अवि.. एक प्रेम कथा (भाग ६)

"चला वेळ झाली. वर्गात जाऊ." चिराग.चिराग, साक्षी आणि अजय जायला निघाले पण अजय वर्गाच्या दिशेने नं वळता कॉलेजच्या गेटच्या दिशेने वळला.


मागील भागात आपण बघितले…


"थँक्यू. तुझ्यामुळे आज माझा आत्मविश्वास परत मिळाला आहे मला. तू खरं बोलतोस. त्याला माझी किंमत नाही त्यासाठी मी का त्रास करून घ्यावा? तो आणि त्याच्या आठवणी आता मला कधीच त्रास देऊ शकणार नाही. वचन देते तुला. अजय हे सगळं तुझ्या मुळेच शक्य झाले आहे. खूप साथ दिलीस. आज मी तुझ्यामुळे जिवंत आहे ह्याची जाणीव आहे मला." विद्याने अजयचा हात हलकेच पकडला.
तसा अजयच्या अंगावर एक शहारा आला. तिचा नाजूक स्पर्श त्याला हर्षून गेला.


तेजस आणि बाकी सगळ्या तिथून रागात कधीच निघून गेल्या होत्या. अजय मात्र खुश झाला होता. त्याची खात्री पटली होती की, विद्या आता तेजसच्या विरहाच्या दुःखातून सरावली आहे.


आता पुढे…


विद्या आणि अजय जास्तीत जास्त वेळ सोबत घालवत. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे, अभ्यास करणे, कधी नुसताच टाईम पास करायचा. त्यांच्या सोबतीला चिराग आणि साक्षी देखील असतं. चौघांची छान गट्टी जमली होती.


विद्या अजयला आळशी म्हणून चिडवत असे. कारण साहेब कधीच वेळेत कॉलेजला येत नसत. दिलेल्या वेळेत तर तो कधी येणार नाही, हे समीकरण पक्केच होते. या उलट विद्या वेळेच्या पाच मिनिट आधी हजर असे. चिराग आणि साक्षी देखील वेळेत येत. फक्त अजयच असा होता जो नेहमी उशीर करत असे.


एक दिवस..

"काय रे विद्या आली नाही अजून?" नेहमी प्रमाणे उशिरा आलेल्या अजयने साक्षी आणि चिरागला विचारले.


"विसरलास का? दोन दिवस विद्या येणार नाहीये. गावी गेली ती काल रात्रीच." साक्षी बोलली.


"हो. सांगितलं होतं तसं तिने. विसरलोच मी." अजय इकडे तिकडे बघत बोलला.


"चला वेळ झाली. वर्गात जाऊ." चिराग.
चिराग, साक्षी आणि अजय जायला निघाले पण अजय वर्गाच्या दिशेने नं वळता कॉलेजच्या गेटच्या दिशेने वळला.


"ओ, हॅलो वर्ग तिकडे नाही आपलं." चिराग हसत बोलला.


"माहीत आहे रे. पण मी घरी जातो. आज इच्छा होत नाहीये कसलीच. दोन दिवसांनी येतो मी पण." अजय जरा थांबून बोलला.


"चूप चाप चल तू. अजिबात घरी जाणार नाहीस." म्हणत साक्षी आणि चिराग त्याला ओढत घेऊन गेले.


वर्गात सर शिकवत होते पण अजयचे मात्र त्याकडे अजिबात लक्ष नव्हते.


मेरी सासो मैं बसा है,
तेरा ही एक नाम,
तेरी याद हमसफर
सुबह शाम,
तेरी याद हमसफर
सुबह शाम!


नकळत गाण्याचे बोल पानावर उतरत होते.


लेक्चर संपल्यावर तिघे खाली गेले.

"चला आता जातो मी. कंटाळा येतो आहे." अजय परत गेटकडे वळत बोलला.


"ए ऽऽ थांब." चिरागने त्याचा हात पकडला आणि नेहमीच्या जागी घेऊन गेला. साक्षी देखील सोबत होती.


"काय रे. आम्ही काय खातो की, काय तुला? सारखा जातो जातो काय करतो आहेस?" साक्षी भुवई उंचावून बोलली.


"तसं नाही गं." अजय


"मग कसं?" साक्षी


"अगं विद्या नाही तर कंटाळा येतो आहे." अजय बोलला.


"अच्छा असं आहे तर." चिरज मिश्किल हसत बोलला.
साक्षी देखील हसत होती.


"तुम्ही दोघे असे हसताय का?" अजय दोघांना बघून बोलला.


"नाही म्हटलं विद्या नाही तर, करमत नाहीये तुला." साक्षी अजूनही गालात हसत होती.


"ह्या विद्याला गावी जायची काय गरज होती?" चिराज थोडा खोटेच रागावून बोलला.


" बघ ना. उगाच गेली. इथे जीव लागतं नाही आणि ही गेली दोन दिवसांसाठी." अजय नकळत बोलून गेला.


" पण तुझा का जीव लागतं नाहीये?" चिराग मुद्दाम बोलला.

"चिराग समजून घे ना. का जीव लागतं नाहीये अजयचा ते." साक्षी


"अजय प्रेमात पडला आहे." दोघे एकदम बोलले.


"बघा तुम्हा दोघांना समजलं पण, जिला समजायला पाहिजे तिलाच कळतं नाहीये." अजय नाराज होत बोलला.


"अरे मग सांग तिला." चिराग.


"नको ती नाही बोलली तर?" अजय जरा घाबरून बोलला.


"अरे, पण तिला कळू तरी देत." साक्षी.


"नको, ती रागावली तर बोलणार नाही माझ्याशी त्यापेक्षा नकोच ते." अजय.


"डायरेक्ट नको बोलुस पण, वेळ बघून थोडी कल्पना तरी दे तिला." चिराग बोलला.


"बघू. पण आता जाऊदे. मी जातो घरी." अजय निघून गेला.

अजय विद्याच्या प्रेमात आहे, ह्याचा आनंद साक्षी आणि चिरागला झाला होता.


अजय घरी गेला पण मनात चिराग आणि साक्षीचे बोलणे येत होते.


"खरंच तिला कल्पना द्यायला हवी." अजय मनातच बोलला.


पुढील दोन दिवस अजयला खूप जड गेले. विद्याच्या आठवणीत जीव कावरा बावरा होत होता. कधी ती येईल आणि कधी तिला बघतो, असे त्याला होत होते. एक एक क्षण हजारो मिनिटांचा वाटतं होता.

शेवटी कसेतरी अजयने ते दोन दिवस काढले. त्या दोन दिवसात एक तरी फेरी तो विद्याच्या घरा समोरून मारत होता. विद्या घरी नाही माहीत होते तरी, उगाच एक वेडी आशा होती.

विद्या येणार त्या दिवशी अजय सकाळीच लवकर तयार होऊन कॉलेजला गेला. मनात काहीतरी निर्धार तर आधीच केला होता.


सगळ्यांच्या आधी त्याला आलेले बघून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण कधीही वेळेत न येणारा तो, आज चक्क सगळ्यांच्या आधी आला होता.
पण नेमकी त्या दिवशी विद्या उशिरा आली. उशिरा म्हणजे तिच्या वेळेच्या एक तास उशिरा. पण तो एक तास अजयसाठी एक दिवसा सारखा होता. क्षण अन् क्षण कठीण होत होते. तीच्या वाटेवर डोळे लावून बसलेला तो जागचा हलला नाही. मनातून तिचा राग सुद्धा येत होता.


"एक तर दोन दिवस गायब झाली आणि आता वेळेत येत पण नाहीये. काय करू मी हीचं आता?" अजय मनातच बडबड करत होता.


"आज काही विद्या येत नाही वाटतं." चिराग मुद्दाम अजयला चिडवत होता.


"शुभ बोल ना रे माकडा." अजय वैतागून बोलला.


त्याला असे चिडलेला बघून चिरागला अजूनच गंमत सुचत होती.


"अरे थकली असेल ती प्रवासाने. म्हणून वाटतं नाही आता येईल ती." चिराग गालात हसू दाबत बोलला. साक्षी देखील गालात हसत होती.

अजयने त्याच्याकडे नाकपुड्या फुगवत रागाने बघितले.


"मग आज सांगणार वाटतं तिला? पण त्यासाठी ती आली पाहिजे ना. ही ना गं साक्षी?" चिराग परत चिडवत बोलला.


"तू आता गप्प बस. नाहीतर मार खाशील. साक्षी सांग याला." अजयने साक्षी कडे बघितले आणि परत नजर गेटच्या दिशेने वळवली.
आणि काही क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर एक छान हसू उमटले. डोळ्यात एक चमक भरली. इतक्यावेळ कोमेजलेल्या त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता खुलली.


समोरून विद्या येताना दिसली. पांढऱ्या रंगाच्या कॉटनच्या कुडत्यावर हलक्या गुलाबी, निळ्या रंगाची नाजूक फुले, त्यावर उठून दिसणारा तिचा हलक्या निळ्या रंगाचा दुपट्टा, कानात लोंबंते कानातले, मोकळे सोडलेले केस. कोणताही मेकअप नसलेली तिची उजळ कांती आणि दुरून त्याला बघून हसणारे तिचे नाजूक गुलाबी ओठ. बघून अजयचा पटकन त्याच्या हृदयावर गेला तोंडातून हलेच शब्द बाहेर निघाले.
"आई गं." तिच्या नजरेचा तिर सरळ त्याच्या काळजात घुसला होता.


तितक्यात चिरागने त्याला मागून हलकेच धक्का मारला. तसा तो भानावर आला. विद्या त्याच्या समोर येऊन उभी होती.


काय होईल सांगेल का अजय विद्याला? की नवीन काही संकट उभे राहील? वाचत रहा अवि.. एक प्रेम कथा.


क्रमशः

© वर्षाराज

🎭 Series Post

View all