Login

अविश्वासाचा दाह भाग ४ अंतिम

कोमल:"किशोरचे विवाहबाह्य संबंध होते"स्वाती :"काय ? भाऊजीचं दुसऱ्या बाईसोबत .."कोमल:"हो स्वाती, जे मी बोलते आहे हे खरं आहे. तुझ्यापेक्षा जास्त मला मोठा धक्का बसला.मला तर विश्वास बसत नव्हता.
स्वातीने कोमलला झोपेतून जागं केलं. ती दचकुन जागी झाली. कोमल उठून बसली स्वातीला एकटक पाहू लागली. स्वतःचे हात पाय निरखून पाहू लागली.चेहऱ्यावर हात फिरवला.

कोमल आनंदाने म्हणाली "मला काही झाले नाही,मी बरी आहे "

स्वातीला कोमलचे वागणे पाहून हसू आले.
तीने कोमलच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाली "अगं वहिनी काय ठीक आहेस ना ? काही स्वप्न पाहिले का?"

कोमल पलंगावरून खाली उतरली. जड पावलाने ती आरशासमोर गेली. जरा घाबरतच तिने स्वतःला आरश्यात पाहिले . छान तसाच चेहरा होता. कमरेपर्यंत रुळनारे केस.टपोरे डोळे,चाफेकळी सारखं नाक सर्व काही जसं होतं तसंच. तिने अलगद चेहऱ्यावरून हात फिरवला. ह्याचा अर्थ जे काही पाहिले ते स्वप्न होते स्वतःला जाळून घेणे,स्वतः चे रक्षण करण्यासाठी धडपड. जळालेलं शरीर, आई , वडील ,भाऊ,स्वाती, मयूर आणि आई हवी म्हणून प्रतिकने काढलेले उद्गार. आई ,वडिलांचा,भावाचा आक्रोश . ज्या नवऱ्याने विश्वासघात केला त्याचीही वाईट अवस्था.

ती स्वातीला म्हणाली "हो गं स्वप्न पाहिले खूप वाईट ..मध्येच थांबली..

स्वाती:"वाईट स्वप्न?"

कोमल:"वाईट नाही ,चांगलं स्वप्न पडलं. खूप दिवस झाले एका गोष्टीमुळे अस्वस्थ झाले होते. स्वतःशीच एक वेगळे युद्ध खेळत होते. आज ह्या स्वप्नाने माझे डोळे उघडले"

स्वाती:"मला काही कळत नाही नक्की तुला काय म्हणायचे आहे,कसलं युद्ध खेळत होतीस वहिनी?"

कोमलने स्वातीचा हात पकडला आणि म्हणाली "स्वाती मला मन मोकळं करायचे आहे तुझ्यासोबत. खूप महत्वाचे बोलायचे आहे"

स्वाती :"बोल ना वहिनी"

कोमल:"किशोरचे विवाहबाह्य संबंध होते"

स्वाती :"काय ? भाऊजीचं दुसऱ्या बाईसोबत .."

कोमल:"हो स्वाती, जे मी बोलते आहे हे खरं आहे. तुझ्यापेक्षा जास्त मला मोठा धक्का बसला.मला तर विश्वास बसत नव्हता. त्यांनी माझी शपथ घेतली आहे , ह्यापुढे मी असे काही करणार नाही . खरं सांगु का स्वाती आता ह्या नात्यात विश्वास तर राहिलाच नाही, मला रात्रभर झोप लागत नाही. नको ते विचार डोक्यात येतात."

स्वाती:"वहिनी,काहीही वाईट विचार करू नको. मी तुझ्यासोबत आहे. जर का किशोर भाऊजी परत त्या किंवा इतर बाईच्या नादाला लागले तर आपण त्यांना चांगलीच अद्दल घडवू. पुन्हा त्या वाट्याला जाणार नाही."

कोमल किंचित हसली.

"स्वाती, अद्दल घडवू शकते गं ; पण हा जो अविश्वासाचा दाह मनात पेटला आहे ना तो आयुष्यभर कायम धगधगत राहणार आहे.


स्वातीने मान डोलवत तिच्या बोलण्याला दुजोरा दिला.

कोमल पुढे बोलू लागली.

"स्वाती, मी एक मात्र मनाशी ठरवलं आहे काहीही झाले तरी मी स्वतःचे बरं वाईट करणार नाही.मी जगणार. आत्महत्येसारखा पर्याय तर मुळीच निवडणार नाही. माझ्या प्रतिकसाठी, माझ्यावर प्रेम करणाऱ्या आई,बाबा,भाऊ आणि बहिणीसारखी तू ह्या सर्वांसाठी मी जगणार आहे. वेळ पडली तर किशोरच्या आयुष्यातुन निघून जाईल; पण हे अनमोल जीवन जे आहे, माझ्या आईची अनमोल देणगी आहे त्याच्याशी मी दगाबाजी करणार नाही. मी खंबीर होणार आणि असे कितीही दाह असू दे मी माझ्या आत्मविश्वासाने त्यांना धुडकावून लावणार. स्वाती, मी जगणार माझ्या प्रतिकसाठी तुम्हा सर्वांसाठी.मी जगणार.


समाप्त.

कसा वाटला अंतिम भाग नक्की कंमेंटमध्ये सांगा. हो आणि लाईक, शेअर जरूर करा.असेच लेख वाचण्यासाठी मला फॉलो करा.
©®अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all