अविस्मरणीय क्षण!

Kshan





     आपल्या आयुष्यामध्ये सतत आपण नवनवीन आव्हानांना सामोरे जात असतो. त्यातील काही प्रसंग हे मनाला नवी उभारी देणारी असतात तर काही टचकन डोळ्यात पाणी आणणारे असतात. असाच माझ्या आयुष्यातील जीवनाला, जगण्याला कलाटणी देणारा अविस्मरणीय क्षण म्हणजे मला मिळालेल निबंध स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ! 

      मी महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गात शिकत होते. माझ्या लेखन कलेतील मार्गदर्शक आणि माझ्या आदर्श प्राध्यापिका सौ. सीमा शेट्टये यांच्यामार्फत मला निबंध स्पर्धेची माहिती बातमी मिळाली. स्पर्धेचा विषय होता \"महात्मा ज्योतिराव फुले- जीवन व कार्य \" स्पर्धेचा विषय वाचला तर सोपा वाटला म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचे ठरवलं. परंतु त्याआधी मॅडमशी चर्चा केली आणि म्हटलं तुम्ही मार्गदर्शन करणार असाल तरच मी या स्पर्धेत भाग घेईन ! मॅडमनी सुद्धा होकार दिला आणि स्पर्धेची तयारी सुरू झाली. वाचनालयातून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित विविध पुस्तक मी उपलब्ध करून घेतली. मॅडम त्यावेळी सेट परीक्षा देत होत्या. परंतु तरीसुद्धा मला त्यांनी छान मार्गदर्शन केलं. मॅडमनी त्यांच सेट परीक्षेच पुस्तकसुद्धा मला विषयाशी संबंधित म्हणून दिलं होतं आणि अशा पद्धतीने माझा कच्चा निबंध तयार झाला. आणि मॅडमनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून मला कच्चा निबंध तपासून दिला. अंतिम निबंध मी तयार केला. स्पर्धेची बातमी जरा उशिरा मिळाली होती त्यामुळे निबंध पाठवायला उशीर होणार होता म्हणून मी त्या संस्थेच्या व्यक्तींना फोन करून विनंती केली की निबंध पाठवायला जरा उशीर होतोय पण कृपया माझा निबंध स्वीकाराल का? सरांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला आणि निबंध पोस्टाने देवरुखवरून चिपळूणकडे रवाना झाला. तीन दिवसांनी सरांना फोन करून विचारलं निबंध पोहोचला का? तर सरांनी हो म्हणून सांगितलं. आणि जरा जीवात जीव आला. परंतु मनात मात्र प्रचंड भीती होती आधीच आपला निबंध उशिरा गेलाय काय होते काय माहित? आणि निकाल ठरलेल्या तारखेला प्रत्यक्ष जागेवर घोषित करणार होते. खरंतर आयुष्यात पहिल्यांदाच मी चिपळूणमध्ये जाणार होते चिपळूणला जाणारी बस कितीची आहे हेही मला माहित नव्हतं, त्यात चिपळूणमध्ये आमचे कोणीही नातेवाईक नाहीत त्यामुळे तिथल्या भागांची सुद्धा मला माहिती नव्हती. सर्वात आधी जायचं की नाही हाच खूप मोठा प्रश्न होता. कारण निकाल काय असेल, नवीन भागामध्ये जायचं आहे फेरी फुकट तर जाणार नाही ना? अशा अनेक प्रश्नांची मनात कालवाकालव सुरू झाली. शेवती आई- बाबांशी चर्चा करून चिपळूणला जायचं निश्चित झाल. कसं जायचं, कोणाबरोबर जायचं हे माहीत नव्हतं. आणि त्याच दिवशी मला माझ्या मैत्रिणीचा फोन आल. तिने सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि तिलासुद्धा त्या कार्यक्रमाला यायची इच्छा होती. तिचा फोन उचलला आणि खूप मोठी उभारी मनाला मिळाली. म्हणजेच मनामध्ये एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. या व्यक्तीचा इथे प्रत्यय येताना दिसतो. आणि 13 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा तो दिवस होता मी आणि माझी मैत्रीण बसमधून चिपळूणला निघालो. तिथल्या सरांना फोन करून ठिकाण विचारून घेतलं होतं. बस मधल्या गर्दीतून, धावत्या बसमधून पाळणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि मनातील चलविचार आणि धावपळीतून आम्ही दोघी चिपळूणला जाऊन पोहोचलो. निकालाच्या ठिकाणी त्या हॉलमध्ये बघता बघता निकालाच्या ठिकाणी त्या हॉलमध्ये जाऊनसुद्धा पोहोचलो. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक घोषित करण्यात आले. प्रवासापेक्षा भीतीने जास्त घामाघुम व्हायला झालं होतं आणि अखेर निकाल घोषित करण्यात आला. प्रथम उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. त्यात नाव नाही भीती अजून वाढली होती. त्यानंतर तृतीय क्रमांक, द्वितीय क्रमांक या मध्ये सुद्धा नाव नव्हतं. मी तर नंबरची अशात सोडून दिली होती. त्यानंतर थोड्याच वेळाने जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी माझ्या नावाची घोषणा करण्यात आली. अक्षरशः पायाखालची जमीन सरकली होती. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते हसाव की रडावं, उठाव की बसाव हेच समजत नव्हतं. आणि शेवटी प्रथम क्रमांकाची रोख रक्कम, गुलाबाचे फुल, प्रशस्तीपत्रक आणि सन्मान चिन्ह देऊन माझा गौरव करण्यात आला. सर्वत्र आनंदाला उधाण आले होते आणि मी सर्वप्रथम आईला फोन करून ही आनंदाची बातमी सांगितली आणि त्यानंतर मॅडमना फोन केला आणि परत आम्ही देवरूखकडे यायला निघालो. भूक लागली नव्हती कारण अविस्मरणीय क्षणानेच पोट भरून गेले होते.

          या मिळालेल्या यशाने माझ्यातली मी जागी झाली होती. यामुळे मी काहीतरी करू शकते हा विश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झाला. एक वेगळी दिशा मला मिळाली आणि याच क्षेत्रात आपले वेगळेपण सिद्ध करायचं असं मी ठरवलं.

स्नेहल गोविंद चव्हाण, देवरूख 

     























     

      


   

🎭 Series Post

View all