Jan 27, 2021
माहितीपूर्ण

अवघड वाटेवरून चालताना..!

Read Later
अवघड वाटेवरून चालताना..!

प्रीती खूप हुशार मुलगी पण खूप सरळमार्गी..आपलं काम बरं आणि आपण बरं अशीच. दिसायला खरंतर ती चांगली होती पण राहणीमान खूप साधं त्यामुळे कॉलेजमध्ये 'काकूंबाई' दिसणं आलं...पण प्रीतीला याचा कधीच फरक पडत नसे. सौंदर्य आणि बुद्धीमत्ता क्वचितच एकत्र नांदू शकतात. प्रीतीच्या चेहऱ्यावर तिच्या हुशारीचं तेज मात्र झळकत असे.
पण तिचा स्वभाव काही बाबतीत खूप हळवा होता.
खरंतर अतिसंवेदनशील. एखाद्याने कारण नसताना बोल लावणं तिच डोकं पोखरून टाकत असे.

प्रीती कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. आणि अचानक तिचं अभ्यासात लक्ष लागेना. तिला छोट्या छोट्या गोष्टींचा राग येऊ लागला. मैत्रिणींनी केलेली मस्करी आवडत नव्हती. पूर्वी काकूबाई म्हटल्यावर त्याला आत्मविश्वासाने सामोरी जाणारी प्रीती आता काकूबाई म्हटल्यावर उदास व्हायची.

एक दिवस ती आरश्यात पाहून स्वतःला न्याहाळत होती. आणि तिला असं जाणवलं की पुळकुट्या पण खुप आल्यात. पण हे असं कधी कधी होतं.. इतका काय विचार करायचा म्हणून तिने दुर्लक्ष केलं. असेच काही दिवस गेले.. आता तिचे केस ही खुप गळायला लागले. 
एक दिवस कॉलेजमध्ये तिची मैत्रीण रीमा तिला म्हणाली.
"अगं सहा महिने होऊन गेले तुझे असे केस गळतात... मुरुमे खूप येतात.. काही क्रिम्स, तेल लावून बघ..शॅम्पू बदल.. हे तेल लावून बघ..माझे ही असेच खूप केस गळत होते.. पण या तेलाने कमी झाले..
असं म्हणत रिमाने तिला एक तेल दिलं.

प्रीतीने ते तेल तीन महिने लावून पाहिले. चेहऱ्यावर बरेच लेप लावून झाले. हळद, दूध, मध सगळं झालं पण तिचे केस गळायचे काही कमी होत नव्हते आणि मुरुमे पण येतच होती. चेहरा खूप खराब झाला होता. आता तर चेहऱ्यावर hair growth जाणवत होती. केसात खूप dandruff होतं होता. हे सगळं कमी होत नव्हतं आणि त्याचा इतरही गोष्टींवर परिणाम होत झालेला. ती चिडचिडी झाली होती.

घरात आईबाबांसोबत तिचे या वाढत्या वयातले खटके अजूनच वाढू लागले. कुठेच मन रमत नव्हतं. प्रीतीची आई एक सामान्य गृहिणी होती. घरातली कामं करून उरलेल्या वेळात रुखवताच्या ऑर्डर्स घ्यायची आणि बाबा एक दुकानात काम करत होते..

माणसं मनाने खुप चांगली आणि साधी होती. प्रीती त्यांची एकुलती एक मुलगी होती. मध्यमवर्गीय सुखी कुटुंब असंच प्रीतीचं घर होतं. 

प्रीतीला हे त्रास होतात हे आईच्या आता लक्षात आलं होतं. ती प्रीतीच्या बाबांना म्हणाली,

"पोरीला कुणाची नजर लागली.. स्वतःच्या कोशात असते.. गेल्या वर्ष भरात इतकी जाड वेणी अगदी पातळ होऊन गेली.. चेहऱ्यावर पुळकुट्यानी जाळ विणालय नुसतं..."

"अगं नयन मग दृष्ट काढ तिची.." असं म्हणून बाबा कामाला निघून गेले.

दाराशी नीता उभी होती. साधारण पस्तिशीची नीता एक आयुर्वेदिक डॉक्टर होती. ती प्रीतीच्या आईला गेली पाच-सहा वर्षे ओळखत होती. नीताच्या लहान बहिणीचं सीमाचं लग्न ठरलं होतं. म्हणून रुखवताचं बघायला ती नयनताईंकडे आली होती. तिने हा प्रीतीच्या आईवडिलांचा संवाद ऐकला.. म्हणजे कानावर पडला तिच्या..!

"काय नयनताई येऊ का आत..?"

"अहो या ना या.."

"नयनताई कितीवेळा सांगितलं मला अहो जाहो नका करू..मी लहान आहे तुमच्यापेक्षा..."

"काय करू आता सवय झाली ती मोडता येत नाही...कसं काय येणं केलात आमच्याकडे..?"

"सीमाचं लग्न आहे दोन महिन्यांनी.. तर रुखवत तुम्ही करायचं आहे... ज्या काही नवीन कल्पना असतील त्या वापरून करा... छान करालच तुम्ही.."

नीताने त्यांना advance देऊन रुखवताची ऑर्डर दिली. आणि ती नयनताईना म्हणाली..
"नयनताई.. मगाशी मी आले तेव्हा तुमचं बोलणं कानावर पडलं.. त्याविषयी बोलू का? .."

"अहो.. संकोच कसला.. बोला ना.."

"प्रत्येक आईला आपली मुलगी दृष्ट लागण्यासारखी आहे असं वाटतंच.. आणि तुमची प्रीती आहे अशीच गोड मुलगी..पण हे असं का होतय याची कारणं वेगळी असतात... तुम्ही प्रीतीला घेऊन क्लिनिकला याल का? नाहीतर तिला एकटीला पाठवा..मी बोलेन तिच्याशी..! "

प्रीती कॉलेजहून घरी आल्यावर आईने विषय काढला.

"त्या डॉक्टर नीता देशपांडे आल्या होत्या..."

"मग...? " प्रीती तुटकच बोलली.

"अगं त्यांच्या बहिणीचं लग्न आहे तर रुखवताची ऑर्डर दिलीय.."

"बरं..करेन हा मी कामात मदत तुला रुखवत करायला.."
असं म्हणत प्रीती खोलीत निघून गेली.

आईने कपाळावर हात मारला..

"अगं बाई.. तुला क्लिनिकला बोलावलं आहे त्यांनी त्या म्हणत होत्या तुला हा त्रास होतो त्याला काही कारणं असतात.. जायचं का आपण....?"

प्रीतीला हल्ली वाटतंच होतं की आपण डॉक्टरकडे जायला हवं... हा असा त्रास सुरू होऊन आता वर्ष होत आलं.. केस गळतात, मुरुमं येतात, dandruff होतोय, आणि चांगलं दहा किलो वजन वाढलय या वर्षात.

"हो मी येते भेटून...."

'म्हणजे ही एकटीच जाणार तर....' आई पुटपुटली. पण एकटी तर एकटी..जाऊन यायला तयार झाली हेच खूप आहे असा विचार करून आई गप्प बसली.

प्रीती दुसऱ्याच दिवशी डॉक्टर नीताच्या क्लिनिक ला गेली.

प्रीतीला बघून नीता सुखावली.

"ये प्रीती, बस.. कशी आहेस...? कॉलेज कसं चाललंय..?"

"बरी आहे...कॉलेज पण छान चाललं होतं....पण..."
प्रीती अडखळली.

"पण काय प्रीती...?"

"आई बोललीय ना सगळंच तुम्हांला....!"

"त्या बोलल्या नाहीत... आई बाबांचं बोलणं माझ्या कानावर पडलं.."

"गेलं वर्षभर मला असा त्रास होतोय.. खूप चिडचिड होते.. कशात लक्ष लागत नाही.. वजन वाढलंय.. मुरुमं येतात ही अशी चेहऱ्यावर आणि facial hair चा प्रॉब्लेम... केस गळतात.. खुप dandruff होतो.. सुरवातीला हे सगळं छोटं वाटत होतं मला.. पण आता खूप कंटाळा आलाय.."

"प्रीती बाकी अजून काही त्रास होतो का..?"

"अजून त्रास म्हणजे नकारात्मक विचार येतात , आत्मविश्वास कमी पडतो कधीकधी, मधेच उगाच रडायला येत..."

"प्रीती ही सगळी pcod/ pcos म्हणजे polycystic overy diseases / syndrome ची लक्षणं आहेत..."

"oho...!! हं.. मी कधीतरी वाचलंय हे.. पण मला बाकी मासिक पाळीशी संबंधित असा काही त्रास होत नाहीये..माझी पाळी वेळेवर येते..पण हल्ली फक्त 6-8 दिवस पुढे मागे होते.."

"अगं तुला जाणवणारी लक्षणं प्राथमिक आहेत.. यातली सगळीच लक्षणं प्रत्येकाला दिसतात असंच नाही.. आधी हे काय आहे ते आपण समजून घेऊ....पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease)......पीसीओडी या आरोग्य समस्येमध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात....पीसीओडी हा महिलांमधील एक इन्डोक्राईन विकार आहे....अंडाशयातील सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो.....एका शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शारीरिक कार्यावर होऊ लागतो... पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते आणि त्यांना हॉर्मोनल असंतुलनाला सामोरे जावे लागते... साधारणपणे मासिक पाळी सुरू झालेल्या किशोरवयीन मुलींपासून अगदी मनोपॉजपर्यंतच्या म्हणजेच पन्नाशीच्या वयोगटातील सर्व महिलांना पीसीओडी या समस्येला सामोरे जावे लागू शकते...."

" पीसीओडीची लक्षणे अजून कोणती असतात डॉक्टर...?"

" पहिलं कारण अचानक वजन वाढू लागणे (Weight Gain). पीसीओडीची समस्या असल्यास महिलांच्या वजनामध्ये अचानक वाढ होऊ लागते.अशा महिलांच्या पोटाचा घेर जास्त दिसू लागतो.

दुसरं कारण अनियमित मासिक पाळी (Irregular Menstrual Cycle)... दर महिन्याला स्रीयांच्या गर्भाशयातून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच मासिक पाळी अथवा ऋतूस्त्राव असे म्हणतो. मात्र पीसीओडीमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो. सहाजिकच त्यामुळे मासिक पाळीची समस्या निर्माण होते. मासिक पाळी उशीरा येते अथवा मासिक पाळीत अपुरा रक्तस्त्राव होतो...मासिकपाळी सुरू असताना असह्य वेदना होतात.

पुढचं लक्षण हॉर्मोन्सचे असंतुलन यांमुळे स्त्रीयांच्या अंडाशयात गाठी निर्माण होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्यांना असह्य वेदना जाणवू लागतात.पीसीओडीच्या समस्येमुळे अनेकींना मासिक पाळी सुरू नसतानादेखील कोणत्याही कारणाशिवाय पोटात वेदना जाणवतात. काहीजणींना पीसीओडीच्या समस्येमुळे योनीमार्गामध्ये मासिक पाळी सुरू नसतानाही असह्य वेदना जाणवतात. 

पुढचं लक्षण...डोकेदुखी (Headache)...शरीरात होणाऱ्या हॉर्मोनल बदलांचा परिणाम तुमच्या शरीरातील इतर अवयवांवरदेखील होतो. पीसीओडीची समस्या असल्यास काहीजणींना अचानक तीव्र डोकेदुखीला सामोरं जावं लागतं....

PCOD मुळे वंधत्व (Infertility) येऊ शकते.पीसीओडी हे महिलांमधील वंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. गर्भधारणा राहण्यासाठी ओव्हूलेशन होण्याची गरज असते. मात्र ओव्हूलेशनच्या कार्यात अंडाशयातील गाठींमुळे अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे महिलांचे आई होण्याचे स्वप्न भंगू शकते....

कधी कधी अशक्तपणा (Weakness) येऊ शकतो.. पीसीओडीचा स्त्रीयांच्या संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. हॉर्मोन्सच्या कार्यात अडथळा आल्यामुळे महिलांना हॉर्मोनल असंतूलनाला सामोरे जावे लागते. ज्यामुळे त्यांना सतत कंटाळवाणं आणि थकल्यासारखं वाटू लागतं. 

हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. केसांचे योग्य पोषण न झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. शिवाय या काळात केस मोठ्या प्रमाणावर गळतात. हॉर्मोन्स असंतुलनामुळे तुमचे केस गळत असल्यामुळे यावर बाह्य उपचार करण्यापेक्षा पीसीओडीवरील उपचार करणे गरजेचे आहे....चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स (Pimples) येतात. अनेक महिला पिंपल्स आणि काळे डाग घालविण्यासाठी पार्लरमध्ये उपचार घेतात. मात्र या समस्येचं मुळे तुमच्या शारीरिक समस्येमध्ये दडलेले असते. 
पीसीओडीमुळे हॉर्मोन्सचे कार्य बिघडते. हॉर्मोन्सच्या बदलाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसू लागतो. अशा महिलांच्या चेहऱ्यावर राट केस दिसू लागतात. ज्यांना मॅनेज करणं अक्षरशः कठीण जातं. हे काढून टाकले तरी पुन्हा पुन्हा चेहऱ्यावर उगवत राहतात. ज्यामुळे तुमचा चेहरा विद्रूप दिसू लागतो..."


" पण हे सगळं नक्की होतं कशामुळे...??"


"प्रीती.. आजकाल जीवनशैली वेगाने बदलत आहे. कामाचा ताण - तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहारकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. सतत जंक फूड आणि पॅक्ड फूड खाण्याचा देखील शरीरावर चुकीचा परिणाम होतो.

जर तुमच्या आई अथवा बहिणीला पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हालाही पीसीओडीची समस्या निर्माण होऊ शकते. पीसीओडी ही एक अनुवंशिक समस्या आहे.

आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे नियमित व्यायामाची शरीराला फार गरज असते. मात्र जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला पीसीओडीचा सामना करावा लागू  शकतो. 
अशी अनेक कारणे असतात.

डॉ. नीताने सर्व विस्तारपूर्वक प्रीतीला समजवल्याने प्रीतीच्या मनावरचा ताण आता हलका झाला.. ती ही आता बऱ्यापैकी मोकळी होऊन बोलु लागली.. "डॉक्टर.. पण यातुन पूर्ण बरं वाटतं का..?? यावर उपचार कसे घ्यावेत...?"

"काही पथ्यं पाळून... नियमित योगा, सुर्यनमस्कार, व्यायाम आणि योग्य उपचार यांनी पीसीओडी बरी होऊ शकते.."

"डॉक्टर.. पीसीओडीसाठी कुठल्या मेडिकल टेस्ट करणं पण गरजेचं आहे..?"


"पीसीओडी तपासणीसाठी सोनोग्राफी केली जाते. पोटाच्या कोणत्याही समस्येसाठी करण्यात येणारी प्राथमिक वैद्यकीय चाचणी आहे. सोनोग्राफीमधून डॉक्टरांना तुमच्या स्त्रीबीजाची वाढ समजू शकते. जर पीसीओडीची समस्या असेल तर त्याचा परिणाम तुमच्या स्त्रीबीजाच्या वाढीवरदेखील होते. त्यामुळे पीसीओडीची तपासणी करताना डॉक्टर सर्वात आधी रुग्णाची सोनोग्राफी करतात.

हॉर्मोन्स टेस्ट करून तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे का हे समजू शकते. यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स (Follicle Stimulating Hormone), ल्युटेनायझिंग हॉर्मोन्स (Luteinizing hormone), टेस्टॉस्टेरॉन (Testosterone) अशा काही हॉर्मोन्स टेस्ट करून उपचार करता येतात.."

"खूप माहिती दिलीत तुम्ही..दिवसेंदिवस वाढत जाणारी स्वप्न पूर्ण झाली नाही की माणूस निराश होतो. खरंतर बघणाऱ्या माणसांना ती व्यक्ती खूप सुखात आहे असं वाटू लागतं पण आतमध्ये एक निराशा मन पोखरत असते. मला ही असा ताण येतच असतो की पुढे मी कोणतं करीअर निवडावं.. आई बाबांच्या आर्थिक परिस्थितीला ते कसं पेलवेल...? पण आता मला या तणावाचे नियोजन करून pcod वर मात करायला तुम्ही मदत कराल ना ?"

" हो नक्कीच प्रीती.. आपण आधी तुझ्या महत्वाच्या चाचण्या करू... आणि मग उपचार करू....!!"

सयांनो.. वरवर साधी दिसणारी लक्षणं.. कधी कधी मोठं लपवत असतात.. तेव्हा वेळीच उपचार घेतलेले चांगले.. अशानेच अवघड वाटेवरुन चालणं सोप्पं होईल.. नाही का??

✍️ प्रियांका सामंत

(कथा नावासह शेअर करण्यास हरकत नाही)