अवघा रंग एक झाला.

सावळी रेवती आणि गोरागोमटा हेमंत विठ्ठलाच्या कृपेने एकमेकांच्या रंगात रंगले नक्की वाचा..

"आई, आता लग्नाचा विषय नकोच." मुलाकडच्यांचा पुन्हा नकार आल्यामुळे नाराज झालेली रेवती आपल्या आईला म्हणाली.


हे ऐकून आईलाही वाईट वाटले.' आपल्या लेकीसमोर आपणच नाराज होऊन तिच्या मनात उगाचच अपराधीपणाची भावना का निर्माण होऊ द्यायची?' म्हणून आई रेवतीला म्हणाली, "जे लोकं तुला नाकारतात त्यांना मुळी हिऱ्याची पारखच नाहीये, ज्यांना ती होईल ना ते बघ तुला स्वतःहून मागणी घालतील."


"आई, तू माझं मन राखण्यासाठी उगाचच नको गं खोट्या आशा माझ्या मनात निर्माण करू." म्हणून रेवती स्वयंपाकात गेली.


आईचे डोळे डबडबले होते. ना संध्याकाळच्या स्वयंपाकात, ना जेवणात आईचे मन कुठेच लागेनासे झाले.


समजूतदार असलेली रेवती आपल्या खोलीत गेली . 'पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. म्हणतात तेच खर.'असे म्हणून रेवती आपल्या आवडीची पुस्तके वाचत बसली.


इकडे शतपावली करताना आजी आणि आई दोघी रेवतीसाठी नेहमीच येणाऱ्या नकाराविषयी बोलत होत्या. बोलता-बोलता आजी म्हणाली, " मला काय वाटतं रमा, आपण एकदा गावच्या विठुरायाच्या दर्शनाला जायला हवं. तुझे सासरे म्हणजे रेवतीचे आजोबा एकही वारी चुकवत नव्हते. दरवर्षी पंढरपूरला चालत जायचे. रमाकांतला इतकं काम असतं की, त्याच्याकडून ती परंपरा चालू ठेवणं शक्य नाही हे मी समजू शकते. पण निदान आपल्या गावातील विठ्ठलाच्या मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त मोठी यात्रा भरते तिथे आपण यावेळी जावं असं मला मनातून वाटतं. त्यानिमित्ताने अन्नदान होईल शिवाय रेवतीलाही बरं वाटेल."


रमालाही सासुबाईंचं म्हणणं पटलं होतं. 


'रमाकांतला यात्रेला जायला तयार करायच.' हा तिच्या मनाने ध्यास घेतला. रात्री खोलीत गेल्यावर तिने रमाकांकडे हट्ट धरला.ती म्हणाली, "आजवर मी तुम्हाला काही मागितले नाही. तेव्हा आज मागतेय."


"हो. बोल रमा, काय हवयं तुला?"आपला लॅपटॉप बाजूला सरकावत रमाकांत आपल्या बायकोला म्हणाले.


"कितीही महत्त्वाचं काम असले तरी तुम्ही चार दिवस रजा घेणार अस मला प्रॉमिस करा." रमा म्हणाल्या.


थोडा विचार करून रमाकांत "हो" म्हणाले. 


"रजा घेण्यामागे काय काम काढलसं ते पण सांगशील?"


"हो.आपण उद्या यात्रेसाठी गावी जायला निघतोय." रमा आनंदाने म्हणाली.


दुसर्‍या दिवशी सर्व साहित्य घेऊन जहागीरदार कुटुंब गावी पोहोचले. यात्रेची तयारी जोरात सुरू होती. दुरून लोक यात्रेला आले होते. गावातील सरपंच हंबीरराव पाटील यांचे कुटुंबीय आणि नुकताच आर्मीत भरती झालेला त्यांचा लेक हेमंत आला होता. हेमंत आर्मीत ऑफीसर होता पण गावच्या पवित्र भूमीचे आकर्षण असल्याने दरवर्षी यात्रेला हजेरी लावायचा.


हंबीरराव आणि रमाकांत बालपणीचे मित्र होते. हेमंतची ओळख करुन दिल्यावर रेवतीसाठी असा मुलगा मिळाला हवा असे जहागीरदार कुटुंबियांना वाटले.'पण ते शक्य नाही इतका देखणा, राजबिंडा मुलगा माझ्या सावळ्या लेकीला कसा पसंत करेल?' हा मनात विचार करून ते भजनात दंग झाले. रेवती अभंग म्हणाली. तिचा तो मधूर आवाज ऐकून पाटील कुटुंबीय मंत्रमुग्ध झाले. रेवती सगळ्यांसाठी प्रसाद घेऊन आली. रेवतीचे संस्कार चार दिवस तिच्या वर्तनातून झळकत होते. हेमंतही रेवतीला मदत करत होता.


"रेवती आणि हेमंतचा जोडा शोधतोय बरका रमाकांत. बघ देतोस का ? या गरिबाच्या घरी तुझी शहरात वाढलेली लेक." हंबीरराव स्पष्टपणे म्हणाले.


"मी तयार आहे रे. पण तुझा लेक तयार होईल का या लग्नाला?" रमाकांत घाबरत म्हणाले.


"का नाही होणार ? थांब लगेच विचारतो." म्हणून हंबीररावानी हेमंतला बोलावून घेतले.


"रेवतीला आम्ही सून करून घ्यायची म्हणतोय, तुम्हाला काय वाटतं?" या हंबीररावाच्या वाक्यावर "आबा तुम्ही म्हणाल तसं." म्हणून स्मितहास्य करत हेमंतने होकार दिला.


जहागीरदार कुटुंबीयांच्या आनंदाला पारावर उरला नाही. जवळचाच मुहुर्त काढून हेमंत आणि रेवती लग्नाच्या रेशीम बंधनात अडकले. वारीसाठी गेलेल्या जहागीरदार कुटुंबीयांच्या जीवनात विठ्ठलाच्या कृपेने "अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग..."


सौ.प्राजक्ता पाटील