अवि.. एक प्रेम कथा ( भाग ३)

"ठिक आहे. माझं पण लेक्चर आहे. तिला सांग मला भेटायला, इथेच येईल मी, लेक्चर संपलं की." असं बोलून तेजस ??

मागील भागात आपण बघितले…


विद्या देखील आग्रह न करता निघून गेली. अजय तिला बघत होता. त्याच्या ही नकळत दोन थेंब त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेल्या. पण लगेच त्याने स्वतः ला सावरले. तितक्यात त्याला तेजस येताना दिसला. नेहमी प्रमाणे तो त्याच्या मैत्रिणींसोबत होता.आता पुढे…


तेजस सरळ अजय जवळ जाऊन उभा राहिला. त्याची नजर काहीतरी शोधत होती. तो कोणाला शोधतो आहे, हे अजयने अचूक ओळखले.


"ती नाहीये इथे. लेक्चरला गेली आत्ताच." अजय बोलला.


"ठिक आहे. माझं पण लेक्चर आहे. तिला सांग मला भेटायला, इथेच येईल मी, लेक्चर संपलं की." असं बोलून तेजस जायला निघाला.
तोच त्याला अजयने थांबवले.


"तेजस मी क्लासमध्ये जाणार नाहीये आत्ता. तू पण थांब मला बोलायचं आहे तुझ्याशी. म्हणून मी तुझी वाट बघत थांबलो होतो."


"मला माहित आहे, तुला काय बोलायचे आहे. सगळं सांगेल मी. पण आता जाऊदे. आधी तिच्याशी बोलायचे आहे." तेजस बोलला.


"तेजस थांब. आज तू माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय जाऊ देणार नाही मी. मी जे ऐकतो आहे ते!" अजय बोलणार तितक्यात तेजसने बोलायला सुरुवात केली.

"अजू तू जे ऐकलं ते खरं आहे आणि हेच मला तिला सांगायचे आहे." असं बोलून तेजस निघून गेला.

अजयला सुचत नव्हते काय बोलावे. तितक्यात त्याला समोर विद्या दिसली आणि तिच्या समोर उभा असलेला तेजस दिसला. तेजसला असे एकदम समोर बघून विद्या खुश झाली होती, पण अजयला मात्र येणाऱ्या वादळाची चाहूल लागली होती. अजयत्या दोघांकडे जाणार त्या आधी ते दिघे अजयच्या दिशेने येताना दिसले.


"तेजसला थांबवले पाहिजे. त्याला समजावले तर सगळं नीट होईल" अजय विचार करत होता तो पर्यंत विद्या आणि तेजस तिथे आले देखील.


"तेजस तुला उशीर होतोय ना क्लास साठी. तू जा. विद्या तू नाही गेलीस लेक्चरला?" अजय


"अरे ऑफ आहे आज लेक्चर." विद्या बोलली.


"अजय तुला विश्वास बोलवत होता. त्याला काही काम आहे. तू जा. मला विद्याशी बोलायचे आहे." तेजस बोलला.
त्याच्या ह्या बोलण्यावर अजय काही बोलू शकला नाही. समोरच उभ्या असलेल्या विश्वास जवळ जाऊन तो उभा राहिला.


विश्वास त्याला काही कामानिमित्त बाहेर जाऊ असे म्हणत होता. पण अजयने ते टाळले. कारण त्याला माहित होते की, त्याची गरज आता कोणाला जास्त होती. तो तिथेच थांबला.


"काय रे कुठे होतास दोन दिवस?" विद्याने हसून विचारले.


तेजस तिच्याकडे बघत नव्हता. त्याची नजर तिच्या नजरेला भिडत नव्हती. पण ती त्याच्या डोळ्यात बघत होती आणि एक क्षण तिच्या पायाखालची जमीनच सरकली.


"तेजस काय झालं आहे? काही चुकलं का माझं? घरी काही प्रोब्लेम झाला आहे का?" ती बोलत होती.


"नाही तसं काहीच नाही." त्याला जे बोलायचे होते, त्यासाठी त्याची हिंमत होत नव्हती. पण विद्याला ते समजत होते. कारण त्याच्या डोळ्यात दिसणारे तिच्यासाठीचे प्रेम तिला दिसत नव्हते. पण तरी मन मान्य करायला तयार नव्हते. आपली शंका चुकीची व्हावी असे तिला वाटत होते.
पण नियतीचा खेळ वेगळाच होता.


"बोल तेजस काय झालं आहे?" तिने परत विचारले.


"विद्या. मला आता तुझ्या सोबत राहता नाही येणार. मला कोणी दुसरी मुलगी आवडते. त्यामुळे आपल्यात जे होतं ते आता संपले आहे. तू चांगली मुलगी आहेस. तुला कोणीतरी चांगला मुलगा मिळेल पण तो मी नाही. कारण आता मला तुझ्या बद्दल काही वाटत नाही." तेजस निर्विकारपणे बोलला.

त्याच्या बोलण्याने विद्याच्या काळजाचा ठोका चुकला. कोणीतरी तिच्याकडून तिचे सर्वस्व हिरावले होते. ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्याने तिचा विश्वास घात केला होता.


"का? कशाला? कशासाठी? कुठे कमी पडले मी प्रेमात?" असे असंख्य प्रश्न तिला विचारायचे होते. पण त्या आधीच तो निघून गेला. जाताना त्याने वळुन एक नजर देखील तिला बघितले नाही. ती मात्र त्याला बघत होती. प्रेम भंगातून दुखावलेल्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या पण तिने तिचे अश्रू अथक प्रयत्नांनी रोखून ठेवले होते. तो त्याच्या नवीन प्रेमा सोबत निघून गेला. विद्या मात्र स्तब्ध उभी होती. सभोवतालच्या गर्दीत एकदम एकटी.


तेजस तिथून जाताच अजय तिच्याकडे धावत गेला. तेजसने तिला सांगितले आहे, हे त्याला लगेच समजले. पुतळ्या सारखी उभी असलेल्या विद्याला, अजय हाताला धरून बाजूच्या पार्किंगमध्ये घेऊन गेला. तिला एका बाईकवर बसवले आणि फक्त "विद्या" इतकीच हाक मारली.

त्याच्या आवाजाने इतक्या वेळ तिने अडवून धरलेल्या अश्रूंचा बांध तुटला. डोळ्यातून पाणी वाहत होते पण शब्द फुटत नव्हत. अजयने तिचा हात घट्ट पकडला. रडत ती होती पण मनातून त्रास अजय ला होत होता. पण ह्या क्षणी त्याला कमकुवत पडून चालणार नव्हते. तिच्या1साठी त्या खंबीर राहणे गरजेचे होते.


"विद्या तो वेडा आहे. त्याला कळत नाहीये तो काय वागतोय. मी बोलतो त्याच्याशी. काळजी करू नकोस." तिचे डोळे पुसत अजय बोलला.

विद्या मात्र फक्त रडत होती. तिला असे बघून अजय हतबल होत होता. पण त्याने हार मानली नाही. तो तिच्याच जवळ थांबला. तिला समजावत राहिला. थोड्यावेळाने विद्या शांत झाली. आता डोळ्यात अश्रू नव्हते, पण डोळे मात्र निर्विकार होते. ती तिथे असून देखील तिथे नव्हती. हरवलेली होती तिच्याच विचारांत. तितक्यात त्यांचे बाकीचे मित्र मैत्रिणी तिथे आले आणि त्यांना कळताच सगळेच चकित झाले.

कारण विद्या आणि तेजस कधीच वेगळे होऊ शकत नाही हेच सगळ्यांना वाटतं होते. ज्याचे प्रेम इतरांसाठी एक उदाहरण होते, तेच प्रेम आता शेवटचा श्वास घेत होते.
सगळ्यांनी विद्याला खूप आधार दिला. तेजसचा सगळ्यांनाच राग येत होता.


"मला बरं वाटतं नाहीये. मी घरी जाते." विद्या बोलली.


"मी सोडतो तुला घरी." अजय बोलला.


"नको. जाईल मी माझी, काळजी करू नकोस." भावनाहिन तिच्या डोळ्यानी तिने अजयला बघितले.


"तू ह्या अवस्थेत एकटी जाऊ नकोस. मी येतो. नाही तर सक्षीला सोबत घेऊन जा." अजय त्यांची मैत्रीण साक्षीकडे बघत बोलला.


"हो. मी येते विद्या तुझ्या सोबत." साक्षी लगेच तयार झाली.

"नको कोणीच येऊ नका. मी जाईल." म्हणत विद्या निघून गेली.

पण अजय मात्र तिच्या मागे गेला. ती तिच्या घरी पोहोचली तो पर्यंत तो तिच्या मागे गेला. कॉलेज पासून घर जास्त दूर नव्हते. पण तिची मनस्थिती खराब होती, त्यामुळे तिला असे एकटीला जाऊ देणे त्याला पटत नव्हते. ती घरी सुखरूप पोहोचल्याची खात्री झाली तसा अजय परत कॉलेजला गेला आणि थेट तेजस समोर उभा राहिला.


"का केलंस असं? किती प्रेम करते ती तुझ्यावर. तुला माहित नाहीये का? चल सांग तिला तू गंमत केलीस ते. असं करू नकोस." अजय चिडला होता.


"अजय. ती चांगली मुलगी आहे. पण मला आता तिच्या बद्दल काही वाटत नाही. मला माहित आहे की, तुझी देखील चांगली मैत्रीण आहे. मी तुलाच काय तर इतर कुठल्याही मित्र मैत्रिणीला तिच्याशी बोलायला अडवणार नाही. आपली मैत्री कायम राहील रे. फक्त मी आता परत नाही येणार तिच्याकडे. तू समजावं तिला." तेजस बोलला.

त्याच्या बोलण्याचा अजयला खूप राग येत होता. पण त्याने स्वतः ला शांत केले. काही दिवसांनी बोलू असा विचार त्याने केला.


पुढील दोन दिवस विद्या कॉलेजला आलीच नाही. अजय तिच्या काळजीने व्याकूळ होत होता.
"हिने काही चुकीचे पाऊल उचलू नये म्हणजे झालं." हीच प्रार्थना तो करत होता. विद्या तेजसच्या प्रेमात किती वेडी होते हे त्याला चांगले माहीत होते.विद्या येईल का कॉलेजला परत की, अजयची भीती खरी होईल? पुढील भागात कळेलच. त्यासाठी वाचत रहा.क्रमशः

© वर्षाराज

🎭 Series Post

View all