अवि.. एक प्रेम कथा (भाग ५)

"आता काय करेल विद्या? मी केलेली मेहनत वाया जाईल का? परत ती सावरेल का?" अजय विचार करत होता. त्याच्या

मागील भागात आपण बघितले…



"विद्या असं बोलू नकोस. चुकून सुद्धा असं काही करू नकोस. तुझ्या जन्म दात्यांचा विचार कर. ज्याला तुझ्या प्रेमाची किंमत नाही, त्याच्यासाठी तू का जीव द्यावा? तुझा जीव काय इतका स्वस्त आहे का? विद्या ते काही नाही तू मला वचन दे तू असा विचार मनात सुद्धा आणणार नाही. तुझ्या वर प्रेम करणारे अजून खूप माणसं आहेत. त्यांच्यासाठी तुला जगावं लागेल आणि ते पण आनंदाने." अजयने तिचा हात हातात घेतला.


विद्याने खोटेच हसत त्याच्या हातावर दुसरा हात ठेवला आणि मनापासून वचन दिले. तसा अजय हसला. वचन घेऊन त्याने तिचा जीव तर सुरक्षित केला ह्याची खात्री त्याला झाली होती.



आता पुढे..


"कसे सांगू तुला ?
काय आहे तू?
श्वास माझा अन्
प्राण आहेस तू.
प्रेम कळेल का
तुला कधी गं?
माझी होशील का तू?" अजयच्या मनात न कळत शब्द उमलले.


दोघे तिथेच बाईकवर गप्पा मारत होते. वेग वेगळे विषय काढून, काहीतरी वेड्या सारखे बोलून अजय विद्याला हसवत होता. हवेत गारवा होता. त्या थंड हवेची झुळूक तिच्या रेशमी केसांमधून फिरून जात होती. त्यामुळे तिच्या केसांची एक बट सतत तिच्या गोऱ्या गालांवर विसावत होती. ती सुद्धा सतत बट कानामागे करून कंटाळली होती. पण, अजयला मात्र तिला असच बघत रहावं वाटत होते. तिच्या केसांचा सुगंध मनाला वेड लावत होता. अशीच एकदा केसांची बट तिच्या गालांवर रुळली आणि त्याने न कळत ती तिच्या काना मागे वळवली.



"खूपच उडत आहेत केस. थांब क्लिप लावते." म्हणत विद्याने बॅगेतून क्लिप काढली आणि तिच्या मोकळ्या केसांना बंदिस्त केले.


"नको ना बांधूस केस. छान दिसते आहेस." असं बोलावं वाटतं होते अजयला पण त्याने मनाला आवर घातला.
त्या बांधलेल्या केसात पण ती तितकीच छान दिसत होती.



"अजय. तू तेजसचा बेस्ट फ्रेंड आहेस. माझ्यामुळे तुमच्या मैत्रीत बाधा नको. त्याला नसेल आवडत तर तू नको बोलू माझ्याशी." विद्या बोलली.


"त्याने जे केले ते चुकीचे आहे आणि मी चुकीची साथ कधीच देऊ शकत नाही. तू नको काळजी करुस त्या बद्दल. त्याला माहित आहे की, मी तुझी मैत्री तोडणार नाही. चल सोड. त्याचा विषय आता काढायचा नाही. नव्याने आयुष्य सुरू कर. मी आहे तुझ्या सोबत." अजय तिच्या डोळ्यात बघत बोलला.


"थँक्यू." जड आवाजात ती बोलली.


*************



दिवस असेच जात होते अजय सावली सारखा विद्या सोबत असायचा. तिची नजर कुठे आहे त्यावर त्याचे लक्ष असायचे. तेजस तिला दिसू नये याची पुरेपूर काळजी तो घेत होता. कधी जोक सांगून, कधी काही बोलून तो तिला हसवत होता. विद्याच्या छोट्यातल्या छोट्या आनंदाची काळजी अजय घेत होता.
बघता बघता दोघे मित्रांपासून बेस्ट फ्रेंड्स झालेत. त्यांची मैत्री अजूनच गहिरी झाली.
आठ महिन्यात बऱ्याच वेळा तेजस आणि विद्या समोरा समोर आले. बरेच क्षण असे होते की, विद्या खचत होती. पण त्यातून अजय तिला सावरत होता. तिची ढाल बनून उभा होता.


अजयच्या सोबतीत विद्या हळू हळू मागचं विसरत होती. अजय मात्र तिच्या प्रेमात पूर्ण बुडाला होता.


असेच एक दिवस,
विद्या कॉलेजला आली. त्या दिवशी नेमकी ती उशिरा आली, त्यामुळे तिच्या सोबत कोणी नव्हते. सगळे लेक्चरला बसले होते. अजय मात्र वर्गा बाहेर थांबून तिची वाट बघत होता.

विद्याचा वर्ग तिसऱ्या मजल्यावर होता. ती घाईत जिने चढत होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याच्यामध्ये पायरीवरून खाली येत असलेला तेजस, सोबत त्याची नवीन गर्लफ्रेंड अनुजा आणि तिच्या दोन मैत्रिणी दिसल्या. विद्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष करत पुढे पाऊल टाकले. सगळे अगदी समोरा समोर होते.



"खूप विश्वास होता ना हिला हिच्या प्रेमावर. बघ तिच्या समोर तिचे प्रेम तिला सोडून माझ्याकडे आलं आणि ती काहीच करू शकली नाही." अनुजा तिच्या मैत्रिणींनी मुद्दाम मोठ्या आवाजात बोलली जेणे करून विद्याला ऐकू जाईल.
ती आणि तिच्या मैत्रिणी जोरात हसल्या. त्या हसण्याच्या आवाजाने अजय पायाऱ्यांजवळ आला. विद्या समोर एका पायरीवर उभी होती आणि वर पाच सहा पायऱ्या सोडून सगळे तिचा रस्ता अडवून उभे होते. तिचा वर यायचा रस्ता त्यानी अडवला होता.

"अनुजा चल खाली जाऊ." तेजस तिचा हात पकडत बोलला.


"आपण कशाला जायचं तिला जाऊदेत की, कशी जाते तर." त्यातली एक मैत्रीण बोलली.



"विद्या." अजयने वरून आवाज दिला.

"आता काय करेल विद्या? मी केलेली मेहनत वाया जाईल का? परत ती सावरेल का?" अजय विचार करत होता. त्याच्या काळजाची धड धड वाढली होती.

विद्या शांत उभी होती तिला वाद नको होते. पण समोरचा शांत बसत नसेल तर काय? तरी तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अजयला बघून विद्याला धीर आला. आठ महिन्यात अजयने विद्याला बरेच खंबीर बनवले होते. आता त्याच्या मेहनतीची परीक्षा होती.



विद्याने परत एकदा अजयला बघितले, तो इशाऱ्याने मी येतो खाली असे खुणावत होता. विद्या त्याला बघून फक्त हसली. एक क्षण डोळे बंद केले आणि मग एकदम निर्भिड पणे अनुजाला एका हाताने धक्का देत, अनुजा आणि तेजसच्या मधून वर निघून गेली.
तेजस तिचे हे रूप बघतच राहिला. ती स्ट्राँग होती हे त्याला माहीत होते. पण तो सोडून गेल्यावर ती खचली होती हे देखील तो जाणून होता.


चार पायऱ्या वर गेल्यावर विद्याने मागे वळून बघितले. तेजस, अनुजा आणि तिच्या मैत्रिणी विद्याला बघत होत्या.


"तेजस, समजून सांग तुझ्या गर्लफ्रेंडला माझ्या वाटेला जाऊ नकोस. महागात पडेल तिला. कळलं?" विद्याच्या डोळ्यात आग होती. आवाजात जबर होती. दरम्यान अजय तिच्या बाजूला येऊन उभा राहिला.



विद्याने अजयकडे एक नजर बघितले.


"थँक्यू. तुझ्यामुळे आज माझा आत्मविश्वास परत मिळाला आहे मला. तू खरं बोलतोस. त्याला माझी किंमत नाही त्यासाठी मी का त्रास करून घ्यावा? तो आणि त्याच्या आठवणी आता मला कधीच त्रास देऊ शकणार नाही. वचन देते तुला. अजय हे सगळं तुझ्या मुळेच शक्य झाले आहे. खूप साथ दिलीस. आज मी तुझ्यामुळे जिवंत आहे ह्याची जाणीव आहे मला." विद्याने अजयचा हात हलकेच पकडला.
तसा अजयच्या अंगावर एक शहारा आला. तिचा नाजूक स्पर्श त्याला हर्षून गेला.


तेजस आणि बाकी सगळ्या तिथून रागात कधीच निघून गेल्या होत्या. अजय मात्र खुश झाला होता. त्याची खात्री पटली होती की, विद्या आता तेजसच्या विरहाच्या दुःखातून सावरली आहे.


"आता तरी होईल का विद्याला माझ्या प्रेमाची जाणीव?" अजय मनातच बोलला.




तुम्हाला पण हाच प्रश्न पडला असेल ना? होईल का विद्याला अजय च्या प्रेमाची जाणीव?
बघूया पुढच्या भागात.


क्रमशः


© वर्षाराज
 

🎭 Series Post

View all