आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना....,

Challenges In Front Of Cover Country While Being A Superpower Nation

आजादी का अमृत महोत्सव साजरा करताना……



            आज माझी मुलगी जवळपास दोन वर्षानंतर पहिल्यांदा शाळेत गेली. कालपासून तिची शाळेत जाण्यासाठी किती लगबग सुरू होती! शाळेत न्यायचं दप्तर, डबा , पाण्याची बाटली, गणवेश, सॅनिटायझर, मास्क, आणि जुन्या वर्ग मित्र-मैत्रिणींना भेटण्याकरिता ती अगदी उतावीळ झाली होती. इतर वेळी सूर्य उगवल्यानंतरच उठणारी, अर्धवट झोपेतच आभासी वर्गात बसणारी माझी कन्या , आज सकाळी मी उठवताच ,पहिल्याच हाकेला उठून बसली. पटापटा स्वतः आवरून अॅटो काकाला लवकर बोलव म्हणून माझ्या मागे तगादा लावत होती. यथावकाश सुपुत्री शाळेत गेली पण त्याच वेळी माझ्या मनात अनेक प्रश्न पिंगा घालू लागले.


      लॉकडाऊनमुळे काही मुलं शिक्षणाला मुकली. आठवी, नववी, दहावीतल्या निम्न मध्यमवर्गीय किंवा दारिद्र्य रेषेखालच्या सावित्रीच्या लेकींचं काय झालं असेल? त्याही आता शाळेत जात असतील का? की काही इतरांच्या घरी धुणीभांडी करत असतील? काहींचे विवाह तर झाले नसतील ना? बरं मुलीं सारखंच त्या गरीब अर्धपोटी मुलांचं काय? ते आता कुठे असतील? वीट भट्टी कामावर? हॉटेलात कपबशा विसळत की ऊस तोडणी मजुरी ही त्यांची नवी ओळख असेल?


       महामारीच्या काळात दुसऱ्या लाटेत अतोनात नुकसान झालं. अनेकांचे पितृछत्र हरवले, अनेक संसार उघड्यावर पडले आणि अनेकांचा ऑक्सिजन अभावी जीव पण गुदमरला. किती व्यथा! किती दुःखद आठवणी !! सांगाव्या -ऐकाव्या, तेवढ्या थोड्याच!!!


         आणि आता युक्रेन रशिया युद्धाने भारताचे अनेक कच्चे दुवे समोर आणले. रशिया अनेक देशांना गव्हाची निर्यात करतो पण युद्धामुळे अनेक देशातील लोकांच्या ताटातला ब्रेड महागणार आहे. भारतानेही अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णता मिळवली पण भारतात जे काही पिकतं ते आपण सर्व फस्त करून टाकतो. अन्नधान्य निर्यात काय करणार? भारत जर कृषिप्रधान देश आहे आणि भारतात सत्तर टक्के लोक शेती करतात तर मग शेतकरी आत्महत्या का वाढल्यात? सरकार शेतकऱ्यांविषयी इतके उदासीन का? तंत्रज्ञानाचा वापर शेती सुधारणांसाठी किती प्रमाणात होत आहे हा एक संशोधनाचा मुद्दा आहे.


        अजून एक युक्रेनची लोकसंख्या सुमारे साडेचार कोटी. भारतातील अनेक राज्ये यापेक्षा मोठी आहेत. तरीही भारतातील हजारो विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात. कारण युक्रेनमध्ये आपल्यापेक्षा शिक्षण स्वस्त आहे. एकीकडे आपण जागतिक महासत्ता होण्याच्या गोष्टी करतो, आत्मनिर्भर होत आहोत म्हणतो आणि दुसरीकडे शिक्षणासाठी आपल्याहून कितीतरी लहान असलेल्या देशात आपल्या विद्यार्थ्यांना जावे लागते. आपल्याकडे बहुतांश शिक्षण संस्था राजकीय पुढार्‍यांच्या आहेत. मतासाठी विविध आश्वासने देणारे कधी बुद्धिभेद करून मते मिळवणारे हे पुढारी सर्वांना परवडेल असे शिक्षण देऊ शकत नाहीत का? आपण नागरिकांनी ही त्यांच्याकडून अशी अपेक्षा का करू नये? अशा मूलभूत मुद्द्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून तर इतर भावनिक मुद्दे उपस्थित करून त्यात जनतेला व्यस्त ठेवले जात नसेल ना? या संबंधी सरकारी धोरणे बदलण्याची गरज आहे का? त्यावर व्यापक चर्चा का होत नाही? युक्रेन रशिया वादात जग भारताकडे आशेने पहात आहे ही अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे पण सोबतच आपल्याला शिक्षणासारख्या गोष्टीसाठी अशा छोट्या देशावर अवलंबून राहावे लागते हे ही विचार करायला लावणारे आहे.



             सर्वात शेवटी परदेशात शिकायला गेलेल्या उच्चभ्रू वर्गातील मुलांचे केंद्रीय मंत्र्यांकडून विमानतळावर होणारे स्वागत , त्यांची विचारपूस आणि भारतीय माध्यमांकडून त्यांना मिळणाऱ्या फुटेजने अचंबित व्हायला होतं. युद्धजन्य परिस्थितीमधून आपली मुलं सुरक्षित राहावीत आणि लवकरात लवकर मायदेशी परत यावीत यासाठीची आई - वडिलांची धडपड त्यांच्या भावना याविषयी सगळ्यांना सहानुभूती आहे. पण कोविडीच्या भयावह काळामध्ये असाही एक मजूर वर्ग होता ,जो अन्नपाण्याविना मैलोन् मैल पायपीट करत होता, मिळेल त्या मार्गाने आपल्या गावी जाण्यासाठी धडपडत होता, या मजुरांची छोटीशी मुलं जिवाच्या आकांताने आपल्या आई वडिलांच्या बरोबर धावत होती, या मजुरांचे वृद्ध आई-वडील कमरे ने सरकत सरकत गाव जवळ करण्याचा प्रयत्न करत होते, काही माणसे अन्नपाण्याविना तडफडून मेली, काही रेल्वे आणि इतर वाहनांच्या खाली सापडून मरून गेली आणि जी गावापर्यंत पोहोचली त्यांना गावानेच प्रवेश नाकारला.


         आपल्या देशात जर हे असं चित्र असेल तर सांगा बरं आजादी का अमृत महोत्सव आपण आनंदाने आणि उत्साहाने कसा बरं साजरा करू शकतो?



संदर्भ -


१. डॉक्टर मनीषा भोसकर यांचा १/३/२०२२ रोजी लोकमत नागपूर येथून प्रकाशित लेख


२. समाज माध्यमांवरील लेख.


३. इतर माहिती व फोटो साभार गुगल

🎭 Series Post

View all