बाप (भाग १)

बी.कॉमला असताना चारही वर्ष तो माझ्या वर्गात होता.....

बी.कॉमला असताना चारही वर्ष तो माझ्या वर्गात होता. नाव जय प्रकाश साबळे. पाच सव्वा पाच फूट उंची. कुरळे पण मानेपर्यंत लांव केस. थोडे पांढरे झालेले. मोठा पण निबरट आणि कोरडा चेहरा. जाड भुवया, मोठे डोळे. बोलताना उपरोधिकपणे हासण्याची सवय. खांदे वाकलेले. वय तेवीस चोवीस. आम्ही सगळेच नोकरी करणारे विद्यार्थी. सकाळच कॉलेज. कॉलेज व्हीटीला होत. तो गिरगावात राहायचा. म्हणून लवकर यायचा. तो इंकम टॅक्स मघे, मी सेल्स टॅक्स मध्ये, दुसरा एक बी. पी. टी. त तिसरा रेल्वेत. असा आमचा चार जणांचा ग्रुप होता. आम्ही जेथे काम करायचो त्या नावाने एकमेकांना हाक मारायचो. अर्थातच, तो आय. टी. मी एस. टी. तिसरा बी. पी. टी, चौथ्याचा शॉर्ट फॉर्म होत नव्हता म्हणून नावाने हाक मारायचो. तासाला दांडी मारून बाहेर फिरणं हे नॉर्मल होत.


एकदा मी सगळ्यांचीच संपूर्ण नाव विचारीत होतो. तस ते साबळेलाही विचारल. तो म्हणाला जय प्रकाश साबळे. मी म्हंटल, \"तुझं नाव जय आणि वडलांच नाव प्रकाश का? \" तो म्हणाला, \"बापाच नाव मी लावीत नाही\" वडलांचा बाप झाला तेव्हाच मी ओळखलं, काहीतरी गोम आहे. थोडी तुच्छता त्याच्या तोंडावर होती. मी म्हंटलं. \"अस का? \" तो वडलांना एक सणसणीत शिवी देऊन म्हणाला, "..... लहानपणीच आम्हाला सर्वाना सोडून दुसऱ्या बाईबरोबर पळून गेला. जाऊ दे. सांगीन केव्हातरी. " मी विषय जास्त ताणला नाही. त्याचा चेहरा आक्रसलेला दिसला. अशीच तीन वर्ष गेली. शेवटच वर्ष चालू झालं. मला फार हौस म्हणून मीच पार्टीचा प्रस्ताव तिघांपुढे ठेवला. साबळे थोडा गंभीर स्वभावाचा म्हणून कोणत्याही प्रस्तावास लगेच हो म्हणत नसे. बाकीच्यांनी ताबडतोब होकार दिला. येणाऱ्या शनिवारी इराण्याच्या हॉटेलमध्ये बसण्याच ठरलं. दुसरे दोघे म्हणाले, \"अरे, आम्हाला शनीवारी कामावर जाव लागत. तुझ्यासारखी सुटी नाही. \". मी जरा चिडून म्हंटले, एखाद दिवस दांडी मारा की. अशी वेळ काय परत परत येणार आहे? \" दोघांनी होकार दिला. मी प्लानिंग करणारा म्हणून प्रत्येकाने माझ्या जवळ शंभर रुपये दिले. मग मी प्रोग्राम ठरवला. बीयर, नॉन व्हेज जेवण आणि जमल तर पिक्चर.

त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या तासाला बसून पुढील तासांना दांडी मारून आम्ही जायच ठरवल. मी आणि आय टी. बाहेर आलो. दुसरे दोघे बाहेर येऊन म्हणाले, \" अरे आम्हाला नाही जमणार रे, ऑफिसला जाव लागेल. \" मी चिडून म्हंटलं. \" अरे काय रडता रे तुम्ही. छाः याला काही अर्थ आहे का? \" मी त्यांचे पै से परत देऊ लागलो. तेव्हा ते मनापासून म्हणाले, \" अरे पैसे राहू दे. पुन्हा केव्हा तरी बसू. \". पण साबळेला आवडलं नाही. तो म्हणाला, "ए, आज नही, तो कभी नहीं. नखरे करू नका. हे पैसे परत घ्या. " त्यांना फारस आवडल नाही. पण त्यांनी पैसे परत घेतले. शेद्वटी मी आणि आय. टी असे दोघेच कॉलेजबाहेर पडलॉ. तो थोडासा अबोलच होता. मी काही तरी विचारायच म्हणून विचारलं. \" तू बी. कॉम नंतर काय करणार आहेस? सी. ए.? तो म्हणाला, " नाही, मी लॉ करणार आहे. मला प्रमोशनच्या द्रुष्टीने आवश्यक आहे. पण मी प्रॅक्टीस करणार नाही. " लवकरच एका इराण्याच्या हॉ टेल मध्ये आम्ही बसलो. मी बियर आणि इतर खाणं ऑर्डर केलं. अजूनही तो मख्ख चेहरा घेऊन बसला होता. मला वाटल याच काहीतरी बिनसल असाव. परंतु मला बिचारण्याच धाडस झाल नाही. बियर आली. आम्ही प्यायला सुरुवात केली. पुन्हा काही वेळ असाच गेला. त्याला कसलातरी ताण असावा.

मग तो अचानक म्हणाला, "रविवारी...... बाप आला होता. साला कशाला आला कोण जाणे. मी अक्षरही बोललो नाही. जवळ जवळ सात आठ वर्षानी तो अचानक उगवला होता. माझी चौकशी केली. अर्थातच आईकडे. बहीण आणि भाऊ अभ्यास करीत होते. त्याच्याशी फक्त आई बोलत होती. मी मधल्या दाराशी उभा होतो. आईच मला आश्चर्य वाटल. तिला इतका आनंद झाला होता की त्याची ती अगदी ऊठबस करीत होती. त्याला सारखी विचारीत होती. काय बनवू, तुमच्यासाठी? तो तो माझा राग उफाळून येत होता. आईनी चहा केला आणि त्याच्यापुढे धरला. तो हातात धरून तोंडाला लावणार तेवढ्यात माझा तोल सुटला. कधी नव्हे ती मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करीत होतो. मी झटकन पुढे होऊन, एका हाताने त्याच्या थोबाडीत मारली. त्याच्या हातातील कप बशी चहासहीत फाटकन उडाली आणि फुटली. मी त्याचा हात धरून म्हंटले, " चल ऊठ, तुझी इथे काही गरज नाही " माझा लाल चेहरा पाहून तो घाबरला असावा. त्याने काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण मी त्याचे दोन्ही हात धरून त्याला बाहेर काढला. माझ्या अनपेक्षित हल्ल्याने तो धडपडून पडला. आणि घाईघाईने बाहेर निघून गेला. मी दरवाजा लावून परत आत आलो. आई भेदरली होती. ति म्हणाली, " अरे हे काय केलस? ते वडील आहेत तुझे ते. " तिच्या डोळ्यात पाणी होत. मी म्हंटल, " होते. आता नाहीत. जेव्हा गरज होती तेव्हा कुठे गेले होते? लोकांच्या दारी काम केलीस तेव्हा कुठे गेले होते.? सरिकाला हॉस्पिटल मध्ये ठेवली होती तेव्हा कुठे गेले होते? मला कॉ लेजात अडमिशन घ्यायची होती तेव्हा कुठे होता हा...... बाप? तू त्याची एवढी बडदास्त ठेवतेस? तुझा चेहरा पाहून कधी त्याला दया नाही आली? " मग आई कडे बोट दाखवून मी म्हंटले, " परत कधीही हा माणूस आपल्या दारी आला नाही पाहिजे".


(क्रमशः)