Login

अवहेलना भाग २

एका स्वाभिमानी स्त्रीची अवहेलना केल्यानंतर तिच्या मुलाने दिलेले प्रत्युत्तर जाणून घेण्यासाठी वाचा - अवहेलना.
अवहेलना भाग २
लेखन - अपर्णा परदेशी.

घरी येईपर्यंत रुपलचा चेहरा उतरलेलाच होता. तिला पाहून बाहेर खेळत असलेला नभय घरात आला.

"आई, तुला कुणी काही बोलले का?"

"नाही रे बाळा."

उसने अवसान आणत तिने ती पिशवी घराच्या एका कोपऱ्यात टाकून दिली व आपल्या कामाला लागली.

कुतूहलापोटी नभयने पिशवी उघडून पाहिली.

"आई ही मोरपंखी साडी कुणी दिली? नवीन दिसतेय."

"आपल्याला नवीन कोण घेऊन देईल राजा? रूपल मॅडमची साडी इस्त्री करताना जळाली. जळालेली साडी त्यांच्या कामाची उरली नाही म्हणून मला देऊन टाकली." शारदाच्या मनातील यातना शब्दांद्वारे बाहेर पडली.

"आई तु का घेतली? घ्यायची नव्हती ना. आपण गरीब असलो म्हणून काय झालं?" नभय रागात म्हणाला.

"नव्हती घ्यायची रे. त्यांनी जबरदस्ती हातात दिली. नकार दिला असता तर त्यांच्या घरचे काम सुटले असते. शिवाय सोसायटीत त्यांनी नको ती बदनामी केली असती. आपल्याला कामाची गरज आहे. गरिबी हा फार मोठा शाप असतो बेटा." शारदाने व्यथा मांडली.

"आई, तू ह्या साडीचे काय करशील?" ती साडी उलगडत नभयने विचारले.

"बघू. बरीच कामे पडली आहे. पडू दे कुठेतरी कोपऱ्यात." शारदाने विषय झटकला.

नभय ती साडी नीट निरखून पाहू लागला. साडी तशी छान होती. महागातली दिसत होती. पण बसण्याच्या जागी बरीच जळालेली असल्याने वापरण्यासारखी अजिबात नव्हती. अशी साडी भेट म्हणून द्यायचे मनात तरी कसे येऊ शकते? आई उलट उत्तरे देणार नाही म्हणून खपवलेली दिसत आहे. नभयच्या मनात विचारचक्र सुरू होते. शिवाय त्याच्या आईसाठी सुद्धा त्याला वाईट वाटत होते.

दुसऱ्या दिवशी शारदा कामावर निघून गेल्यावर नभयने ती साडी पुन्हा काढली. साडीचा विचार त्याच्या मनातून जातच नव्हता. पुढच्या महिन्यात दिवाळी होती. या साडीचे असे काय करता येईल, जेणेकरून त्या रुपल मॅडमला पश्चाताप होईल.

तितक्यात त्या चाळीतल्या गोंधळात दोन स्त्रियांचे बोलणे त्याच्या कानावर पडले.

"अगं, दोन रंगांची साडी कशी दिसेल?"

"खूप सुंदर दिसते. माझ्या मालकिणीने काल पूजेला घातली होती."

"फॅशनच्या नावाखाली आजकाल काही पण जोडजाड करून कपडे शिवतात. किती विचित्र वाटतं ते."

"अगं नाही गं. पाटलीपल्लू म्हणतात त्याला. दोन वेगळ्या रंगाची एक साडी. फक्त रंगसंगती साधता यायला हवी. त्यासाठी कलाकुसर आणि कल्पनेची जोड योग्य पद्धतीने घालता यायला हवी. सर्व व्यवस्थित जुळून आले की ती साडी सुंदर दिसते. सध्या पाटली पल्लूचाच बोलबाला आहे. बऱ्याच बायका आवडीने घेत आहेत." दुसरीने माहिती पुरवली.

"काय बाई, काही पण प्रकार. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी. चल निघते मी. मला कामावर जायला उशीर होतोय."

"हो चल. मी पण निघते."

त्या दोघी बायका तिथून निघून गेल्या.

त्या दोघींचे संभाषण नभयच्या कानावर पडले. अचानक काहीतरी साक्षात्कार झाल्यासारखे त्याचे डोळे लकाकले. तो साडी पुन्हा नीट बघू लागला. जळालेला भाग काढून टाकला आणि तिथे दुसऱ्या साडीचा भाग जोडला तर एक नवीन साडी तयार होऊ शकते. शिवाय या साडीवर अजून खडे वगैरे चिपकवले तर साडी सुंदर दिसेल. त्याच्या मनात त्याची कल्पना जोर धरू लागली.

शारदा घरी येईपर्यंत तरी तो घरी एकटाच असायचा. त्यामुळे आईला कळणे शक्यच नव्हते. घराला कुलूप लावून तो बाहेर पडला. घरापासून काही अंतरावरच दामोदर काकांचे टेलरिंगचे दुकान होते. नभयच्या मनात त्यांची मदत घेण्याचा विचार आला. पण सरळ मदत मागायची कशी? ते त्यांचा कामधंदा सोडून नभयसाठी कशाला इतकं करतील? त्यासाठी त्याला काहीतरी करणे भाग होते. काय करावे ह्या विचारात तो त्यांच्या दुकानाबाहेर एका कोपऱ्यावर बसून त्यांचे निरीक्षण करू लागला.

दामोदरचे दुकान गजबजलेले दिसत होते. तिथे ब्लाउज शिवून देणे, साड्यांना पिको फॉल करून देणे, इस्त्री करून देणे अशी शिवणकाम संबंधीत अनेक कामे चालायची. त्यामुळे तिथे बायकांची खूप वर्दळ असायची. कामाच्या गराड्यातही दामोदरचे लक्ष वारंवार समोर बसलेल्या नभयकडे जात होते. चेहऱ्यावरून तरी दामोदरला तो निरूपद्रवी वाटत होता. परंतु, त्याच्याबद्दल मनात शंका जोर धरू लागली होती.

कदाचित तो दुकानात येणाऱ्या स्त्रियांना बघण्यासाठी तर आला नसेल ना? किंवा मग चोरीच्या उद्देशाने तर पाळत ठेवून नसेल ना? नुसता समोर बसून दुकानाचे निरीक्षण का करतोय? नभय मात्र दामोदरच्या काम करण्याच्या पद्धतीला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता.

बराच वेळ झाला तरी नभय जागचा हलला नाही. न राहवून दामोदरने त्याला आपल्याकडे बोलवले. नभय दुकानात येताच दामोदरने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. उत्तरदाखल त्याला नभयबद्दल बरीच माहिती मिळाली. नभयने दामोदरच्या हाताखाली महिनाभर विनामोबदला शिवणकाम शिकण्याची इच्छा व्यक्त केली. विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे ऐकल्यानंतर दामोदरने त्याचा प्रस्ताव स्वीकारला. असेही त्याला त्याच्या दुकानात फुकटात काम करणारी व्यक्ती मिळणार होती.

त्यानंतर रोजच नभय आई कामाला गेल्यावर घराबाहेर पडू लागला. दामोदरच्या दुकानात कामाला लागून नभयला काहीच दिवस झाले होते. दामोदर त्याची काम शिकण्याची प्रामाणिक वृत्ती पाहून खुश होता. नभयने त्याला तक्रार करण्याची संधीच दिली नव्हती. आपल्या आईला मदत व्हावी म्हणून नभय शिवणकाम शिकण्यासाठी उत्साही असेल असे दामोदरला वाटत होते. दामोदर देखील त्याला शिवणकामातल्या बऱ्याच बारीक सारी गोष्टी आवडीने शिकवत होता. शिकता शिकता नभय त्याला लागणाऱ्या गोष्टी बाजूला काढून ठेवायचा. जसे की, उरलेल्या कपड्यांचे तुकडे, पदराला लागणारे बोंडे, साडीवर कलाकुसर करण्यासाठी लागणारे काचेचे गोल तुकडे, काही चमकणारे खडे अशा बऱ्याच वस्तू तो जमवून ठेवत होता. काही दिवसात नभय बराच तरबेज झाला होता. महिना भरायला आणि दिवाळी यायला काहीच दिवस शिल्लक होते.