बेरीज वजाबाकी आयुष्याची ( दत्ता जोशी ) भाग चवथा

नशिबाचा खेळ कोणाला कळला आहे बरं, नाहीतर एक वारांगना एका संन्याश्याच्या प्रेमात पडलीच नसती.

बेरीज वजाबाकी आयुष्याची ( भाग चवथा )

त्या नंतर किती काळ गेला होता तिनं मोजणच सोडून दिलं होतं. शिक्षे नुसार नगरातल्या सगळया पुरुषांनी तिच्या कडे हजेरी लावली होती. ज्या शरीराचा एकेकाळी तिला प्रचंड गर्व होता. त्या बद्दल आता काहीचं वाटतं नव्हते.


उंची मद्य, दागदागिने, अलोट संपत्ती सगळं काही मिळवून झालं होतं. सगळे उंची भोग भोगून झाले होते.  पण या सगळ्यांत सुख होतं कुठं. आता तरं भोगात देखील तोच तो पणा आलेला होता. सगळ्यां गोष्टीतल नावीन्य संपलेल होतं.

वय हळुहळू उतरणीला लागलं होतं. सौंदर्य ओसरायला लागलं होतं. लोकं यायचे हळुहळू कमी झाले होते. दास दासी तिला सोडून निघून गेल्या होत्या.

पण तिला त्याचं काहीच वाटतं नव्हतं. तिला फक्त आस होती त्या संन्याशाच्या येण्याची. ज्याचं तिला नावं गावं देखील माहीत नव्हत. पण मनात कुठेतरी विश्वास होता की एक ना एक दिवस तो नक्की येणारं. आणि एक रात्र तिच्या सोबत घालवणार. बस ती रात्र म्हणजे आयुष्याचं सोनं करणारी रात्र असेल. त्याच्या सोबत रात्र घालवण्याच्या नुसत्या विचारांनीच तिच्या शरीराला कंप सुटला. त्याचं ते दिव्य शरीर तिच्या डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले.

या तंद्रीत आपलं आपल्या शरीरा कडे पूर्ण दुर्लक्ष होतं आहे हे तिच्या लक्षातच आलं नाही. हळूहळू तिच्या कडं येणारी जाणारी प्रत्येक माणसं बंद झाली.

अनेक दुर्धर आजार तिला जडले. केसांमध्ये ऊवा झाल्या. त्वचेचे आजार ईतके झाले की तिला जखमा झाल्या. अंगातून रक्त पू वाहायला लागलं. दुर्गंधी तर ईतकी पसरली की तिच्या जवळ पास देखील कोणी फिरकेना. खाण्या पिण्याचे हाल व्हायला लागले. दिवस दिवस उपास व्हायला लागले. कोणी तरी तिला गावा बाहेर झोपडीत आणून टाकलं.

तरी तिच्या डोळ्यासमोरचा तो संन्यासी काही केल्या दूर होत नसे.

एक दिवस ती अशीच अर्धवट ग्लानी मधे उपाशी तापाशी झोपडीत विव्हळत पडली होती. आयुष्याचा जणू शेवट आला होता.

"छे, त्या संन्याशाच्या शरीराचा उपभोग न घेताच आपल्याला मृत्यू गाठणार तर "

अजुनही ती संन्याशाच्या शरीराच्या आसक्तीत अडकलेली होती. हळुहळू दिवस मावळला. क्षीण आवाजात ती अर्धवट ग्लानी मधे कण्हत होती. आयुष्याच्या संध्याकाळी ती एकटीच होती. तिचं सौंदर्य, लावण्य ओसरून गेलं होतं .

कोणती तिथी होती कुणास ठाऊक. तिला कसलंच भान राहिलेलं नव्हतं. पण बहुतेक पौर्णिमाच असावी. कारणं आकाशात पूर्ण चंद्र बहरून आला होता. त्याचं लख्ख चांदणं सगळी कडे पसरलेल होतं. सगळा आसमंत उजळून निघालेला होता.

तिला अंधुकस आठवल.

" त्या दिवशीही अशीच चांदणी रात्र होती, आणि भर मध्यरात्री तो रस्त्यावरून जात होता. का बरं आला आयुष्यात. आला आणि सगळं सूख ओरबाडून घेऊन गेला. आता बस, शेवट जवळच आला आहे की. उद्या मी नक्कीच या जगात नसेल. बस आता जाण्या पूर्वी त्याचं रूप कसं दिसतं होतं त्याचं स्मरण करू या." असं म्हणत तिने अलगद डोळे मिटले.

आणि अचानक तिला जाणवलं की तो आला होता. तिचं व्याधीग्रस्त शरीर त्याने नीट स्वच्छ केलं. सगळया जखमा साफ करुन दिल्या. तिचं डोकं मांडीवर घेऊन तो म्हणाला,

" देवी मैथिली मी तुम्हाला वचन दिलं होतं की मी एक रात्र तुमच्या सोबत घालवेल. त्या नुसार मी आलेलो आहे. तुमची कोणती ईच्छा मी पूर्ण करू ते सांगा "

" महाराज आपण आलात यातच माझं समाधान झालं आहे "

" देवी, समाधान अखेर मानण्यात आहे. हे शरीर आणि हे भोग सर्व नाशवंत आहेत. कितीही भोग घेतले, कितीही त्याग केला तरी शेवटी आयुष्याची बेरीज वजाबाकी शून्यच आहे. चिमुटभर राख हेचं सत्य आहे. म्हणून तुम्ही या नश्वर गोष्टींचा विचार न करता. शाश्वत गोष्टींचा विचार करा. आणि पुढील प्रवासा साठी काहीतरी पाथेय सोबत न्यायचा प्रयत्न करा "

कितीतरी वेळ संन्यासी तंद्री मधे बोलतंच होता. त्या बोलण्यात तिला कधी चिरनिद्रा लागून गेली होती तेचं त्याला कळलं नाही.

( समाप्त )
लेखक : दत्ता जोशी

🎭 Series Post

View all