Feb 22, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

अवि.. एक प्रेम कथा (भाग २)

Read Later
अवि.. एक प्रेम कथा (भाग २)


मागील भागात आपण बघितले…विद्या नुसतीच गोड हसली. तिच्या गोऱ्या गालांवरचा तो तीळ आणि हसताना रुंदावलेले तिचे नैसर्गिक गुलाबी ओठ, अजय नुसतं तिला बघत होता. तिच्या ह्या हसण्याने त्याच्या काळजाचा ठोका नेहमीच चुकायचा. विद्या न बोलता ही खूप काही सांगून गेली. तिच्या मनातली भावना समजण्यासाठी अजयला शब्दांची गरज नव्हतीच कधी.

विद्या तिथून निघून गेली पण ती जाताच अजयच्या चेहेऱ्यावर चिंतेची एक लकिर उलटली.


आता पुढे…


विद्या गेल्यावर तिच्या पाठोपाठ तेजस आत आला.


"काय रे काय बोलली विद्या?" अजयने तेजसला विचारले.


"नाही रे विशेष काही नाही. घरचे, अभ्यास असच काही बोलत होतो. पण खूप छान दिसत होती ती आज. तिच्या वर गुलाबी रंग खूपच उठून दिसतो. मला पण काही बोलायला सुचत नव्हते. नुसतं तिलाच बघत होतो मी." तेजस अजयच्या खांद्यावर हात ठेऊन उभा होता.

तितक्यात समोरून दोन तीन मुली आल्या. त्या तेजस च्या वर्गात होत्या. त्यातली एक तेजसची मैत्रीण होती. तेजसने अजयला बाय केले आणि त्या मुलींसोबत वर्गात निघून गेला. अजय देखील त्याच्या वर्गात गेला. पण त्याला तेजसचे वागणे जरा खटकले. कारण तेजस असा त्याला सोडून कधी कुठे जात नसे.


असेच काही दिवस गेले. कॉलेज सुरू होऊन महिना होत आला होता. ह्या महिना भरात हळू हळू विद्या आणि तेजसचे बोलणे कमी होत गेले. तेजस विद्या पासून दूर राहतो आहे असे, विद्याला जाणवत होते. पण का? ते तिला समजत नव्हते. नेहमी तिच्या अवती भोवती असणारा तेजस कॉलेजमध्ये आला की, नाही हे देखील आता तिला माहित पडत नसे. कोणी सांगितलं की, कळत असे ," तेजस आज आला होता पण बाहेरच होता. लेक्चरला बसला नाही. कोणासोबत आहे? विचारलं तर उत्तर ठरलेलं होतं की, त्याच्या वर्गातल्या मैत्रिणी सोबत." पण तो त्यांच्या सोबत जास्तं राहतो ह्याचा विद्याला काही फरक पडत नव्हता. करणं तिचा खूप विश्वास होता त्याच्यावर. फरक पडत होता, तो त्याच्या न बोलण्याचा. त्याच्या अशा वागण्याने ती आतून खूप दुःखी होत होती आणि तिला असे बघून अजयच्या काळजाचे तुकडे होत होते.

एक दिवस अजयच्या मित्राने त्याला काहीतरी सांगितले आणि अजय अस्वस्थ झाला.

"जे माझ्या कानावर येत आहे, ती गोष्ट खरी आहे का? मला वाटतं ह्या बद्दल मी सरळ तेजसशी बोलावं. खरं काय ते आज विचारतोच त्याला." अजय मनात बोलला.


"अजय, अरे लेक्चरला येणार नाहीस का? इथेच बसणार आहेस? विद्याने बाईकवर बसलेल्या अजयला विचारले. तिचा चेहरा पूर्ण पडलेला होता. कारण आजचा तिसरा दिवस होता की, तेजस तिला दिसला नव्हता.

त्यावेळेस मोबाईल इतके प्रचलित नव्हते त्यामुळे संपर्काचे काही मध्यम नव्हते. अजय नेहमीच विद्या आणि तेजस चे निरोप एकमेकांना पर्यंत पोहोचवत असे. पण आता त्याला किती त्रास द्यायचा म्हणून तिने त्याला देखील विचारले नाही. पण त्याला तिची अवस्था दिसत होती. नेहमी हसणारी विद्या आज देखील हसत होती पण, तिच्या हसण्यात एक खिन्नता होती. जी कोणाला नाही पण अजयला जाणवत होती. वर वर काही झाले नाही असे दाखवणारी विद्या मनातून मात्र रडत होती. चेहेऱ्यावर मुखोटा लावून फिरत होती जसे सगळे नीट सुरू आहे आणि हे सगळं अजयला समजत होते. तिचे तेजसला शोधणारे डोळे, त्याच्या एका हाकिसाठी आसुसलेले तिचे कान, तेजस दिसताच रुंदावणारे तिचे नाजूक ओठ. काही न बोलता अजयला खूप काही सांगत होते.


"काही नाही. आज मूड नाहीये बसायचा लेक्चर ला. तू जा मी पुढच्या लेक्चरला येतो." अजय ने सबब पुढे केली आणि तिथेच थांबला.

विद्या देखील आग्रह न करता निघून गेली. अजय तिला बघत होता. त्याच्या ही नकळत दोन थेंब त्याच्या डोळ्यांच्या कडा ओल्या करून गेल्या. पण लगेच त्याने स्वतः ला सावरले. तितक्यात त्याला तेजस येताना दिसला. नेहमी प्रमाणे तो त्याच्या मैत्रिणींसोबत होता.


काय झालं असेल तेजसला? का असा वागत असेल तो? अजयला काय समजले असेल? काय बोलायचे आहे त्याला तेजसशी? बघूया पुढच्या भागात.क्रमशः

© वर्षाराज
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//