Feb 28, 2024
स्पर्धा

आयुष्याला द्यावे उत्तर... #प्रेरणादायी कथा

Read Later
आयुष्याला द्यावे उत्तर... #प्रेरणादायी कथा

आजची कथा आहे आशाची.... अशा कितीतरी 'आशा' आपल्या अवतीभोवती असतात. तुम्हाला ती कदाचित तुमच्यातच सापडेल,  किंवा अगदी शेजारच्या घरात सुद्धा.  कदाचित ती ट्रेन मध्ये तुमच्या बाजुला बसलीये ना आता... ती ही आशा असू शकते. कधी वैतागला असाल,  थकला असाल,  माझ्याच वाट्याला का हे भोग असं वाटत असेल,  तर हे वाचाच. आपोआप टेन्शन जाईल तुमचं. तुमच्या लक्षात येइल,  आयुष्याच्या लढाईत तुम्ही एकटेच नाही मैदानात... कितीतरी सैनिक हाती शस्त्र नसताना सुद्धा लढतायेत.. काहींकडे तर ढाल सुद्धा नाही स्वसंरंक्षणासाठी... त्यामानाने तुम्ही धनवान आहात.. शस्त्र.. ढाल.. सगळं आहे तुमच्याकडे.. फक्त तुमचे प्रयत्न कमी पडतायत.. 

आशा. ३भावंडांमध्ये सगळ्यात मोठी. वयाने आणि विचाराने सुद्धा. म्हणतात ना परिस्थिती सगळ्यात मोठा गुरु असते. घरच्या परिस्थिती मुळं लहान वयातच मोठ्या माणसांसारखं समजूतदार बनावं लागलं. परिस्थितीला समजुन उमजून वागावं लागलं. ताई आणि आई दोन्हीही भूमिकेत जगावं लागलं. वडिलांचा पगार जेमतेम. घर चालवणं,  मुलांची शाळा  एका पगारात शक्य नव्हतं. म्हणून आईनेही घरच्या घरी पदार्थ करुन विकायला सुरवात केली. घरखर्चाला आईचा हातभार लागू लागला... आणि आईच्या कामात आशाचा... 

 

आशा,  शाळेत पाहिला नंबर मिळवणारी,  उत्तम डान्स,  उत्तम चित्रकला,  उत्तम अभिनय,  उत्तम लेखन, उत्तम anchoring,   थोडक्यात ऑल राऊंडर...हरहुन्नरी..   शाळेत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमात आशा सर्वात पुढे,  हिरीरीने भाग घेणारी. शिक्षकांपासून ते मुख्याध्यापक सर्वांची लाडकी विद्यार्थिनी.. 

 

आठवीला असल्यापासून तिनं लहान वर्गाचे ट्युशन घ्यायला सुरवात केली. तेव्हा चाटे कलासेस मुळं लोकांना वेडच लागलं होतं आपल्या मुलाला ट्युशन ला पाठवायचं. अगदी ४थी -५  वी पासून पालक मुलांना ट्युशन लावायला लागले होते. ऐपत नसताना,  झेपत नसताना ही ट्युशन म्हणजे एक फॅड झालं होतं... स्टेटस सिम्बॉल..  आशा ने मग लहान वर्गासाठी घरच्या घरीच ट्युशन सुरु केले.  तिची हुशारी माहित असल्यानं लोकांनीही आपल्या मुलांना तिच्याकडे पाठवायला सुरवात केली.  कमीत कमी फी आणि शिकवणीची  छान पद्धत,  मिळेल त्या पैशात समाधानी असायची. कधी कुणाकडे मागितले नाही की फी साठी कुणाच्या मागे लागली नाही. ज्याला जसे जमेल तसं ती घ्यायची. घरच्यांनाही हातभार. 

मेहनत, कष्ट,  धावपळ... तिच्या पाचवीलाच होतं जणु... सटवाई ने लिहिल्यासारखं... 

 

दहावीचं वर्ष असतानाही ट्युशन बंद नाही केले. आपला अभ्यास सांभाळून घरखर्चाला हातभार लावत राहिली. तेव्हा ८०% म्हणजे खूप झाले. आपले अशोक मामा म्हणतात तसं ८०% वाला म्हणजे 'नवकोट नारायण', आतासारखं ९९% म्हणजे 'सामान्य'... नाही नाही  'अतिसामान्य'..  असलं काही नव्हतं.. आशा ला छान ८५%मिळाले. पण म्हणतात ना 'जी कधीही जात नाही ती जात' आडवी आली. ओपन मध्ये असल्यानं 'आवडीचं कॉलेज',   'जवळचं कॉलेज',  ह्या सगळ्यापेक्षा 'मिळेल ते कॉलेज' याला प्राधान्य द्यावं लागलं.. जिथं ४०%वाले ऍडमिशन च्या पहिल्या लिस्ट मध्ये होते तिथं तिला दुसऱ्या लिस्ट पर्यंत वाट पाहावी लागली. आणि एकदाचं विज्ञान शाखेत ऍडमिशन मिळालं. घरकाम,  ट्युशन,  स्वतःचा अभ्यास,  तारेवरची कसरत सुरूच होती. प्रवासात जाणारा वेळ नोट्स काढण्यात सत्कारणी लावायची.  हाच तिचा अभ्यासाचा क्वालिटी टाइम. या सगळ्याचा बारावीत व्हायचा तो परिणाम झाला.  टक्केवारी ७०% वर आली. इंजिनीरिंग करायचं स्वप्न आधीच घरच्या परिस्थिती मुळे आणि ओपन कॅटेगरी मुळं धूसर होतं... आता तर त्याची राखरांगोळीच झाली..  पेड सीट परवडणार नव्हतीच आणि गव्हर्नमेंट कॉलेज ला ऍडमिशन अशक्य गोष्ट होती. मग मन मारून bsc ला ऍडमिशन घेतलं. 'आपल्याबरोबरची सगळी मुलं इंजिनीरिंग,   मेडिकल ला गेली,  मी एकटीच bsc ला आले' या  विचाराने तिचं मन तिला खात राहिलं. ती शांत झाली. कुणाशीच बोलेनाशी झाली. जेवढा अतिरिक्त  वेळ मिळेल तेवढा ट्युशन मध्ये घालवू लागली,  घरच्या ट्युशन सोबतच बाहेरही व्हिसीटींग फ्याकल्टी म्हणुन जाऊ लागली,  तिची शिकवण्याची शैली जबरदस्त होती,  त्यामुळं सगळ्यांना तिचं समजायचं आणि आवडायचं सुद्धा... 

शाळेतल्या शिक्षकांना तिची परिस्थिती चांगलीच ठाऊक होती.. तिचे कष्ट,  धडपड सर्व त्यांनी जवळून पाहिलं होतं.. त्यामुळं ते तिला जमेल ती मदत करायचे. कुणी त्यांचाकडे ट्युशन ची विचारपूस करायला आले की तिचं नाव रेकंमेंड करायचे.

Bsc मध्ये उत्तम मार्क्स मिळवून गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये msc मॅथ्स साठी ऍडमिशन मिळवलं. तिचा आवडता विषय. हळूहळू इंजिनीरिंग मेडिकल चं दुःख मागे पडलं आणि ती आपलं प्राध्यापक व्हायचं स्वप्न जोपासू लागली. तिचा आवडता विषय जगायला लागली. कष्ट अजूनही संपले नव्हतेच.  कॉलेज,   प्रवास,  ट्युशन,  तारेवरची कसरत चालूच होती. आपल्या शिक्षणाचा एक रुपयाही घरून घ्यायचा नाही. हे व्रत तिनं शेवटपर्यंत पाळलं. शाळेचे शिक्षक होतेच. मनाला उभारी दयायला. म्हणतात ना शिक्षक फक्त पुस्तकी ज्ञान नाही देत,  तर जगरहाटी सुद्धा शिकवतात. प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ देतात. पुन्हा एकदा शाळा आणि शाळेचे शिक्षक मदतीला आले. शेवटी जो अडचणी देतो तो त्यातुन बाहेर पडायचा मार्गही दाखवतोच.या  ना त्या रूपाने.. 

 

आशाचं msc चं फायनल इयर चा result यायचा होता. तिच्या शाळेनं नुकतंच जुनिअर कॉलेज सुरु केले होतं.  मॅथ्स साठी त्यांना शिक्षक मिळेना.  शेवटी शाळेच्या मॅथ्स च्या शिक्षकांनी तिचं नाव पुढं केलं.  जोपर्यंत कुणी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आशा ला टेम्पररी शिक्षक ठेवायचं ठरलं. आशा ला तिचं आवडतं काम मिळालं होतं. अगदी मन लावून तिनं शिकवायला सुरवात केली. जुनिअर कॉलेज,  घरचे ट्युशन,  बाहेरचे ट्युशन... सकाळीच ६ ला सुरु होणारा दिवस रात्री 10ला संपायचा. भाग.... भागमभाग... ईदर दौड है... उदर दौड है... असंच चाललं होतं सगळं.. 

 

Msc चा  result लागला. आशा मेरिट लिस्ट मध्ये आली. आणि त्या  जोरावर तिला  BEd साठी मुंबईला  गव्हर्नमेंट कॉलेज ला ऍडमिशन मिळालं. खरंतर  तिनं ते मिळवलं. आपल्या कष्टानं... पण अजून तिची परीक्षा संपली नव्हती... तिची धावपळ आता अजुनच वाढली. नवी मुंबई ते मुंबई ट्रेन चा प्रवास,  कॉलेज चे स्ट्रिक्ट रुल्स,  २मिनिट जरी उशीर झाला तर सरळ मैदानात गवत काढायला लावलं जायचं. तिचं कॉलेज सकाळी 11ला सुरु व्हायचं. इकडे जुनिअर कॉलेज ला शिकवणं चालूच होतं,  जे सकाळी ७ ला सुरु व्हायचं.  तिच्या शिकवण्याची पद्धत इतकी सुंदर होती की शाळेनं तिलाच कंटिन्यू केलं. तिला तिचं कॉलेज वेळेवर अटेंड करता यावं म्हणून timetable अड्जस्ट केलं. तिचे सगळे lectures १० च्या आत संपतील अशा पद्धतीने timetable बनवलं गेलं. शाळा जमेल ती मदत करत होती,  कारण तिचे कष्ट शाळा पहिलीपासून पाहत आली होती. १० वाजता ती जुनिअर कॉलेज मधून पळतच बाहेर पडायची. रोजची रिक्षा परवडणार नव्हतीच. म्हणुन पळत पळत रेल्वे स्टेशन गाठायचं. ट्रेन चुकली किंवा लेट झाली की गवत काढणं ठरलेले. ट्रेन मध्ये चढल्यावर डबा खायचा,  बरं.. डब्यात काय असायचं..  तर चटणी चपाती चा रोल. रोजच. वेळ वाचावा म्हणुन. कारण उरलेला वेळ स्वतःच्या अभ्यासासाठी खर्च करायचा होता. प्रवासाचा अर्धा पाऊण तास हा अभ्यासासाठी राखीव. स्टेशन वर उतरलं की बस चा प्रवास आणि मग कॉलेज. संध्याकाळी परत येताना  पुन्हा तीच धावपळ. स्टेशन वर उतरून तिथेच एखाद्या टपरीवर एक चहा आणि पार्ले चा छोटा पुडा... हाच पोटाला आधार. रात्री ९-१० वाजेपर्यंत ट्युशन,  तिथून मग घर,  दुसऱ्या दिवसाच्या lecture ची तयारी,  आपला काही गृहपाठ,  घाईघाईत पोटात टाकलेलं ४घास,  अर्धवट मिळालेली झोप... थकवा काय असतो... आराम.. काय असतो हेच विसरली होती जणु. जिथं महिनाभरात लोक त्रासाला कंटाळतात तिथं ही इतकी वर्षे धावत होती. लाईफ म्हणजे एक रेस झाली होती. एक अशी रेस जिथं तिला कोणी जिवंत माणूस प्रतिस्पर्धी नव्हता. तर स्वतः वेळ/काळ/परिस्थिती  तिच्याशी स्पर्धा करत होती. आणि तिला ही रेस हरणं परवडणार नव्हतं. कोणत्याही परिस्थिती मध्ये जिंकायचंच होतं. आईवडिलांना घर सांभाळण्यात मदत व्हावी म्हणुन,  भावंडाना आयुष्यात तिच्यासारखं धावपळ करावी लागू नये म्हणून,  स्वतःच स्वप्न पूर्ण करता यावं म्हणून... कारणं अनेक होती. ती मात्र एकटी होती. पण  नशिबानं मैत्रिणी खूपच चांगल्या मिळालेल्या. तिची ओढाताण लक्षात घेऊन नोट्स काढून देणाऱ्या. असाइन्मेंट्स साठी लागेल ती मदत करणाऱ्या. या सगळ्यांच्या मदतीशिवाय ती अपूर्ण होती!  जेवढे कष्ट होते,  तेवढेच मदतीचे हात होते. या सगळ्यांच्या साथीनं ती यशाचे एकेक शिखर गाठत गेली.  कष्टांना हरवत..  सगळ्या संकटाना नामोहरम करत आयुष्यात यशस्वी झाली. 'जात' नावाच्या अदृश्य राक्षसाला सुद्धा तिने आपल्या यशाच्या आड येऊ दिलं नाही. आज ती एका सरकारी कॉलेज वर प्रोफेसर आहे.  विद्यार्थ्यांची फेव्हरिट मॅम आहे.

 

 कवी गुरु ठाकूर यांची 'आयुष्याला द्यावे उत्तर' ही कविता आशा खऱ्या अर्थानं जगली.... 

 

असे दांडगी इच्छा ज्याची.... 

मार्ग तयाला मिळती सत्तर... 

नजर रोखुनी नजरेमध्ये... 

आयुष्याला द्यावे उत्तर... 

 

सत्य घटनेवर आधारित. 

 

©®रत्ना 

माझ्या इतर कथा वाचण्यासाठी लिंक 

https://irablogging.com/profile/ratna-w

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//