बाप -३

मग मी परिक्षेच्या तयारीत गर्क होतो.......

मग परीक्षेच्या तयारीत मी गर्क होतो. असेच काही महिने गेले. आई आजकाल वेळ काढून भजनाला जात असे. या गोष्टीचा मी कधीच गांभिर्याने विचार केला नाही, असे वाटते. असो, मी मॅट्रिक झालो. आईलाही आनंद झाला. तिने कसे का असेना, पण स्वस्तातले पेढे आणले. देवापुढे ठेवले आणि आजूबाजूच्या लोकांना वाटले. अर्थातच शेजाऱ्यांनी ते घेतले, पण किती मार्क मिळाले किंवा पुढे काय करणार वगैरे काहीही न विचारता जमतील तेवढे टोमणे मारले. अर्थातच बापावरून. तरी ही आईने हासरा चेहरा ठेवला. काही काही कुत्सित लोकांनी "खरं तर, वडलांनी पेढे द्यायला पाहिजेत नाही? किंवा "हल्ली जयचे बाबा दिसत नाहीत नाही? येतच नाहीत का? " वगैरे अडून अडून विचारलेही. विचारणारे सगळे आपलेच लोक होते, मराठी. म्हणजे ग्रांट रोडच्या शास्त्री हॉल मध्ये राहतात तसे. आई आनंदात होती. तिनी जेवायला खीर केली होती, आणि जशी बापाला जेवायला घालत होती ना तसाच तिनी मला एकट्याला जेवायला घातला. मग ती आणि इतर भावंड बसली. मला ते आवडलं नाही. अशी तिची माझ्यावर माया होती. ती कधी आम्हा मुलांना ओरडल्याचे आठवत नाही, किंवा कोणतेही बंधन आमच्या वागण्यावर ठेवले नाही. आम्हाला ती पाहिजे तसं वागू द्यायची. मोठा झाल्यावर मीच पुढेपुढे घरात शिस्त निर्माण केली. तसे आम्ही कोणीही बेशिस्त नव्हतो. पण मला नेहेमी भीती वाटायची. पैसा कमी असल्याने किंवा इतर मोहांमुळे आम्ही बिघडू की काय? मग मला आई म्हणायची, "अरे असं निर्दयपणानं वागू नये. ज्याला बिघडायचं असतं ना, तो तुम्ही कितीही नियम लावा नाही तर प्रेमानं समजावून सांगा, तो बिघडतोच. " आपल्याशी कोणी कसही वागो, आपण चांगलच वागलं पाहिजे. अशी ती भोळसट होती. त्याचं फळ तिला काय मिळालं हे पाहिलचं मी.
मॅट्रिक तर झालो. कॉलेजचं काय? भाऊ बहीणही शिकत होते. परवडत नव्हत म्हणून बहिणीला नववीतच शाळा सोडावी लागली. ती घरचं काम आणि सगळा खर्च इकडे लक्ष देई. मी खूप प्रयत्न केला, पण मला काम मिळेना. मी सध्या कॉलेज शिक्षण न घेण्याचे ठरवले. नाहीतरी मी पैसे कुठून आणणार होतो? आईकडे काही दागिने होते. पण अगदीच कमी. ते मोडायला ती तयार होती. पण मीच नाही म्हंटलं̮ दिवेकर काका काहीतरी सोय करतो म्हणाले, पण मीच नाही म्हंटलं. उलट त्यापेक्षा त्यांनी मला नोकरी बघावी असं मी त्यांना सुचवलं. मी म्हंटलं, "मी ऑफिस बॉयच, किंवा पॅकरच किंवा एखादं हलकं काम मिळाल तरी मला चालेल. " पण ते म्हणाले, "अरे मॅट्रिक झालेल्या आणि अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या मुलाला अशी कामं कशी मिळतील?, तरी पण मी बघतो. " मग मी मध्यंतरी, स्टेशनावर हमालाचं कामही काही दिवस केलं. पण त्यांचीही युनियन असते की काय कोण जाणे. सात आठ दिवस ठिक चाललं. मग स्टेशनावरचे हमाल लोक मला हाक्लू लागले. पुढे पुढे तेही काम बंद झाल.
मग एक दिवस एक गृहस्थ भेटले. मी व्ही टी स्टेशनवर उभा होतो. कुठलीशी लांबची गाडी आली. ते हमाल पाहात होते. त्यांनी मला हात केला. त्यांचे सामान उचलून मी स्टेशना बाहेर आलो. ते चांगले सूट्वूट वाले होते. पायात चकचकणारे बूट, पांढरा कोट पांढरी पँट. डोक्यावर लहानशी हॅट. हातात सिगारेट, तोंडात पान. असा उंच आणि सडसडीत बांध्याचा तो स्मार्ट माणूस होता. मी पैसे मागायच्या आतच त्यांनी मला पन्नास रुपये दिले. मला आश्चर्य वाटलं, की ह्या कामाचे एवढे पैसे? पण मला गरज होती. मी त्यांना थँक्स म्हंटले. शर्टाला घाम पुसून मी निघालो. तेव्हा ते मला बोलावून म्हणाले. "अरे तू तर चांगला शिकलेला दिसतोस, आणि ही काम का करतोस? "मग मी नुकताच मॅट्रिक झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, " हे बघ, उद्या सकाळी मीरा मॅन्शन मध्ये येऊन मला भेट. काळजी करू नकोस. मी तुला नक्कीच चांगलं काम देईन. "त्यांनी मग मला त्यांचं कार्ड दिल. माझ्या आयुष्यात मला मिळालेलं हे पहिल कार्ड. मी त्या दिवशी आनंदात घरी आलो. देवाला मी प्रथमच नमस्कार केला. मी कार्ड पाहिल. त्यावर लिहिलं होतं. "रोहिणी पॅकर्स, एक्झिक्युटिव्ह मॅनेजर, मीरा मॅन्शन, दुसरा माळा, जयकर मार्ग, गिरगाव, मुंवई. फोन नंवरही होता. त्यांचं नाव होतं, मि. ए. टी. रघुवीर.

दुसऱ्या दिवशी मी साडेदहाच्या सुमारास त्यातल्या त्यात बरे कपडे घालून त्यांच्या ऑफिसमध्ये

गेलो. बाहेर एका टेबलापाशी दोन तीन माणसं नुसतीच बसली होती. समोर फोन होते. पण ऑ फिस असल्यासारखे मला वाटले नाही. कोणतेही पेपर्स किंवा फाइली दिसल्या नाहीत. तेबलाशी बसलेली माणसंही चांगली दणकटग वाटली. त्यांच्यापैकी एकानं मला काय काम आहे विचारलं. मी त्याला माझ्याजवळचे कार्ड दाखवलं. त्याने केबिनकडे बोट केल. मी दारावर हळूच टकटक करून उभा राहिलो. आतून काहीच उत्तर न आल्याने मी घाबरतच पुन्हा दार वाजवले. मग आतून आवाज आला, "येस, कम इन. " मी दार उघडून आत गेलो. केबीन कसली मला ती जागा गोडाऊन सारखी वाटली. बरीचशी खोकी, रिकामी असावीत, तिथे आजूबाजूला पडली होती. एका भिंतीवर एक दात तुटका
ए. सी. होता. (म्हणजे एअर विंडोच्या पट्ट्या तुटलेल्या असतात. तेव्हा दिसतो तसा)टेबल मात्र अतिशय उत्तम होत. एका फिरत्या खुर्चिवर कालचे ते स्मार्ट गृहस्थ बसले होते. मी त्यांना माझं नाव सांगितल व पत्ताही. आपले पुढचेच दोन सोनेरी दात आणि हातातल्या अंगठ्या चमकावीत ते म्हणाले. "बस. जय, मला लोकल माणूसच पाहिजे होता. कामाचा माणूस मी चांगलाच ओळखतो. तुला काम दिलं यात आश्चर्य वाटण्यासारख काहीच नाही. "मी घाबरत घाबरत तिथल्याच एका खुर्चीवर बसलो..
ते म्हणाले, " हे बघ जय, कंपनी तशी नवीन आहे. ऑफिस काढून दोन तींनच महिने झालेले आहेत. सुरुवातीला मी तुला महिन्याला पाचशे रुपये देईन. नंतर काम पाहून वाढवीनही. शिवाय बाहेरचा सगळा जाण्या येण्याचा, खाण्या पिण्या चा खर्च मी वेगळा देईन. अगदी कायमचा जॉब आहे बघ हा. काम काही फार नाही. ही लहान लहान रसायनांच्या पावडरीची पार्सलं आहेत. ती सांगितलेल्या पत्त्यावर देऊन यायची. त्यांच्या कडून आपल्याला पावतीही नको आहे. तुझं काम फक्त डिलिव्हरीच आहे. अडीचशे ग्रॅम पासून ते एक किलो पर्यंतची ही पॅक्स आहेत. घाबरू नकोस तुला ती हमालासारखी उचलावी लागणार नाहीत. तुला मी ब्रीफकेस मध्ये भरून देईन. ती ब्रीफकेसहीत डिलीव्हर करायची. जिथे देशील तिथे फक्त त्यांना आतल्या मालाच वजन सांगायच. बॅगेचा कोड नंबर मी त्यांना सांगीन. आणि हो, हे पाचशे रुपये मी तुला आगाऊ देतोय. ते पगारातून कापून घेणार नाही. तुला कपडे व इतर घरखर्चही असेलच. कपडे कोणतेही चालतील, फक्त हिरोसारखे नकोत. मग केव्हा चालू करतोस काम? उद्यापासूनच ये. शुभस्य शीघ्रम काय? काही अडचण आली तर सांग. "
माझा विश्वासच बसेना. मी शंभराच्या पाच नोटा खिशात घालून थँक्स म्हंटले. आणि बाहेर आलो. बाहेर ती दणकट माणसं बसूनच होती. पण त्यांनी मला एका अक्षरानेही विचारलं नाही. जणू मी अस्तित्वातच नव्हतो. मला कोणत्याही प्रकारचा संशय आला नाही. आपल्या गरीब आईचे कष्ट कमी होतील हा एकच विचार त्यावेळी मनात होता. मी तडक घरी आलो. रस्त्याने जातानाही आपल्याला पार्ट टाईम कॉलेज करता येईल व आईला पण एखाद दोन कामं, निदान रविवारची जास्तीची कामं तरी बंद करता येतील, असे वाटत होते̱. घरात शिरता शिरता दिवेकर काकांनी खुणेनीच विचारलं काय रे आज खुषीत दिसतोस? मी उद्या सांगतो असे खुणेनेच सांगितले. घरात शिरलो. बहिणीला मी नोकरी लागल्याचे सांगितले. आई यायला वेळ होता. तो दिवस अगदी छान गेला. आई आली. तिला फारच आनंद झाला. तिला इतकं बरं वाटलं, की तिला एकदम हुंदकाच फुटला. ती रात्रपण मी विसरणार नाही. मला जेमतेमच झोप लागली.

(क्रमशः)