बेरीज वजाबाकी आयुष्याची ( दत्ता जोशी ) भाग तिसरा

नशिबाचा खेळ कोणाला कळला आहे बरं, नाहीतर एक वारांगना एका संन्याश्याच्या प्रेमात पडलीच नसती.


बेरीज वजाबाकी आयुष्याची ( दत्ता जोशी ) भाग तिसरा 


भर मध्यरात्री, कमरेला भगवे चीवर आणि खांदयावर उत्तरीय टाकून तो  राजरस्त्यावरून चालला होता. ईतक्या लांबून त्याचं अलौकिक सौंदर्य सगळया आसमंतावर भुरळ घालत होतं. त्याचं ते सरळ नाक, वृषभा सारखे पुष्ट खांदे, अजानुबाहू हात आणि गौरवर्ण सगळचं विलक्षण विलोभनीय होतं. त्याचे लांबसडक कुरळे केस खांद्यावर रुळत होते. चंद्राच्या चंदेरी प्रकाशाने तो जणू उजळून निघाला होता. त्याची नजर फक्त राज रस्त्यावर खीळलेली होती. आजूबाजूला कोठेच लक्ष नव्हते.


त्याला बघताच मैथिली देहभान विसरली. आपण कुठं आहोत कोणासोबत आहोत याचंही तिला भान राहिलं नाही. क्षणार्धात ती धावतच महालाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावर आली. महाराजांनी राजदूत तिच्या मागे पाठवले. आणि स्वतः दुःखी मनाने राणीच्या महालात आले.

ती धावतच त्या संन्याशाला सामोरी गेली. तिला काय झालं होतं ते तिलाही समजत नव्हतं. फक्त एकच जाणीव होतं होती की हा क्षण दवडायला नको. संन्यासी आपल्याच तंद्रीत चालला होता. मैथिलीने स्वतःला त्याच्या पायावर झोकून दिलं. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. त्या संन्याशाला क्षणभर काय झालं तेचं समजलं नाही. जेंव्हा त्यानं त्या लावण्यावतीला आपल्या पायावर झोकून दिलेलं पाहिलं. तेंव्हा तोही आश्चर्यचकित झाला.

" महाराज, मला सोडून जावू नका. मी तुमच्या शिवाय जगू शकणार नाही. मला तुमच्या सोबत घेऊन चला. यक्ष गंधर्वानाही भूरळ घालणार हे सौंदर्य आपल्या साठीच आहे महाराज "

" देवी, आम्ही संन्यासी आहोत. आम्हाला अशा मोहात अडकवू नका. "

" महाराज ठीक आहे. तूम्ही संन्यासी आहात मला मान्य आहे. माझी फक्त एकच ईच्छा आहे. फक्त एक आणि एकच रात्र तुम्ही माझ्या सोबत घालवा. मग मी तुम्हाला कधीच अडवणार नाही. या रात्रीच्या आठवणीवर मी सगळं आयुष्य घालवेल. तुम्हाला माझी शपथ आहे महाराज "

" ठीक आहे देवी. एक रात्र मी नक्की तुमच्या सोबत घालवेल. मी तुम्हाला शब्द देतो. पण आज नाही. माझी तपस्या पुर्ण होवू द्या. अगदी लवकरच मी तुम्हाला येवून भेटतो." आणि त्याने आपला हात तिच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या पायाची धूळ कपाळाला लावून ती महालात परत आली.

महालात आता ती एकटीच होती. समईतली वात जळून जळून संपून गेली होती. चंद्राचा प्रकाश तसाच पसरलेला होता.

किती काळ, किती वेळ गेला होता. समजलच नव्हतं. ती तशीच काहीही न खाता पिता तशीच बसून होती.
अचानक राज रस्त्यावरून महाराजांचे अफाट सैन्य युद्धाला निघाल्याचे संकेत दिसू लागले. तुताऱ्या भेरी वाजू लागल्या. शंख नाद होवू लागला. शून्य मनाने ती मिरवणूक पाहू लागली. एव्हढ्या गोंधळात महाराज आपल्या महालाकडे बघून हात हलवत आहेत असे तिला दिसले. पण त्याला प्रतिसाद देण्याचंही तिला भान नव्हतं. ती नुसतीच रिकाम्या मनाने बघत राहीली.

बघता बघता दिवस संपला. तिला तिच्या डोळ्या समोर फक्त तो संन्यासी दिसत होता.

एकाएकी महालातून आक्रोश उठल्याचा आवाज झाला. एक दासी धावत तिला सांगायला आली. महाराज युध्दात धारातीर्थी पडले होते. 

महाराणीने तिला बोलावणे पाठवले होते. सुन्न मनाने ती राणीच्या महालात आली. तिथं शोकाचा महासागर उसळलेला होता. तिला बघताच मोकळे केस सोडलेली, छाती पिटून आक्रोश करणारी राणी तिच्याकडे क्रोधाने फुत्कारत म्हणाली,

" चांडाळणी झालं ना आता तुझं समाधान. त्या दिवशी महाराजांना तूही सूख दिलं नाही आणि मलाही देवू दिलं नाही. ठीक आहे. तुला पुरुषाचचं सूख हवंय ना. मी देते. शिपाई, आजपासून या राज नर्तकीला आजपासून राजवाड्यातून हाकलून द्या आणि वेश्या व्यवसायाला लावा. गावातल्या प्रत्येक पुरुषाचा उपभोग तिला घेवू द्या.  "

( क्रमशः)
लेखक:  दत्ता जोशी

🎭 Series Post

View all