अवि.. एक प्रेम कथा (भाग ४)

"आज सुद्धा येते की नाही ही? कशी असेल? घरी फोन केला तिच्या आणि दादाने उचलला तर, तिला अजून प्रॉब्लेम

मागील भागात आपण बघितले…


पुढील दोन दिवस विद्या कॉलेजला आलीच नाही. अजय तिच्या काळजीने व्याकूळ होत होता.
"हिने काही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणजे झालं." हीच प्रार्थना तो करत होता. विद्या तेजस च्या प्रेमात किती वेडी होते हे त्याला चांगले माहीत होते.


आता पुढे..



"आज सुद्धा येते की नाही ही? कशी असेल? घरी फोन केला तिच्या आणि दादाने उचलला तर, तिला अजून प्रॉब्लेम होईल. पण आजही नाही आली ती तर? थोडावेळ वाट बघतो. नाहीतर जातोच सरळ घरी, किंवा साक्षी आली तर तिला सांगतो जायला, म्हणजे विद्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ती कशी आहे हे पण समजेल." अजय नेहमीच्या ठिकाणी बाईकवर बसून विद्याच्या वाटेच्या दिशेने डोळे लावून होता. मनात विचार चक्र सुरू होते. जसजशी वेळ जात होती तशी अजयची काळजी वाढत होती. दोन दिवसांपासून त्याची झोप उडाली होती. सतत विद्याचा चेहरा डोळ्यांसमोर येत होता.


"अजय, विद्या आज देखील येत नाही की काय? मला तिची काळजी वाटते आहे." अजय विचारात असतानाच साक्षी आली आणि त्याला बोलली.


"बरं झालं तू आलीस. विद्याची यायची वेळ कधीच होऊन गेली आहे. तू एक काम करतेस?" अजय बोलला.


"तू जाऊन ये तिच्या घरी."
"मी जाऊन येते तिच्या घरी." अजय आणि साक्षी एकदम बोलले. तसा अजयच्या जीवात जीव आला.


"ठिक आहे, मग लगेच जा." अजय बोलला.


"चालेल. चल जाऊन येते मी." म्हणत साक्षी जायला निघाली. अजय देखील तिच्या मागोमाग तिला बाहेर पर्यंत सोडायला म्हणून जात होता.


दोघे कॉलेजच्या गेट बाहेर पडले तोच त्यांना समोरून विद्या येताना दिसली. दोघे तिला बघून तिच्याकडे धावत गेले. साक्षीने विद्याला मिठीच मारली.

अजय फक्त तिला बघत होता. तिच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होता. वरून बघता ती नहामी सारखीच तयार होऊन आली होती, पण डोळ्यात मात्र कसलेच भाव नव्हते. सगळ्यांमध्ये असूनही शून्यात हरवलेले तिचे डोळे तो बघत होता.
साक्षी आणि अजय, विद्या सोबत परत आत आले. तिघे नेहमीच्या त्यांच्या जागेवर जाऊन बसले.


"विद्या, तू दोन दिवस आली नाहीस. आम्हाला तुझी काळजी वाटत होती. आता तुझ्या घरीच येत होते मी." साक्षी विद्याच्या गालावर हात ठेवत बोलली.


"इच्छा होत नव्हती गं यायची मला. पण घरी कितिदिवस राहू? आई पण प्रश्न विचारते म्हणून आले." विद्याच्या बोलण्यात जड स्वर होते.


"बरं झालं आलीस. घरात राहून अजून विचार येत राहिले असते. इथे आम्ही आहोत तर वेळ जाईल तुझा आणि अभ्यास पण बुडणार नाही." अजय जरा हसून बोलला.

"हो" विद्या शांत पणे बोलली.


नेहमी हसणारी विद्या आज हसत नव्हती. अजयचा जीव कासावीस होत होता. मनावर झालेले घाव खोल होते त्यामुळे, त्यातून बाहेर निघायला विद्याला वेळ लागेल हे अजयला माहीत होते.


"काहीही झालं तरी विद्याची साथ सोडणार नाही. तिला ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी मी तिच्या सोबत आहे." अजय मनातच बोलला.


"विद्या जे झालं ते, आपल्या हातात नव्हतं. मी बोलणार आहे तेजसशी ह्या बद्दल. मला राग येतो आहे त्याचा खूप." साक्षी बोलली.



"नको कोणी काही बोलू नका. त्याच्या आयुष्यावर त्याचाच अधिकार आहे. जे माझं नव्हतं ते माझ्यापासून दूर जाणारच होतं हेच मी समजेल. त्याला बोलण्यात काही अर्थ नाही. काही उपयोग होणार नाही." बोलताना विद्या आणखीनच उदास झाली.

तितक्यात बेल वाजली आणि लेक्चरला जायची वेळ झाली.


"विद्या चल जाऊ वर्गात आता." साक्षी तिची बॅग उचलत बोलली.


"साक्षी मला नको वाटतं आहे. तुम्ही दोघे जा. मी इथेच बसते." विद्या बोलली.


"मी पण थांबतो. मला पण आज कंटाळा आला आहे." अजय बोलला.


"ठिक आहे मग मी पण थांबते." साक्षी परत बॅग खाली ठेवत बोलली.


"साक्षी तू जा. आज एकतर चिराग पण नाही, आम्ही दोघे पण नाही. कोणीतरी तर पाहिजे लेक्चर ला आपल्या पैकी. जेणे करून काय शिकवला7हे समजेल." चिराग म्हणजे त्याचा चौथा मित्र, अजय बोलला.


"ते पण बरोबर आहे. मी येते मग लेक्चर झाले की." साक्षी असं बोलून निघून गेली.


विद्या शांत बसली होती पण मनात वादळ उठत होते. तेजस आणि तिच्या तुटलेल्या नात्या नंतर आज ती पहिल्या वेळेस कॉलेजला आली होती. भूतकाळ राहून राहून तिच्या समोर येत होता.
अजय काहीतरी विषय काढून तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. तितक्यात तिला समोरून तेजस येताना दिसला. त्याच्या वागण्यातून स्पष्ट दिसत होते की, त्याला कसलाच फरक पडत नव्हता. तिच्या डोळ्यात मात्र आपोआप अश्रूंनी गर्दी केली. तिच्या चेहऱ्यावरील बदललेले भाव बघत अजयने मागे वळून बघितले आणि त्याच्या लक्षात आले काय होत आहे .

"विद्या, अगं मला अकाउंटस् चा एक टॉपिक समजत नाहीये. तू सांग ना. तू छान सांगतेस, की लगेच समजतं." अजय तिचा चेहरा हाताने वळवत बोलला आणि तिच्या समोर असा उभा राहिला की, तिला तेजस दिसणार नाही.

पण तिच्या डोळ्यातील वेदना कशा लपणार होत्या? इतके ते सोपं नक्कीच नव्हते, तरी त्याचे प्रयत्न सुरू होते. कसही करून अजय, विद्याला हसविण्याचा तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करत होता.

"कोणता टॉपिक?" अजयच्या बोलण्यावर विद्या बोलली खरी पण, तिची नजर तेजसच्या दिशेनेच होती.


"विद्या इकडे बघ. तिकडे बघून तुलाच त्रास होणार आहे. त्याला काही फरक पडत नाहीये. तू का त्रास करून घेतेस? मला माहित आहे हे इतकं सोपं नाही. पण प्रयत्न तर करावा लागेल ना?" अजयने तिचा चेहरा आपल्याकडे वळवला.


"मला तर खरंच काही सुचत नाहीये. क्षणात होत्याचं नव्हतं झालं रे. असा कसा वागला तो? किती विश्वास होता माझा त्याच्यावर. तुला सांगते अजय, मला राहून राहून जीव द्यावा वाटतो आहे. पण आई बाबांचा विचार करून अजून पर्यंत शांत बसले आहे. नाहीतर आता पर्यंत." विद्याचे डोळे वाहत होते.
अजयने तिचे बोलणे थांबवत एकदम तिच्या ओठांवर त्याचा हात ठेवला.

"विद्या असं बोलू नकोस. चुकून सुद्धा असं काही करू नकोस. तुझ्या जन्म दात्यांचा विचार कर. ज्याला तुझ्या प्रेमाची किंमत नाही, त्याच्यासाठी तू का जीव द्यावा? तुझा जीव काय इतका स्वस्त आहे का? विद्या ते काही नाही तू मला वचन दे तू असा विचार मनात सुद्धा आणणार नाही. तुझ्या वर प्रेम करणारे अजून खूप माणसं आहेत. त्यांच्यासाठी तुला जगावं लागेल आणि ते पण आनंदाने." अजयने तिचा हात हातात घेतला.


विद्याने खोटेच हसत त्याच्या हातावर दुसरा हात ठेवला आणि मनापासून वचन दिले. तसा अजय हसला. वचन घेऊन त्याने तिचा जीव तर सुरक्षित केला ह्याची खात्री त्याला झाली होती.



पण विद्या सावरेल का? अजय कशी साथ देईल तिला? जाणून घेण्यासाठी वाचत रहा अवि.. एक प्रेम कथा.



क्रमशः


© वर्षाराज

 

🎭 Series Post

View all