अवि.. एक प्रेम कथा (भाग ८)

"अरे, आई बाबा, घरचे बाकीचे, सगळ्यांनाच मुलगा आवडला, नाकारण्या सारखं काही नव्हतं त्यात. मग काय करणार? त्यात सगळे म्हणाले की, आपण सगळे आहोत एकत्र तर लगेच साक्षगंध करून घेऊ. म्हणून मग काल दुपारी लगेच कार्यक्रम झाला." विद्या गालात हसत होती.
मागील भागात आपण बघितले…


"अरे, मी सगळ्यात लहान त्यामुळे सगळ्यांनी खूप खेचली माझी. तुम्हाला सांगते ह्या सगळ्या ताई, भाऊ, वहिन्या जिजाजी ह्यांना काही कामच नव्हतं. लग्नात फक्त माझ्यासाठी मुलं बघत होते. नुसतं छळलं मला सगळ्यांनी." विद्या आठवून हसत होती.


"मग, आवडला का तुला कोणता मुलगा?" साक्षीने लगेच विषय पुढे नेला.
अजयच्या काळजाचे ठोके वाढले होते. कसाबसा तो धीर एकवटून उभा होता.


आता पुढे..


"ए ऽऽऽऽ, एक मिनिट! ही अंगठी कसली? साखरपुडाi झाला तुझा?" विद्या काही बोलणार त्या आधीच चिराग, विद्याच्या अंगठीकडे बोट दाखवत बोलला.


विद्याने त्याच्या बोलण्यावर सगळ्यांकडे एक नजर बघितले.


"बरोबर ओळखलं. काल झाला साखरपुडा. ही बघा अंगठी. हेच सांगायचे होते मला." विद्या जरा लाजून अंगठी दाखवत बोलली.


"संपलं." अजय ओठताच पुटपुटला. गोऱ्या हातांवर काळी झालेली मेहंदी उठून दिसत होती. त्यात तिच्या नाजूक बोटांमध्ये त्याला ती अंगठी खुपत होती. तिच्या आनंदात हसू की, स्वतः साठी रडू त्याला कळत नव्हते.


तिचे वाक्य अजयचा जीव घेऊन गेले. इतकावेळ जीव एकवटून सरळ उभा असलेला तो एकदम मागे असलेल्या बाईकला टेकला. जणू कोणी त्याच्या कडून त्याचे प्राण हिरावून घेतले होते. अंगातील शक्तीच संपली होती त्याच्या. चिरागने त्याला एका हाताने सहारा दिला.


"काय गं इतकी घाई झाली होती तुला? की, लगेच साखरपुडा करून आलीस. जरा थांबता येत नव्हतं तुला?" साक्षी जरा चिडून बोलली.


"बघ की, एकाच भेटीत हो बोलली आणि एंगेजमेंट करून आली. जर तो मुलगा चांगला नाही निघाला तर? तुला काय माहित गं, तो खरंच चांगला आहे, की नाही?" चिराग सुद्धा चिडला होता.


"अरे, आई बाबा, घरचे बाकीचे, सगळ्यांनाच मुलगा आवडला, नाकारण्या सारखं काही नव्हतं त्यात. मग काय करणार? त्यात सगळे म्हणाले की, आपण सगळे आहोत एकत्र तर लगेच साक्षगंध करून घेऊ. म्हणून मग काल दुपारी लगेच कार्यक्रम झाला." विद्या गालात हसत होती.


"डोक्यावर पडली होतीस का गं तू लहानपणी? उद्या आई बाबा म्हणाले दहाव्या मजल्यावरून उडी मार, तर खरंच मारशील का?" चिराग रागात बोलला.


"हो मारेल. मुळात माझे आई बाबा मला दहाव्या मजल्यावरून उडी मारायला का सांगतील? काही ही बोलतोस तू." विद्या.


"अरे हिला कोणी समजावा रे. विद्या ऐक असं नको करुस. थोडा वेळ घे." चिराग स्वतः ला शांत करत, विद्याला परत समजावण्याचा प्रयत्न करत होता.


"अरे, तुमची मैत्रीण नवीन आयुष्य सुरु करते आहे ह्याचा, तुम्हाला आनंद नाही झाला का? अजय तूच सांग आता ह्या दोघांना." विद्या अजयकडे बघून बोलली.


इतक्या वेळ गप्प बसलेल्या अजयला काय बोलावे कळत नव्हते.


"तू खुश आहेस ना? मग झालं. पण विद्या ते दोघे जे बोलत आहेत ते पण बरोबर आहे. आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो आम्ही." अजय मोठ्या कष्टाने बोलला.


"तू पण ह्यांच्या बाजूनेच बोल." विद्या गाल फुगवत बोलली.


"असं नाही गं. पण खरंच काय घाई आहे लग्नाची?" साक्षी परत बोलली.


अजय, साक्षी आणि चिराग काळजीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. कसं समजून सांगायचं विद्याला? हा प्रश्न त्यांना पडला होता.
विद्या त्यांचे भाव टिपत होती. काही वेळ त्यांना बघितल्यावर विद्या जोरात हसायला लागली. सगळे तिच्याकडे बघत होते.


"बावळट, अशी काय हसते आहेस?" साक्षी आधीच चिडलेली होती.


"आम्हाला काळजी वाटते आहे आणि हिला हसू येतय व्हा!" चिराग वाकडे तोंड करत बोलला.


"मग हसू नाही तर काय करू? चेहरे बघितले का तुमचे कसे झाले आहेत?" विद्या हसत बोलली.


"तू हसू नकोस हा. मला खूप राग आला आहे आधीच." चिराग.


अजय तर काही बोलण्याच्या, ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता.


"अरे, वेड्यांनो. मी गंमत करत होते. काही साखरपुडा वगैरे झाला नाही माझा. मान्य आहे की, मागणी घातली होती माझ्यासाठी एक, दोन जणांनी पण, माझ्या आधी माझ्या आई बाबांनीच नकार दिला.
चिरागने अंगठी बघून डायरेक्ट प्रश्न केला. त्यामुळे म्हंटल करावी गंमत सगळ्यांची. ही अंगठी आईची आहे. काल तिने दिली होती घालायला, जरा मोठी आहे ती, तर इतर कोणत्याच बोटात बसत नव्हती म्हणून ह्या बोटात घातली. " विद्या अजूनही हसत होती."अरे गंमत करत होती ती. साक्षी, चिराग समजलं का? गंमत करत होती. " आता पर्यंत काही प्रतिक्रिया न दिलेला अजय एकदम हसायला लागला. त्याचा जीव भांड्यात पडला होता. छतीवर जोरात चोळत ती हसत होता. केव्हा पासून कोंडलेला श्वास मोकळा झाला होता.


"तुला चांगली मारली पाहिजे." म्हणत साक्षीने, विद्याचे कान ओढले.


"ए साक्षी, माझ्याकडून पण कान पिळ जरा तिचे." चिराग.


"माझ्या कडून पण जरा जास्त जोरात पिळ." अजय सुद्धा बोलला.


चौघे हसत होते. विद्याला असे हसताना बघून अजय सुखावला. त्यापेक्षा जास्त तिचा साखरपुडा झाला नाही. हे ऐकून तो खूश झाला होता.


"काय ही ना खरंच. कधी काय सुचेल हिला ह्याचा नेम नाही." चिराग हळूच अजयच्या कानात बोलला.


"जीवच काढला बाहेर हिने माझा." अजय चिरागच्या कानात बोलला.


"आता तरी बोल तिला. आज गंमत होती म्हणून बरं झालं. पण उद्या खरं पण होऊ शकतं." चिराग.


"हो. ट्रेलर मिळालं मला." अजय डोके दाबत बोलला. टेन्शनमुळे त्याचे डोके दुखायला लागले होते.


"चला माझं आणि साक्षीचे प्रॅक्टिकल आहे. तुम्हाला दोघांना ऑफ आहे. तुम्ही बसा. आम्ही येतो जाऊन." चिराग बोलला. साक्षी आणि चिराग तिथून निघून गेले.

"बोल तिला आता." चिराग जाताना हळूच अजयला बोलला.सांगेल का आता तरी अजय? काय होईल?
वाचत रहा अवि..एक प्रेम कथा


क्रमशः


© वर्षाराज

🎭 Series Post

View all