बाप - ४

सकाळीच उत्साहात त्यातल्या त्यात बरे कपडे घालून......
सकाळी उत्साहातच त्यातल्या त्यात बरे कपडे घालून दहाच्या सुमारास मी ऑफिसला पोहोचलो. कालची दणकट माणसं आज नव्हती. मला जरा बरं वाटलं. ऑफिस उघडं होतं म्हणजे ते स्मार्ट गृहस्थ होतेच. मी केबीन वर टकटक करून आत शिरलो. ते गृहस्थ काहीतरी वाचीत होते. बहुतेक ते पत्रव्यवहाराचे कागद असावेत. त्यांनी नजर वर केली. मी त्यांना म्हणण्याऐवजी तेच मला "गुड मॉर्निंग "म्हणाले. प्रसन्न हसले. आज तर ते अधिकच स्मार्ट दिसत होते. त्यांच्या उजव्या हाताच्या सर्व बोटांमध्ये अंगट्या होत्या. त्याती, वेगवेगळ्या रंगांचे खडे चमकत होते. गळ्यात सोन्याची साखळी होती. हाताला अतिशय किमती घड्याळ होते. आपण हल्ली जे "ओमेगा" चं घड्याळ पाहातो ना तसं. त्यानी मला एक ब्रीफकेस तयार असल्याचे सांगितले. ती काळबादेवी रोडवरच्या पत्यावर पोचवायची होती. "वजन ३किलो ५०० ग्राम आहे. ठीक आहे? आलास म्हणजे दुसरीकडे जायला सांगीन. साधारणपणे, दिवसाला पाच तरी डिलीव्हरीज व्हायला पाहिजेत. आणि टॅक्सीनेच जात जा. " मी हो म्हंटले. त्यानी मला आणखी शंभर रुपये देऊन म्हंटलं, " हे ठेव. तुला जायला लागतील. तुला तासाभरात परत या यला हरकत नाही. मग दुसरी डिलीव्हरी घेऊन जा. काही अडचण आलीच तर मला पीसीओ वरून फोन कर. मी ऑफिसमध्येच आहे. "

मी काळबादेवी सांगून टॅक्सी केली. आणि मेनरोडला उतरलो. पहिल्याच डिलीव्हरीसाठी त्यांनी नाव दिलं होतं "हिम्मतभाई". एका अरुंद आणि अत्यंत घाणेरड्या गल्लीमध्ये हिम्मतभाईंच ऑफिस होतं. ऑफिस कसलं खुराडच ते. हिम्मतभाई एक पन्नाशीला आलेला माणूस होता. जाडजूड, काळपटलेला चेहरा, तोंडावर देवीचे वण. दोन्ही हातांवर कोडाचे डाग. मळकट, कळकट कपडे घातलेला. मी त्याला रघुवीरांच नाव सागितलं. जास्त काही न बोलता त्यानी ब्रीफकेस ठेउन घेतली. मी वजन सांगितले. "नो रिसिट, नो मनी, नथिंग. " मी तडक निघालो. मला जॉब आवडला. लगेच ऑफिसला जाऊन पुढच्या डिलीव्हरीजही केल्या. पहिला दिवस फार छान पार पडला. मलाही जॉब आवडला. अशा रोजच्या डिलिव्हरीज चालू झाल्या. रघुवीर माझ्या कामावर खूष होते. जास्त प्रश्न न विचारणारा मी त्यांनी दिलेल्या पैशांवर खूष होतो. दिवस चालले होते. महिना झाला. पहिला पगार मिळाला. मी जाताना आईसाठी साडी, भावा बहिणी साठी कपडे आणि थोडी मिठाई खरेदी केली. आईला कटाक्षाने घरी राहायला सांगितलं होतं. कित्येक वर्षात फारसे पैसे पाहाण्याची तिला सवय नव्हती. तिला भरून आलं. मी तिच्या पाठीवरून हात फिरवीत म्हंटलं, " दिवस बदलतील आता". रात्र फारच चांगली गेली. नेहेमी तणावाखाली लागणारी झोप आता सुखानी लागू लागली. दिवेकर काकांना कामाबद्दल थोडक्यात सांगितलं. ते म्हणाले, " नशिबवान आहेस. पण शिक्षणाला विसरू नकोस. तुला मोठं व्हायचय ना? शिकल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. आम्हाला शिक्षण कमी रे. म्हणून तर खालच्या लेव्हल वर रिटायर झालो. अनुभवाच ज्ञान भरपूर, त्याला बाहेर कुत्रा विचारीत नाही. " माझ्या मनात आलं, खरच शिक्षणाने माणूस मोठा होतो का? पण मी त्यांच्याशी वाद घालणार नव्हतो. मला ते वडलांच्या (बापाच्या नाही) स्यानी होते.

माझी नोकरी अशा रितीने बरी चालली होती. ऑफिस कुंभारवाड्यात होतं. मी रोज बसने जायचो. असे चार पाच महिने गेले. पगार वेळेवर मिळत होता. रघुवीर खूष होते. ते म्हणत. "तू आलास आणि घंदा चांगलाच वाढला. " मला कधीही हा माल कुठून येतो, कोण आणतो हे जाणून घ्यावेसे वाटले नाही. पण मनात काटया सारखी टोचणी लागलीच होती. काहीतरी या सगळ्यात वेगळं वाटत होतं. पण मी रघुविरना विचारणार कसं? कितिक वेळेला शब्द तोंडावर यायचे पण धैर्य होत नसे. त्यांना नाही आवडलं तर? नोकरी जाईल. आईची ससेहोलपट परत वाढेल. मी सध्या गप्प बसण्याचे ठरवले. या गोष्टीला आपोआप तोंड फुटलं तर बर होईल असे मला वाटे. पुढे तेच झालं. आश्चर्य म्हणजे, मी ज्यांना माल पुरवला ते सगळे असे घाणेरड्या जागांमध्येच का होते, कोण जाणे. माझ्या डोक्यात कॉलेज शिक्षणाने परत थैमान घालायला सुरुवात केली.

आता मला ऑफिसमध्ये दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम आदल्या दिवशीच मिळू लागला. अधून मधून ती दणकट माणसं मी नसताना येऊन जात असावीत, तीच माल आणून देत असावीत असा मला दाट संशय होता. असो. एक दिवस डिलीव्हरी देताना माला संध्याकाळ होत आली. मी नुकताच दिवसाच काम संपवून ऑफिस मधून बाहेर पडणार, तोच मला रघुवीरांनी बोलावले आणि म्हणाले. \""जय, आज जरा एक अर्जंट डिलीव्हरी आहे ती आत्ताच कर. म्हणजे उद्या उशीर होणार नाही. प्रथमच आपला माल "एक्स्पोर्ट " होणार आहे. तू ही ब्रीफ्केस घे आणि जीवनलालच्या ऑफिस मध्ये नेऊन दे. " मग मला वजन सांगितलं. पुढे म्हणाले, "जरा उशीर होईल तुला, पण आत्ता आठ वाजेपर्यंत ही ब्रीफकेस पोचलीच पाहिजे. " संध्याकाळचे सात सव्वा सात वाजत होते. ह्यांच्याकडे काम करण्यामुळे मला गिरगावातले व जवळपासचे बरेचसे भाग पाहायला मिळाले. नाहीतर आम्ही काय, चौपाटी, घर आणि चर्निरोड स्टेशन एवढचं पाहिलेलं. असो, मी कपडे नीट केले. बॅग उचलली. रघुवीर मी जाऊन येईपर्यंत नेहेमीप्रमाणे बसणार होते.

आताचा पत्ता होता, लॅमिंग्टन रोडचा. मी टॅक्सी केली आणि निघालो. हातातली बॅग नेहेमीपेक्षा जड वाटली. इतक्या डिलीव्हरीज केल्या पण कोड नंवर माहित नसल्याने आत काय माल आहे हे कधी पाहिले नाही. जरी नंवर माहेत असता तरी मला केमिकल मधलं काय कळत होत? मी बॅग डीलीव्हर केल्यावर तिथे थांवत नसे. एकतर सगळ्या जागा अतिशय घाणेरड्या असायच्या, म्हणूनही असेल. जूनचा महिना होता. हल्ली अधून मधून पाउसही यायचा. उन्हाळा नुकताच संपला होता. पावसाचा शिडकावा फार सुखद वाटायचा. आजही पावसाला एकदम सुरुवात झाली. मी टॅक्सितच होतो म्हणा. पण छत्री किंवा रनकोट जवळ नव्हता. वीसेक मिनिटांनी मी एका जुन्या पुराण्या चाळ्वजा इमारतीजवळ पोचलो. टॅक्सी सोडली. बहुतेक सर्व खोल्या बंद होत्या. मला तिसऱ्या मजल्यावरच्या १७ नंबरच्या खोलीत जायचे होते. टेकू दिलेली ती इमारत पाहून मला खरंतर जाण्याची शिसारी आली होती. इमारतीच्या प्रवेशदाराशीच कचऱ्याचे ढीग पडले होते. मी जिने चढायला सुरुवात केली. तिथेही अधून मधून कित्येक वर्षांचा कचरा, भिंतीचे प्लास्टर पडले होते. जिन्याचे लोखं डी कठडे काही ठिकाणी तुटले होते, तर काही ठीकाणी गंजले होते. मी धावतच तिसरा मजला गाठला. रस्यावरच्या दिव्यांमुळे अंधुक दिसत होतं. त्या काळात माझ्या अंगात भयंकर उत्साह असायचा. डाव्या बाजूच्या सर्व खोल्या बंदच होत्या. वर आणखी एक मजला असावा किंवा गच्ची असेल. उजव्या बाजुला एक दोन खोल्या सोडून पाहिलं तर एकच खोली उघडी होती. सगळिकडे त्या मजल्यावरही भिंतीचे प्लास्टर पडले होते. खोलीचं दार अर्धवट उघडंहोतं. आतमधून लाईटचा पिवळा उजे ड येत होता. मी दार वाजवलं. आतून गुजरथीतून उत्तर आलं. " आव जो डिक्रा. " मी आत प्रवेश केला. एका जुनाट बेडवर एक गुजराथी म्हातारा बसलेला होता. त्याच्या अंगात मलमलचा सदरा आणि गुजराथी पद्धतीचे धोतर होते. मी त्याला ब्रीफकेस दिली आणि वजन सांगितले. माझे कोणाशीही बोलणे होतच नसे, तशी माझ्या कडून अपेक्षाही नव्हती किंबहुना माझं ते कामच नव्हतं. तरीपण तो म्हातारा म्हणाला, ": माल चोकस छे ना? ". मला काही कळलच नाही. मी त्याच्याकडे आवासून पाहात राहिलो. मला गुजराथी कळत नसल्याचे वाटून तो हिंदीत म्हणाला, " माल सही है ना? " मी हो म्हंटले. आणि निघालो. बाहेर येऊन जिना उतरणार, तो च कोणीतरी दाणदाण पावले टाकीत वर ये त होते. मी पटकन वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्यावर जाऊन लपलो. खाली वाकून चोरून पाहताना दोन पोलिस हवालदार आणि इन्स्पेक्टर मी ज्या खोलीतून बाहेर आलो तिकडे धावत जाताना दिसले. ते बोलत होते. " बघा सावंत खबर पक्की आहे. पकडा त्या म्हाताऱ्याला, आणि एक मुलगा पण आहे. " सावंत की कोण होता त्याने जीवनलालला बीफ्केस सहीत धरला असावा. मी पुढचं पाहायला थांवलोच नाही. धडाधड उड्या मारीत मी जिन्यावरून निघालो. वरून आवाज येत होता. "सावंत तुम्ही दोघे धावा आणि त्या पोराला पकडा. जा लवकर. मी ह्याला घेऊन येतो....... "

सावंत की कोण होता तो आणि दुसरा एक जण असे दोघे माझ्या मागे धावत सुटले. मी रस्या वरून वाट फुटेल तिकडे पळत होतो. पावसाची रिपरिप चालूच होती. मी जाम घाबरलो होतो. रात्रीचे साडे आठ वाजून गेले असावेत. दुकानं बंद होत होती. हळुहळू रस्त्यावरच्या एक दोघांनीही माझ्या मागे धावायचा प्रयत्न केला. पण मी थांबायला तयार नव्हतो. लोकांनी लवकरच माझा नाद सोडला. पण दोधेही पोलीस मात्र माझ्यामागे पळत होते. जीव घेऊन पळणं म्हणतात ना, ते मला त्यावेळी समजलं. माझं सर्व अंग घामानी आणि पावसानी भिजलं होतं. शर्ट पाठीला आणि पँट पायांना चिकटली होती. धावण्यात अडचणी येत होत्या. मी मग की प लेफ्ट मंत्र ठेवून धावत होतो. माझा श्वास रस्त्यावरच्या लोकांना ऐकू जातोय की काय याची मला भीती वाटली. थोड्या वेळाने मी एका बोळ्वंडीत शिरलो. तिथे रस्त्यावर लाईट नव्हते. आणि गुडुप अंधारही होता. सगळ्याच इमारती जुन्या, चाळ्वजा. मला कळेना मी कुठे जात होतो. माझ्या मागून येणारे दाणदाण पावलं टाकीत येतच होते. आता माझ्या तोंडातून आणि नाकातून शिट्ट्या मारल्यासारखा श्वासाचा आवाज येत होता. ते दोघेही गल्लीच्या तोंडाशी थांबले असावेत. माझा अंदाज घेत असावेत. मी समोर पाहिलं, मला हा भाग थोडा ओळखीचा वाटला. मग लक्षात आलं की आमच्या वाण्याचं दुकान ज्या गल्लीत आहे तिथेच मी आहे. एका इमारतीच्या भिंतीला चिकटून सरकत सरकत लहानसा बोळ होता तिथे जाऊन थांवलो. हवालदार आता गल्लीत शिरले होते. मी त्यांना दिसू नये म्हणून, बोळात अत्यंत घाण येत असुनही आत शिरलो. बोळ ओलांडून ते पुढे गेले आणि परत आले. मग आवाज आला, " सावंत तो पळाला असावा. साले ही चरस गांजावाली पोरं पळण्यात वस्ताद असतात. आपण असं करू. बाजूच्या गल्लीतही बघू आणि प्रत्येक इमारतीत जाऊन बघू. " ते बोळ ओलांडून गल्लीच्या तोंडाशी मेन रोडला आले. मी पुन्हा धावायला सुरुवात केली. आता मला भीती नव्हती. तरीही मी धावतच चाळ गाठली. तसाच मी पहिल्या मजल्यावरच्या माझ्या खोलीशी आलो. घामाने आणि पावसाने माझे केस विस्क्टलेले होते. खोचलेला शर्ट कसतरी बाहेर आला होता. बू ट चिखलाने माखले होते. मी जोरजोरात दरवाजा वाजवला. आईने दरवाजा उघडताच मी तिच्या अंगावरच पडलो. तिला दरवाजा लावायला सांगितला. मी तिला मिठी मारली. आणि प्रथमच मी पूर्ण श्वास घेतला. तिला काही कळेना. रात्र्रीचे दहा वाजत आले होते. थोडावेळ कोणीच काही बोलले नाही.

मग दारावर थाप पडली. मी स्वयंपाक घरात जाऊन, कसेतरी कपडे भिरकावून टेबलाखाली लपलो. आई म्हणाली, " अरे एवढा घाबरतोस काय? बघते मी. आईला काहीच माहिती नव्हतं. आता सगळं सांगणंही कठीण होतं. तेवढा वेळ ही नव्हता. कदाचित ती घाबरली असती. आई दरवाजापाशी गेली. तिने दार उघडलं. दारात पोलिस हवालदार.... "बाई, एक सोळा सतरा वर्षाचा मुलगा गुन्हा करून पळालाय, त्याचा आम्ही शोध घेतोय. तुमच्याकडे तर नाही आला? किंवा नुम्ही पाह्यलाय का इथून पळताना.? "दोन हवालदारां पैकी एक जण म्हणाला. मी आवाज ओळखला. मग आईचा आवाज आला, " नाही हो इथे कोण येणार? आनी आम्ही कोणाला पाहणार? मी स्वयंपाक घरातच होते. पाहिजे तर आत येऊन पाहा. " मला वाटलं आईला वेडबीड लागलं की काय? त्यांनी घरात यावं म्हणून आई दारातून बाजूला झाली.. पण त्यांनी नुसतीच आतमध्ये नजर टाकली, आणि आईला म्हणाले, " ठीक आहे. इथे कोणी नाही आहे. अंधारात त्या मुलाचा नक्की चेहरा किंवा कपडे वगैरे नीट दिसले नाहीत, म्हणून आम्ही आता काही सांगू शकत नाही. पण बघा, लक्ष ठेवा. तसं चाळित शिरताना कोणी दिसलं तर पोलिस स्टेशनला येऊन सांगा. " आणि ते गेले.

(क्रमशः)