नावडतीचे मीठ अळणी...

मिळालेल्या चांगल्या गोष्टींच्या आधारेपण जगता येते हे सांगणारी लघुकथा..

नावडतीचे मीठ अळणी..




आज मीनलकडे खूप दिवसांनी तिची नणंद सुचेता आपल्या मुलांना घेऊन आली होती.. मुलांना तसेच घरातल्या सर्वांना आवडतात म्हणून तिने कटलेट्सचा बेत केला होता.. मीनलने सगळ्यांना कटलेट्स दिले.. तिच्या सासूबाईंनी वृंदाताईंनी मात्र नकार दिला.. 

" का ग आई? तू का नाही खात?" सुचेताने विचारले .

" मला ना हे असे कटलेट्स नाही आवडत.. मला ना फक्त मटार आणि कोबी टाकून केलेले आवडतात.." वृंदाताई उत्तरल्या..

" आई यात फक्त गाजर आणि बीट जास्तीचे टाकले आहे. बाकी तुमच्याच पद्धतीचे केले आहे." मीनल म्हणाली..

" मागच्या वेळेस तू पोहे टाकले होतेस, मी ब्रेड टाकते.." वृंदाताई म्हणाल्या..

" हो, कारण मला ब्रेड आणायला वेळ नव्हता मिळाला.. पण आज मी ब्रेडच टाकला आहे.." मीनल आपली बाजू मांडत होती .

" तरिही नको.." वृंदाताई आपला हेका सोडायला तयार नव्हत्या..

" जाऊ दे, मीनल.. तू आम्हाला वाढ अजून.." सुचेता म्हणाली..

मीनल आतमध्ये गेली आहे हे पाहून ती आईला पटकन बोलली," काय ग हे आई नवीन? चांगले तर झाले आहेत, मग काय हरकत आहे खायला?"

" मला नाही आवडत तिच्या हातचे खायला तुला माहित आहे ना, तरिही परत कशाला विचारतेस?"

मीनलला येताना पाहून सुचेताने विषय वाढवला नाही. तरिही वृंदाताईंचे बोलणे मीनलने ऐकलेच होते.. पण तिच्यासाठी हे रोजचेच झाले होते.. मुलांना आणि नवर्‍याला आवडते म्हणून ती मनाचे समाधान करून घ्यायची.. आत्तासुद्धा सगळी मुले आवडीने मागून खात होती.. मुलांचे यम्मी यम्मी ऐकून वृंदाताई म्हणाल्या..

" माझ्यासाठी खायला काय आहे?"

" तुम्हीच सांगा?"

" दे एखादे कटलेट मला.. मुले एवढे चांगले झाले म्हणत आहेत. बघू खरंच झाले आहे का?"

खायला लागल्यावर एकाचे दोन, दोनाचे चार कधी झाले हे वृंदाताईंना कळलेच नाही.. मीनल परत काही करायला लागले नाही म्हणून खुश झाली.. सुचेता मात्र वृंदाताईंच्या वागण्याचा विचार करत होती..



       वृंदाताईंचे वागणे बदलेल का? बघू पुढील भागात.  तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर 

दादर मुंबई

🎭 Series Post

View all