार न करतात यायीच्या सोबत लगीन लाऊन दिले. ज्याचा सोबत संसार करती आहे त्यास कशाचा होश नायी. पोरं जेवले का उपाशी हायेत, माझ्या सोड पण पोटच्या पोरांच्या डोक्यावर छप्पर हाय की नाही .. कशाच म्हणजी कशाच घेणंदेणं नायी.. मजुरी करून कमवलेले पैसे पण मारझोड करून हिसकून घेतो..हा अन् याची दारू.. बस.. पाय कसा पडला हाय.." बोलत बोलत तिने काही पेले आणि वात्यांमध्ये चहा ओतला. 


ते दोघं तर ते सगळं बघूनच निशब्द झाले होते.


"घे.. पोरी तू पण घे.." म्हणत त्या दोघांजवळ येत एक एक चहाचा पेला धरत म्हणाली. 


"अ.. नाही नको..असूद्या.." तो तिथे असलेल्या लहान मुलांच्या केविलवाण्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. 


"आरे घे रे पोरा.. दूध नाय तर घातलं नाय… पण चांगला गरम हाय, बरं वाटेल.." ती स्त्री म्हणाली.


"तसं काही नाही.." ऋषी. 


"तिन्ही सांजेला घरी आलात.. आपल्या धडीवर आलेला पाहुणा देवाचं रूप आसते रे.. जास्त काय नाही घरात.. हेच घ्या.." ती म्हणाली. 


"मुलांना द्या.. आम्ही आताच घेतला, म्हणून म्हणालो." ऋषी कसाबसा म्हणाला.


"वाटून घेऊ.. त्यांच्यासाठी पण काढला आहे.." ती म्हणाली. तसे ऋषी आणि धृतीने एक एक पेला हातात घेतला. तेवढयात त्याला काहीतरी आठवले.. आणि तो काहीतरी शोधत होता.


"एक मिनिट.." म्हणत तो बाहेर गेला आणि त्याची बॅग घेऊन आला.. त्यातून त्याने ब्रेडचे पॅकेट काढले आणि मुलांना दिले..


"आरे राहू दे की.. या पावसापाण्याचा काय भरोसा नाही.. खण्याच तुमच्यासाठी ठेवा साठवून.." ती स्त्री काळजीच्या सुरात म्हणाली. 


"हो.. घरी आहे.." तो म्हणाला. 


"बघ, मी म्हणलं होतं, देव घरी कोणत्या पण रुपात येतो.. काल रातच्या पासून पोरांच्या पोटात अन्नाचा दाना नाही.. असाच चहा पित हायित.." ती कृतज्ञता व्यक्त करत म्हणाली. 


ऋषी आणि धृती कसेबसे हसले.. 


मुलांनी चहाब्रेड खाल्ली. मुलांचा चेहरा बघून ऋषिला तेवढेच समाधान वाटले. पाऊस थोडा कमी झाला, तसे दोघंही त्या स्त्रीचा निरोप घेऊन झोपडी बाहेर पडले. ऋषीने धृतीला तिच्या हॉस्टेलवर सोडले आणि तो आपल्या रूमवर निघून आला. 


  

         रात्रभर पाऊस सुरू होता. दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाने नाद नाही सोडला. रोज सकाळी उठल्यावर धृती आधी ऋषीला एकतर फोन तरी करायची किंवा मेसेज तरी करत. सकाळ होऊन बराच वेळ झाला, पण आज त्याला अजून पर्यंत मेसेज आला नव्हता. म्हणुन त्यानेच धृतिला फोन केला.. 


"हॅलो.." धृतिचा आळसावलेला आवाज आला. 


"काय ग, झोपलीच आहेस?" ऋषी.


"हम्म्.. "


"काय झालं? बरं वगैरे वाटत नाहीये का? आवाज का असा येतोय?" 


"ऋषी, ऐक ना , आपण त्या स्त्रीला मदत करूया?" धृती"कोणती स्त्री?" 


"अरे असा काय करतोय? ती.. काल आपण तिच्या घरी थांबलो होतो.. चहा प्यायलो.." 


"तुझ्या डोक्यात तेच चाललंय का?" 


"ऋषी आपण तिला घर बांधून देऊया?" 


"काय?" तो शॉक झाला..


"तिला गरज आहे रे.. ती मुलं बघितली ना किती केविलवाणी बघत होती.." "अग हो, पण तिथे त्यांच्यासारखी कितीतरी घरं होती.. तू कोणकोणला घरं बांधून देणार आहेस? ते सरकारचे काम आहे..आपले नाही." 


"बाकीच्यांचे नाही.. मी तिचे म्हणतेय. तिने आपल्याला मदत केली..पावसात आपल्याला सहारा दिला..आता आपली टर्न आहे…" 


"ओ एकता कपूरच्या सीरियलची हिरोईन.. तुम्ही बापलेकी डायरेक्ट घर बांधण्यावरच का येता राव.. तुम्हाला कोणाला प्रॅक्टिकली विचारच करता येत नाही का?" 


"ऋषी, मी अजिबात जोकच्या मूड मध्ये नाहीये.. आय एम सिरीयस.." 


"हो तर मी पण सिरीयसलीच बोलतोय.. ते कोण कुठले..आपल्याला त्यांच्या बाबतीत काहीच माहिती नाही.. " 


"त्या स्त्रीने पण असाच विचार केला असता तर.. तिने पण म्हणावं तुम्ही कोण कुठले, आम्ही ओळखत नाही, तर तुम्ही इथे थांबू नाही शकत… मग? माणुसकी विसरत चालला तू.." 


"अग माझे आई.. अग हे घर बांधणे सोपी असते काय? बाई माझा पगार किती.. त्यात ऑलरेडी एवढे लोन उचलून ठेवलंय.. कितीसे येतात आहेत हातात आता.. आणि कोण कुठले म्हणजे अग ती लोकं एका ठिकाणी नाही राहत.. कामं मिळतात तशी जागा बदलत असतात.. आणि समजा एका ठिकाणी राहत पण असेल तर ते राहतात आहेत ती जागा त्यांची थोडी असेल.." तो तिला समजावत म्हणाला. "ऋषी, ठीक आहे घर नाही, पण आपण त्यांच्या झोपडीचे छत तरी ठीक करून देऊ शकतो, पाणी तरी साचणार नाही.. मुलं तेवढीच सुरक्षित राहतील.. आपण ते आपल्या फ्लॅटला pop नको करूया.. ते पैसे वाचवून तिचे छत नीट करून देऊया.. ऋषी प्लीज ऐक ना, फक्त एवढच.. मग पुढे काय नाही मागणार.. मला रात्रभर नीट झोप आलेली नाही.. सतत तेच चित्र डोक्यात फिरत आहे.. अरे आपण एवढे तर करूच शकतो ना.." त्या स्त्रीला मदत करण्यासाठी धृतीचे ऋषीपुढे हट्ट वजा विनंती करणे सुरू होते.. 


"ओके. पाऊस ओसरला की जाऊ तिकडे. त्यांनाच विचारुया कशी मदत करू शकतो ते.. ठीके? चालेल?" ऋषी तिचे मन राखत म्हणाला. 


"होssssss…. Love you 1, love you 2, love you 3……love you infinity… तू जगातला सगळ्यात बेस्ट बॉयफ्रेंड आहेस… आणि विश्वातील सगळयात जबरदस्त होणारा नवरा आहे…. ऊssssssमाह…" आनंदाने तिची कळी आता खुलली होती. आणि परत तिची नेहमीसारखी बडबड सुरु झाली. 


"लय महागडं प्रेम आहे ऋषिराव तुमचं.. प्रेमात माणूस फकीर बनतो म्हणतात.. ते काय खोटं नाही म्हणलंय कोणी.." तो स्वतःशीच विचार करत हसत होता आणि धृतीची बडबड ह्मम ह्मम करत ऐकत होता. *******


       दोन दिवस पाऊस सुरूच होता.. दोन दिवसांनी जरा वातावरण उघडलं होतं. ऋषी आणि धृती दोघेही शहराच्या बाहेर त्या ठिकाणी पोहचले. आणि समोरचे दृश्य बघता त्यांच्या हृदयात धडकीच भरली. पूर्ण परिसर पाण्याने तुडुंब भरला होता. लोकांची बरीच गर्दी जमली होती. पोलिस, इतर बचावकर्मी लोकांची पाण्यात शोधाशोध सुरू होती. बाई, माणसं, लहान मुलं, गुर ढोर जे सापडतील त्यांना काढत होते.. कोणी जिवंत सापडत होते तर कुणाचे मृत शरीर… किंचाळलने, ओरडणे, तेथील लोकांचा आक्रोश सुरू होता.. माहिती मिळाली की पावसामुळे शेजारचे नदीनाले तुडुंब भरल्यामुळे ही जीवघेणी परिस्थिती ओढवून आली आहे.. ते सगळं बघून धृतीच्या डोळ्यात पाणी साचून आले. तिची नजर भिरभिर इकडेतिकडे बघत होती.. "ऋषी, ती.. ती स्त्री..ती बाई..ती मुलं… कुठे.." तिच्या तोंडून शब्द सुद्धा नीट फुटत नव्हते. धृतीच्य डोळ्यांपुढे ती स्त्री वारंवार येत होती.. 


"इथेच असेल.. आपण शोधू.. तू शांत हो.." तो तिला समजावत आजूबाजूला ती स्त्री कुठे दिसते काय शोधत होता.. तिथे असलेल्या लोकांजवळ विचारपूस करत होता. शोधता शोधता धृतिची नजर एका ठिकाणी स्थिरावली..


"ऋषी..ती.." धृतिने हात दाखवला. एका देवळाच्या पायरीजवळ त्यांना ती स्त्री बसलेली दिसली. जराशी कोरड्या चिखलाने माखलेली.. केस विस्कटलेले.. डोळ्यातील आसू त्या मळक्या गालांवर सुकलेले, समोर नजर कुठेतरी शून्यात हरवलेली.. "ताई.." म्हणत धृतीने आवाज दिला. पण तिला काही ऐकू गेलेले दिसत नव्हते. ऋषीने पण आवाज दिला.. 


"बाई.." म्हणत धृतिने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला थोडे हलवले.. 


"हा.. भेटला का माहा पोऱ्या.. मंदा भेटली का? ते तिकडे त्या बाजूने पाण्यात गेली..तिकडे.. " ती स्त्री सारखं सारखं तेच म्हणत होती. 


"ताई.. आम्ही.." 


"कोण तुम्ही?.. माझे पोरं सापडले का? कितीदा सांगितले त्या बाजूने ..जा शोधून द्या लवकर.. उपाशी हायीत ती..भूक लागली असल.. " तिला कशाचीच सुधबुध नव्हती. ती तेवढीच बडबड करत होती. 


  तिची ती हालत बघून धृतीला आता रडु कोसळले. 

"ऋषी, आपण उशीर केला… आपण उशीर केला.. " धृती रडत रडत बोलत होती. संसार आपण विचार करतो इतका सोपी नाही, स्वप्न रंगवणे, आणि प्रत्यक्ष जगणे यात जमीन आसमनचा फरक असतो,हे तिला कळले होते..त्या स्त्रीच्या वेदना तिला जाणवत होत्या.


             ऋषिने तिला आपल्या जवळ घेतले. तिला समजावत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता.. 

ऋषिला सुद्धा तीन दिवस पूर्वीची ती, चहा साठी आग्रह धरणारी.. ती डोळ्यांपुढे येत होती. तिचे बोलणे कानात घुमत होते..


"दोन काळे मनी गळ्यात घातले म्हणजे संसार होत नाही.. डोक्यावर सुरक्षित छप्पर पाहिजे..बापाला जड झाली तर याच्या गळ्यात बांधली… " 


आणि त्या नंतर त्याला धृतिच्या वडिलांचे शब्द आठवत होते..त्यावर त्याने त्यांच्यासोबत घातलेला वाद आठवत होता..

"माझ्या मुलीसोबत लग्न करायचे असेल तर आधी स्वतःचं घर घे....वेळ हवा असेल तर वेळ घे..हवे तर दोघं मिळून घ्या…पण घर हवे..बाकी घरात काय करायचं, ते तुम्ही तुमचं बघा.. पण तुझं घर नसेल तर मुलगी देणार नाही.." 


          तेव्हा हट्टी वाटलेल्या बापाची तळमळ, लेकीसाठी सुरक्षित भविष्यासाठी त्याची चाललेली खटाटोप..त्याच्या जीवाचा चाललेला आटापिटा … आता मात्र ऋषिला कळला होता.. बाबा चुकीचा नसतो..हे समजले होते. 


******

समाप्त 
🎭 Series Post

View all