बाप

Father's Day Special

बाप,,,,,,!

वामनराव आज भलतेच खुश होते एकुलत्या एका लेकाच लग्न होतं आज , अंबा बाई पण वरमाय च्या थाटात मिरवित होत्या , लाडक्या लेकाच लग्न होत ना !

लग्न यथासांग मानापानाने थाटात पार पडले , 

सोपान बायको सुमन ला बघुन खुश होता तसे सुमन त्याच्या मामाचीच मुलगी होती लहानपणा पासुन त्याने तिला बघीतलेले एका ताटात जेवणखाण व्हायच लहान असताना पण वयात येता येता सुमन बदलली आता ती पुर्वीसारखी सोपान सोबत खेळत नव्हती की एका ताटात जेवत नव्हती मग एकदा त्याला खुप राग आला तिचा , 

आईला म्हणाला माय चाल आपल्या गावाले ,

ही सुमी लई इत्तरते बोलेनाशी झाली मायासंग ,

मले नायी राहाचं मामाकड , 

चाल ऊद्याच जाऊ घराकडं तसे हसुन अंबाबाई म्हणाल्या आर पोरा येवढा राग काऊन करत बा तू तिचा ? 

आर,, पोट्टी मोठी झाली ना बा ! 

आता का येवढ्या मोठ्ठ्या पोट्ट्यायसंग खेळीन का थे,,,आँ,,,भल्लाबाप्पा भयताड हास तू ,,,

ऊगामुगा चार दिस राह्य आन मंग पायटीच निंगू आपल्या गावाले जाय साटी , 

बंडी { बैलगाडी }जुपाले सांगा लागन मामाले , 

नायी का ? 

होवं बर जाऊ मंग चारपाच दिसान .

त्यांच बोलण आतून सुमन ऐकत होती , 

थोड्यावेळाने तिने परसदारी बघीतले तर तिथे धुण धुवायच्या दगडावर सोपान बसला होता त्याच्या चेहरावर तिला नाराजी स्पष्ट दिसत होती , मग ती त्याच्या जवळ गेली , 

अय,,, कावुन बोलत नायी माह्यासंग , 

कावुन असा नाराज राह्यत ? 

तिच्याकडे बघत सोपान म्हणाला त्या कावुन बोलन सोडल मायासंग ? पयले सारकी कावुन बोलत नायी ? 

काय झाल तुले ? 

माय म्हन्ते मोठी झाली ,,मंग काय खेळतही नसते का ? 

आन काय बोलतही नसते का ?

पुढल्या खेपेले म्या येनारच नायी हिथ ,,, 

अब्बा काऊन असा बोलतं ,,

भोंग्याच हायस ,,,,

तुया मामाच घर हो , या,,तं लागनच तुले,,, 

आन चाल तुले कायीच समजत नायी ,,,चाल ऊट ,,

चाल घरात माय च्या प्याले बलावते,,,

अय,,ऊटत का नायी,,,?

सुमे तू कवापासून मले , अय,,काऊन म्हणून रायली वं ?

मले त भावू मनत होती ना ? 

तू मोठ्ठी झाली आन म्या काय ल्हान झालो का ? 

तशी सुमन गालातल्या गालात हसत आत पळाली ,,,,

येजो माय बलवत हाये च्या प्याले,,,अय,,,,!

आज्जी आतूनच त्या दोघांचे बोलणे ऐकत होती , 

मनातल्या मनात तिला काही विचार आले तसे तिने अंबा बाईला आवाज दिला , 

अंबे वो अंबे येजो बाई जरा इकडं , 

थांब व माय च्या घीवून येतो , 

हाव आन च्या , आन एक घोट पानी आन्जों बाई , 

होवं,, माय ,,म्हणत अंबाबाई पाणी , चहा माय साठी घेऊन आली ,

काय म्हन्तं व माँ ? काऊन बलावलं त्या ?

अवं बायी ,,,मायी गोट ध्यान दिऊन आयकजो , 

पुढल्या साली सोन्याच लगीन करत ना ? 

होवं माय करतो , पाह्यतो एकांदी पोरगी नात्यातली , 

थ्या सखाराम मामाले सांगतल होत , असन पोरगी त सांगजो म्हनुन , सोन्याले लागल ना माय सोळाव वरीस ,

चांगली पोरगी भेटली का ऊरकवतो सालभर्‍यान मंग ! 

अवं माय काखत कळसा आन गावाले वळखा व माय अंबे , तुले दिसत नायी कावं , ताडमाड सारखी मायी नात सुमी ,,,

बाई चवदा सालाची झाली ना माय अंबे , 

आत्तो घरी भाची माय सुखात राहान व माय सास सुना तुमी , काय म्हणतं ,,आँ,,!

होवं माय ,,,आपल्या दाट्ठ्यात पोट्टी आन आपन भाहेर शोधत हावो,,, हा,,,हा,,,हा,,,हो वं माय मले चालन मायी भाची सुन म्हनुन,,,,आनंदाने अंबाबाई म्हणाली .

मग काय पुढल्या वर्षी लग्न करायचे ठरले , 

तोच हा आजचा दिवस !

लग्न वर्‍हाड पाळा गावात परत आलं नवरी घेऊन , छान डम्मन मधे बसवुन त्या दोघांची गावातून वरात काढण्यात आली , सोबत प्रखर कंदील आणि ढोल ताशे वाजत होते ,

नवरी नवरदेवाचे स्वागत झाले , रात्री खोलीत खाली अंथरुणावर बसलेल्या सुमनला सोपान म्हणाला , 

काव सुमे आतायी माह्या सोबत बोलनार नायी का? 

कावुन बा,,आता तुमीतं माये धनी,,,मंग कावुन नायी बोलनार ?लाजतच सुमी म्हणाली , 

मंग आता मले काय म्हणशीन,,? 

अय,,सुमी लाजलीच , 

मले ना तुमी पयलेपासून लय पसंद होते , 

म्हनुन अय म्हन्तो , 

मायी माय बापाले अयच तं म्हंन्ते,,,

नायी ना , तू मले सोन्या म्हन्जो आज्जी वानी , 

तशी लाजून हसलीच सुमी .

छान संसार सुरु होता सुमन आणि सोपान चा , सुमन घर सांभाळायची अंबाबाई , वामनराव आणि सोपान आपल्या नऊ एकर शेतीत राब राब राबायचे दिवसभर , 

हसत खेळत संसार सुरु होता , 

तीन वर्षाने सुमन आई झाली ,

सुमनला मुलगा झाला दिसायला सोपान सारखाच निमगोरा नाकडोळे टपोरे आणि वजनही चांगलच होतं , 

आतातर दोन्ही घरात आनंद द्विगुणीत झाला , 

आज्जी आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळत बाळ मोठ होत होतं , विठ्ठल नाव ठेवल होत बाळाचं .

सोपान विठ्ठलचा फार लाड करायचा , शेतात कामं करुन थकून भागुन घरी आल्यावरही सोपान त्याला खेळवायचा ,

एका ताटात बापलेक जेवायचे , आता विठ्ठल शाळेत जायला लागला , सोपान त्याला पाहून खुश व्हायचा , आपण , सुमन अनाडी पण आपल्या लेकाला चांगल शिकवायच , त्याला जे ही पाहीजे असेल ते घेऊन देऊ त्याने निर्धारच केला होता , पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवायचाही निर्धार त्याने केला कारण गावात शाळा चवथी पर्यंतच होती , हो पण सुमनच्या गावात शाळा सातवी पर्यंत होती .

आनंदाने संसार सुरु असता अचानक एक दिवस वामनराव पहाटे ऊठलेच नाहीत , अंबाबाई ने त्यांना आवाज देऊन ऊठवायचा प्रयत्न केला पण त्यांनी " ओ " दिला नाही आणि अंबाबाईने एकच हंबरडा फोडला , सोपान वर तर दुःखाचा डोंगरच कोसळला , पुर्ण कुटूंब दुःखसागरात बुडाले , सगळे अंतीम सोपस्कार पार पडलेत , काही दिवसांसाठी सगळे सुमनच्या गावी मामांकडे राहुन आलेत , हळुहळु आपल्या शेतीच्या कामात व्यस्त झाले पण आतुन दुःखी असायचे सगळे .

विठ्ठल मोठा होत होता , सुमनला अजुनही मुल हवं होत पण दुसरा गर्भ राहतच नव्हता , विठ्ठल अभ्यासात हुशार होता पहीला दुसराच नंबर असायचा वर्गात , सोपान सुमन , अंबाबाई जीव ओळवाळुन टाकायच्या त्याच्यावर , विठ्ठल चवथी मधे गेला सोपानला पुढच्या वर्षाच्या शिक्षणाची चिंता वाटू लागली आता कसे ? मग तिघांनी मिळुन निर्णय घेतला सोपानला मामाच्या गावी सातवी पर्यंत शिकवायचे मग पुढच पुढे बघू !

नेहमी प्रमाणे याही वर्षी पहील्या नंबरने विठ्ठल पास झाला !

त्याला मग मामांच्या गावच्या शाळेत घालण्यात आले राहण्याची व्यवस्था मामाकडेच झाली , मामाही त्याचा खुप लाड करायचे त्यांच्या घरातील त्यांच्या मुलीचा मुलगा , 

पहीला शिक्षण घेणारा ठरला विठ्ठल ,

इकडे विठ्ठल विना घर सुने सुने झाले होते , सगळेच ऊदास राहायला लागले , त्यातच कधी कधी सोपानचे हात पाय सुन्न व्हायचे , भुक कमी लागायची , अंबाबाई मग त्याला समजावित असे , अर पोरा अस खाल मुंडी घालुन बसू नये , विठ्या तुया मामाच्याच घरी हाय ना ! त्या अस केल तं विठ्या राईन का तिथ बराबर , थो लय खुश हाये बापा तिथ , माया भावु लय ध्यान ठेवते त्याचा , तू कायी फिकर करु नोको , 

हो वं माय मले मायीत हाये मामा त्याचा लय ध्यान ठेवते , पन मायीत नायी कावुन तं माये हातपाय सुन्न पडते ते ! 

भाकरयी गोड लागत नायी कायी दिसा पासुन , 

होईन सार बराबर रमव तुय मन वावरात , हो वं माय ! 

हसुन सोपान म्हणाला , सुन्न झालेल्या हातापायाला पुढे जखम व्हायला लागली पण त्या जखमांचा त्याला त्रास होत नव्हता , हातापायावर पांढरे डाग हळुहळु यायला लागले आणि ते बसत नव्हते मग सगळेच घाबरले , 

तसेही स्वतःच्या जखमा बघुन सुमन आणि अंबाबाई पासुन सोपान दुरदुर राहु लागला , 

वेगळा झोपू लागला , आता गावात चर्चा होऊ लागली लोकं ही सोपान पासुन दुरदुर राहू लागली , 

पुर्वी त्याच्या चांगल्या स्वभावामुळे लोकं त्याला घरी बोलवायचे लग्नकार्यात तो गावातल्यांना मदत करायचा , 

आता ते सर्व मागे पडले सोपान एकटा पडला , 

शहरातून आलेल्या एका डाॅक्टरांनी त्याला कुष्ठरोग झाल्याच निदान केलं !

अंबाबाई सुमन तर हादरल्याच त्यांना तसेही थोडी कल्पना आलीच होती , पण डाॅक्टरांनी सांगीतल्यावर तर शिक्का मोर्तबच झाले , आता त्या घरात थांबायलाही घाबरु लागल्या , सोपान ने शेतात जाणे बंद केले , 

डाग आणि दोन तीन शरीरावरील जखमा जास्त पसरल्या तश्या अंबाबाई आणि सुमन एक दिवस त्याला एकट्याला घरी ठेऊन मामांसोबत मामांच्या गावी गेल्या कायमच्या !

सोपानने मनाला समजाविले होते , जवळ राहीलेत तर ह्यांना ही होऊ शकतं म्हणुन त्याने काहीच म्हंटले नाही , 

सोपान दुखी मनाने एकटाच स्वतः जेवण बनवुन खाऊ लागला घरातील कामे करु लागला , वर्षभरात सोपानच्या सहमतीने तिथली शेती विकून मामाच्या गावाला शेती घेतली , राहतं मोठ्ठ घर शेजारीच राहणार्‍या नातलगाला विकुन अंगणातल्या एका कोपर्‍यात जिथे खत टाकायची जागा होती तिथे त्याला झोपडी ऊभारुन देण्यात आली हे सगळ सोपानच्या सहमतीने करण्यात आले , तो म्हणाला हा रोग म्हन्जे माये मांगच्या जलमाचे पाप होय मलेच फेडा लागन पन माये लेकरु बायको आन माँ यायच्या कडं कोन पाहीन , मायाच्यान तं आता कायीच होत नायी , हे सब्बन ईका माया पोराले विठ्याले शिकवजा , सायेब बनवजो मामा ! 

त्याले आन्जो नको इथ , मले पावुन घाबरन थो , माय मी करुन खातो , मायी कायजी नोको करु !

लहानाचा मोठा सोपान त्याच गावात झाल्या मुळे सोपान बद्दल लोकांच्या मनात सहानुभूती होतीच म्हणुन कुणी ही त्याला तिथून निघुन जा नाही म्हंटले आणि तोही लोकांपासुन दुरच राहायचा पुढे त्याचे हातापायाचे बोटे झडलेत , चालायला त्रास व्हायचा जेवण बनवता नाही यायचे मग ज्या नातेवाईकांना घर विकले होते तेच नातेवाईक त्याला दुरुनच भाजी भाकर देऊ लागलीत ,,! 

अचानक खुप वर्षानंतर एक सव्वीस सत्तावीस वर्षाचा मुलगा त्याच्या झोपडी समोर येऊन ऊभा राहीला , जमीनीवर कळकट गोधड्यांवर कळकटलेले कपडे घालुन आकुंचित झालेल्या हातापायाच्या बोटांना चिंध्या बांधलेला सोपान डोळे मिचकावित त्या सफारी घातलेल्या धिप्पाड पोराकडे बघू लागला त्याची नजर ही क्षिण झाली होती , कोन होस बा ! कोन पायजे बाबू ? सोपानने विचारले , 

बाबा,,,,बाबा,,,,,!

सोपानला कळतच नव्हत काय करु आणि काय नको , धडपडुन ऊठून तो डोळ्यांची ऊघडझाप करत पाहू लागला , विठू होस का बाबू,,,, माया विठ्या,,,, आर बापा ,,,विठ्या,,,बापा बापा केवढा मोठ्ठा झाला बापा तू,,,कसा आला बाबू,,,कावुन आला बापा,,,होय तिकड दुर होय,,,,!

सोपानचा आनंद गगनात मावेना झाला होता त्याने कल्पनाच केली नव्हती तो पुन्हा कधी त्याच्या मुलाला भेटेल पण सोबतच त्याला प्रत्यक्ष पाहुन आपली बिमारी ह्याला तर लागणार नाही ना ही पण भिती वाटली म्हणुन तो त्याला दुर जा म्हणत होता आणि विठू च्या डोळ्यांच्या धारा थांबतच नव्हत्या काळा जांभळा झालेला बाप त्याची अवस्था पाहुन तो पुरता शहारला , पण थोड्यावेळाने स्वतःला सांभाळुन त्याने बापाची चौकशी केली , 

माय ,,जावु दे बाप्पा ,,,तुय सांग तू कुट असत , 

सुमी कशी हाय ! 

आई आणि मी मुंबईला असतो मला एका कंपनीमधे नोकरी लागली आहे राहायला काॅर्टर आहे दोन वर्षापुर्वी लग्न केले दोन महीन्यापुर्वी मला मुल झालं तुम्हाला नातू झाला बाबा !

तुमच्यासारखाच दिसतो ,,,!

हो कारं बा ,,,मस्तच गड्या,,मलेयीबी नातू झाला,,,व्वा,,खुश राहा बापा , इथ नोको येजो,,,कायले येतं,,,आता मायी कायीच विच्छा नायी ,,,तुयी भेट झाली बाप्पा,,पावलं मले,,,!

पण त्या नंतरही विठ्ठल वर्षातून एकदा न चुकता मुंबईवरुन बापाला भेटायला यायचा , बापाच्या झोपडी बाहेर पाट टाकुन बसायचा , त्याला मुलांच कौतुक सांगायचा , काही इकडच्या तिकडच्या घटना सांगायचा , गावातल्या लोकांच्याही भेटी घ्यायचा थांबायचा दिवसभर , शेजारच्या काकांना भेटवस्तू आणायचा , पैसे द्यायचा , त्यानाच मग मनिआॅर्डरही पाठवायचा , त्याच्यावडीलांना दोन वेळ भरपेट जेवन द्या विहीरीवरुन पाणी आणुन द्या बस एवढीच त्याची इच्छा असायची ,

तसेही जेव्हा अंबाबाई आणि सुमन मामांच्या गावी गेलेत तेव्हा त्याला सांगण्यात आले त्याचे वडील वारलेत,,,!

तो खुप दुखी झाला पण काळाने आपले काम केले , पुढे शिकायला शहरात गेला होस्टेल मधे राहीला शिक्षण झाल्यावर मुंबईच्या नामांकीत कंपनीत नोकरी लागली , 

लग्न झाले तसे आईलाही मुंबईला घेऊन आला , 

मध्यंतरी अंबाबाई एका आजारातूनच देवाघरी गेल्या होत्या , विठुला बाळ झाल्यावर सहजच सुमनबाई बोलुन गेल्या , 

तुया बापाले निरोप धाड नातू झाला म्हणा तुम्हाले,,,

आणि विठू चमकलाच ,,,, माझे बाबा जिवंत आहेत !

मग सुमनने हकीकत सांगीतली आणि वेळ मिळताच विठू बापासमोर ऊभा राहीला पण बाबांची हालत बघुन त्यांना तिथेच ठेवल्या शिवाय गंत्यतर नव्हते .

कित्येक वर्ष विठु बाबांच्या भेटीला येत राहीला त्याचे मुलं मोठी झालेत फिल्म इंडस्र्टी मधे कामं करु लागलीत , एकदिवस अचानक सोपान ऊठलाच नाही सकाळी , 

शेजारच्या काकाची नात त्यांना आवाज देऊन गेली , 

आबा ऊठनं किती वेळ झोपत , चा प्याचा नायी का ? जेवाच नायी का ? पण सोपान ने प्रतिसाद दिला नाही मग तिने आपल्या आजोबांना सांगातले , त्यांनीही आवाज दिला पण सोपान ऊठला नाही , अरर ! गेला डांग्या बुढा,,,,!

त्याच्या सद्य परिस्थितीतील शरीरयष्टीवरुन त्याला सगळेच डांग्या म्हणायचे ,,,!

आजुबाजुच्या लोकांनी कसाबसा सोपानचा अंत्यविधी केला बाकी सोपस्कार केले ,,आणि शेजारच्या मुलीने पोस्टकार्डवर सोपान आबाच्या निधनाची बातमी विठुला पाठविली , 

काही दिवसातच विठ्ठल गावी आला आणि मोडुन पडलेल्या त्या रिकाम्या झोपडीला पाहुन धायमोकलुन रडू लागला,,,,!

बाबा,,,! बाबा,,,! मला माफ करा,,,,!

तुम्ही कधीच कोणती ही अपेक्षा केली नाही बाबा,,,

कुटूंबाच माझं सुख पाह्यलं,,,बाबा कसे फेडू पांग,,,!

००००

कुष्ठरोगावर{ महारोग } पुर्वी कमी ऊपचार होते आणि भाकड कथाच जास्त होत्या त्या मागे , हा रोग सहजा सहजी स्पर्श झाल्याने पसरत नाही , नाकावाटे शिंकेतून प्रसार होतो आणि त्यालाही खुप संपर्क आल्यासच दुसर्‍याला होतो , आता हा रोग एक ते सहा महीन्यांच्या औषोधोपचाराने कायमचा बरा होतो आणि अश्या रुग्णांनपासुन जवळच्या कोणत्याही व्यक्तीला संक्रमण होत नाही किंवा त्या रुग्णाला पुन्हा हा आजार होत नाही !

हा रोग झाल्यास सरकार फ्री मधे औषोधोपचार करतात .

संगीता अनंत थोरात

13/06/2021

०००००००