अविश्वासाचा दाह भाग ३

आज प्रतिकला शाळेत जाताना घट्ट मिठी मारली कारण ती माझी शेवटची मिठी होती. निरागस आहे तो . मी गेल्यावर तो माझी खूप आठवण काढेल; पण तू त्याला सावरून घ्यायचे आहे . तू सावरून घेशीलच मला ह्याची शंका नाही.
प्रिय स्वाती,

विचार करत असशील हे लिहून मी तुझ्या पर्समध्ये का ठेवले आहे?. ह्याचे कारण आता तुला कळलंच असेन. मी आता तुझ्यासोबत नाही . खूप दूर गेले. खूपदा विचार केला तुझ्याशी बोलून मन हलकं करावं; पण नाहीच जमले. अगदी माहेरी देखील मी कोणाला सांगितले नाही.म्हणूनच जास्तच घुसमट होत राहिली.

मला माहीत आहे , रागावली असशील ना माझ्यावर. मी वेडेपणा केला. सर्व लहानसहान गोष्टी सांगणारी मी असे पत्रात लिहून का बोलते आहे. एक आई म्हणून प्रतिकची चिंता आहे म्हणून जाता जाता तुला हे लिहून सांगते आहे. माझ्या नंतर प्रतिकची काळजी घे स्वाती. आज प्रतिकला शाळेत जाताना घट्ट मिठी मारली कारण ती माझी शेवटची मिठी होती. निरागस आहे तो . मी गेल्यावर तो माझी खूप आठवण काढेल; पण तू त्याला सावरून घ्यायचे आहे . तू सावरून घेशीलच मला ह्याची शंका नाही.

स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले होते. हुंदके देत रडू लागली.

पुढे वाचू लागली.

मी किशोरवर किती प्रेम केले .संपूर्ण विश्वास ठेवला आणि त्याने काय केले माहीत आहे माझा विश्वासघात. त्याचे बाहेर प्रेमप्रकरण सुरू होते. त्याचे बदललेलं वागणं पाहून मला शंका आली आणि जेव्हा मी स्वतःच्या डोळ्याने त्याला परस्त्री सोबत नको ते करताना पाहिले तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात गेली. मी ताडकन त्याच्या कानाखाली मारली. त्या मुलीला देखील मी थोबाडीत मारली. आपल्या नवऱ्याला असे परस्त्री सोबत पाहून माझ्या मनाला किती वेदना झाल्या त्या माझी मला माहीत. त्या दिवशी मी भयंकर चिडले. खूप मनस्ताप झाला. डोकं सुन्न झाले. ज्याच्याशी मी मनापासून प्रेम केले ,सर्वस्व बहाल केले त्याने असे करावे . खूप बदलला तो. सात जन्माचे नातं निभवायचे वचन दिले; पण त्याने वचन तोडले. त्यानंतर त्याने माझी शपथ घेतली,पुन्हा असे करणार नाही. विश्वास ठेवणे तर जड होऊन गेले होते; पण संसार करायचा होता,प्रतीकची जबाबदारी , समाजाची चौकट खूप काही होतं. नेहमी अंगी उत्साह असणारी मी पार गर्भगळीत झाले. माझे मन मला खात राहिले. मलाच कळेना काय झाले.

त्या विचाराने रात्रभर झोप लागत नव्हती. मला खूप त्रास होत होता. ज्या माणसावर मनापासून प्रेम केले त्याने असे वागावे? विश्वासघात करावा? स्वप्नातही असा विचार केला नव्हता. सर्व स्वप्न धुळीस मिळवले. आई बाबांचा विरोध करून मी लग्न केले आणि शेवटी असे झाले. मी आई बाबांना दुखावलं. खूप दुखावलं. म्हणून की काय पुन्हा तिथे जाण्याची हिंमत झाली नाही.

चूक त्याने केली आणि त्रास मी भोगत राहिले .आता हा मानसिक त्रास सहन होत नाही.
आतल्या आत तडफड होते आहे. नको वाटतंय सारं.

मला माहित आहे मी चुकीचं वागते आहे. बुद्धी म्हणते आहे असं करू नको पण मन मात्र आज हळवं झालंय. स्वाती खरंच मी चुकीचा निर्णय घेतला आहे . मी हे नको करायला. फक्त एक विनंती आहे माझ्या प्रतिकचा सांभाळ कर. प्रतिकला सांग "त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करायची". जमलं तर मला माफ कर"



तुझी मैत्रीण कोमल.

वाचकहो कथेमध्ये ट्विस्ट आहे बरं का.तो पुढच्या आणि अंतिम भागात वाचायला विसरू नका.धन्यवाद..

©® अश्विनी ओगले.




🎭 Series Post

View all