Login

अवहेलना भाग १

एका स्वाभिमानी स्त्रीची अवहेलना केल्यानंतर तिच्या मुलाने दिलेले प्रत्युत्तर जाणून घेण्यासाठी वाचा - अवहेलना.
अवहेलना भाग १
लेखन - अपर्णा परदेशी

शारदा रुपलच्या घरी सर्वात शेवटी आली होती. ती त्याच सोसायटीमध्ये अजून चार-पाच घरी धुणीभांडी करायची. कुठूनतरी तिला समजले की रुपलचे काहीतरी बिनसले आहे. उगाच आपला दिवस खराब नको जायला म्हणून ती इतर घरांची कामे आटपून रुपलच्या घरी आली होती.

शारदा एका चाळीत आपल्या सोळा - सतरा वर्षाच्या मुलासोबत राहत होती. तिच्या नवऱ्याने तिला टाकले होते. लोकांच्या घरी धुणीभांडी करून ती आपला चरितार्थ चालवत होती. शारदा स्वभावाने शांत, प्रेमळ आणि मनमिळावू होती. तिच्या कामात देखील टापटीपपणा असायचा. त्यामुळे त्या सोसायटीत बरेच लोक तिच्याकडून वरचेवर काम करून घेत असे. त्या बदल्यात तिला मोबदला देखील मिळायचा.

रुपल एका बड्या अधिकाऱ्याची बायको होती. तिच्या चेहऱ्यावरून आणि वर्तणुकीत तिच्या श्रीमंतीचा माज झळकायचा. त्यामुळे ती इतर लोकांशी फटकून वागायची. ती इतरांना जरा कमीच लेखायची. म्हणून शारदा तिच्याशी जेवढ्यास तेवढे वागायची. ह्या मोठ्या लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आपण भले आणि आपले काम भले.

शारदाच्या गरीब स्वभावामुळे ती बहुतांशी रुपलच्या हेकेखोर स्वभावाला बळी पडायची. शारदा घरात येताच रुपलच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला.

"आजकाल सगळेच लोक किती माजले आहेत. कुणीच काम व्यवस्थित करत नाही. दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आपले नुकसान होते."

"काय झाले बाईसाहेब? कसलं नुकसान झालं आहे?"
काहीही न कळल्याने शारदाने विचारले. एका क्षणासाठी तिला वाटले की तिच्यामुळेच त्यांचे काहीतरी नुकसान झाले असावे.

"तुला माहिती आहे का? माझी महागाची साडी इस्त्री वाल्याने जाळून टाकली. किती हौसेने घेतली होती मी."

"अरे देवा, ती मागच्या आठवड्यात दिवाळीसाठी घेतली होती ती का?" शारदा वाईट वाटून घेत म्हणाली.

त्याचबरोबर तिने सुटकेचा निःश्वास सोडला.

मागच्याच आठवड्यात रूपलने एका मॉल मधून अत्यंत महागडी साडी खरेदी केली होती. हजारांच्या घरात असलेली साडी शारदाने एकच नजर टाकून पाहिली होती. साडी तशी भरजरी होती. त्या साडीची किंमत म्हणजे शारदाच्या कित्येक महिन्यांचा पगार. त्या साडीचा पॅटर्न शारदाला फार आवडला होता. परंतु, रुपलचा स्वभाव पाहता तिने त्या साडीला हातात घेण्याचा मोह आवरला.

"तुझ्या जिभेला काही हाड. पाटली पल्लू म्हणतात तिला. पाटली पल्लू घेण्याची तुझी ऐपत तरी आहे का? एक जुनी साडी मी काढून ठेवली होती. जी फक्त मी दोन-चार वेळा वापरली असेल. माझी चुलत वहिनी या दिवाळीत घरी येणार आहे. तिला दिवाळीत भेट म्हणून द्यायची होती. जुनी वाटू नये म्हणून ड्रायक्लीन साठी दिली होती. पण त्या मेल्याने इस्त्री वाल्याने साडी जाळून टाकली. आता विनाकारण दुसरी साडी विकत घ्यावी लागेल. घरबसल्या भुर्दंड." रूपल चिडचिड करत होती.

ही ती साडी नाही हे ऐकून काय माहित पण शारदाला हायसे वाटले. शारदाने नकळत समाधानाचा सुस्कारा सोडला. पाटली पल्लू घ्यायची ऐपत नाहीये हे तिला स्वतःला चांगलेच ठाऊक होते.

बराच संताप करून रुपल तिथून निघून गेली. शारदा दुर्लक्ष करून नेहमीप्रमाणे घराच्या साफसफाईच्या कामाला लागली. सर्व कामे आटपून झाल्यानंतर शारदा रुपलचा निरोप घेऊन दाराबाहेर पडणार तोच तिने तिला मागून आवाज दिला.

"हे बघ शारदा, एवढी चांगली साडी ठेववतही नाहीये आणि फेकवतही नाहीये. असेही तुला दिवाळीत काही ना काही द्यावे लागले असते. त्यामुळे ही साडी तू का ठेवत नाही? माझ्यातर्फे दिवाळीची भेट समज."

असे म्हणून रुपलने ती साडी एका पिशवीत टाकून जबरदस्ती शारदाच्या हातात दिली.

शारदा मनातून चरकली. एक टाकावू साडी जी दुसऱ्याला देता येणार नाही ती तिच्या माथी मारण्यात आली होती. त्याचे तिला फार वाईट वाटले. परंतु, चेहऱ्यावर तिने तसे दिसू दिले नाही.

"नका बाईसाहेब, गरिबांच्या घरी कसली आली दिवाळी. या साडीला ठिगळ लावण्याइतपत सुद्धा आमची ऐपत नाही. तसेही साड्यांचा मला शौक नाही. त्यामुळे तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्या." अपमानाचा घोट गिळत शारदा म्हणाली.

सौम्य शब्दात नकार देण्यावाचून तिला पर्याय नव्हता. तिच्या मनात आले तर ती रूपलला तिथेच फटकाऊ शकली असती. परंतु, रूपलने नको त्या गोष्टींचा गवगवा केला असता. रुपलच्या एका कृत्याने इतर लोकांच्या मनात शारदाच्या प्रतिमेला डाग लागायला नको होता.

"अगं, इतकी छान साडी तुला बघायला तरी मिळाली असती का? माझ्यामुळे त्या चाळीत तुला चारचौघात मिरवायला मिळेल. निघ आता पटकन. भारीतली साडी मिळाल्याचा आनंद साजरा कर." रूपलने जबरदस्ती तिच्या हातात साडीची पिशवी कोंबून तिला पाठवून दिले.

शारदाचा कंठ दाटून आला. हीच गरीब लोकांची किंमत का? दुसऱ्याने वापरलेली जळालेली साडी दिवाळी सारख्या सणाला मी नेसायची. मी स्वाभिमानाने माझा संसार चालवते. माझ्यावर अशी वेळ यावी? जड अंतकरणाने विचारांच्या अधीन होऊन ती आपल्या घरी आली.