बाप - ७

खरं तर माझ्या मनात पाठलाग करण्याचं नव्हतं........

खरं तर माझ्या मनात पाठलाग करण्याचं नव्हतं. आपल्याच आईवर संशय घेणं बरोबर नव्हतं . पण मी पडलो आता सरकारी नोकर. सरकारी नोकरीत माणुस काहीही शिकला नाही , तरी दोन गोष्टी शिकतो. एक टाळाटाळ आणि दुसरी संशय घेणं. पैकी संशय घेणं माझ्या अंगात भिनलं होतं. मी जाडकन उठलो. साधारण कपडा घातला. पायात चपला सारकवल्या. जवळ जवळ घावतच निघालो. ती दिंडी दरवाजातून बाहेर पडत होती. मी फार भराभर चालत होतो. ती मेन रोडपाशी पोचली होती. तीन साडेतीन म्हणजे काही फार रहदारीची वेळ नव्हती. तरी गर्दीत कधी कधी आई दिसेनाशी होई. ती सरळ चालत कुंभारवाड्याकडे वळली. रघुवीरांचं ऑफिसची बिल्डिंग दिसली. माझी नजर वर गेली. दुसऱ्या मजल्यावरील ती खोली सील केलेली दिसत होती. आता मला भीतीही नव्हती आणि जरूरही.


आईच्या एवढ्या भराभर चालण्याचं आश्चर्य वाटलं. तिला गाठणं मला कठीण जाऊ लागलं. चालता चालता ती गोल देवळाजवळ आली. तेही ओलांडून ती एका मुस्लीम मोहल्ल्यत शिरली. मला क्ळेना, या ठिकाणी कोणतं रामाचं देऊळ आहे ? तरीही मी चालतच होतो. नंतर ती डाव्या बाजूला एक बोळ लागला तिथे थांवली. तिने मागे वळून पाहिले आणि बोळात शिरली. मी दिसणार नाही अशा रितिने थांवलो. मग धावत जाऊन बोळाचं तोंड गाठलं. आई डाव्या बाजूच्या एका चाळीत शिरली. पाहिलं तर सगळिच मुसलमान वस्ती. ही चाळीची मागची बाजू असावी. बोळात नेहेमीप्रमाणे सांडपाण्याचे पाईप वाहत होते. त्यांचा शॉवर चुकवीत लाकडी जिन्याने वर निघालो. जिन्यावरून लहान लहान मुले धावत होती. माझ्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. आई नक्की कोणत्या मजल्यावर गेली, कळणं कठीण होतं. पण माझं नशीब जोरावर होतं. मी प्रत्येक दरवाजापुढच्या चपला पाहात होतो. पहिला मजला सोडला. दुसऱ्या मजल्या वरच्या उजव्या हाताला एक खोली होती. तिचं कुलुप थोडसं हालत होतं. म्हणजे आई नुकतीच आत गेली होती तर. जवळच तिच्या चपलाही दिसल्या. दारावर नाव होतं.

"एस. डी . मिर्झा. " मी आतला कानोसा घेण्याचा प्रतत्न केला. पण काही दबक्या आवाजातील बोलणं आणि हालचालींचे आवाज येत होते. असं दुसऱ्या च्या दाराशी किती वेळ उभं राहणार होतो मी ? पण मला दार वाजवण्याचं धाडस झालं नाही. दुसऱ्या खोल्यांकडे पाहिलं. सर्वांचीच दार लोटलेली होती. धड्याळात चार वाजत होते. त्याच खोलीला जिन्या जवळ असलेल्या खिडकीशी मी आलो. लोटल्यावर जी उभी फट राहते त्यातून आतलं दृश्ञ अंधुक दिसत होत.

आत थोडासा उजेड होता. आणि माझी आई माझ्या (इलाज नाही) हरामखोर बापाच्या मिठीत होती. तो तिच्या अंगावरून हात फिरवीत होता.म्हणजे हे आहे तर " भलतच भजन" माझ्या मनात आलं.मला आता उलगडा झाला.हेच ते निरूपण करणारे बुवा तर. माझा बाप अधून मधून बोलत होता. " किती दिवसानी येत्येस ? " आई भेदरल्या सारखी म्हणाली, " मला नाही आता यायला‍ जमणार . मुलं मोठी झालेली आहेत. जयला संशय आला तर काय करणार ? त्याला आता नोकरी लागलेली आहे. "बापानं तिला धरून ठेवली होती. तो म्हणत होता, " आता तर तुला मोकळीक आहे.; तुला गुरुवारच्या भजनाचं निमित्त नको. एरवी पण तू येऊ शकतेस.नाहीतर मला यावं लागेल. तसही घरी कोणी नसतच. "मी आजुबाजूला सारखा पाहात होतो. कोणी आलं तर? तेवढ्यात . आतल्या एका खोलीचं दार दाणकन उघडलं. एक मुसलमान बाई बाहेर येऊन ओरडली, "अरे, तुम्हारी रंग रलिया कभी खतम नही होगी. इतनाही प्यार था तो मेरे पास क्यूं आया ? आज दस बरसके बाद भी तुम छुप छुपके ये धंदा करते हो ? " आई कडे वळून तिरसटली.

" बेशरम कहीकी. मुसलमान क्या तू तो काफिर भी नही हो सकती. जानवर हो तुम दोनो. " आईने पटकन बाहेरचा दरवाजा उघडला. ती बाहेर येणार तेवढ्यात मी धडपडत कसातरी जिन्यावरून खाली आलो. आता पाच वाजत होते. मधून मधून तिथे राहणारे लोक येऊ लागले. ते माझ्याकडे डोळे विस्फारून पाहात होते. मी त्यांच्याकडे लक्ष दिलें नाही. मी धावतच मेन रोडला आलो. आता आई घरीच येणार हे मला माहीत
होतं. जे पाहिलं ते इतकं धक्कादायक होतं. , की माझं डोकं भणभणू लागलं. एकीकडे मला रागही आला आणि आईनी फसवल्या सारखं वाटलं. जिला आपण एवढं मानलं तिला आपला अजिबात भरवसा कसा नाही ? 

घरी गेल्यावर आईला मी जाब विचारायचं ठरवलं . अर्ध्या तासात घरी आलो. सरू म्हणाली , " तु या वेळेला कुठे गेला होतास ? " मी तिला थातुर मातुर उत्तर देऊन गप्प बसवली. आईची वाट पाहू लागलो. अस्वस्थ्तेने मी येरझारा घालीत होतो. मी जाम चार्ज झालो होतो. पण आई सांगितल्या प्रमाणे सात साडे सात लाच आली. मला आश्चर्य वाटलं. मी तिथून निघाल्यावर ती कुठे गायब झाली .


ती आत आली. तिच्या कपाळावर हळद कुंकू लावलेलं दिसत होतं. तिनी साडी बदले पर्यंत मी वाट पाहिली.
 मग न राहवून म्हणालो, " काय , झालं का बुवांचं निरूपण ? माझ्या बोलण्यातला खंवचटपणा तिला जाणवला नसावा किंवा ती तसं दाखवीत असावी. ती म्हणाली , " हो .... झालं की . अरे आज भजन असं रंगलं की भानच राहिलं नाही. तिच्या प्रत्येक शब्दाला माझ्या दृष्टीने वेगळाच अर्थ होता. पण ती आनंदात होती. तसे ती दाखवीत होती की काय कोण जाणे.

मग मी सरळच विचारलं, " किती दिवसांपासून हे निरूपण चालू आहे? की काही वर्ष ? तिला माझ्याबो लण्यातली खोच कळली असावी. तिचे तोंड आश्चर्याने उघडे पडले. चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, " काय बोलतोयस काय तू? कळतय का तुला ? " मी चिडून म्हणालो , " चांगलच. " ती म्ह्यणाली, " म्हणजे तू आला होतास तर. पाठलाग केलास माझा. आईवर संशय घेतोस? माझ्या नजरेला नजर न देता ती कातर स्वरात म्हणाली, " अरे , ते खरं नाही रे. " मी म्हंटलं. " काय खरं नाही?, तुझं जाणं ? त्या हरामजाद्याशी जे काही केलस ते ? " मी तिचे दोन्ही खांदे धरले रागाने हालवून म्हणालो, " तुला खोटं बोलायला लाज नाही वाटत ? " तिचे डोळे पाझरत होते. ओठ थरथर्त होते. चोरी करताना पकडलं गेल्याचे भाव तिच्या तोंडावर होते. मी तिला सोडली. थोड्या वेळानी भानावर आल्यावर म्हणाली, " तुला सगळं सांगावच लागेल. तुला काय माहीत हे गेल्यानंतर मी पाच्सहा महिने कसे काढले ते ? काही लोकांनी तर काम देतो सांगून नको ते उद्योग करण्याचा प्रयत्न केला. सगळं सांगणं फार कठीण आहे. ( माझ्या मनात आलं लोक आईला गावभवानी म्हणत) मी कशी तरी पळून आले . नंतर जी कामं मिळाली त्या पैशांतून तुमच्या फिया, कपडे रोजचं खाणंपिणं झालं असतं का? हे अधून मधून पैसे देत असत म्हणून तर सगळं चाललं. त्या बदल्यात त्यांना भेटावं लागायचं. तु आता सगळं पाहिलंच आहेस्. मी तरी कोणाकडे मनमोकळं करणार? मलाही भावना आहेत. हे तूही लक्षात घेत नाहीस . मला आई, वडील , भाऊ , बहीण कोणी नाही. मला तुझी फार भीती वाटते रे. मी ... काय करू? " बोलता बोलता ती खाली बसली. हुंदके देऊन रडू लागली. तरीही मला दया आली नाही. माझ्या डोक्यावर भूत सवार झालं होतं.


मी दात खात म्हंटलं., " म्हणजे त्या.......... बापाचंच अन्न मी खाल्लं तर. हा सोडून गेला तो त्या मुसलमान बाईबरोबर ? धर्मसुद्धा बदलेल याच्यासारखा हलकट माणूस . जिवंतपणी गाडला पाहिजे साल्याला. ती रात्र अशीच गेली‌. सरू तर घाबरून झोपून गेली. आई आणि मी रात्रभर बिछान्यावर बसून होतो. सकाळ झाली. डोळे जागरणानी जळत होते. मी तसाच ऑफिससाठी
तयार झालो. आईनी चहा वगैरे तयार केला. पण मी त्याला हात सुद्धा लावला नाही. उलट मी म्हणालॉ, " हे बघ, मी आता अंधेरीत फ्लॅट बुक केलाय., चार सहा महिन्यात ताबाही मिळेल. पण तू इथेच राहायचं. तुला मी नेणार नाही. (इथेच मी चूक केली. नंतर जाणवलं. )मग तो ..... बाप आणि तू घाला गोंधळ. पैसे पाठवीनच मी. असं म्हणून मी ऑफिसला गेलो. दोन चार दिवस घरी न जेवताच मी ऑफिसला गेलो. मग हळू हळू घरी जेवायला मी सुरुवात केली. आता आई घरातून हालेनाशी झाली. मी तिच्याशी पूर्णपणे बोलणं टाकलं. लागलो. ऑफिसच्या परीक्षेत मी पहिला आलो . मला आता इन्स्पेक्टरचं प्रमोशन लवकरच मिळेल.

खाणं पिणं संपलं होतं. माझा पिक्चरचा मूडच गेला.मी त्याचा निरोप घेतला. मणामणाची जड कथा घेऊन घरी आलो. मग महिनाभर असाच गेला.


(क्रमशः)