बाप नावाचं आभाळ..#फादर्स_डे#अलक

बाप नावाच आभाळ

बाप नावाचं आभाळ #फादर्स_डे #अलक 

१. आग्र्याहून मोगलांच्या हाती तुरी देऊन आल्यावर संभाजीराजेंच्या सुरक्षिततेसाठी, शत्रूची दिशाभूल  करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाचे श्राद्ध घालणाऱ्या छत्रपती शिवरायांचा आत एक बाप आतल्या आत हमसून रडला होता. 

-----------------------------------------------------

२. “तुझ्या बापाने खाल्ली होती का इतकी खारट भाजी?” नवऱ्याच्या या उद्गारासरशी तिचे डोळे भरून आले. तिच्या हातची अर्धी कच्ची भाकरीसुद्धा कौतुकाने खाणारा बाबा तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. 

-----------------------------------------------------

३. संसाराचं निखळून पडलेलं चाक हाती घेत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ती अपघातात पाय गमावलेल्या आपल्या नवऱ्याचा गणवेश अंगावर चढवुन नवऱ्याची रिक्षा चालवू लागली. आज ती आईसोबतच बाप नावाचं आभाळ बनली होती. 

-----------------------------------------------------

४. ”माझ्या आजवरच्या साऱ्या यशाचे श्रेय मी माझ्या बाबांना देतो..” सत्कार समारंभाच्या भाषणात हे वाक्य ऐकताच कधीही बाप होऊ न शकणार्‍या सुमितचे डोळे दत्तकपुत्राच्या त्या उद्गारांनी भरून आले. 

-----------------------------------------------------

५. आयुष्यभर ताठ मानेनं जगणाऱ्या, कोणापुढेही न झुकणाऱ्या बापाला आज आपल्या नोकरीसाठी मालकाचे पाया पडताना पाहून त्याला आपला बाप नव्याने कळला होता. 

-----------------------------------------------------

६. “आधी लगीन कोंढण्याच मग माझ्या रायबांच..”  असं म्हणत स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता धारातीर्थी पडलेल्या वीर तानाजी मालुसरेंनी लाखाच्या पोशिंद्याचा, स्वराज्याच्या पित्याचा जीव वाचवला होताच पण स्वराज्यातील हजारो बापांचे प्राणही वाचवले होते. 

-----------------------------------------------------

७. उच्च शिक्षणासाठी लागणाऱ्या फीची रक्कम भरण्यासाठी भविष्याची सारी पुंजी विकून त्याने मुलाच्या हातावर डी. डी. ठेवला. आपल्या सावत्र बाबांचा कायम दुस्वास करणाऱ्या अजयला त्यांच्यातला बाबा आज खऱ्या अर्थाने उमगला आणि द्वेष गळून पडला. 

-----------------------------------------------------
८. रात्री उशिरापर्यंत काम करून घरी परतत असताना काही गुंड तिच्या मागे लागले. तिथेच बाजूला बसलेल्या भिकाऱ्याने जवळच्या काठीने त्यांना बडवून काढले. गुंडापासून संरक्षण करणाऱ्या त्या भिकाऱ्यामध्ये तिला तिचा बाप दिसला. 

-----------------------------------------------------
९. पाठवणी करताना मुलीने “बाबा.." म्हणत गळ्यात पडून एकच हंबरडा फोडला आणि इतके दिवस धैर्याने राखलेला त्याच्या अश्रूंचा बांध अखेरीस फुटलाच. 

-----------------------------------------------------

१०. पारितोषिक नाचवत येणाऱ्या आपल्या मुलाला आनंदाने मिठी मारूनही आरपार निघून गेल्याचे पाहून व्यथित होत त्याने मागे वळून पाहिलं. त्याची पत्नी मुलाला छातीशी कवटाळून म्हणत होती, 
“आज तुझे बाबा असायला हवे होते.”
----------------------------------------------------- 

© निशा थोरे