अवनी, एका अतिशय गरीब कुटुंबात पहिली लेक म्हणून जन्माला आली. कुटुंबातील वातावरण थोडं जुन्या विचारांचं आणि पुरुषप्रधान संस्कृती जपलेलं त्यामुळे तिच्या आईचं घरात काही फारसं चालत नसे. घरात आजीचा दबदबा, त्यामुळे पुढच्याच वर्षी नातू पाहिजे असा हट्ट सुरु, नातूसाठी एका पाठोपाठ एक तीन मुली झाल्या. अवनीच्या आईला सगळा दोष मिळत होता, घरात आईला होणारा सासुरवास, मारझोड, मानसिक आणि शारीरिक अत्याचार बघत ती मोठी होत होती. तिच्या काका काकूंना पहिलाच मुलगा झाला मग साहजिक आजीची ओढ तिकडे जास्त आणि अवनी व तिच्या बहिणींना दुय्यम स्थान दिलं जात होतं. मुली शिकून काय करणार असं म्हणून मुलींना सरकारी शाळेत घातलं. त्यात अवनी फार काही हुशार नव्हती आणि खूप ढ ही नव्हती. भोळसट आणि भित्रा स्वभाव, वडिलांच्या गाडीचा आवाज जरी आला तरी सगळं सोडून एका कोपऱ्यात बसणारी ती बाबा घरात असताना अक्षरशः एक शब्दही बोलायची नाही. अभ्यासात काही चुकलं किंवा एखादी गोष्ट जमली नाही ,तीच गोष्ट तिच्या बहिणींनी किंवा चुलत भावानी छान केली की तिला ऐकवलं जायचं,कधीकधी तिच्या गप्प राहण्यामुळे अजूनच मार खायची.
घरात मोठी म्हणून जबाबदारी लवकर अंगावर आली. अगदी लहान वयात बहीण भावंडं सांभाळत स्वयंपाक आणि घरकामही करायची. प्रेमळ स्वभाव त्यामुळे मिळून मिसळून राहायची सगळ्यांशी..
राहायला चाळीतलं घर, तिथे सगळे एकोप्याने राहत होते. शेजारच्या मुलाची ज्याला ती दादा म्हणायची त्याची वाईट दृष्टी तिच्यावर होती. एकदा घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार केला. अगदी आठ नऊ वर्षाची कळी त्याने स्वतःच्या क्षणिक सुखासाठी उमलण्याआधी कुस्करून टाकली. अवनीला समजतही नव्हतं हे काय झालंय तिच्यासोबत फक्त तिला त्रास होत होता इतकंच तिला माहीत होतं. मुळातच तिचा भित्रा स्वभाव सगळ्यांना माहीत होता, त्याने त्याचाच गैरफायदा करून तिला धमकी दिली, "घरी सांगितलं तर तुझ्या पप्पांना मारून टाकील". घाबरलेली अवनी शांत शांत राहू लागली, आता तो प्रत्येक वेळी तिचा गैरफायदा घेऊ लागला,ती दिवसेंदिवस भेदरत चालली होती. हे दीड वर्ष असंच सुरू राहिलं, जवळच अजून एक मुलीसोबत असंच झालं हे सगळीकडे पसरल्यावर तिला जाणवलं की लहान गोष्ट नाहीये आणि तिने हिम्मत करून आईला सांगितलं.
घरी सगळेच खूप हादरले, खूप भांडण झाली. पण ते प्रकरण तिथेच दाबून टाकलं गेलं आणि त्या मुलाला कसलीच शिक्षा झाली नाही. अवनी तिच्या परिवारासोबत दुसरीकडे राहायला गेली. तिच्या मनावर झालेला खोलवर आघात तिला सहन होत नव्हता परिणामी तिच्या अभ्यासावर अजून वाईट परिणाम झाला. असेच काही वर्षे लोटले, ती तिचं दुःख मनाच्या एका कोपऱ्यात दडवून जगत होती. दहावी झाली, तिची इच्छा होती विज्ञान शाखेला प्रवेश घ्यायची पण मराठी माध्यमातून इंग्रजीत अभ्यास मग वेगळे क्लास पाहिजे.. परिस्थतीमुळे शक्य नव्हतं. पैशाअभावी तिने वाणिज्य शाखेला प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा दिली, निकाल येण्याआधी काळाने पुन्हा घाव घातला, तिचे बाबा देवाघरी गेले. ती पुन्हा हादरली, जबाबदरीमुळे आईला मदत म्हणून पार्ट टाईम नोकरी करू लागली. शिक्षणाबत नोकरी सुरू होती, काही दिवसाने तिच्या आयुष्यात एक नवीन सुंदर वळण आलं. तिच्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा, अचानक ते घरी आले. दोघांची नजरानजर झाली तिला तो बघताक्षणी आवडला,तो होताही तसाच देखणा. त्याच्याही वागण्यातून असं वाटत होतं की त्याला ती आवडत असावी.
दिवसेंदिवस त्याचं तिच्या घरी येणं वाढू लागलं, बोलणं होऊ लागलं.. सहवासातून तिला तो अधिकच आवडू लागला. त्याच्या आईलाही अवनी आवडत होती, त्यांनी तिला तिच्या आईजवळ मागणी घातली. तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. ती त्याच्यासोबत तिच्या नवीन आयुष्याची स्वप्न रंगवू लागली.पण तिचं ते स्वप्नही फार काळ टिकलं नाही, त्याने लग्नाला नकार दिला कारण त्याला अवनीची लहान बहीण आवडत होती. अवनीच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. अवनीच्या बहिणीने त्याच्याशी लग्नाला नकार दिला मग दोन्ही परिवारात थोडं तेढ निर्माण झालं. मध्यंतरीच्या काळात अवनी आणि तो चांगले मित्र मैत्रिणी झाले होते,तो कधीतरी तिला बाहेर भेटत होता पण विषय फक्त तिच्या बहिणीचा असे. नंतर ती त्याला टाळू लागली पण वारंवार तो तिला भेटायला बोलवत होता, तीही त्याच्यावर प्रेम करत होती त्यामुळे तिचं मन त्याच्यामागे आणि ती तिच्या मनाच्या मागे धावत होती. तिचा भोळा स्वभाव बघता त्याने तिला लग्नाची फूस लावली, आईला मी मनवतो, घरचे संबंध ठीक होतील ,मी लग्नाचं बोलतो असं खोटं सांगून तो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला. त्याने आता तिचा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. तिच्या शरीराचा पुरेपूर फायदा करून घेऊन शेवटी तो घरी ऐकत नाही सांगून तिला एकटीला सोडून निघून गेला.
ती पुन्हा निराशेच्या गर्तेत अडकली. नातेवाईक लग्नासाठी आग्रह करू लागले, तीन मुलींची लग्न करायची त्यामुळे तिच्या आईलाही टेन्शन होतं. तिने आता सगळे निर्णय घरच्यांवर सोपवले होते, तिने कसलाच विचार न करता लग्नाला होकार दिला. लवकरच तिचं लग्न झालं. तिला वाटलं आता तरी सगळं सुरळीत होईल, लग्नानंतर पंधराच दिवसात समजलं, नवऱ्याचं दुसऱ्या बाईसोबत अफेयर आहे. पुन्हा एकदा ती कोलमडली. तो त्या बाईला घरात घेऊन येऊ लागला, त्याची दारूची सवय आणि ते वागणं तिला सहन होत नव्हतं तरीही ती सगळं दुःख आई आणि बहिणीसाठी मुकाट राहून गिळत होती. नवराही रोज तिच्या शरीराचे लचके तोडत होता, ती गुपचूप हा समाजमान्य बलात्कार सहन करत होती एव्हाना तिचा समस्त पुरुषवर्गावरचा विश्वास उडून गेला होता. आता शारीरिक अत्याचाराची हद्द पार झाली होती,एके रात्री सहन झालं नाही म्हणून जीव वाचवून पळत सुटली. कुठे जायचे माहीत नव्हतं.. रात्रभर रस्त्यावर काढली. दुसऱ्या दिवशी आईकडे पोहचली..जिवंत मुडदा दिसत होती. आई आणि बहिणीच्या पायाखालची जमीन सरकली. सगळी हकिकत सांगितल्यावर आई हिंमतीने तिच्यामागे उभी राहिली पण नातेवाईक जगू देत नव्हते. आजही समाजात नवरा सोडून आलेली बाई लोकांच्या नजरेत खुपते. लोकांनी अवनीला दूषणं द्यायला सुरुवात केली. ती दिवसेंदिवस खचत गेली, पूर्णपणे नैराश्यरूपी राक्षसाने तिच्यावर नियंत्रण मिळवलं. तिची अवस्था खूपच बिकट झाली. एकटक शून्यात बघत राहायची, रडायला लागली की बघणाऱ्याचं हृदयात पिळवटून निघेल अशी रडायची, चार चार दिवस तोंडातून एक शब्दही बोलायची नाही, डोळे खोल गेलेले, शरीरावर असंख्य जखमा,नखांचे ओरखडे, सतत काहीतरी विचार करत असायची, रात्रभर झोपायची नाही, मधेच उठून बाथरूम मधे जाऊन अंगावर थंड पाण्याच्या बादल्या ओतून अंग घासायची आणि जोरजोरात रडायची जणूकाही जे शारीरिक अत्याचार तिच्यावर झाले, जे घाणेरडे स्पर्श तिला आजवर झाले ते धुवत असावी...
पुढे तिचा डिओर्स झाला पण ती त्या धक्क्यातून बाहेर येतच नव्हती. सगळे डॉक्टर ,औषध करून झाली पण तिच्या मनावर झालेले घाव सहसहजी भरून निघण्यासारखे नव्हते.
आईने आणि बहिणींनी तिला साथ दिली. सलग चार वर्षे ती नैराश्याशी लढत राहिली. तिला खूपदा वाटलं जीवन संपवून टाकावं, या मरणापेक्षा भयंकर जीवन यातना भोगण्यापेक्षा एकदाच सुटून जावं पण तिने धीर सोडला नाही. त्या जीवघेण्या क्षणावर ती मात करत राहिली. जुने मित्र मैत्रिणी तिला भेटायला येऊ लागले, तिला बाहेर घेऊन जाऊ लागले. लग्नामुळे अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं असं तिच्या बहिणींनी तिला सुचवलं.. तिने ऍडमिशन घेतलं पण कॉलेजला जायला नाही म्हणायची. पण बाहेर गेली तर मन रमेल म्हणून बहिण तिला कॉलजला घेऊन जाऊ लागली, हळूहळू तिचं मन पुन्हा अभ्यासात रमू लागलं. नवीन मित्र मैत्रिणी व्हावे असं तिला वाटत होतं पण तिची हिंमत होत नव्हती कुणावर विश्वास ठेवायची. बहिणीने तिच्या वर्गातल्या चार पाच मुलींना भेटून त्यांना तिच्याशी मैत्रीचा हात पुढे कराण्याची मदत मागितली. त्या मुलींनी खूप आनंदाने तिला त्यांच्यात सामावून घेतले, नवीन ग्रुपमधे तिला घेऊन वेगवेगळ्या गोष्टीत तिचं मन रमवू लागले. मागचे काहीच विषय तिला काढू देत नव्हते, कधी ट्रेकिंग तर कधी हॉटेलिंग असे बहाणे करून तिला गुंतवून ठेवू लागले. घरी आई आणि बहिणीही तिला एकटे सोडत नव्हत्या,सगळे असं वागत होते जसं काही घडलंच नाहीये.
हळूहळू तिचा उडालेला आत्मविश्वास ती परत मिळवत होती. तिने पोस्ट ग्रॅज्युएशन फर्स्ट क्लास मिळवत पूर्ण केलं. शेयर मार्केटमधे कमालीचं डोकं चालवत ती आज मोठ्या हुद्द्यावर काम करतेय.. बहिणींची लग्न झाली, त्या त्यांच्या संसारात सुखी आहेत. ती आज म्हाताऱ्या आईला आणि स्वतःला दोघींनाही सांभाळते. मुलगा नाही म्हणून तिच्या आईला झालेल्या त्रासाला तर ती भरून काढू शकत नाहीये पण तिला पुढे त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घेतेय. नंतर तिला दुसऱ्या लग्नाची स्थळही आली पण आता ती स्वतःसाठी जगायला शिकलीये, एक स्त्रीला जगायला पुरुषाची गरज नाहीच हे तिने जगाला दाखवून दिले. ती आज स्वतःच्या कष्टाच्या आणि कठीण प्रसंगी ठेवलेल्या धीराच्या बळावर एकटी आनंदाने जगतेय.
नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी तिचं उदाहरण आदर्श म्हणून तिचे डॉक्टर आजही वापरतात.
अवनीच्या आयुष्यात खूप काही घडलं, ज्यात तिची काहीच चूक नव्हती. प्रत्येक वेळी अन्याय आणि अत्याचाराला बळी पडलेली ती आपल्या लोकांच्या आणि तिच्या मानसिक बळाच्या जोरावर नैराश्याच्या गर्तेतून सुखरूप परत आली होती. मान्य आहे भूतकाळ पुसता येत नाही किंवा विसारताही येत नाही पण रंगरंगोटी नक्कीच करता येते. विसरू शकत नाही पण आठवणीने आठवूही नये.. अशावेळी आपले दोन प्रेमाचे शब्दही अशा लोकांना खूप मदत करू शकतात. आपण खूप करू शकत नसलो तरी कमीतकमी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं तरी खूप केल्यासारखं आहे. आजच्या या जलद जगात कुणीतरी आपलं ऐकावं आपल्याला समजून घ्यावं यापेक्षा जास्त कुणी अपेक्षाही ठेवत नाही.
चला तर मग आज निश्चय करूया, अवनीसारख्या लोकांना थोडा आधार देऊया.. त्यांना मन मोकळं करायला हक्काचं माणूस देऊया, त्यांना रडायला हक्काचा खांदा देऊया.
©®Suvarna Rahul Bagul
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा