अवि.. एक प्रेम कथा (भाग १०) अंतिम

सांगत नाही म्हटलं तर, अजय मला सांगणार नाही असं काही नाही. त्याला जर पायल आवडत असती तर, त्याने सर्वात आधी मला सांगितले असते. ह्याची मला खात्री आहे. मग? मग कसलं वाईट वाटतं आहे मला?" विद्या विचार करत होती. सोबतच तिच्या बॅगेत पुस्तकं भरत होती.


मागील भागात आपण बघितले…

त्याच्या ह्या अनपेक्षित प्रश्नाचे उत्तर विद्याकडे नव्हते. तिने एकदम त्याच्याकडे बघितले डोळ्यातील मोत्यांचे दोन थेंब तिच्या गालांवर ओघळले. अजयने ते अलगत ओंझळीत झेलले.


"विद्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. मग मी तुला सांगेल मला कोण आवडत. हे अश्रू खूप किमती आहेत. ते असे वाया नको घालवूस. चल आता खाली. सगळे वाट बघत आहेत." अजय बोलताना उठला.


आता पुढे…


"तू जा मी येते जरा वेळाने." विद्या बोलली.


"ठिक आहे. पण लवकर ये." अजय वर्गाच्या बाहेर निघून गेला.

विद्या विचारांच्या गर्दीत हरवली होती. अजयने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ती शोधत होती.

"खरंच. कसलं वाईट वाटत आहे मला? तो तिच्यासोबत आहे ह्याचं वाईट वाटतं आहे की, मला सांगत नाही ह्याचं?

सांगत नाही म्हटलं तर, अजय मला सांगणार नाही असं काही नाही. त्याला जर पायल आवडत असती तर, त्याने सर्वात आधी मला सांगितले असते. ह्याची मला खात्री आहे. मग? मग कसलं वाईट वाटतं आहे मला?" विद्या विचार करत होती. सोबतच तिच्या बॅगेत पुस्तकं भरत होती.


अजय लपून तिला बघत होता. तिच्या मनात चालेल गोंधळ त्याला समजत होता.


काही वेळात विद्या बाहेर आली. अजय तिला येताना बघून तिथून निघून गेला.

विद्या खाली आली सगळ्यांशी बोलत होती. अजय तिला बघत होता. ती देखील अजयला बघत होती. पण आज त्यांची नजर काही वेगळाच अनुभव घेत होती.

थोड्याच दिवसात कॉलेजचे डेज सुरू झाले. रोझडेला विद्याने छान मरून रंगाची बांधणीची साडी घातली होती. तिच्या गोऱ्या रंगावर मरून रंग अजूनच खुलून दिसत होता. चेहऱ्यावर लिपस्टिक व्यतिरिक्त कोणताही मेकअप नव्हता. गळ्यात नाजूक हार आणि कानात तसेच नाजूक कानातले घातले होते. हातात खूप बांगड्या होत्या. खूप सुंदर दिसत होती.
अजय तर तिलाच बघत होता आणि तिची नजर आज त्याच्या नजरेचा सामना करू शकत नव्हती. काहीतरी वेगळे तिला जाणवत होते. नेहमी पेक्षा बदलेला तिला तो दिसत होता, की ती स्वतः बदलली होते हे तिला समजत नव्हते. त्यादिवशी विद्याला बेनामी खूप गुलाब आले. तिला कळत नव्हते कोणी पाठवले?


विद्या, साक्षी, चिराग, अजय त्यांच्या नेहमीच्या जागी बसले होते. गप्पांना उधाण आले होते. हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे हवेत थंडावा होता. ह्या वर्षीचे डेज जास्तं खास होते कारण हे कॉलेजचे शेवटचे वर्ष होते. त्यानंतर कोण कुठे असेल? परत कोणी भेटेल की नाही? कधी भेटेल ते ही माहीत नव्हते. सगळे ह्या आठवणी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवत होते.


सकाळ सरून दुपार होत आली होती.


"ए. चला कॅन्टीन मध्ये जाऊ. मला भूक लागली आहे." चिराग

"चल पण बिल तू देणार आहेस ह्या वेळेस." साक्षी बोलली.


"आ ऽऽ मी का देऊ बिल?" चिराग डोळे मोठे करत बोलला.


"कंजूस एकदा तर खाऊ घाल आम्हाला." साक्षी त्याची मज्जा घेत होती.


"ठिक आहे. तुम भी क्या याद रखोगे!" चिराग एक हात वर करत बोलला.


"चला, म्हणजे आज पार्टी चिराग कडून." म्हणत विद्या उठली तसा अजयने तिचा हात पकडला.


"चिराग तू आणि साक्षी जाऊन ऑर्डर द्या. आम्ही दोघे नंतर येतो. जरा एक काम आहे." बोलताना अजयने चिराग आणि साक्षीला खुणावले.


"ओ.के. लवकर या पण." म्हणत साक्षी आणि चिराग निघून गेले.


"काय रे काय झालं?" विद्या


"तू माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं अजून!" अजय विद्याच्या डोळ्यात बघून बोलला.


आता पर्यंत तिला उत्तर मिळाले होते. पण तिचे मन हे मान्य करायला तयार नव्हते. तिच्या हातात मिळालेली गुलाबाची फुलं होती. ती काही न बोलता नुसती त्या फुलांना बघत होती.


"कोणी दिली असतील ही फुलं?" दर वर्षी मिळतात ही अशी निनावी फुलं. कोण असेल तो?" विद्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला.


आता मात्र अजय जरा वैतागला होता.

"उठ जरा." अजय बोलला.
विद्या ज्या बाईकवर बसलेली होती. ती बाईक अजयची होती.

विद्या उठली तशी अजयने गाडीतून एक बॅग काढली आणि विद्याच्या हातात दिली.
विद्याने ने ती बॅग उघडली त्यात अजून काही गुलाबाची फुलं आणि कार्ड्स होते. ज्यावर फक्त विद्याचे नाव होते. विद्याने ते बघितले.


"अजय म्हणजे!" विद्या काही बोलणार तितक्यात अजयने तिला थांबवले.


"मीच आहे तो. जो तुला दरवर्षी गुलाब पाठवतो. तुझ्यावर आज नाही तर खूप आधीपासून प्रेम करतो. तेव्हा पासून जेव्हा तुला पहिल्यांदा बघितले होते. तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण तुला कळतच नव्हते.
विद्या आय लव यू." अजय विद्याचा हात हातात घेत बोलला. त्याचे शब्द भिजले होते. डोळ्यात प्रेम जमा झाले होते.


"आता म्हणू नकोस की, तू मला फक्त मित्र समजते. आहोत आपण मित्र. पण त्या पेक्षा जास्त आहे आपल्यात. नाहीतर माझ्या प्रश्नावर इतका विचार करावा लागला नसता तुला! तुला सत्य मान्य करावे लागेल विद्या." अजय तिच्या जवळ जात बोलला.


विद्या काहीच बोलत नव्हती. शांत होती. परत एकदा थंड हवेची झुळूक तिच्या केसांना गालावर घेऊन आली आणि अजयने तिचे केस कानामागे अडकवली. तेव्हा त्याच्या बोटांचा हळुवार स्पर्श तिची गालांना झाला. तिने डोळे बंद केले. अजयने परत एक अलगत स्पर्श तिच्या हातावर केला. तशी ती शहारली. तिच्या श्र्वासांची गती वाढली होती.


"सॉरी अजय. मला कळत होतं सगळं पण, हे सत्य मान्य करण्याची हिम्मत माझ्यात नव्हती. सुरुवातीला मला वाटलं की, काहीतरी चुकत आहे माझं. पण तुला पायल सोबत बघून मला त्रास होत होता. खूप त्रास होत होता. मग वाटलं तुला ती आवडत असेल तर, मी का तुमच्या मध्ये यावं? त्या दिवशी तू मला प्रश्न केला तेव्हा मनातला गोंधळ दूर झाला.
अजय मला कळलंच नाही. मी केव्हा तुझ्या प्रेमात पडले." विद्या बोलत होती.

अजय तिला बघत होता. त्याचे प्रेम त्याला मिळाले होते.आज त्याच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस होता. जिच्यावर मनापासून प्रेम केलं आज ती त्याच्या जवळ होती.

अजयने एक हात विद्याच्या गालावर ठेवला आणि एका हाताने तिचा हात पकडला.
"विद्या, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर. तुला आयुष्यभर सुखात ठेवेल मी."


विद्या गोड हसून लाजली. तिच्या गालावरचा तीळ अजूनच छान दिसत होता. दोघे एकमेकांकडे बघत होते. प्रेमाच्या अथांग सागरात दोघे बुडाले होते.

आता पर्यंत दोघे सोबत होते पण, एक नव्हते. आता ते मनाने एक झाले होते आणि पुढील आयुष्याचा प्रवास त्यांचा असाच प्रेममय सुरू होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोघे पायावर उभे राहिले आणि घरच्यांना त्यांच्या नात्या बद्दल सांगितले. घरून अर्थातच खूप विरोध होता. पण त्यांनी घरच्यांना तयार केले आणि लग्नाच्या बंधनात अडकले.


अजय आणि विद्याची, अवि … एक प्रेम कथा इथेच संपली.
तुम्हाला माझी कथा कशी वाटली नक्की सांगा.


धन्यवाद.


© वर्षाराज

🎭 Series Post

View all