Jan 23, 2022
पत्रलेखन

अव्यक्त प्रेम #पत्रलेखन

Read Later
अव्यक्त प्रेम #पत्रलेखन

प्रिय अभि,

हो अभिच... नवरोबा, माय लव्ह किंवा सख्या असे न म्हणता मी अभिच म्हणाले कारण मला तुमचे नाव खूप आवडते आणि अभि लिहिण्यामध्ये जेवढी आपुलकी वाटते तेवढी माय लव्ह किंवा स्वीट हार्ट लिहिण्यामध्ये नाही. तसेच तुमचे अभि आणि माझे प्रिया असे आपल्या दोघांचे नाव मिळून "अभिप्रिया" हे परिपूर्ण आणि सुंदर नाव बनते. तुम्हाला सांगू मी आपल्या नावाची एक चारोळी सुध्दा बनवली आहे.

सप्तसुरांच्या रंगात साद घालती
राधा अन् कृष्ण पिया..
सप्तजन्माची साथ आपुली
तू अभि अन् मी प्रिया..

सप्तपदीच्या साक्षीने तुमच्या पावलावर पाऊल टाकून मी घरात प्रवेश केला आणि सर्वस्वी तुमचीच झाले. अनोळखी आपण जेव्हा एकत्र आलो तेव्हा वाटले की, आपण एकमेकांसाठीच बनलेलो आहोत, अगदी प्रत्येक जन्मासाठी. आसमंतात रंगांची उधळण व्हावी, प्राजक्ताच्या सुवासाने कोमेजलेले मन प्रसन्न व्हावे तसे तुमच्या सहवासाने माझे जीवन आनंदी झाले.

खरंतर आपला स्वभाव खूप भिन्न. तुम्ही कोल्हापूरी झणझणीत ठेचा, नाक नाही पण नाकावर राग खूप आणि मी सांगलीच्या कृष्णामाई सारखी संथ, शीतल. मी व्यक्त तर तुम्ही अव्यक्त, इतके भिन्न स्वभावाचे असूनही एकमेकांना पूरक कधी बनलो कळलेच नाही.

लग्नाच्या आधी मैत्रीणी आणि बहिणींचे बघितले होते की, वॅलेंनटाईन डे किंवा इतर वेळी नवऱ्याकडून खूप गिफ्टस् मिळतात. मी लग्नानंतर गिफ्टस् ची वाट पाहिली. इतरांच्या नवऱ्यांनी दिलेले गिफ्टस् पाहून तुम्ही काय देणार? याची आतुरता होती. पण तुम्ही काही दिलेच नाही. उलट म्हणालात की, ती आपली संस्कृती नाही. तेव्हा मी खूप नाराज झाले. मला खूप वाईट वाटले.

पण जेव्हा मी आजारी होते तेव्हा तुम्ही अगदी मध्यरात्री सुध्दा माझा ताप चेक केला होता. औषध घेतलीस का? जेवलीस का? अशी सारखी विचारपूस करत होता. तेव्हाच खरे प्रेम म्हणजे हेच असे जाणवले. एकदा तर काही कारणाने मला खूप रडायला येत होते तेव्हा तुम्ही मला मिठीत घेतलंत. नंतर मी तुमच्याकडे पाहिले तर तुमचे डोळे देखील भरले होते. तेव्हाच मला खऱ्या प्रेमाची प्रचिती आली. खरे प्रेम जे आहे ते हेच वाटले. एकमेकांच्या सुखदुःखात सांभाळून घेऊन एकमेकांचा आदर केला तर जीवन आनंदी बनते, हे मी तुमच्याकडून शिकले.

संसाराच्या वेलीवर चढउतार येणारच पण त्यावेळी एकमेकांचा हात हातात घेऊन आपण चालत रहायचं. कधी अडखळलो तर एकमेकांना सावरायचे, प्रेम करत रहायचे. असेच कायम माझ्या सोबत रहा, मला नेहमी सांभाळून घ्या.

प्रत्येक श्वासात आहेस तू,
ध्यानी मनी स्वप्नी तू,
मनामनात फक्त तू,
मनातला हळवा कोपरा तू,
मनातली गर्द हिरवळ तू,
आनंदाचे कारण आहेस तू,
विसाव्याचे ठिकाण तू,
जगण्याचे कारण तू,
पंख पसरून उडण्याचे कारण तू,
स्वप्नातील राजकुमार तू,
सर्वस्वी जीवन तू,
असाच कायम सोबत रहा...

तुमच्यासवे जीवन जगताना न भासे कशाची कमतरता. तुम्हीच सारे आयुष्य आहात, जीवनातील आनंद आहात, पंखातील बळ आहात, हास्याचे कारण आहात. तुमच्याविना अपूर्ण मी, तुमच्यासोबत परिपूर्ण मी.

हे सगळे ठीक. पण माझी एक तक्रार आहे. तुम्ही आजपर्यंत कधीच प्रेम व्यक्त केला नाहीत. प्रेम दिसून आले, जाणवले, पण कधी कधी बोलूनही दाखवता आले पाहिजे ना. तर तुम्ही तुमच्या मनातील प्रेम, भावना व्यक्त करा.
ही विनंती.

कळावे,
फक्त तुमचीच,
प्रिया.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..