बाबा चुकीचा नसतो... भाग 3

एक चहा आणि ती दोघं

बाबा चुकीचा नसतो…

भाग 3


पूर्वार्ध:

ऋषी आणि धृती हे प्रेमात असलेलं तरुण जोडपं. बाहेर फिरायला जातात. पावसा मध्ये एकमेकांत रममाण होतात..

आता पुढे… 


"धृती, इकडे बाजूला फेमस टपरी आहे, खूप छान चहा मिळतो. थंड वातावरणात गरम गरम चहा.. चल जाऊया.." म्हणत त्याने एका टपरी जवळ गाडी थांबवली.. 

"भैय्या, एक चहा मस्त अद्रक मारके.." आवाज देत धृतीचा हात पकडत त्याने तिला आडोशाला आणले. केसांवर जमलेले पाणी आपल्या हाताने झटकत होता. धृती मात्र त्याला बघण्यात हरवली होती..

"काय बघतेय?" ऋषी तिला असे एकटक बघत असलेले पाहून म्हणाला. 

"कोण म्हणतं पावसात भिजल्यावर फक्त मुलीच छान दिसतात.. माझ्या ऋषीला बघावं म्हणा.." ती गोड आवाजात म्हणाली. 

"मग.." त्याचे कान सुद्धा पुढले ऐकायला आतुर झालेत.

"माझ्या ऋषीला बघावं म्हणा..कसला गोड, निरागस दिसतो ते.. ते असे क्यूटसे नाक त्याचे, ओढावे वाटतात.." 

"देवा.. अगं हॉट अँड सेक्सी नाही म्हणता येत तर हँडसम तरी म्हण.." त्याने कपाळावर हात मारला. ते बघून ती खुदकन गालात हसली. 

"भैय्या एक की दो चाय?" टपरीवाल्याने आवाज दिला.

"एकच…. " ऋषीने आवाज दिला..

"एकच दोघांत पिउ…" तो तिचे हसू बघून म्हणाला.. तिला ते ऐकून थोड्या वेळपूर्वीचा कीस आठवले.. आणि लाजून तिचे गाल लाल झाले.. आपल्या एका हातात आपला चेहरा लपवत तिने पलीकडे वळवला.

"हाये..ही अशी लाजरी पोर, आणि हा बरसणारा पाऊस.. जीव घेईल माझा.."  

टपरिवाल्याने चहा आणून दिला.. दोघंही पावसाकडे बघत गरम वाफाळलेल्या चहाचा एक एक घोट घेत , एकमेकांत रममाण होत गोड आठवणी साठवत होते.. 

"ऋषी, आता निघायला हवे, पावसाचा जोर वाढतोय.." 

"हो, आलोच पैसे देऊन.." म्हणत तो चहाचे पैसे द्यायला गेला.

"भैय्या, सुटे द्या.." चहावाला म्हणाला. 

"नाहीयेत हो.. Paytm, gpay आहे काय?" ऋषी.

"नाही.." चहावाला.

"काय दादा तुम्ही…" ऋषी.

"गरम गरम भजी घ्या.. तुमच्या मॅडमला पण आवडतील.." 

"नको.. मग ते पिंपल जर आले तर, पंधरा दिवस तुझ्यामुळेच ऑईली खाल्ले अन् आले म्हणून कुरकुर ऐकत बसावी लागेल.." ऋषी स्वतःशीच पुटपुटला.

"काय म्हणाले भैया?" चहावाला.

"काही नाही.. असं करा उरलेल्या पैशांत ते ब्रेडचे पॅकेट द्या.." ऋषी.

"बरं.." चहावाल्याने त्याला ब्रेडचे पॅकेट दिले.. ते पाठीवरच्या बॅगमध्ये घालून दोघंही घरी जायला निघाले. 

फिरायला इकडे नदीकडे आल्यामुळे ते दोघं शहराच्या बऱ्याच बाहेर आले होते. आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. पावसाच्या धारांचा डोळ्यावर जोरदार मारा बसू लागला होता. समोरचे दिसेनासे झाले होते. 

"ऋषी, इकडे आजुबाजुला काही दिसत असेल तर बघ, पावसाचा जोर खूप वाढला आहे.." 

"हो बघतो.." म्हणत तो आजूबाजूला काही घर वगैरे दिसतेय का ते बघत होता. तर त्याला तिथे काही झोपड्यांची वस्ती दिसली. त्याने तिकडे आपली गाडी उभी केली आणि समोर असलेल्या झोपडी जवळ आले.

******

क्रमशः 

🎭 Series Post

View all