अवि.. एक प्रेम कथा (भाग १)

"अगं तेजस तुझी वाट बघतोय बाहेर. कॉलेजमध्ये आला तर, त्याला त्याची बहीण बघेल आणि मग लेक्चरला बसावं

अवि… एक प्रेम कथा. तर ही कथा आहे एका मित्र आणि मैत्रिणीची. म्हणायला दोघे पक्के मित्र पण त्या मैत्रीत प्रेमाचा अंकुर रुजत होता हे त्याला माहीत होते. कारण त्याच्यासाठी ती नेहमीच खास होती. तो तिच्या प्रेमात आहे हे त्याला आधीच कळून चुकले होते. पण ती मात्र अजून मैत्रीतच अडकलेली होती. होईल का तिला त्याच्या प्रेमाची जाणीव? घडेल का काही त्यांच्यात? मैत्रिपलिकडे उमलेल का हळुवार प्रेम? सगळ्यांची उत्तरं तुम्हाला मिळणारच आहेत.
पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, ह्या प्रेम कथेत अवि कोण आहे? तो मुलगा की मुलगी? तर अवि ना मुलगा आहे, ना मुलगी. मग आहे तरी कोण? चला तर मग बघूया कोण आहे अवि? आणि कायसंबंध आहे ह्या कथेशी?"विद्या काय गं कुठे होतीस? केव्हाचा शोधत होतो तुला मी." अजय विद्याला समोरून येताना बघून धावत तिच्याकडे गेला.


"काही नाही रे. विसरलास का तू? आज प्रॅक्टिकल होतं माझं. कॉम्प्युटर लॅबमध्ये होते. काय झालं? तू का शोधत होतास मला?" विद्या हातातील पुस्तक दाखवत अजयला बोलली.


"अगं तेजस तुझी वाट बघतोय बाहेर. कॉलेजमध्ये आला तर, त्याला त्याची बहीण बघेल आणि मग लेक्चरला बसावं लागेल त्याला, म्हणून त्याने मला पाठवलं तुला बोलवायला. जा लवकर." अजयने तेजसचा निरोप विद्याला दिला.


"काय? अरे मग आधी सांगायचं ना. थँक्यू चल भेटते त्याला. बाय!" तेजसच नाव ऐकून विद्या एकदम खुश झाली आणि जवळ जवळ धावतच कॉलेजच्या गेट बाहेर त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी गेली.
अजय मात्र जागीच उभा राहून पाठमोऱ्या विद्याला जाताना बघत होता. तिच्या ओठांवरील हसू त्याच्यासाठी किती किमती होते हे, त्याचे त्यालाच माहीत होते.


"तेजसचे नुसते नाव जरी काढले तरी, इतकी खुश होते ही मुलगी की, तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसते. का खुश होणार नाही ती? जिवापाड प्रेम करते त्याच्यावर आणि तो देखील. दोघे एकमेकांसोबत खुश आहेत मग अजून काय हवं आपल्याला. तेजस माझा बेस्ट फ्रेंड आणि ती तितकीच खास आहे माझ्यासाठी." अजय विचार करत उभा होता. विद्या दिसेनाशी होई पर्यंत त्या दिशेने बघत होता.

तेजस, विद्या आणि अजय शाळेपासून एकत्र होते. पुढे ज्युनिअर कॉलेज आणि आता सीनिअर कॉलेजला देखील सोबतच. विद्या आणि अजय एकाच डिव्हिजनमध्ये होते तर, तेजसला दुसरी डिव्हिजन मिळाली होती.

विद्या गोरीपान बारीक बांध्याची, दिसायला तशी सुंदर. तेजस निमगोरा वर्णाचा, डोळे त्याचे बोलके होते. त्याच्या त्या डोळ्यांवर विद्या भाळली होती. तर अजय विद्या सारखाच गोरा, नेहमी हसरा, उंच बांध्याचा दिसायला स्मार्ट. कॉलेजमध्ये कित्येक मुली त्याच्या मागे होत्या.

विद्या आणि तेजस शाळेच्या शेवटच्या वर्षा पासून प्रेमात पडले. म्हणतात ना \"बचपन का प्यार \" तसं त्याचं होतं. विद्यासाठी तेजस तिचं सर्वस्व होता. इतक्या वर्षांच्या त्यांच्या नात्यात कधी दुरावा आला नव्हता आणि कधी येणार नाही ह्याची तिला खात्री होती. अतूट विश्वास होता तिचा तेजसवर.
तर अजय हा तेजसचा बेस्ट फ्रेंड आणि आता विद्याचा देखील बेस्ट फ्रेंड झाला होता. तेजस आणि विद्याचा जिवाभावाचा मित्र.
विद्या आणि तेजसला सोबत बघून अजय नेहमीच खुश होत असे. त्याच्यासाठी दोघे देखील खूप महत्त्वाचे होते.


तर,

विद्या बाहेर जाताच तेजसला भेटली. तिथून दोघे जवळच्या एका कॅफे मध्ये गेले. तासभर गप्पा मारल्या आणि परत आले. पण त्या एका तासात विद्या खूप खुश होती. तिचे प्रेम तिच्या सोबत होते. तेजस आणि विद्या फारसे कधी बाहेर भेटत नसतं. करणं विद्याचा मोठा भावाला ती फार घाबरत असे. त्यात आता वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात आल्यापासून त्यांची ही पहिलीच अशी एकांतातली भेट होती. विद्या नेहमीच दोघांचे ते क्षण मनात साठवत राहायची. कारण पुढची अशी एकट्यातली भेट नक्कीच लवकर नाही हे तिला माहित होते.


"झालं का बोलून?" अजयने, विद्या आल्यावर तिला विचारले.


विद्या नुसतीच गोड हसली. तिच्या गोऱ्या गालांवरचा तो तीळ आणि हसताना रुंदावलेले तिचे नैसर्गिक गुलाबी ओठ, अजय नुसतं तिला बघत होता. तिच्या ह्या हसण्याने त्याच्या काळजाचा ठोका नेहमीच चुकायचा. विद्या न बोलता ही खूप काही सांगून गेली. तिच्या मनातली भावना समजण्यासाठी अजयला शब्दांची गरज नव्हतीच कधी.

विद्या तिथून निघून गेली पण ती जाताच अजयच्या चेहेऱ्यावर चिंतेची एक लकिर उलटली.काय असेल अजय च्या चिंतेचे कारण?
कळेलच पुढील भागात. वाचत रहा, अवि.. एक प्रेम कथा.क्रमशः

©वर्षाराज
 

🎭 Series Post

View all