बाप- ५

आईने ते पूर्णपणे गेल्याचे पाहून दार लावले.....

आईने ते पूर्णपणे गेल्याचे पाहून दार लावले. मग मला म्हाणाली , " काय रे काय आहे हे? तुझा काही संबंध आहे का ? " मी थोडक्यात जे आवश्यक आहे ते सांगितलं. तशी ती म्हाणाली, " अरे तू थोडाच गुन्हा केलायस? तो त्या रघुवीरनी केलाय. तू नोकर माणूस . तुला काय माहित कसली पार्सलं होती ती. जाऊ दे, जास्त विचार करू नकोस आणि कामावरही जाऊ नकोस. " रात्र टेन्शन मध्येच गेली. घरी बसायचं म्हणजे पैशाचा प्रश्न होताच. ह्या सगळ्याचं पुढे काय होणार? याचीही काळजी होतीच. जेवणावरची वासनाच गेली. सकाळी उठलो. पेपर नेहेमी बाहेरुनच आणायचो. पण बाहेर गेलोच नाही. सकाळचे दहा वाजायला आले. मध्येच काकूंचा डोळा चुकवून दिवेकर काका घरी आले. म्हणाले, " काय रे, काल असा घाबरत घाबरत आणि धावतसा घरी आलास? " मी त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते म्हणाले, "तू सध्या दोन तीन दिवस घराबाहेर पडू नकोस. कदाचित त्या रघुवीरची माणसं आणि पोलीस तुझ्या मागावर असण्याची शक्यता आहे. आणि हो, आज पेपरला काहीतरी आहे खरं. मी फारसं नीट वाचलेलं नाही. मी पेपर आणून देतो, तो वाचून काढ. " असं म्हणून त्यांनी मला पेपर आणून दिला.


मी पेपर पाहिला. पहिल्याच पानावर रघुवीरांचा फोटो होता. मोठा मथळाही होता. " गेली काही वर्ष अव्याहतपणे अमली पदार्थांचा व्यापार करणारा तस्कर मुंबईत सापडला. " त्यात रघुवीर आणि जीवनलाल हे पोलिसांच्या ताब्यात असल्याचे लिहिले होते. तसेच रघुवीरांच्या ऑफिसवर धाड घालून पोलीसांनी काही लाखांची रोकडही हस्तगत केली होती. पण मालाचा साठा सापडलेला नव्हता. नुसतीच रिकामी खोकी सापडल्याचे म्हंटले होते. पण त्यांची कार्यपद्धती दिली होती. दुसरे पण दोन तीन इसम त्यांनी पकडले असल्याचे त्यांनी लिहिले होते. हे वाचून मला जरा बरं वाटलं. पण पुढील ओळ वाचून मला घाम फुटला. पोलीस एका सोळा सतरा वर्षाच्या मुलाच्या मागावर असल्याचे लिहिले होते. जो रघुवीरांचा जुना सहकारी आहे (मी तर पाच सहा महिन्यांपूर्वीच लागलो होतो. हा पोलीसांचा गुगली असावा). पुढे वर्णन होते. हा मुलगा मध्यम बांध्याचा , लांव केस वाढवलेला पांढरा शर्ट आणि गडद रगाची पँट घातलेला, स्थानिक मुलगा असावा, असे लिहिले होते. पण माझा शर्ट आकाशी रंगाचा होता. असो , तो मुलगा पोलीसांना हवा असल्याचे लिहिले होते. " मला काही सुचेना. मी पुढील दरवाजा किलकिला करून बाहेर पाहिले. माझी अवस्था घाबरलेल्या मांजरीसारखी झाली होती. बाहेर नेहेमीप्रमाणे मुलं खेळत होती. नेहेमीसारखी भांडणं चालू होती. समोरच वसणारा स्टोव्ह रिपेअर करणारा नेहेमी प्रमाणे पानवाल्याबरोवर जुगार खेळत होता. दिवेकर काकू बोंबाबोंब करित होत्या . म्हणजे सर्व काही नॉर्मल होतं. मला बाहेर जायचा धीर होईना. माझ्याकडे लोक कसे पाहतील काय माहित. मी दार लावून घेतले. आई संध्याकाळशिवाय येणार नव्हती. मी कसतरी बहिणी बरोबर जेऊन घेतल. कोठेही जायचे नव्हते. पण वेळही जात नव्हता. तो दिवस असाच गेला. आणखी दोन दिवस असेच काढले. नंतर बाहेर पडायचो , पण काळोख पडल्यावर. मेन रोडला पोलीस स्टेशन होतं. ते दिसलं की छाती धडधडायची. कोणी आपल्याला थांववणार तर नाही, किंवा कोणी ओळखणार तर नाही . मला आणखी एक भीती होती. रघुवीर , तो जीवनलाल, आणि रघुवीरांचे ते लोंबते, माझ्याबद्दल पोलीसांना काही बोलले तर ? त्या दडपणात मी चार पाच दिवस घालवले.

रोज दोन दोन तीन तीन पेपर मी घेऊन यायचो. वाचून काढायचो. पण कसलीच बातमी नव्हती. आई म्हणायची, " काय करायच्येत एवढे पेपर ? उगाचच रद्दी वाढवतोयस. आतापर्यंत पेपर घेतला नाही , काही अडलं का आपलं? मग मी तिला समजावून सांगितलं , ती म्हणाली, " अरे तसं काही होत नाही. तुझी माहिती पकडलेले लोक कशाला सांगतील ? तू काही एवढा महत्त्वाचा दुवा नाहीस. पोलीसही फार लक्ष देणार नाहीत. कारण त्यांना महत्त्वाचे लोक सापडले आहेत. काही होणार नाही." पण मी दुसरं काम शोधाव असं काही ती म्हणाली नाही. तिचा हिशो ब सरळ होता. आपल्याला काम केलच पाहिजे. मुलांना पोसण्याची जबाबदारी आपली आहे. अशी ती साधी होती. आठवडाभरा नंतर दिवेकर काकांनी मला एक चिठ्ठी दिली . आ णि त्यांनी मुबई सेंट्रल स्टेशनात एक नायर नावाच्या माणसाला भेटायला सांगितले. "हे बघ तू नववी नापास आहेस असं सांग म्हणजे तुला हेल्पर म्हणून लावून घेतील. " त्यांच्या म्हणण्या प्रमाणे मी नायरला भेटलो. तो म्हणाला, " ठीक है, दिवेकर साबने भेजा है , इसलिये रखता है. लेकीन कभी भी निकाल सकता है.मग माझी त्या कामाला सुरुवात झाली. पगार बरा होता जवळ जवळ आठशे ते हजार रुपये हातात पडत. क्लास फोरची सगळी कामं मी करीत होतो. नायर्ची केबीन झाडण्या पासून ते चहा, कॉफी , नाश्ता आणणं . माझी तक्रात काहीच नसल्याने मी लवकरच आवडता झालो. असं वर्ष गेलं. रघुवीर आणि कंपनी यांना मी विसरून गेलो. पण कोणी पॉश माणूस दिसला की मी त्याची तुलना रघुवीरांशी करीत असे. ते तसे स्मार्ट होतेच. आता मी मोकळेपणाने जाऊ येऊ लागलो. रस्त्यानी जाताना भीती वाटेनाशी झाली. माझी कॅजुअल लेबर म्हणून नेमणुक असल्याने दर महिन्याला ब्रेक देत असत. त्याचीही सवय झाली. घराच स्वरूप पालटू लागलं. आईला जरा बऱ्या साड्या नेसायला मिळत होत्या. ती अधून मधून भजनाला जात असे. भजनाला जातान मात्र तिचे कपडे जरा बरे असत. अजूनही तिला कामं करावी लागत होतीच. आता थोडफार सेव्हींगही होऊ लागलं. दिवस बरे चालले होते.


एक दिवस काय माहिती काय झालं . कुठलसं इस्पेक्शन निघालं. नायरचा बॉस उन्नीकृष्णन सकाळी सकाळी आला.मी नायरची केबीन आवरत होतो. नायर यायला उशीर होता. त्या उन्नी बरोबर एक खटखटे नावाचा माणूसही होता. उन्नी तापट असला तरी बोलायला जरा बरा होता. मी त्यांच्या कडे दुर्लक्ष केलं. पण खटखटे मला भांडखोर आणि तक्रारखोर वाटला. तो तापून म्हणाला, " देखो उन्नी साब, मै बोलता है, ये आपका नायरने पैसा खाके , जो आदमी पहिलेसे निकाला गया था , और जो युनियन का मेंवर है, उनको छोडके बाहर्वाले आदमीको कामपे रखताहै. आपको अभी तक कोई मिला नही लेकीन मेरे को पक्का डाउट है , देखो. " "तुम जरा चुप करो ना, मैने पूछा क्या ? " उन्नी म्हणाला. मग त्याने एन. एम . आर मागवला. त्याने मस्टर्वर नाव असलेल्या प्रत्येकाला बोलावून घेतले. सगळ्यांजवळ युनियनचा पास होता. मग तो खटखटेला म्हणाला, " देखा, सब युनियन का आदमी है. " तरीही खटखटेला डाउट होता. तो म्हणाला, " आपने ये लडके को पूछा? मग माझ्याकडे वळून म्हणाला, " ए, तुझा पास दाखव रे. " मी म्हंटलं. " कोणता पास ? , तुम्ही नायर साहेबांना येऊ द्या, ते सांगतील काय ते. "मग घामाघूम झालेला नायर आला. खटखटेला पाहून तो म्हणाला , " काय कू चिल्लाता है रे ? मै अभी एक दो दिनमे इसका पास निकालनेवालाही था . ये देख , फॉर्म भी है. " त्याने कुठलासा फॉर्म दाखवला. खटखटे चिडून म्हणाला, " अरे इस आदमी को एक बरस रखा है तुमने हमारे पर्मिशन के बगैर. वो कुछ नही, तुम इसको पहले बाहर निकालो. या तो तुम उसको सफाईके काम मे लगाओ. "

" अरे यार खटखटे , जरा सोचो इतना अच्छा आदमीको सफाईमे भेजनेका? नायरने माझी बाजू घेतली . उन्नी म्हणाला, "इसको या तो सफाईमे भेजो , या तो निकाल दो.. ये लडका मेरेकू कलसे यहापे दिखना नही चाहिये , समझे. " मग कसलासा लाल रिमार्क मस्टरवर मारून तो निघून गेला. खटखटे बडबडत गेला, " मैने बोला ना आपको ये लोग साला पैसा खाके......... " नायर मला म्हणाला, " देख बेटा मै अब कुछ नही कर सकता. तु कल लच्छी से जाके मिलना , यहा मत आना. " मी विचारलं , " लेकीन मेरेको पगार कौन देगा? पण नायरने लक्ष दिले नाही. मी घरी आलो. आईला काही बोललो नाही. मला फारसं काही समजलं नव्हतं. तिला एकच गोष्ट माहित होती, काम आहे , काम नाही. काय काम आहे, किती पैसे मिळणार, याच्याशी तिला काहीही मतलब नव्हता. मला वाटतं तिच्या स्वभावामुळे , लोक तिला फार कमी पैसे देत असणार. असो. या महिन्याचा पगार अजून मिळाला नव्हता. नोकरी टिकते की राहते कोण जाणे. दिवेकर काकांना सारखं काय सांगायचं. काम मिळवून देण्याच काम त्यांनी केलं होतं .मी दुसऱ्या दिवशी ऑफिसकामासारखे कपडे घालून गेलो. गेटवर नायर भेटला. मी त्याला लच्छी कुठे बसतो ते विचारले. तो म्हणाला, " वो आठ नंबर फलाटके आखरी कोनेमे बैठता है. त्याने माझी विचारपूस केली नाही. त्याला बहुतेक उन्नीसाहेबानी नंतर झापला असावा.

मी आठ नंबर प्लॅटफॉर्मच्या एंडला गेलो. तिथे एक रेल्वे स्लीपर्स वापरून केबीन बनवलेली होती. आत एका टेबलापाशी एक चॉकलेटी कलरचा माणूस भुस्कारलेले केस घेऊन खाकी कपड्यात बसलेला होता. तो काडीने दात कोरत बसला होता. मी विचारलं , " लच्छी कौन है ? " त्याने मला तुच्छतेने आपादमस्तक न्याहाळले. माझा बऱ्या पैकी कपडे आणि बूट त्याला आवडले नसावे. काडीने निघालेली दातातली घाण थुंकून , करवादून म्हणाला, " क्या रे , लच्छी का बाप है क्या तू ? साला. " माझ्या लक्षात आलं की त्याला भाव दिला पाहिजे. मी म्हंटले, " अरे माफ कीजिये लच्छी साब , मुझे नायर साबने आपके पास सफाईकाकाम करने भेजा है. " त्याला जरा बरं वाटलं असावं. मग तो विडीने काळे पडलेले दात विचकून म्हणाला, " ठीक है, ठिक है. चल सब कपडा उतार. जांगिया है ना अंदर? " मी पाहात राहिलो.तो पुढे म्हणाला, " इन कपडोमे सफाईका काम क्या खाक करेगा ? आया बडा लाट साब, सफाईका काम करने. " मी शर्ट पँट काढली . तसाही मी नायरकडे असताना शर्ट काढीतच होतो. मी शर्ट पँट काढली. जांग्यावर उभा राहिलो. तो म्हणाला, " अब चल मेरे साथ, इधर अपना राज चलता है. " त्याने एक दो न रेल्वे ट्रॅक ओलांडून एका गटारापाशी नेले. तिथे माझ्यासारखीच चार पाच माणसं एका गटाराची सफाई करण्यासाठी उभी होती. माणसं कसली आयुष्यातल्या लाचारीचे बळीच म्हणायचे. मीही त्यातलाच एक , फक्त इतर काही पर्याय शोधण्याची जाणीव झालेला, असं म्हणता येईल फार तर. त्यांना सुद्धा असलं वाईट काम करण्याची इच्छा नसणार. लच्छी मला म्हणाला. "देख ये संडास का टंकी है, जादा गहरा पानी नही है, जादासे जादा घुटनेतक आयेगा.ये वायर ले, अंदर उतरके चोक निकालना पडेगा. .. ‌ समझा ? चल कूद अंदर. " मी बघतच राहिलो, मला मळमळू लागलं̱. घाण एवढी भयानक होती , की अगदी जिवंतपणी नरकवास्च तो.... मग मला बापाची आठवण झाली. या ...... मुळेच मला ही कामं करायची वेळ आली. लच्छी माझ्याकडे पाहून म्हणाला, " इधर ऐसाच काम है. ये कोई अफसरका काम नही, समझा ? मंगता है तो कर. वर्ना निकल जा. अरे लोग साला, पाच पाच हजार रुपीया देकर ये काम करता है. हमने सिर्फ नायर साबके कहनेपर तेरेको ये काम दिया. वो भी मोफतमे.


मी तिथून तसाच वळलो. तो बडबडतच होता. त्याच्या कडे लक्ष न देता मी धावत जाऊन प्रथम कपडे घातले. आणि मागे वळून नबघता गेट बाहेर आलो. विषण्ण मनस्थीतीतच घरी पोचलो. घरी आई नव्हती. सरूनी काही विचारलं पण मी मोघम उत्तर देऊन गप्प बसवली. समोर काकांच सिंहासन पण रिकाम होत. (काका , गुंडाळलेल्या दोन गाद्या व त्यावर ठेवलेली उशी या रचनेला सिंहासन म्हणायचे. ) दिवस अतिशय वाईत गेला. या महिन्याचा पगार नव्हता आणि मी आता तो घ्यायलाही जाणार नव्हतो.

(क्रमशः)