Aug 05, 2021
कथामालिका

अविष्कार - भाग-२

Read Later
अविष्कार - भाग-२
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

© सुनीता मधुकर पाटील

अविष्कार - भाग -२

आविष्कार आता शाळेत जाऊ लागला होता. बघता बघता तो आता दहा वर्षाचा झाला होता. तो चौथीत शिकत होता.

एक दिवस शोभा अविष्कारला शाळेत सोडून आल्यानंतर घरातील कामे आवरत होती. "काय पण हा पोरगा!!! नुसता वान्ड झालाय, घरभर पसारा करून ठेवलाय नुसता." ती स्वतःशीच बोलत घरातील पसारा आवरत होती. इतक्यात फोनची रिंग वाजली. तिने फोन उचलला," तुम्ही आविष्कारच्या आई बोलताय का? मी त्याच्या स्कूल मधून त्याची क्लास टीचर बोलतेय. त्याचा छोटासा अपघात झालाय तुम्ही लवकर सिटी हॉस्पिटलमध्ये पोहचा. आम्ही त्याला घेऊन तिकडे निघालो आहे."
"अहो!!! हे काय बोलताय तुम्ही, आता थोड्या वेळा पूर्वी तर मी त्याला शाळेत सोडून आले आणि हे तुम्ही काय सांगताय. काय झालं अचानक? कसा आहे तो? त्याला जास्त लागलं तर नाही ना? त्याच्या कडे फोन द्या मला त्याच्याशी बोलू द्या?" शोभला काहीच कळत नव्हते तिने अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

"अहो अविष्कारची आई तुम्ही प्रश्न विचारात वेळ नका घालवू तुम्ही लौकर निघा, तुम्ही इथे आल्यावर सांगतो सगळ सविस्तर. आणि हो घाबरू नका, ठीक आहे तो. तुम्ही निघा लौकर." इतकं बोलून अविष्कारच्या टीचरने फोन ठेवुन दिला.

शोभला काय करावं काही कळत नव्हतं, तिने घाईघाईत माधवला त्याच्या ऑफीसात फोन केला आणि त्याला सगळं सांगितलं. तिने माधवला डायरेक्ट सिटी हॉस्पिटलला  यायला सांगितलं आणि तीही तडक हॉस्पिटलला जायला निघाली. दोघेही वेळ न दवडता हॉस्पिटलमध्ये पोहचले.

 ते दोघे पोहचण्याचा आधीच थोडावेळ अविष्कारला तिथे आणण्यात आलं होतं.

तिथे पोहचल्यानंतर त्यांना समजलं की स्कूलच्या जिन्यावरून पाय घसरून अविष्कार पडला. तो जवळ जवळ दहा पंधरा पायऱ्या खाली घरंगळत गेला आणि जागीच बेहोश झाला. रक्त ही बरच वाहील होतं. त्याच्या डोक्याला जबर मार बसलेला आहे. 
हे सगळं कळाल्यानंतर त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. माधव आणि शोभा डॉक्टरांची विणवनी करू लागले. काहीही झालं तरी अविष्कारला काहीही होता कामा नये. वाटेल तितका पैसा खर्च होऊ देत पण आमच्या अविष्कारला नीट करा म्हणत शोभाने डॉक्टरांचे पाय धरले.

डॉक्टरांनी त्यांना आश्वासन दिले आम्ही आमचे शंभर टक्के प्रयत्न करू तुम्ही काही काळजी करू नका. धीर धरा.

माधव आणि शोभा दोघांची ही झोप उडाली होती, शोभा निरंतर देवाचा धावा करत होती, माझ्या बाळाला नीट कर रे!!! देवाला सांगत होती. 

डोक्याला भयंकर दुखापत झाल्यामुळे पुढील चोवीस तास धोक्याचे आहेत त्यांनंतरच नक्की काय ते सांगता येईल असे डॉक्टरांचे मत होते. 

पण अविष्कारचे शरीर कोणत्याच औषधाला किंवा उपचारांना साथ देत नव्हते म्हणून काळजीच कारण आणखी वाढले होते.

देवावर भरवसा ठेवण्याशिवाय काही पर्याय नव्हता. शोभाची मानसिक अवस्था ही ढासळत चालली होती. ती चुपचाप शून्यात नजर लावुन बसली होती. 
अचानक डॉक्टर आणि नर्सेस यांची धावाधाव सुरू झाली, काय चाललय काही कळत नव्हतं. माधव बाहेर दाराच्या काचेतून आत पाहत होता. त्याच पिल्लू धापा टाकत होत. श्वास घेण्यासाठी तडफडत होतं. त्याच्याने हे सगळं बघवत नव्हतं. डॉक्टरांचे प्रयत्न चालू होते आणि अचानक सारंच ठप्प झालं. अविष्कारचे हृदय धडधडायचं थांबलं. 

तो निघुन गेला हे जग कायमचं सोडून. आई वडिलांना दुःखाच्या सागरात लोटून. कधीही परत न येण्याच्या वाटेवर.

 डॉक्टर बाहेर आले त्यांनी अविष्कार गेल्याचे माधवला सांगितले आणि सॉरी बोलुन निघुन गेले. माधव समोर आता मोठा प्रश्न होता हे शोभला कसे सांगायचे. तो खाली मान घालुन शोभासमोर थोडावेळ तसाच बसुन राहिला. काय आणि कुठून सुरवात करायची काही कळत नव्हतं. इतक्यात शोभनेच त्याला विचारलं "काय म्हणाले डॉक्टर, अविष्कार कसा आहे, आपण भेटु शकतो का त्याला? आला का तो शुद्धीवर."

" शोभा आपला अवि आपल्याला सोडुन गेला, आपल्याला कायमचा एकटं टाकून." इतकंच तो बोलला आणि तिला कवेत घेऊन ढसाढसा रडू लागला.

थोड्या वेळाने माधवला जाणवलं की ती काहीच बोलत नाही आहे किंवा हालत नाही आहे. त्याने तिला जागं करण्याचा प्रयत्न केला, शोभा!!! शोभा!!! म्हणून तो ओरडू लागला. त्याने डॉक्टरांना आवाज दिला. अविष्कार गेल्याचा धक्का तिला सहन न झाल्यामुळे ती बेहोष झाली होती. तिच्यावर लगेच उपचार सुरू केले गेले. तासा दोन तासात ती शुद्धीवर आली पण शुद्धीवर आल्यानंतर ती असबंध बडबडत होती." माझा अवि नाही जाऊ शकत, तो असा कसा जाऊ शकतो मला सोडुन." ती वेड्यासारखे हातवारे करू लागली, मध्येच त्याची एक एक आठवण काढत हसु लागली. तो समोर आहे असं समजुन ती बडबडत होती. तिची ही अवस्था पाहुन माधव पुरता कोलमडून गेला. काय करावं काही कळेना. त्याची अवस्था ही काही चांगली नव्हती. एकीकडे अवि गेल्याचं दुःख तर दुसरीकडे शोभला कसं सांभाळायचं हा प्रश्न. 
अविष्कारला जाऊन जवळपास दोन महिने उलटले होते, माधव काळजावर दगड ठेवून सारं काही सावरण्याचा प्रयत्न करत होता. शोभाच्या मानसिक अवस्थेत काहीच फरक पडत नव्हता. तिने स्वतःभोवती एक कोष निर्माण करून घेतला होता, अविच्या अस्तित्वाचा. ती तासनतास एकटीच तिच्या जगात मग्न असायची. समोर अविष्कार आहे अशी कल्पना करून ती तासनतास एकटीच बडबडत रहायची.

या सगळ्यात माधवची फारच कुचंबणा होत होती. शोभा तर तिच्या आभासी विश्वात रममाण होती पण माधव!!!सारा दुःखाचा डोंगर त्याने एकट्याने पेलला होता. कधी कधी गोष्टी त्याच्या सहनशक्तीच्या पार व्हायच्या तेंव्हा तो रात्र रात्र हुमसून हुमसून रडायचा.

माधवने मानसोपचारतज्ञाकडे शोभाचे उपचार सुरू केले.
शोभाच्या आयुष्यात अविष्कारच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे ती जर भरून निघाली तर शोभा बरी होऊ शकते असे डॉक्टरांचे मत होते.

शोभाच्या आयुष्यातील अविची पोकळी कशी भरून काढायची हा सगळ्यात मोठा प्रश्न आता माधवच्या पुढे आ वासुन उभा होता. शोभाच्या या अशा मानसिक अवस्थेत दुसऱ्या बाळाच्या विचाराचा तर प्रश्नच नव्हता. 
माधवने बऱ्याच विचारांती एक निर्णय घेतला आणि तो आनाथाश्रमात गेला. तेथील अधिकाऱ्यांशी भेट घेऊन त्यांना शोभाची मानसिक अवस्था आणि त्याच्या कारणा विषयी सांगितलं. डॉक्टरांचे रिपोर्ट्स दाखवले, डॉक्टरांचे मत काय आहे ते ही त्यानां पटवुन देण्याचा प्रयत्न केला.
शोभाला थोडा वेळ येऊन अनाथाश्रमात बसु देण्याची परवानगी मागितली.

अनाथाश्रमाच्या अधिकाऱ्यांनी माधावच बोलणं नीट ऐकून घेतलं आणि आश्रमातील मुलांच्या सुरक्षिततेच्या जवाबदारीवर शोभाला आठवड्यातुन दोन दिवस रविवारी आणि गुरुवारी एक तासासाठी तेथील मुलांना भेटण्याची, तिथे थांबण्याची परवानगी दिली. 

ठरल्याप्रमाणे माधव शोभाला घेऊन आठवड्यातुन दोन दिवस अनाथाश्रमात जाऊ लागला. पहीले थोडे दिवस शोभामध्ये काहीच फरक जाणवला नाही पण एक दिवस आश्रमातील दोन महिन्याचं एक छोट बाळ खुप रडत होतं ते काही केल्याने रडायचं थांबत नव्हतं, शोभाच्या कानावर जसा त्याचा आवाज पडला तशी ती बैचेन झाली. थोडा वेळ तिने दुर्लक्ष केलं आणि स्वतःच्याच नादात राहण्याचा तिने कसोशीने प्रयत्न केला पण ती स्वतःला जास्त वेळ थांबवू शकली नाही. धावत जाऊन त्या बाळाला तिने पोटाशी धरलं आणि "अवि बाळा तुला काय झालं, का बरं रडतयं ते माझं पिलु, माझा अवि, माझा अवि म्हणुन त्याचे पापे घेऊ लागली."
ते बाळ पण शोभाच्या कुशीत जाऊन रडायचे थांबले जणु काही स्वतःच्या आईच्या कुशीतच शिरले होते.
दिवसांमागुन दिवस सरत होते. माधवचं शोभाला आश्रमात घेऊन जाणं चालुच होत. माधवचे अथक प्रयत्न, डॉक्टरांचे उपचार आणि मुख्य म्हणजे आश्रमातील बाळांच्या संगतीत राहुन शोभाची मानसिक अवस्था आता सुधारू लागली होती. ती त्या मुलांमध्ये इतकी रमत चालली होती की रोज तिला तिथे जाण्याचा मोह होई. खासकरून तो छोटु ज्याला ती अवि म्हणूनच बोलावत होती. तिच्या वागण्यात बोलण्यात आता बराच फरक जाणवू लागला होता. तिने अविष्कार गेल्याच सत्य आता स्वीकारलं होतं. त्या दुःखाच्या सागरातून ती आता बाहेर पडू लागली होती. 

तिला आता अनाथाश्रमात जाण्यासाठी वेळेचं बंधन नव्हतं. तिथल्या लोकांना ही ती आता आपलीशी वाटू लागली होती.

अविष्कारला जाऊन आता जवळपास दोन वर्षे उलटली होती. या दोन वर्षात ती पूर्णपणे सावरली होती. एक दिवस तिने माधवला अविला रीतसर दत्तक घेण्याबद्दल विचारलं.

माधवला ही तिचा हा निर्णय पटला. खरं तर तो याच दिवसाची वाट पाहत हॊता. त्याच्या ही मनात हेच होते पण जोपर्यंत शोभा या गोष्टीसाठी तयार होत नव्हती. तोपर्यंत तो काहीच बोलला नव्हता कारण त्याला कोणतं ही नात जबरदस्ती तिच्यावर लादायचं नव्हतं. तिने ते मनापासून स्वीकारावं असं त्याला वाटत होत.
अविष्कारच्या देवाघरी जाण्याच्या दोन वर्षानंतर हा छोटा दोन वर्षाचा अवि त्यांच्या घरी प्रवेशला होता. त्या दोघांच्या जगण्याला नवीन अर्थ देण्यासाठी. त्यांच्या जखमेवर फुंकर बनुन. जखम तर भरत आली होती, पण सलं अजुन काळजात बाकी होती आणि ती कधीच संपणार नव्हती.

आज अविष्कारला जाऊन चार वर्षे उलटली होती. या चार वर्षात शोभा आणि माधव बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाले होते. छोटा अवि देखील आता चार वर्षाचा होत आला होता आणि आज अचानक या मोहितने येऊन त्यांच्या जखमेवर धरलेली खपली काढली होती._________________________________

क्रमशः

मोहित कोण आहे , त्याच आणि आविष्कारच नात काय?

हे सगळं जाणुन घेऊयात पुढील भागात.

© सुनीता मधुकर पाटील.

copyright

कथा आवडल्यास लेखिकेच्या नावासहित शेअर करावी.

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Sunita Madhukar Patil

Self employed

I seem like a strict soul.... Yet I am a child at heart.... In my mind thoughts take a stroll.... And reach out in the form of an art....????