Feb 24, 2024
वैचारिक

अव्यक्त तो..

Read Later
अव्यक्त तो..

आपल्या मुलाचे निष्प्राण कलेवर पाहून त्याचं काळीज तीळतीळ तुटत होतं. 

 

"असं का केलंस रे?"

एक बाप म्हणून त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख, वेदना, भीती यांचा झालेला मिलाफ फार विचित्र दिसत होता. भावाच्या दोन मुली आणि आपल्या दोन मुलींनंतर आपल्या माघारी घराला पुरुषाचा आधार हवा या विचारातून नवसाने झालेला हा मुलगा..

 

"मी त्याला इतकं बोलायला नको होतं गं आज. खरंच इतकं काय चुकलं माझं? एक 'बाप 'म्हणून चार वाक्य सुनावली मी त्याला." असे म्हणत त्याने हंबरडा फोडला. अक्षरशः ओक्साबोक्षी रडत होता तो आणि त्याची बायको कोपऱ्यात भिंतीला टेकून मूकपणे अश्रू ढाळत होती. एक आई म्हणून मुलाला वाढवण्यात आपलं काय चुकलं याचा विचार करत होती.

 

शेजारी पाजारी, नातेवाईक येत होते. आई -बापाचं सांत्वन करत होते. पण हे सांत्वन त्या आईच्या मनापर्यंत पोहोचत नव्हतं. हाता - तोंडाशी आलेला आपला मुलगा अचानक 'असं काही करेल ' हे तिला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.

 

तिच्या सासुबाई आपल्या नातवाजवळ बसून कितीतरी मोठ्याने रडत होत्या. तिला हे सारं नकोस वाटलं. आपला मुलगा आत्ता उठेल अन् नेहमीसारखा म्हणेल, 'आई तुझ्या हातचा चहा दे पट्कन.' याच विचारात ती उठून उभी राहिली.

 

इतक्यात मुलाचे काका पुढे आले. 

 

"सोन्या उठ रे. तुझ्या काकासाठी उठ बाळा." त्यांनी आपल्या बायकोला हाक मारली. 

"अगं उठव तुझ्या पुतण्याला. तुझं ऐकतो ना तो? नाहीतर असं कर, एक कानाखाली ठेऊन दे. त्याच्या लहानपणी दिली होतीस ना तशीच. मग उठेल बघ तो." 

हे ऐकून काकू काकांच्या अगदी जवळ बसली. त्यांचा खांदा तिच्या अश्रूंनी पूर्णपणे भिजून गेला.

 

"अशी रडतेस काय? ऐकलं नाहीस का? मी काय म्हणालो ते?" काका.

 

"भाऊजी, तो आता कधीच उठायचा नाही." वहिनी पुन्हा खाली बसत म्हणाल्या.

 

"असे कसे? अहो वहिनी, तीन तासांपूर्वी आम्ही दोघे एकत्र बसलो होतो. नोकरी लागली की एका वर्षात लग्न करायचे म्हणून किती चिडवले मी त्याला ! नुसताच हसत होता तेव्हा.  

तेव्हाच मला त्याचे मन वाचता आले असते ना, तर मी ही वेळ येऊच दिली नसती. जराही अंदाज नाही आला..माझ्या बछड्याच्या मनात काय चालले असेल याचा." 

काकांच्या या आक्रोशाने तिथे जमलेल्या साऱ्यांची मन हेलावून गेली. जो तो डोळ्याला रुमाल लावत होता. 

 

आता कोण कुणाचे सांत्वन करणार?

 

तिघी बहिणी आपल्या एकुलत्या एका भावाकडे नुसत्याच टक लावून पाहत होत्या. धड रडत नव्हत्या की बोलत नव्हत्या.

 

"दादा, अरे उठव तुझ्या लेकाला. माझे ऐकत नाही तो." काका आपल्या भावाजवळ गेले.

 

"तूच उठव त्याला. अरे माझे ऐकायचे नव्हते म्हणूनच त्याने..." त्या बापाने पुन्हा हंबरडा फोडला.

 

"तुमचं कोणाचाच ऐकत नाही तो. माझे नक्की ऐकेल." आईने उठून आपल्या लेकाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. 

"राजा, ऐक रे. तुझी आई चुकली, बाबाही चुकले. माफी मागते बघ, उठ आता तरी. नऊ महिने पोटात वाढवले मी तुला. नऊ महिने तू जवळ असून देखील तुझा विरह सहन केला. पण आता नाही सहन होणार. ऐक माझे. तुझी आई तुला बोलावते आहे रे."

 

"वहिनी, स्वतःला सांभाळा." काकूने पुढे होत आपल्या जावेला आधार दिला.

 

"दादा, सगळे जमले आहेत. आता 'निघायची' तयारी करायला हवी." काका गडबडीने म्हणाले.

 

तयारी झाली. सारे घराबाहेर आले. 

 

"बाळा, आत्ता निरोप द्यायला येतो. मात्र आम्ही परत येताना तू सुद्धा आमच्या सोबत पुन्हा घरी यायचे हं." निरोप देणाऱ्या बापाचे वाक्य फक्त त्याच्या लेकानेच ऐकले.

 

..गर्दीत कुणीतरी म्हणत होते, " व्यक्त व्हायचा विसरला तो. हुशार होता तितकाच शांत होता. ना धड बोलायचा ना कधी मनमोकळ हसायचा. त्यावेळी त्याच्या मनात काय आले असेल, त्यालाच ठाऊक! पण त्याने असे करायला नको होतं. अव्यक्त राहिला तो.

 

मनातल्या भावना वेळीच व्यक्त करण्यासाठी एखादी व्यक्ती कायम आपल्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. धीराचे दोन शब्द देखील आयुष्य तारून नेतात. वेळीच व्यक्त व्हा आणि मनातला संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करा. उचललेल टोकाचं पाऊल आपल्या जीवाभावाच्या माणसांसाठी खूप वेदनादायी असतं..खूपच. 

आयुष्य खूप छान आहे. व्यक्त व्हा, आनंदी राहा.

 

(सत्यघटनेवर आधारित)

समाप्त.

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sayali Joshi

Housewife

आपल्या मनातले शब्द जेव्हा कोणीतरी वाचतं, तेव्हा मिळणारा आनंद वेगळाच असतो.

//