बाप जाणून घेताना..#fathers_day#अलक

फादर्स डे निमित्त अलक लिहायचा पहिलाच प्रयत्न


बाप
गणपत आज लवकर टपरीवर चालला होता.एवढ्यात कचरापेटीजवळ रडल्याचा आवाज आला.दुपट्यात गुंडाळलेली पोर...गणपत घरी घेऊन .आज तीच सुषमा अधिकारी व्हायच्या परीक्षेचा निकाल आणायला गेलीय.गणपत टपरीवर अस्वस्थ,पोरीचा निकाल काय लागला असेल. एवढ्यात सुषमा पळत आली...बाबा एक कडक चहा.पत्रकार तोवर पोहचलेच. ती आपले नाव सांगताना अभिमानाने म्हणाली,सुषमा गणपत जाधव.हे गणपत जाधव माझे बाबा.या वाक्यासरशी एक बाप तृप्त झाला.
---------------------------------------------------------------------
अस्तित्व

डॉ निरंजन सुलभा साठे.आजही नाव सांगितल्यावर काहीजण अभिमानाने पाहतात,तर काही हसतात.निरंजन मात्र भूतकाळात हरवतो.रोज त्या दारुड्या माणसाचा गुरासारखा मार खाणारी,शिव्या खाऊन झोपणारी आई त्याला आठवते.तो गेला आणि निरंजन स्वतः आपल्या आईच नाव स्वतःपुढे लावून आला.आजसुद्धा हेच नाव त्याच अस्तित्व आहे आणि राहील.
---------------------------------------------------------------------


सरप्राईज

पालवी आज खूप उदास होती.सगळ्या फ्रेंड्स चे स्टेट्स ,बाबांबरोबरचे फोटो पाहत होती.तिने बाबासाठी आणलेले गिफ्ट नीट रॅप केले आणि कॉलेजला गेली.आज अभ्यासात मन लागत नव्हतं. पालवी घरी आली.उदास मनाने बेडरूम मध्ये शिरली....एवढ्यात लाईट उजळले.समोर पालविचा बाबा होता...कर्नल विजय शिर्के.पालवी धावतच बाबांच्या मिठीत शिरली.आजच फादर्स डे च सरप्राईज दोघांनाही मिळालं होतं.
---------------------------------------------------------------------


सत्कार

मी नाही येत ग तुझ्या कॉलेजला.निशा आपल्या मुलीला समजावत होती.पण का???हा का???मोठा होता.निशा तृतीयपंथी होती.तिने शिवानीला वाढवलं होत.आज गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल शिवानीचा सत्कार होता.तू आली नाहीस तर मी सत्कार घेणार नाही.निशा घाबरत त्या भव्य कॉलेज मध्ये गेली.शिवानी बोलायला उभी राहिली.सिग्नलवर भीक मागणारी एक पोरगी आज इथे आहे कारण.....ती माझी आई आणि बाप सुद्धा.सगळ्या कॉलेजमधून टाळ्यांचा कडकडाट होत होता...निशा तीच बाप आणि आईपण जगत होती मनापासून.....
---------------------------------------------------------------------


शिकवण

अँड प्रमोशन गोज टू निशांत देशमुख...सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट..शांपे,दारू नुसता धुडगूस.निशांत पार्टीवरून रात्री 12 वाजता गेला.तसाच झोपणार एवढ्यात त्याचा पाच वर्षांचा मुलगा मयंक जवळ आला.डॅडु हॅप्पी फादर्स डे.. असे म्हणून कपाटातील व्हिस्की ची बाटली समोर धरली.निशांत रागावणार एवढ्यात तो निरागसपणे म्हणाला,"तुला हेच आवडत ना?म्हणून मग कॅडबरी मी खाऊन टाकली.बाप असण्याचा धडा निशांतला मिळाला आणि दुसऱ्या दिवशी घरातला बार काउंटर गायब झाला.
---------------------------------------------------------------------

खाऊ...

शिवराम सकाळी उठला,नऊ वर्षांची चिंगी जवळ आली.नाना आज त्ये फादर्स डे हाये..तवा तुला लै ग्वाड शुभेच्छा.मला खाऊ आण बाजारावरून.शिवराम बाजाराला गेला.स्वतः जवळचे माळवे विकले.सगळा बाजार करून पन्नास रुपये राहिले.चिंगिला पेढे लै आवडत्यात.पेढे घेऊन शिवराम घरी आला.दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं.चिंगे हा घे पेढा.चिंगी पाणी घेऊन आली.अर्धा पेढा त्याच्या समोर धरला.नाना तू खा..शिवरामला ते सगळे नातेवाईक आठवत होते ,जे मुलगी झाली तर नाराज होते.आज त्याला मुलीचा बाप असण्याचं सार्थक वाटत होत....
---------------------------------------------------------------------


तू मोठा झालास....

सुजयने आज मोठी पार्टी ठेवलेली.फादर्स डे निमित्त.त्याने बाबांना काही कळू दिले नव्हते.घरी आल्यावर हळूच आईच्या कानात सांगितले.आई बाबांना म्हणाली,आपल्याला जरा बाहेर जायचंय.बाबा नाखुषीने बाजारात गेले.दोन तासांनी परत आले तर.....घरात सगळीकडे सजावट.....केक आणि कोपऱ्यात मोठा बुक शेल्फ त्यावर सगळी आवडती पुस्तक.बाबा,मला शिकवताना स्वतःची आवड बाजूला ठेवत गेलात ना...आज माझ्या कमाईतून हे तुम्हाला गिफ्ट...बाबांनी डोळे पुसले..हसत सुजयला जवळ घेत म्हणाले,"मोठा झालास रे लेका"......
---------------------------------------------------------------------

आणि ढग मोकळे झाले...

श्रीकांत आरे आवर,शाळेत नाही का जायचं? श्रीकांत गोरे शहरातील नामांकित शाळेत शिक्षक होते.गेल्या महिन्यात त्यांचा दहा वर्षांचा मुलगा कॅन्सरने गेला.खूप निराश होते.शाळेत जावेसे वाटतच नव्हते.नित्यकर्म म्हणून ते शाळेत गेले.नेहमी दंगा करणारा पाचवीचा वर्ग आज खूप शांत होता...सर येऊन बसले.शिकवायला सुरु केले.एवढ्यात मागच्या बाकावरचा सुमित जवळ आला.सर,माझा बाबा मागच्या वर्षी देवाघरी गेला...मग आईने नवा बाबा आणला.तो पण छान आहे.तुम्ही सुद्धा श्रीयशला मिस करत असाल तर मी आहे,असे म्हणून तो घट्ट मिठी मारून रडू लागला.त्याला थोपटत असताना,निराशेचे सगळे ढग सरून गेले.आभाळ मोकळं झाला.
---------------------------------------------------------------------


आनंदाचा ठेवा

प्रसूतिगृहाच्या बाहेर प्रणव येरझाऱ्या मारत होता.गेले बारा वर्षे नाना प्रयत्न करून थकले होते.पहिल्यांदा अनुजाने गुड न्युज दिली तेव्हा तो स्तब्ध झाला होता.गेले नऊ महिने दोघे एकत्र जगले होते सगळे क्षण..एवढ्यात नर्स बाहेर आली.कापडात गुंडाळलेला तो छोटासा जीव.अभिनंदन मुलगा झाला....प्रणवच्या हातात बाळ दिले..एक आनंदाचा ठेवा ...एका बापाला जन्म देत होता.
---------------------------------------------------------------------


आनंदाचे झाड.

प्रकाशराव आज खूप उदास होते.त्याचा चाळिशीतला मुलगा कोरोनात गेला.आज फादर्स डे, राहून राहून आठवणी पिंगा घालत होत्या.सौरभ जन्मला तेव्हा किती आनंदात होते.शाळा,घर सगळीकडे हुशार असणारा सौरभ होताच तसा.सगळ्यांना आनंद वाटणारा.आज अनेक आठवणी येत होत्या.डोळ्यातले पाणी मुश्किलीने रोखत होते..एवढ्यात त्यांचा नातू चिन्मय पुढे झाला.त्यांना मिठी मारत म्हणाला,"हॅप्पी फादर्स डे आज्जो,तुझं आनंदाचं झाड जाताना त्याच रोपटं लावून गेलंय....
---------------------------------------------------------------------