बाप - ६

दुसऱ्याची दिवशी मी काकांना भेटलो.....

दुसऱ्याच दिवशी मी काकांना भेटलो. सगळं सांगितल्यावर ते म्हणाले, " अरे बघतोच मी त्या नायरला. मी म्हंटलं. " जाऊ द्या, काका. माझ्या नशिबात जर अशीच कामं असतील तर मी तरी काय करणार? त्यावर ते भडकून म्हणाले, " मग जातोस उद्यापासून लच्छी कडे? तुला काही वाटतं की नाही.? सध्या जरा थांब, कुठे चांगला जॉब आहे का बघतो किंवा क्लेरिकल मध्ये आहे पाहातो. मी घरी आलो. आईला सांगितलं. पण तिची काहीच प्रतिक्रिया नव्हती. तिनी मला नुसता बसू नकोस वगैरे असही काही म्हं टलं नाही. मग मात्र मी सहा सात महिने असेच काढले. साबू, वॉशिंग पावडरी वगैरे कमिशन वर विकण्याची लहान सहान कामे मी करित होतो. पण आवक एवढी कमी की कामावर जाणं आणि घरी बसणं सारखचं वाटायचं. फक्त दिसायला, मी कामावर जात होतो असे दिसे. आई ही तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. त्यामुळे आमच्याकडे कोणी नातेवाईक असा येतच नसे. बापाशीच संबंध नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा प्रश्नच नव्हता. नाहीतर लोकांकडे आज काय मामा आला, उद्या काय मावशी मग कधी लोकं काकांकडे जात. आम्ही बारा महिने तेरा काळ घरीच असायचो. आम्ही कोणत्याही वस्तूसाठी हट्ट करीत नव्हतो. करमणूक हा प्रकार नव्हताच. करमणुकीसाठी आधी थकावं लागतं. पण आम्ही अगदीच निष्काम कर्मयोगी होतो. एक गोष्ट मात्र आईने कटाक्षाने पाळली होती. ति म्हणजे, पैसे कितीही कमी मिळोत दूध मात्र चांगलचं आणायचं. जेवायलाही वरण भाताशिवाय काही नसायचं. कधी कधी आई गोड म्हणून भाताची खीर करायची. ती मात्र अप्रतीम लागायची. कधी कधी आई जिथे कामं करायची तिथे मिठाई वगैरे मिळायची. आंब्याचे दिवस असले की आई कुठून तरी लागलेले आंवे घेऊन यायची. त्यांचा चांगला भाग वापरून ति आमरस करायची. पण आम्हाला आमरस खायला घालायची.


मला आता अठरा वर्ष पूर्ण झाली होती. एक दिवस दिवेकर काकांनी मला एक कार्ड दिलं. ते एका वाधवा नावाच्या सी. ए. चं होतं. ते म्हणाले, " तू त्याला भेट. तो तुला आयकर ऑफिसमध्ये क्लेरिकल्ची भरती आहे तिथे लावून देईल. तुझं नशिब चांगलं असेल तर लागशील. सगळी सर्टिफिकेटस घेऊन जा. मी वाधवा ऍंड कंपनीच्या चर्चगेट मधीलऑफिसमध्ये गेलो. मी काकांकडून आल्याचे सांगितले. ज्याला भेटायचं होतं त्याचं नाव "मितेश वाधवा" होतं. मला बसायला सांगितलं. मीसकाळी दहा वाजल्या पासून बसून होतो. लंच टाईम झाला. तरीही मला कोणी बोलवेना. शेवटी रिसेपशनिस्टला दया आली. तिनी मितेशला फोन केला. "अरे, एक आदमी सुबेसे बैठा है उसको या तो बुलाव या तो जानेको कहो ना. "मध्येच कंपनी तर्फे चहा आला. मी नाही म्हंटल तर रिसेपशनिस्ट म्हणाली, "लेलो, व्हिजिटर्स के लिये हि बनाते है. ये फ्री ऑफ चार्ज है. " पैसे द्यायला माझ्याजवळ होतेच कुठे?. मग मितेश भाईनी मला बोलावले. साध्या कपड्यातले मितेश भाई मला सभ्य वाटले. पण मला भीतिही वाटली. हाही रघुवीरांसारखा निघतो की काय?. मग तो म्हणाला, " चल आपण निघू या. " त्यांनी जाताना बऱ्याच चौकशा केल्या. एकूण तो माणूस निगर्वी वाटला. त्याच्या गाडीतून आम्ही नानाचौकातल्या आयकर ऑफिस मध्ये गोलो. त्याने तिथल्या एडीएम ऑफिसरशी ओळख करून दिली. जाताना मला म्हणाअले, " काम झालं नाही किंवा कामात जर काही अडचण आली तर उद्या मला भेट. " त्यांचं मराठी इतकं चांगलं होतं की ते गुजराथी वाटलेच नाहीत. मी तसं त्यांना सांगितलंही. त्यावर ते म्हणाले, " अरे, माझा जन्मच मुंबईतला. एवढी वर्ष इथे राहिल्यावर मराठी बोलायलाच पाहिजे., नाही का? " मला असा दृष्टिकोन सगळ्यांनीच ठेवला तर भाषिक वादच नष्ट होतील. माझी प्रमाणपत्र वगैरे पाहिल्यावर एल. डी. सी म्हणून लावून घेतो असे म्हंटले. पण थोडं थांबावं लागेल. त्यावेळी अशा नोकऱ्या मिळत असत. आत्ता या सगळ्या परीक्षा वगैरे आल्या. माझा सबंध दिवस गेला. पण मला नियुक्ती पत्र मिळालं. मी खुषीत घरी आलो. पण जरा सांशकच होतो. ही नोकरी किती टिकणार?आणि इथे काय काम सांगणार?आयकर ऑफिसमधील माझी नोकरी व्यवस्थित चालू होतं. पगार चांगला होता. मी जाम मनापासून काम करायचो. एक दिवस एक सहकारी म्हणाला, " अरे अशी कामं करशील तर आपल्या नोकऱ्या नसलेल्या बंधूंचं काय होईल? सगळी कामं संपतील की. कामं थोडी पेंडिंग ठेवायला शीक. "अर्थातच मी लक्ष दिलं नाही. त्याचा परिणाम म्हणजे माझ्या डोक्यावर बरीचशी कामं येऊन पडली. पण मला एवढी माहिती झाली की एक दोन वर्षात मी त्या वॉर्ड ऑफिसमध्ये प्रसिद्ध झालो. अधून मधून मितेश भाई यायचे मी त्यांचे मनोमन आभार तर कधीचेच मानले होते. मला म्हणायचे, " इथे काही त्रास असेल तर सांग, बरं का. आपण दुसरं काम शोधू. " असं कोण म्हणणार आहे? ". दिवस चांगले चालले होते.. घराचं स्वरूप मी पालटलं. जुजबी फर्निचर घरी आणलं. सेव्हिंग बऱ्यापैकी होत होतं. आईनं कामं सोडावीत असं मी म्हंटलं. पण घरी वसून काय करणार असं ती म्हणाली. काही कामं तिनी बंद केली. रविवारी पण ती घरी राहू लागली. आमच्या आर्थिक स्थितीत चांगलीच सुधारणा झाली. कपडे बरे वापरू लागलो. मग ही ब्रीफकेस घेतली. एवढी जुनी आहे ही. "

थोडं थांबून तो म्हणाला, " तुला मी बोअर तर करीत नाही?. " मी म्हटलं, " छे छे, अजिवात नाही. फक्त दोन तीन बीयर झाल्यावर जी चढायची ती चढत नाही. " मग आम्ही आणखी एकेक बियर आणि खिमा मागवला. बियरचे घुटके घेत तो म्हणाला, " आई दर गुरुवारी भजनाला जायची. पण घरात रोजची देव पूजा असं काही रुटीन नव्हतं. ती सकाळी उठल्यावर काय करीत असेल तेवढच. माझा विश्वास देवावर यथातथाच होता.

एक दिवस एक पत्र आलं. अर्थातच निनावी. सोमवार होता. मला थोडा ताप असल्याने मी घरी होतो.आई आणि बहीण बाहेर गेली होती. भाऊ शाळेत गेला होता. ते एक बंद पाकीट होतं. मी ते उघडलं. आम्हाला पत्र लिहीणारे नातेवाईकच नव्हते. मग हे पत्र कसं आलं कोण जाणे. आत एक चिठ्ठी वजा कागद होता. त्यात "श्री नाही, मायना नाही". मला वाटलं कोणी खपला की काय?. पण या पत्रानी माझं आयुष्य चांगलच बदललं. त्यात एकच ओळ होती. " त झी आ ई भ ल ती च भ ज नं क र ते. सांभाळ. "खाली सही नाही काही नाही. निनावी पत्रावर सही नसतेच. पोस्टाचा शिक्का पाहिला. गिरगावातलाच होता. चिठ्ठी उलटी सुलटी करून पाहिली ,कोणत्याही प्रकारच्या खुणा अथवा लिखाण नव्हतं. मला त्या वाक्याचा अर्थ लागेना. मी ते पत्र बॅगेत टाकलं. कोणालाच सध्या काहीही न बोलण्याच ठरवलं. पोस्टात चौकशी करून काही उपयोग नव्हता. मग नेहेमीप्रमाणे गुरुवार आला. आई भजनाला जाणारच. मी ऑफिसला असल्याने मला काहीही करणं शक्य नव्हतं. मग पुढच्या गुरुवारी दांडी मारण्याचे ठरवले.


त्या गुरुवारी मी सकाळी दहा वाजत आले तरी उठलो नाही. हे पाहून आईने आज जायचं नाही का अस विचारलं. त्यावर मी आज जायचा कंटाळा आलाय म्हणून म्हंटलं. पण ती म्हणाली, " ठिक आहे, मला आज दुपारी भजनाला चारलाच जायचय. ", असं म्हणून ती जिकडे कामं करायला जायची तिकडे गेली. मग मी परत पडून राहायचा प्रयत्न केला. पण माझ्या डोक्यातून ती ओळ जाईना. " भ ल त च भ ज न ". म्हणजे काय? लिहीणारा पागल असला पाहिजे आणि ओळखणाराही. चाळीतलं कोण असेल? मला डोकं भणभणू लागलं. मला अंदाय येईना. आईचं नक्की काय चालू आहे?. झोपही येईना. म्हणून अंघोळ, जेवण वगैरे उरकून घेतलं. एक वाजायला आला. मी लोळत पडलो होतो. अडीचच्या सुमारास आई आली. मी झोपलेला आहे असे पाहून ती भजनाला जाण्याच्या तयारीला लागली. मी हळूच डोळे उघडून पाहिलं. ती चांगली साडी नेसून, गजरा वगैरे माळून तयार झाली. मग मला तिने उठवलं. म; ई खरं तर जागाच होतो. पण उठल्या सारखं केलं. बहीणही नुकतीच सगळं आवरून झोपली होती. आई म्हणाली, " मी जाऊन येते. " मी न राहवून विचारलं. " भजनाला एवढी अगदी तयार होऊन चालल्येस? कमाल आहे. ती म्हणाली, " अरे. आज ग्रुप मधल्या बायकांनीच आग्रह केला. त्या सगळ्या साठीच्या पुढच्या आहेत आणि विधवाही. " मी मध्येच म्हणालो, " तशी तूही काही विधवे पेक्षा कमी थोडीच आहेस?. "माझ्या बोलण्याचा रोख तिला आवडला नाही. पण स्वतःचा मूड ठिक ठेवीत ती म्हणाली, " मीच लहान आहे म्हणून त्यानीच मला आग्रह केला, की मला चांगली साडी नेसून यायला काहीच हरकत नाही. आज बुवा निरूपण पण करणार आहेत. म्हणून जरा लवकर. मला यायला जरा उशीर होईल. म्हणजे सात साडे सात. सरू करील जेवणाचं. " न राहवू न मी विचारलं, " असं कोणतं मंदीर आहे गं, जिथे तू जातेस. " " हे कोपऱ्या वरचं रामाचं नाही का? " ती घाईघाईने म्हणाली. आणि चपला घालून ती निघाली देखील.

(क्रमशः)